Thursday, 6 August 2020

तो अडकत गेेला...

एकाच वेळी सहा जणांवर संशय. कारण प्रत्येकाचा त्याच्याशी खटका उडालेला. पण त्यामुळे थेट जीव घेण्यापर्यंत हे सहाजण जातील का, असा विचार वारंवार इन्सपेक्टर खडस यांच्या डोक्यात घोळत होता. मग त्यांनी पुन्हा एकदा सर्व घटना आणि संशयितांची माहिती कसून गोळा करणे सुरू केले. आणि आठवडाभरात सर्व चित्र स्पष्ट झाले. आरोपी गजाआड झाले.

मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत, विशेषत: व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाची सुरुवात सात-आठ वर्षांपूर्वी झाली. नजिकच्या गावातून रोजगारासाठी आलेला नंदन पाच भावांमधे सर्वात धाकटा. त्याच्या मित्राच्या मामाचे झेरॉक्स सेंटर होते. तेथे कामाला लागला. दिवसाचे जेमतेम शंभर रुपये मिळत. वर्षभर नोकरी करताना झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी यंत्राच्या सगळ्या बाबी त्याला कळाल्या. कारण कधी यंत्र बिघडले तर दुरुस्तीला येणाऱ्या इंजिनिअर सर्वेशसोबत तो लहान मुलासारखा कुतुहलाने असायचा. बाकी शिक्षणात गती नसली तरी झेरॉक्स यंत्राचे बारकावे त्याला आत्मसात झाले. कधी सर्वेशकडे जास्तीचे काम असले तर तो नंदनला यंत्र दुरुस्तीसाठी पाठवायचा

पाहता पाहता वर्षभरातच तो वाकबगार झाला. अगदी सर्वेशच्या बरोबरीने त्याचा व्यवसाय चालू लागला. आता मित्राच्या मामाच्या दुकानावर काम करण्याची गरज नाही, असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने धडपड सुरू केली. दुरुस्ती कामाच्या निमित्ताने ओळख झालेले बँकेचे मॅनेजर हरिवंश यांनी त्याला कर्ज मिळवून दिले. ते घेऊन त्याने मध्यवस्तीत एक छोटासा गाळा घेऊन झेरॉक्स कॉपी काढून देणे, यंत्र दुरुस्ती, इंटरनेट आणि सोबत पुस्तक बांधणीचा व्यवसाय सुरू केला. नशिब असे जोरावर होते की, दोन वर्षातच त्याच्या कामाचा व्याप प्रचंड वाढला. आजूबाजूच्या शहरातूनही काम मिळू लागले

ज्या इमारतीत त्याचा छोटासा गाळा होता. तेथील एक अख्खा मजला त्याने खरेदी केला. दहा जणांना रोजगार मिळाला. लक्ष्मी मल्टी सर्व्हिसेसची स्थापना केली. दुसरीकडे सर्वेश बराच मागे पडला. पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात सर्वांसमक्ष वादाचे प्रकार तीन चार वेळा झाले. अखेर दहा-वीस हजार रुपये देऊन त्याने ते मिटवले. आता नंदनला इमारतीच्या वरच्या मजल्यावरचा आणखी एक गाळा हवा होता. त्यासाठी तो गाळा मालक चंदनमल यांना भेटला. तर ते प्रचंड संतापले. मग दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्या भांडणानंतर नंदन कितीतरी दिवस स्वत:वर नाराज होता. दरम्यानच्या काळात आई-वडिल वारले. भाऊ आपापल्या नोकरीत मग्न झाले

अशा स्थितीत त्याच्या आयुष्यात प्रणितानं प्रवेश केला. एका पुस्तकाची झेरॉक्स करण्यासाठी ती आली होती. दिसायला जेमतेम असली तरी तिचं बोलणं अतिशय प्रभावशाली होतं. एका सामाजिक संघटनेत ती काम करत होती. नंदनने तिच्याकडे प्रेमाची कबूली दिली. रेशीमगाठीत बांधले जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तिने स्पष्टपणे होकार दिला नाही किंवा नकारही दिला नाही. संघटनेत मला विशिष्ट पदापर्यंत प्रगती करायची आहे. ते पद मिळाले की नक्की विचार करेन, असे ती म्हणाली. नंतर दोघांच्या भेटीगाठी खूपच वाढल्या. मध्यमवर्गीय घरातील प्रणिताला फक्त आई आणि एक भाऊ होता. त्यामुळे लग्नात फारशा अडचणी येणार नाहीत, असा नंदनचा कयास होता. पण तो चुकीचा ठरला. एक दिवस दुपारी तो कामात मग्न असताना प्रणिताच्या संघटनेचा सचिव अरुण पाच-सहा जणांना घेऊन आला. नंदनला वाटले त्यांचे काहीतरी कामच आहे. तर अरुणने त्याला सरळ मारहाण सुरू केली. बऱ्याबोलाने प्रणिताचा नाद सोड. नाहीतर माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी देऊन गेला. थोड्यावेळाने स्थिरसावर होऊन त्याने प्रणिताला मोबाईल केला. तर ती खळखळून हसू लागली. माझ्या मागे लागणाऱ्या मुलांना तो असाच मारतो. पण माझे त्याच्यावर प्रेम नाही, असे सांगू लागली. बोलता बोलता तिने आमच्या संघटनेला एक लाख रुपयाची देणगी दिलीस तर अरुण शांत होईल, असे सूचक शब्दांत सांगितले. त्याने चौकशी सुरू केली तर तिच्यासोबत काम करणाऱ्या राकेश, सूरज यांच्याशीही तिचे निकटचे संबंध आहेत. ती त्यांच्यासोबत सहलीला, सिनेमांना जाते, असे कळाले. तो तिच्याबद्दल माहिती गोळा करत असतानाच राकेश, सूरज यांनीही दुकानावर येऊन धुडगूस घातला. जीवे मारण्याची धमकी दिली. यातला सूरज म्हणजे चंदनमल यांच्या पुतण्या आणि सर्वेश म्हणजे अरुणचा मावसभाऊ असल्याचे कळाल्यावर त्याचे डोके भणाणून गेले

प्रणिता, अरुण सारखे एक लाख रुपयांची मागणी करू लागले. यातून मार्ग काढण्यासाठी एकेकाळी आपल्याला मदत करणारे बँक मॅनेजर हरिवंश यांना बोलण्याचे त्याने ठरवले. थोडक्यात प्रकरण त्यांच्या कानावर घातले. त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी बोलावले. पण ती भेट झालीच नाही. सकाळी कामावरील नोकर नंदनच्या फ्लॅटची बेल बराच वेळ वाजवत राहिला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दरवाजा तोडला. तेव्हा नंदन मृतावस्थेत होता. डोक्यावर कोणीतरी जोरदार फटका मारल्याने त्याची कवटी फुटली होती.






No comments:

Post a Comment