Monday, 26 July 2021

महिला संत : महती ते शक्ती

पंढरपूरची वारी म्हटलं की, डोळ्यासमोर विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला वारकऱ्यांचा महापूर येतो. डोळ्यात देव भेटीची आस दाटलेले, भक्तीरसात न्हाऊन निघालेले वारकरी म्हणजे आषाढी एकादशी असे चित्र डोळ्यासमोर येते. महान मराठी संतांनी ही परंपरा सुरू केली. त्यात विलक्षण सत्व असल्याने शेकडो वर्षे उलटून गेल्यावरही त्यात खंड पडलेला नाही. त्याचे एक कारण या परंपरेला मिळालेले महिला वर्गाचे बळ हेही आहे. पुरुषांइतक्याच कदाचित काकणभर अधिक श्रद्धेने महिलाही वारीमध्ये सहभागी होतात. मात्र, संतांची भूमी असलेल्या भारतात पुरुषांच्या तुलनेत महिला संतांची संख्या मोजकीच आहे. पूर्वीच्या पुरुषी वर्चस्वामुळे महिलांमधील भक्तीभाव बाजूला सारला गेला असावा. तरीही त्या काळची समाजव्यवस्था, दडपण बाजूला सारत महिला संत उदयास आल्या. देवभक्तीची एक निराळी परंपरा त्यांनीही विकसित केली. समाजमन घडवण्याचे काम त्यांनीही मोठ्या हिरीरीने केले. त्यापैकी काहीजणींची माहिती पुस्तक रुपात उपलब्ध आहे. काहीजणींच्या जीवनकार्याचे उल्लेख टीव्हीवरील मालिकांमध्ये अधूनमधून येत असतात. पण नव्या पिढी पुस्तकांपासून काहीशी दुरावलेली आहे. मालिका पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतोच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन व्रिशाली गोटखिंडीकर यांनी संतश्रेष्ठ महिला ही वीस भागांची मालिका मातृभारती बेवसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. ती इंटरनेटची सहजपणे हाताळणी करणाऱ्या आणि जिज्ञासू पिढीसाठी उपयुक्त आहे. ही पण एक प्रकारे वारकरी सेवाच आहे. संतांविषयीचा ठेवा तरुण पिढीला दिला आहे. संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई अशा अनेक थोर महिलांची महती, शक्ती या मालिकेतून त्यांनी मांडली आहे. गोटखिंडीकर यांचे अध्यात्मिक लेखन विपुल आहे. दत्त अवतार, नवदुर्गा, महती शक्तीपीठांची, नवनाथ महात्म्य, नर्मदा परिक्रमा, हरतालिका अशा विविध विषयांवर त्यांनी लिहिले आहेच. शिवाय पुनर्भेट, प्रारब्ध, अघटित, अचानक, अतर्क्य, सुनयना, चित्रकार, माणसांच्या गोष्टी, बँक डायरी ३२४ कथा, २५ कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहे. वेबसाईटवर पीडीएफ रुपातील हे सारे साहित्य पाहून आपण थक्क होतो. संतश्रेष्ठ महिला या वीस भागांच्या मालिकेत गोटखिंडीकर यांनी जे म्हटले ते महत्वाचे आहे. त्या लिहितात की, माणूस देवाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही. देवाची महती जाणुन घेणे अथवा त्याचा कृपा प्रसाद घेण्यासाठी कोणी मध्यस्थ आवश्यक असतो. हे काम संत करीत असतात. संकटाशी सामना करू शकणारा समाज घडवण्यासाठी संत पुढाकार घेत असतात. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांसह अनेक संत या मातीत जन्मले. परंतु पुरुष संतांच्या तुलनेत महिलांची संख्या खूपच कमी, अशी अनेकांच्या मनातील खंत गोटखिंडीकरही व्यक्त करतात. या मालिकेतील एकेका भागात त्यांनी महिला संतांची महती, कर्तृत्व अतिशय साध्या, सोप्या भाषेत सांगितले आहे. काही ठिकाणी या संतांच्या जीवनातील प्रसंग रंजकपणे पेरले आहेत. मांडणीची विशिष्ट अशी पारंपारिक चौकट त्यांनी स्वीकारलेली नाही. शब्दांमध्ये कुठेही क्लिष्टता नाही. महिला संतांच्या अभंग रचना, समाजमनावर केलेला परिणाम आणि आता आपण त्यांच्याकडून नेमके काय शिकू शकतो, याची माहिती त्या ओघवत्या, दार्शनिक रुपात देतात. उदाहरणार्थ संत मुक्ताबाईंविषयी त्या म्हणतात की, गोरक्षनाथांच्या कृपेचाही मुक्ताबाईंवर वर्षाव झाला होता. या कृपेनंतरच मुक्ताबाईंना “अमृत संजीवनीची” प्राप्ती झाल्याचे सांगितले जाते. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपुर्ण अशी मुक्ताबाईंची अभंग निर्मीती आहे. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणुन आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. संत मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी गेल्या. विवेकबुद्धी तर मुक्ताबाईंकडे अत्यंत दृढ होती. म्हणूनच समाजाकडून होणारा अपमान सहन न होऊन ज्ञानेश्वर जेव्हा पर्णकुटीचे दार (ताटी) बंद करून ध्यानस्थ बसले. तेव्हा मुक्ताबाईंनीच त्यांना आर्त हाक दिली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या संत जनाबाई यांच्या आई-वडिलांविषयीही एका अभंगातून शोधलेला धागा त्यांनी वाचकांसमोर मांडला आहे. संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत वेणाबाई यांच्या अभंग रचनातील भावार्थही त्यांनी उलगडून सांगितला आहे. संत बहिणाबाईंचे अभंग अनुप्रास, यमक, अनन्वय अशा अनेक अलंकारांनी नटले आहेत. करूण, वत्सल, हास्य, भयानक, अद्भुत, वीर आणि भक्तीरसाने ओतप्रेत भरले आहेत, असे त्या सांगतात. केवळ मराठीच नव्हे तर इतर प्रांतातील महिला संतांची महतीही मालिकेत वाचण्यास मिळते. त्यामुळे ही मालिका अधिक व्यापक आणि भक्तीचा विचार विस्तारणारी झाली आहे.

No comments:

Post a Comment