Saturday, 30 October 2021

शालिन तलवार

भारतातील सर्वात मोठे राज्य, सर्वाधिक मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या प्रचाराचा ढोल-ताशे आतापासूनच वाजण्यास सुरूवात झाली आहे. जात-धर्म हा भारतीय समाजाचा राजकीय पाया आहेच. तो उत्तर प्रदेशात अत्यंत मजबूत आणि गुंतागुंतीचाही आहे. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी काँग्रेस, समाजवादी आणि इतर काही पक्षांची धडपड सुरू आहे. त्याचा आधार घेत भाजप हिंदू मतांची मोट बांधत आहे. जसजसे निवडणुकीचे वातावरण तापत जाईल तसतसे धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रकार वाढीस लागणार आहेत. त्यासाठी नवनवीन फंडे वापरले जातील. काही दशकांपूर्वी उत्तर प्रदेशात राजकारण्यांच्या तेढीला साहित्य जगतातून ठोस उत्तर दिले जात असे. ते ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्या समाजातील काही मंडळी चूक करत असतील. प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील. साहित्यिक मंडळी समाजाचा एकोपा कायम राखण्यासाठी धडपडत. त्यांच्या कलाकृतींमधून प्रागतिक विचारांचा संदेश दिला जात असे. पण हळूहळू असे तडाखेबंद, निस्पृह आणि प्रगतीशील साहित्यिक झुंडशाहीमुळे लोप पावत आहेत. जे काही शिल्लक आहेत त्यांचा आवाज क्षीण होत आहे. राजकारण तर बाजूला राहू द्या दुटप्पी समाजावर प्रहार करण्याचाही त्यांना विसर पडला आहे. हे सगळे पाहून इस्मत जुगताई यांची प्रकर्षाने आठवण येते. ३० वर्षांपूर्वी म्हणजे २४ ऑक्टोबर १९९१ रोजी या जगाचा निरोप घेणाऱ्या इस्मत यांचे जीवनचरित्र, लेखन अतिशय हृदयस्पर्शी, बोलके होते. वैयक्तिक जीवन एका रंगाचे आणि लेखन अनेकरंगी असा दुहेरी चेहरा त्यांनी ठेवला नाही. वेळप्रसंगी समाजाशी संघर्ष करण्याची, चुकीच्या प्रथांवर बोट ठेवण्याची हिंमत त्यांच्यात होती. त्या उर्दूतील नवसाहित्याच्या आधारस्तंभ होत्या. इस्मतचा अरेबिकमध्ये अर्थ पवित्र तसेच शालिन, नम्र असा होतो. साहित्यिक भाषेतच बोलायचे झाले तर त्या पवित्र तर होत्याच. शिवाय शालिन तरीही धारदार तलवार होत्या. मुक्तपणे आणि अत्यंत निर्भयतेने त्यांनी लिखाण केले. तत्कालिन समाजव्यवस्थेवर टीका केली. बिनधास्त मांडणी करत समाजमन ढवळून काढले. असे असले तरी त्यांच्या सर्व लिखाणात मानवी समूहाविषयी कमालीची करूणा दिसून येते. उत्तर प्रदेशातील बदायू शहरात २१ ऑगस्ट १९१५ रोजी नुसरत आणि कासीम बेग चुगताई दांपत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. चुगताई कुटुंबातील दहा मुलांमध्ये त्यांचा क्रमांक नववा होता. वडिल न्यायाधीश होते. त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे इस्मत यांचे बालपण अलिगढ, आगरा, जोधपूरसह अनेक शहरात गेले. त्या वेळी त्यांनी जी भारतीय संस्कृती पाहिली, अनुभवली त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या बहिणी वयाने त्यांच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. विवाह होऊन त्या सासरी गेल्याने इस्मत यांचे बालपण भावांसोबत गेेले. म्हणून मुलांमध्ये असलेला एक प्रकारचा बंडखोरपणा त्यांच्यात आला. घरात साहित्यिक वातावरण होतेच. विविध प्रकारचे भरपूर साहित्य त्यांनी वाचले. वाचनाचा दिनक्रम सुरू असताना लोकांना जे आवडते ते लिहिणार नाही. मला जे वाटते तेच लिहिन असा निश्चय त्यांनी केला होता. हा निश्चय त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत अंमलात आणला. स्वातंत्र्यपूर्व काळात लिहाफ ही त्यांची पहिलीच कथा प्रचंड वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. तेव्हा त्यांच्या सासरेबुवांनी इस्मत यांच्या पतीला म्हणजे शाहीद यांना एक पत्र लिहिले. त्यात म्हटले होते की, ‘लिखाणासाठी खटला दाखल होणे ही काही फार चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इस्मतने रोज अल्लाह आणि प्रेषितांचे नामस्मरण करावे. आम्हाला तिची काळजी वाटते.’ अशा प्रकारचा काळजीवजा पाठिंबा सासरच्या मंडळींकडून त्यांना मिळाला. या बाबत त्या नशिबवानच होत्या. त्यामुळे घराबाहेरील लढाई त्यांना खंबीरपणे लढता आली. भारतीय साहित्यातील वास्तववादी, परखड लेखक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. आता ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनेक साहित्यिक मंडळी मनासारखा वापर करतात. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांना अधिकार आहे, असे त्या मानत. त्यानुसार त्या जगल्या. प्रत्येक साहित्यकृतीतून स्त्री-पुरुष समानतेचा घोष केला. त्यांनी कायम निम्नमध्यमवर्गीय मुस्लिम समाजातील शोषित, पिडित महिलांच्या जीवनाचे चित्रण केले. कथा लेखन हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. शिवाय गरम हवा, जुगनू, छेडछाड आदी तेरा सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. अशा या चतुरस्त्र लेखिकेची उणिव दिवसेंदिवस वाढत आहे, हीच त्यांच्या व्यक्तिमत्व आणि लेखनाची ताकद आहे. होय ना?

No comments:

Post a Comment