Wednesday, 18 May 2016

हा ‘दरवळ’ आणखी पसरो

हा ‘दरवळ’ आणखी पसरो

विज्ञान कितीही प्रगत झालं. अगदी माणसासारखा दुसरा माणूस तयार करू लागलं. तरीही एका माणसाच्या मनात, खोल तळाशी नेमकं काय सुरू आहे, हे शोधणं त्यापेक्षा कठीण अगदी अशक्य मानलं जातं. माणसाचं मन समुद्रापेक्षाही अथांग आणि खोलवर असतं. त्यात प्रत्येक मायक्रो-मायक्रो सेकंदाला विचारांचे शेकडो बुडबुडे निर्माण होतात आणि तेथेच फुटून जात असतात. काही, बोटावर मोजण्याइतकेच बुडबुडे पृष्ठभागावर येत असतात. आणि त्यावरूनच आपण त्या माणसाविषयीचा अंदाज व्यक्त करत असतो. प्रत्यक्षात जेव्हा खोलात जाऊन चौकशी केली जाते. किंवा काही घटना घडल्यावर तपास केला तर असे लक्षात येते की आपल्याला कळाला त्यापेक्षा हा माणूस वेगळाच आहे. परंतु, आश्चर्य म्हणजे तपासात कळालेला माणूसही पूर्ण कळालेला नसतो. माणसाच्या अंतर्मनात होत असलेल्या या उलाढाली, गुंतागुंती लेखक, साहित्यिक, नाटककार, सिनेमा लेखक, चित्रकारांच्या आवडीचा विषय आहे. कारण त्यात तुम्ही जितके खोलात जाल तितके वर येत राहता. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, वावरणाऱ्या, आपल्याला भेटलेल्या किंवा स्मृतीत राहिलेल्या माणसाला जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या कुवती आणि गरजेनुसार करत असतोच. कारण सोबतच्या माणसाला जाणून घेतल्याशिवाय त्याला पुढचे पाऊल टाकताच येत नाही. जाणून घेण्यातून त्याचे जीवन काहीसे सोपे होत असते. पण जाणून घेतलेल्या माणसांना शब्दांत पकडणे. आणि त्यातून जीवनाचे काही मूलभूत सिद्धांत मांडणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. वस्तुतः आपल्या प्रत्येकाच्या भोवती अगणित माणसं वावरत असतात. त्यापैकी काहींच्या स्वभावातील विक्षिप्तपणा, मतलबीपणा, सत्ता लोलूपता, कुटिलता, नीचता डाचत असते. तर काहींचा दिलदारपणा, सौंदर्य, आसोशीने वागणे, संकटकाळात धावून येणे सुखावून टाकत असते. अशी माणसं शब्दांत टिपणे म्हणजे एक कसबच असते. आणि व्यक्तीचित्रणाच्या पलिकडं जाऊन माणसाविषयी सांगणं हे तर कसबाच्या पलिकडचं कौशल्य आहे. ते प्राप्त असलेल्या मंडळींपैकी एक म्हणजे अंबरीश मिश्र. त्यांच्या सिद्धहस्त, ओघवत्या शैलीतून राजहंस प्रकाशनामार्फत आलेलं `दरवळे इथे सुवास` हे पुस्तक त्यांच्यातील कसबापलिकडच्या कौशल्याची साक्ष तर देतेच शिवाय आपल्या आजूबाजूची माणसं कशी पाहावी, कशी निरखावी आणि कशी मांडावी, हे पण अगदी सोप्या पद्धतीनं सांगतं. माझ्या मते `दरवळे`  त्यामुळेच मनाला भिडत जातं. त्यात मिश्र यांनी सांगितलेली माणसं कळत नकळत समोर येऊन उभी राहतात. अशी एखाद्या कोपऱ्यात ठेवलेल्या मूर्तीसारखी ध्यानस्थ होतात आणि काही क्षणांनी त्यांच्याशी आपला संवाद सुरू होतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यानं सुखावतो. मध्येच त्याच्या आयुष्यातील दुःखाच्या तारेने आपल्याही हृदयावर चरचरीत रेघ उमटते. म्हणून त्या अर्थाने दरवळे इथे सुवास हे पुस्तक व्यक्तीचित्रणाच्या परंपरेतील वेगळ्या धाटणीचे ठरते.

मिश्र मूळचे उत्तर भारतीय असले तरी मुंबई हीच त्यांची कर्मभूमी. इंग्रजी पत्रकारितेत राहूनही मराठी माणूस हाच त्यांचा केंद्र बिंदू. आणि पत्रकार असूनही माणसं वापरण्याऐवजी माणसं खोलात जाऊन बघण्याचा छंद. असा त्रिवेणी संगम त्यांच्यात झालेला दिसतो. तो पुस्तक वाचूनच अनुभवता येईल.

खरं म्हणजे मिश्र यांच्या प्रमाणेच प्रत्येकाभोवती तऱ्हेवाईक, प्रामाणिक, मानी, दिलदार, लहरी माणसं असतातच. फक्त त्यांच्या या स्वभावगुणांना एका सूत्रात रचण्याची प्रतिभा आपल्यात नसते. किंवा आपल्या भोवतीच्या माणसाबद्दल सांगून आपल्याला काय मिळणार. असा स्वार्थी विचार समोर येत असावा. म्हणूनच मिश्र अधिक महत्वाचे ठरतात.

सेलिब्रिटी, नेत्यांच्या खालोखाल पत्रकारांच्या भोवती माणसांची गर्दी असते. सेलिब्रिटींना लोकांना भेटावंसं कारण ते त्यांना जीवन जगण्याची प्रेरणा, आनंद देत असतात. राजकारणी, अधिकाऱ्यांकडून लोकांना त्यांची कामे करून घ्यायची असतात. त्यामुळे ते त्यांच्याशी कामापुरतंच बोलतात. पत्रकारांकडे लोकच नव्हे तर सेलिब्रिटी, राजकारणी, अधिकारीही आनंद, दुःख मांडतात. अडचणी सांगतात. काही सामाजिक चळवळी पत्रकारच उभ्या करून टिपेला नेतात. पत्रकार आणि लोकांमधील आपुलकी, वैराचे नाते जोपर्यंत पत्रकाराला वाटत नाही तोपर्यंत टिकून राहते.

 त्या अर्थाने पाहिले तर माणूस जाणून घेण्याचे, खोलात शिरण्याचे आणि त्यातील वेगवेगळे पैलू शोधण्याचे साधन पत्रकाराच्या हातात असते. त्याचा तो कसा वापर करतो, यावर बरेच काही अवलंबून असते. मिश्र यांनी तो अचूक केल्याचे दिसते. त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेल्या किंवा त्यांनी ऐकलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या व्यक्तींचा दरवळ त्यांनी टिपला आहे. ब्लिटज्‌चे मालक रुसी करंजिया, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, प्रख्यात बंडखोर लेखिका इस्मत चुगताई, फिअरलेस नादिया यांना प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांनी रेखाटले आहे. तर प्रख्यात संगीतदार मदनमोहन, गीतकार शैलेंद्र आणि दांडीचा सत्याग्रह, लॉरेन्स आॉलिव्हिए-विवियन ली याविषयी माहिती गोळा करून ओवली आहे. स्वतःच्या बहिणीविषयीही मिश्र यांनी यात लिहिले आहे.

ही सारी गुंफण करत असताना बहुतांश पत्रकारांमध्ये आढळणारा अहंकाराचा दर्प लिखाणात कुठेही दिसत नाही. जसे घडले तसे किंवा जसे वाटले तसे नम्रपणे मांडले आहे. शिवाय त्यात एक ललित वाङ्‌मय मूल्यही आहे. त्यामुळे प्रत्येक ओळ खोलवर जाणीव करून देणारी होत जाते. विचार करण्यास भाग पाडते. किमानपक्षी गुंतवून तर ठेवतेच. स्वतःची माणूस म्हणून पात्रता, पत्रकारितेची क्षमता जाणून न घेता स्वतःलाच थोर मानणाऱ्या, दुसऱ्यांच्या अपमानात आनंद शोधणाऱ्या आणि जातीय द्वेषातच अडकून पडलेल्या मराठी पत्रकारांसाठी तर हे पुस्तक नवीन वाट दाखवून देणारे, निर्मितीची दिशा सांगणारे आहे.

आपल्या आजूबाजूला असणारी माणसं अशा पद्धतीनं टिपण्याचा काही पत्रकारांनी प्रयत्न केला तर त्यातून एक भलंमोठं साहित्य विश्व उभे राहू शकते. चित्रपट, नाट्य, कादंबरी, कवितेसाठी शेकडो कथानकं उपलब्ध होऊ शकतात, एवढा खजिना पत्रकारांकडे आहे. मसाला बातम्या अन्‌ अहंकार, जातीय द्वेष, कुटिल राजकारण आणि सत्ताधीश होण्याची धुंदी चढलेले पत्रकार स्वतःच्या भल्यासाठी का होईना हा खजिना खुला करतील का?

No comments:

Post a Comment