माणसासाठी सर्वात सोपी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे दुसऱ्यावर टीका करणे. त्याच्या चुका दाखवून देणे. पाणउतारा करणे. जगातील सर्वच माणसे कमी अधिक फरकाने, वेळ प्रसंग पाहून हे काम करत असतातच. कारण स्वत:च्या चुका शोधणे, त्यावर मात करणे त्याच्यासाठी खूपच कठीण असते. आणि जगातील सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल तर दुसऱ्याचे जाहीर, मनापासूून कौतुक करणे. त्यातल्या त्यात सार्वजनिक जीवनात वावरत असणाऱ्या राजकारणी, साहित्यिक, कलावंतांसाठी दुसऱ्याची तारीफ करणे म्हणजे खूपच अशक्य गोष्ट मानली जाते. अर्थात काही मंडळी तोंडदेखले कौतुक करतात. मोजकेच जण हृदयापासून दुसऱ्याचे कौतुक करू शकतात. केवळ कौतुक करूनच थांबत नाहीत तर ज्या व्यक्तीने समाजासाठी मोठे योगदान िदले आहे, अशांचा जाहीर सत्कार सोहळाही करत असतात. कर्तृत्ववान मंडळींच्या ऋणात राहू इच्छितात. अशा ऋणात राहू इच्छिणाऱ्यांचा ग्रुप म्हणून रंगाई परिवाराची ओळख करून दिली तर ते गैर ठरणार नाही. २८ मे रोजी या परिवाराने लोककलावंतांचा जो सत्कार सोहळा केला तो पाहून तर हे निश्चितच म्हणावे लागेल. लोककला हा मराठी कलाक्षेत्राचा पाया असे वारंवार म्हटले जात असले तरी लोककलावंतांची जाण समाजाने ठेवली नाही. नाट्य, चित्रपट, मालिकेतील कलावंतांना जो सन्मान मिळतो. तो क्वचितच लोककलावंतांच्या वाट्याला येतो. त्यासाठीही त्यांना खूप प्रदीर्घ प्रवास करावा लागतो. मराठवाड्यातील प्रख्यात लोककलावंत विश्वास साळुंके यांनी असाच प्रवास करत स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. एवढेच नव्हे तर लोककलावंत घडवण्याचे
कामही केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या लोकनाट्यांनी एक दशकभर रसिकांना मनसोक्त हसवले आणि हसता हसता अंर्तमुखही केले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रा. डॉ. राजू सोनवणे यांच्या रंगाई परिवाराने मुंबई विद्यापीठ लाेककला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, खंजिरी वादक भारूडकार मीरा उमप,सोंगी भारूडकार निरंजन भाकरे, परसराम भुसळे, देविदास धोंगडे, जरिना सय्यद, शाहीर सुरेश जाधव, शोभा दांडगे आदींचा सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी असलेले गणेश चंदनशिवे आता भारतातील सर्वोत्कृष्ट लोककलावंतांमध्ये गणले जातात. प्रचंड लोकप्रिय झालेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील गीत त्यांनी गायले.
यावरून त्यांची महती लक्षात येते. सोंगी भारूडकार निरंजन भाकरे यांच्याविषयीही हेच म्हणता येईल. सामाजिक समस्यांवर कठोर प्रहार करणारे त्यांचे भारुड
ज्याने पाहिले त्याला ते आयुष्यभर विसरता येत नाही. एवढी भाकरे यांच्या सादरीकरणाची परिणामकारकता आहे. खंजिरी वादक आणि भारुडकार मीरा उमप या
देखील उत्तुंग कलावंत आहे. ज्या खुमासदार पद्धतीने त्या मांडणी करतात ती लाजबाब असते. शाहीर सुरेश जाधव यांनी तर आतापर्यंत शेकडो सभा, संमेलने पहाडी आवाजाने गाजवली आहे. शिवरायांचा धगधगता इतिहास सादर करताना प्रेक्षकांनाही सोबत घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. परसराम मुसळे, देवीदास धोंगडे, जरीना सय्यद हे देखील मातब्बर श्रेणीतीलच. या साऱ्यांचा गौरव रंगाई परिवाराने केला. याबद्दल खरे तर मराठवाड्याचे संपूर्ण कलाक्षेत्र रंगाई परिवाराच्या ऋणात राहू इच्छिते. या परिवाराची उभारणी करणारे प्रा. डॉ. राजू सोनवणेही अस्सल लोककलावंत आहेत. पारिवारिक अडचणी आणि स्वभावातील भिडस्तपणा यामुळे ते मुंबईतून परतले. त्यामुळे मुंबईकरांनीच नव्हे तर मराठी कलासृष्टीला त्यांच्यातील प्रतिभेचा अविष्कार तेवढ्या प्रमाणात पाहता आला नाही. मात्र, मुंबईतून आल्यावर १९९९ मध्ये प्रा. सोनवणे यांनी लोककला, नाट्य क्षेत्राची कास सोडली नाही. औरंगाबादेत राहून त्यांनी अत्युत्तम निर्मिती केली आहे. त्यांना नितीन कडू, सोमनाथ आहेर, शोभा दांडगे, अभिजित देशमुख, संजय चिंचोले, कैलास टापरे, अस्मिता पेशकार, रुपाली भावसार यांची साथ मिळाली. गिनिज बुकात नाव नोंदवणारे वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी रंगाईच्या उपक्रमांना उपस्थित राहून त्यांच्या वाटचालीला दिशा दिली. सध्या रंगाईची धुरा अमर सोनवणे, रमेश लांडगे, प्रीतम चव्हाण, संतोष गारोळे, प्रेरणा कीर्तीकर, सीमा पठाडे, भावना अंबोदकर, सुप्रिया कादी, रोशन ठाकूर, अक्षय बनकर, नितीन गुडसूरकर, रोहीत बारवाल, अरुण शर्मा, ऋषिकेश डोखळे, अजिंक्य लिंगायत सांभाळत आहेत. या कलावंतांनी चार लघुपटांची निर्मिती केली. राज्यातील विविध एकांकिका स्पर्धेत पारितोषिके पटकावताना सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रा. सोनवणे यांनी लिहून दिग्दर्शित केलेल्या जागरण : शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण या नाटकाने रसिकांची प्रचंड दाद मिळवली. त्यामुळेच बीड येथे झालेल्या नाट्य संमेलनात रंगाई परिवाराला सादरीकरणासाठी निमंत्रण मिळाले होते. केवळ कलाप्रांतात न राहता हा परिवार रक्तदान, वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमांतही आघाडीवर असतो, हे महत्वाचे. कलावंतामधील संवेदनशील माणूस जिवंत असल्याचेच हे लक्षण आहे ना?
No comments:
Post a Comment