Tuesday, 7 June 2016

आता तनवाणींची खरी परीक्षा




एखाद्या बड्या घराण्यात लाडाकोडात राहिलेली, मनासारखे वागण्याची सवय असलेली, स्वतंत्रणपणे जगणारी मुलगी दुसऱ्या बड्या घराण्यात सून म्हणून गेल्यावर जशी प्रत्येक पाऊल आजूबाजूला पाहून, सासरच्या कर्त्या मंडळींना विचारून टाकते, तशी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची अवस्था झाल्याचे दिसते. शहराची कार्यकारिणी जाहीर करताना त्यांनी ज्या कार्यकर्त्यांना स्थान दिले आहे. काल त्यांनी जाहीर केलेल्या यादीवर नजर टाकल्यास सूनबाईंनी सर्वांच्या सल्ल्याने पदाधिकारी निवडल्याचे लक्षात येते. मात्र, नव्या घरातील नियम, अटी, शर्ती पाळताना आणि रिती रिवाजानुसारच पावले टाकताना त्यांनी स्वत:च्या निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडले नाही. पक्ष मजबूत करताना आपल्याभोवती आणि सोबत विश्वासातील, काम करणारी  मंडळी राहतील, याचीही काळजी घेतली आहे. शिवसेनेतून त्यांच्यासोबत भाजपमध्ये आलेल्यांना वेगवेगळ्या पदांवर क्षमतेनुसार सामावून घेतले आहे. अर्थात ही यादी परिपूर्ण नाही. भाजपमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेल्या काही मंडळींना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे यादी जाहीर होताच अपेक्षेनुसार आरडाओरड सुरू झाली आहे. २५ वर्षे घाम गाळला. ज्या गल्लीत भाजप म्हणताच लोक हाकलून देत होते. तिथे आम्ही काम केले. लोक जोडले. पक्ष नावारुपाला आणला. दोन टर्ममध्ये माझ्यामुळेच एक नगरसेवक झाला. पण बाहेरच्या पक्षातून आलेल्या तनवाणींनी मलाच डावलले, अशा तक्रारी वरिष्ठांपर्यंत, प्रसार माध्यमांकडे होत आहेत. अर्थात राजकारण, राजकीय पक्ष म्हटले की हे आलेच. अगदी पाच पन्नास कार्यकर्ते असलेल्या पक्षातही पदांवरून असे वाद होत असतातच. त्यात भाजपसारखा राज्यात आणि देशात सत्तेत असलेला पक्ष असेल तर तक्रारींची संख्या आणि तीव्रता अधिक असणारच. ही बाब तनवाणींनी आधीच हेरली असल्याने त्यांनी पूर्ण कार्यकारिणी जाहीर केलीच  नाही. इतर अनेक आघाड्यांवर नेमणुका बाकी आहेत. वॉर्डांची स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर होणार आहे. त्यात काहीजणांना सामावून घेतले जाईल, असे सांगून त्यांनी बचावाचे एक पाऊल टाकून ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेतून भाजपमध्ये त्यांच्यासोबत उडी मारणाऱ्या सुरेंद्र कुलकर्णी, जगदीश सिद्ध, हुशारसिंग चव्हाण आदींना पदे देऊन स्वत:भोवती सुरक्षित तटबंदी उभी केली आहे. शिवाय भाजपमध्ये असूनही कायम रस्त्यावर उतरणाऱ्या, लोकांमध्ये उठबस असलेल्या दिलीप थोरात, दामोदर शिंदे, महेश माळवदकर, प्रशांत देसरडा, मंगलमूर्ती शास्त्री, सागर निळकंठ, भाऊसाहेब ताठे, राम बुधवंत, उत्तम अंभोरे यांनाही संधी दिली आहे. निष्ठावंतांच्या बळावरच नेता टिकून राहतो, हे त्यांना पक्के ठाऊक असल्याचेच हे लक्षण आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी सल्लामसलत करून त्यांनी कार्यकर्ते निवडले आहेत. पण केवळ वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि निष्ठावंतांना स्थान दिल्याने जबाबदारी संपली असे तनवाणींना वाटत असेल तर ती त्यांची सर्वात मोठी घोडचूक ठरेल. कारण भाजप म्हणजे एक प्रकारचा काँग्रेस पक्षच आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही प्रचंड गटबाजी, हेवेदावे आहेत. देशपातळीपासून ते अगदी गल्लीपर्यंत नेतेमंडळींचे छुपे समर्थक आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे कार्यकारिणी निवडणे एकवेळ सोपे परंतु निवडलेल्यांकडून काम करून घेणे. त्यांना पक्षाच्या कामासाठी प्रवृत्त करणे प्रचंड कठीण असते. राज्य आणि केंद्रातील सत्तेमुळे एक विशिष्ट प्रकारचा अहम् भाजपमध्ये वाढत चालला आहे. लोकांसोबत राहून लोकांची कामे करण्यापेक्षा स्वत:च्या पदरात एखाद्या कामाची निविदा पडते का, याचा शोध सुरू झाला आहे. काहीजण त्यात यशस्वी होत असल्याचे पाहून निविदा शोधणाऱ्यांची रांग लांब होत आहे. त्यांना लोकांच्या हितासाठी वळवणे, हेच तनवाणींपुढील आव्हान राहिल. आणि हे करताना कोणताही गट-तट दुखावला जाणार नाही ना, याची काळजी घेत प्रत्येक पाऊल टाकावे लागणार आहे.

तनवाणींना अशा कसरतीची सवय नाही. शिवसेनेत असताना थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा संपर्क होता. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी पटत नसतानाही त्यांनी स्वत:चे अस्तित्व कायम राखले होते. प्रदीप जैस्वाल यांच्यासोबतच्या मैत्रीला तडे पडूनही त्यांना फारसा फरक पडला नव्हता. पक्षाचे आणि स्वत:चे कार्यक्रम ते धडाकेबाजपणे राबवत होते. त्याचे श्रेयही घेत होते. भाजपमध्ये त्यांना एवढी अनुकूल परिस्थिती नाही. सातारा-देवळाईची पोटनिवडणूक आणि त्यानंतर तेथील नाला खोलीकरण, सिमेंट बंधारा बांधकामात त्यांना याचा अंदाज आला. औरंगाबादेत शिवसेना हा कायम रस्त्यावर उतरणारा, लोकांमध्ये उठबस असणाऱ्यांचा पक्ष. अपघातग्रस्तांना मदत असो की दोन गटांतील भांडणे किंवा अतिक्रमण हटाव, रक्तदानाची मोहीम शिवसैनिक तेथे असतोच. भाजपमध्ये अशा कार्यकर्त्यांची वानवा आहे. बहुतांश मंडळी नेत्यांभोवती राहण्यात दंग असतात. आणि काही नेते मुंबई, दिल्ली वाऱ्यांमध्ये. त्यामुळे गेल्या काही महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने प्रगती करून शिवसेनेच्या जवळपास जाणारे यश संपादन केले असले तरी पुढील काळात ते यापलिकडे जाण्याची चिन्हे नाहीत. भाजपला खऱ्या अर्थाने शत प्रतिशत भाजप करायचे असेल. औरंगाबादचा कारभार चालवणारी महापालिका एकहाती ताब्यात घ्यायची असेल तर त्यासाठी शिवसेनेसारखे नेटवर्क तयार करावे लागणार आहे. ३६५ दिवस, २४ तास लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागेल. सोबत भाजपच्या पारंपारिक मतदारांना अपेक्षित असलेली विकासाची कामे दर्जेदार होतील, यावर लक्ष ठेवावे लागेल. तरच शिवसेनेच्या तसूभर पुढे जाणे शक्य आहे. आणि हे सारे तनवाणींना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, भगवान घडामोडे यांच्याशी एकाचवेळी जुळवून घेत त्यांच्या सल्ल्याने करावे लागणार आहे. कार्यकारिणी निवडताना पहिले पाऊल सावधगिरीने टाकल्यावर दुसरे पाऊल दमदार तरीही  सावधपणे  टाकण्याची हुशारी तनवाणी दाखवतील काय, याकडे साऱ्या शहराचे लक्ष राहणार आहे.



No comments:

Post a Comment