Wednesday, 7 September 2016

उद्योगी पिढी घडण्यासाठी





प्रत्येक गोष्ट जात-पात आणि धर्माच्याच पारड्यात टाकून ती स्वतःला फायदेशीर अशीच तोलून घेण्याचा उद्योग महाराष्ट्रातील माणूस मोठ्या इमानेइतबारे, अगदी मनापासून करत आहे. मात्र, स्वतःसोबत इतरांनाही जगवणाऱया उद्योगाकडे तो ढुंकूनही बघत नाही. जी मोजकी मंडळी उद्योग, व्यवसाय उभा करत असतील. त्यांना नावे ठेवणे, त्यांच्यावर जाती-धर्माची लेबले चिटकवून टाकणे. त्यांना पूर्ण ताकदीने खाली खेचणे. चारही बाजूंनी घेरून त्याचा उद्योग संपुष्टात आणणे ही जणू काही आपली सर्वात महत्वाची जबाबदारी आहे, असे मानणारे अनेकजण आहेत. त्यामुळेच की काय मराठी मुलुखात इतर प्रांतांच्या तुलनेत उद्योगाची परंपरा फारशी विकसित झाली नाही. स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे तर उद्योजक होणे म्हणजे पापच असे महाराष्ट्रात मानले गेले. शालेय स्तरावर उद्योजकांच्या यशोगाथा फुटकळ रुपात सांगितल्या गेल्या. महाविद्यालयात तर उद्योजकतेचा दुरान्वयाने संबंध नाही. इंजिनिअर कशासाठी व्हायचे तर कुठल्यातरी कंपनीत नोकरीसाठी, असा प्रवाह १९८०-९० च्या दशकात होता. आई-वडिलही मुलांना स्वतःचा उद्योग सुरू करून काय आम्हाला भिकारी करायचे का, असा सवाल करत त्याला नोकरीला जुंपून टाकत. अशावेळी साहित्यकार, लेखकांनीही उद्योजकतेची दुसरी बाजू मांडली नाही. उद्योग सुरू करूनही समाधान, आनंद मिळू शकते. चार जणांची पोटे चालवणे ही देखील मानवतेची सेवाच आहे, असा संदेश दिला नाही. उलट कारखानदार म्हणजे गरिबांचे रक्त शोषण करणारा. त्यांच्या जागा बळकावणारा. अत्याचार करणाराच असे चित्र कादंबऱ्या, कथा आणि नाटक-चित्रपटांमधून, प्रसारमाध्यमांतून रंगवले गेले. त्यात मुळीच तथ्य नव्हते असे म्हणता येणार नाही. पण तमाम उद्योग जगाचा चेहरा काळा करण्यात आला, ते पूर्ण सत्य नव्हते. उद्योजक म्हणजे खलनायक असेच बहुतांश ठिकाणी चित्रीकरण झाले. तेव्हा ते सारे वास्तववादी मानले गेले. पण त्याने झालेले नुकसान अलिकडील काळात समोर येत आहे. इतर प्रांतातील मंडळींनी उद्योगधंद्यात पाय रोवले आहेत. सरकारी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. तेव्हा कुठे मराठी मुला-मुलींनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा. केवळ सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांच्या मागे धावाधाव न करता रोजगार देणारा बनावे, असे आवाहन सर्व पातळ्यांवर सुरू झाले आहे. उद्योग सुरू करण्यासाठी सरकार विविध योजना जाहीर करत आहे. त्याचा काही प्रमाणात फायदाही होताना दिसत आहे. उद्योग जगताशी जवळकीचे नाते असणारी काही लेखक मंडळी यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या सांगत आहेत. या कहाण्या तरुणांना प्रेरणा देणाऱया, आकाशात झेप घेण्याची शक्ती देणाऱ्या आहेत. अशा लेखकांपैकी एक आहेत सुधीर सेवेकर, व्यंकटेश उपाध्ये. यातील सेवेकर म्हणजे औरंगाबादेतील चतुरस्त्र व्यक्तिमत्व. नाट्य,संगीत, चित्रपट, चित्रकला अशा विविध कलाप्रांतात त्यांचा वावर आहेच. शिवाय ते अनेक वर्षे उद्योग क्षेत्रातही कार्यरत राहिले. नाविन्यपूर्णतेचा वसा घेतलेल्या सेवेकरांकडे सोप्या पद्धतीने माहिती मांडण्याचे कौशल्य आहे. त्यांचे जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा हे पुस्तक साकेत प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.  यात ते कौशल्य ठळकपणे जाणवते. ३३६ पानांच्या या पुस्तकात त्यांनी जगप्रसिद्ध ३२ कंपन्यांचा (यात बजाजसह काही महत्वाच्या भारतीय कंपन्या नाहीत, हे थोडे खटकते.) धांडोळा घेतला आहे. गुगल, फेसबुक, इन्फोसिस यांच्याविषयी अलिकडील काळात खूप काही लिहून आले आहे. या कंपन्यांची उत्पादने, शक्तीस्थाने कोणती हे तरुण पिढीला माहिती असेल. पण एच.जे. हेंझ, बेन अँड जेरीज, फेडरल एक्सप्रेस, सिंगर, एव्हॉन आदी कंपन्यांमधील सामान्य मराठी माणसाला फारशी कल्पना नाही. प्रत्येक जण इंटरनेटचा वापर करून गुगलवरून ही माहिती वाचू शकत नाही. त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे महत्वाचा ठेवा आहे. सेवेकर, उपाध्ये यांनी जगप्रसिद्ध कंपन्यांविषयी सांगताना त्यात पाल्हाळिकपणा येणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेतली आहे. उद्योजकीय प्रेरणा निर्माण करणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून पुस्तक लिहिले गेले असले तरी त्यात यांत्रिकता नाही. उलट काही कंपन्यांविषयी त्यांनी दिलेली माहिती उद्योग जगताशी फारसा संबंध नसणाऱ्यांच्या ज्ञानात भर पाडणारीच आहे. उदाहरणार्थ टोयोटा कंपनीचे संस्थापक टोयोडा कुटुंब असले तरी आरंभीच्या काही वर्षानंतर त्यांनी कंपनीचे मूळचे टोयोडा मोटर्स नाव बदलून टोयोटा केले. जपानी भाषेत टोयोडाचा अर्थ फुललेले हिरवेगात भातशेत असा होतो. म्हणजे त्याचा अर्थ शेतीशी निगडीत आहे, परंतु, धंदा तर मोटारगाड्यांचा आहे म्हणून टोयोडा नाव योग्य वाटत नाही, असे वाटल्याने १९३६ साली कंपनीने नाव सुचवा अशी स्पर्धा घेतली. यात आलेल्या २७ हजार नावातून टोयोटा नाव निवडण्यात आले. जपानी भाषेत टोयोटाचा अर्थ समृद्धी आणि सुदैव असा होतो. जो मोटारधंद्याला साजेसा ठरू शकतो. शिवाय जपानी लिपित टोयोटा हा शब्द लिहिण्यासाठी ब्रशचे आठ फटकारे मारावे लागतात. अशा आठ फटकाऱ्यातून तयार होणारे शब्द खूप भाग्य घेऊन येतात, अशी जपानी माणसाची श्रद्धा आहे. म्हणूनही टोयोटा शब्द निवडला गेला, असे सेवेकरांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे अनेक किस्से वाचण्यास मिळतात. बोईंग, फेडरल एक्स्प्रेसविषयी त्यांनी दिलेली माहितीही अशीच मनोरंजक  आणि ज्ञानवर्धक आहे. सर्वच प्रकरणात त्यांनी एक मुद्दा ठळकपणे मांडला आहे. तो म्हणजे सर्व उद्योगांच्या संस्थापकांनी धाडस केले. अपार कष्ट घेतले आहेत. आणि आज या कंपन्या कोट्यवधी लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार देत आहेत. त्यांची कुटुंबे चालवत आहेत. उद्योग म्हणजे घातच आणि तमाम उद्योजक म्हणजे रक्तपिपासू ही काही साहित्यिक, लेखक, चित्रपट आणि राजकीय पक्षांनी रंगवलेली प्रतिमा मुळीच खरी नाही. आज यशस्वी झालेल्या सर्व कंपन्यांनी अनेक संकटे झेलून यशाचे दार उघडले आहे, असेही सेवेकर, उपाध्ये आवर्जून नमूद करतात. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी तरुणांनी स्वतःचा उद्योग उभा केला तर ती खरी मानवतेची सेवा होईल. आणि इतरांना मारण्यापेक्षा त्यांना जगवण्यासाठी लढणे किती बहुमोल असते हेही कळेल. नाही का?

No comments:

Post a Comment