Monday, 23 January 2017

बांगलादेशच्या रक्तरंजित स्वातंत्र्यासोबत बरेच काही




मानवी दुःखाबाबत भारताच्या भूमिकेबद्दल माझी स्वतःची काही धारणा आहे. माझ्या मते, भारतीय लोक एखाद्या गोष्टीबद्दलच्या भावनेची तीव्रता सतत वाढवत नेऊन बेभान होतात. आणि मग त्यातून सुटका कशी करून घ्यायची, हे त्यांना कळत नाही. (पान क्र. २९२) निक्सन म्हणत, पाकिस्तानी लोकांमध्ये भारतीयांपेक्षा कमी अहंगंड आहे. ते स्वतःचं म्हणणं परिणामांची पर्वा करता स्पष्टपणाने मांडतात. (पान क्र. २१). हिंदू प्राध्यापकांना वेचून काढल्याचा पुरावा उपलब्ध आहे...तसंच हिंदू वस्त्या, जुन्या ढाक्याच्या सीमेवर असलेले परिसर आणि जुन्या ढाक्याच्या सीमेवर असलेले परिसर आणि एका मंदिराभोवती उभं राहिलेलं खेडं यांनाही आगी लावण्यात आल्या. त्याचप्रमाणे २६ मार्चच्या रात्री ढाका विद्यापीठातल्या हिंदू वसतिगृहावर झालेल्या हल्ल्यात किमान २५ जण मारले गेले. (पान क्र. ११२) शब्द वाचूनच कानशिलं गरम होतील. भावना भडकतील आणि चीन, पाकिस्तान, अमेरिकेबद्दल खूप संताप व्यक्त होईल, अशा अनेक वाक्यांनी भरलेल्या `ब्लड टेलिग्राम` या पुस्तकातील ही काही उदाहरणे. पण यात केवळ पाकिस्तान किंवा अमेरिकाविरोध नाही. बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध एवढ्यापुरते हे पुस्तक मर्यादित नाही. किंवा तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन कसा होता, हे सांगण्यापुरते सीमित नाही. तर ‘ब्लड टेलिग्राम’ १९७० च्या दशकात जागतिक पातळीवर कशा घडामोडी घडत होत्या, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अत्यंत बिकट प्रसंगातून कसा मार्ग काढत बांगलादेशाला स्वतंत्र केले, सोव्हिएत रशियाने त्यासाठी किती मोलाची मदत केली, चीनला भारताच्या अंगावर सोडण्याचे निक्सन, किसिंजर यांचे डावपेच कसे हाणून पाडले, याची अतिशय सखोल माहिती या पुस्तकात आहे. मैदानावर लढल्या जाणाऱ्या युद्धासोबत कूटनीतीला प्रचंड महत्त्व असते. किमान एकीकडे चीन आणि दुसरीकडे पाकिस्तान, तिसऱ्या बाजूला नेपाळ, चौथ्या बाजूला अफगणिस्तान अशांनी घेरलेल्या भारताला तरी कोणतेही युद्ध सोपे नाही. एक तरी महासत्ता आपल्या बाजूने असली तरच पाकिस्तानसारखा परंपरागत शत्रू अंगावर घेता येतो, हे त्याच वेळी इंदिराजींच्या लक्षात आले होते. त्या दृष्टीनेच त्यांनी एकेक पाऊल उचलले. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धासाठी पूर्णपणे छुपी मदत केली. कट्टर धर्माच्या आधारावर कोणतेही राष्ट्र टिकू शकत नाही, असा संदेश देण्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे तुकडे केले. पाकिस्तानी सैनिकांकडून बांगलादेशातील हिंदूंचे शिरकाण होत असल्याचे स्पष्ट झाल्यावर इंदिराजी आणि तत्कालीन काँग्रेस सरकारची अस्वस्थता वाढली होती. मग भारतातील हिंदू-मुस्लिम एकता कायम ठेवत त्यांनी पाकिस्तानची जी अभूतपूर्व कोंडी केली ती काँग्रेसच्या चाणाक्ष धोरणांची साक्ष देणारीच आहे, असे हे पुस्तक सांगते. बांगलादेश स्वतंत्र होऊन अर्धशतक होण्यास काही वर्षे बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणाचे संदर्भ तेच राहिले का? अमेरिका हा खरेच भारताचा विश्वासार्ह मित्र होऊ शकतो का? अमेरिकेची परराष्ट्र व्यवहार धोरणे काय आहेत? नवे राष्ट्रपती ट्रम्प पाकविरोधी भूमिका घेतील का? पुतीन यांच्या नेतृत्वात दिवसेंदिवस बलशाली होत चाललेला रशिया भारताच्या मदतीला धावून येईल की पाकिस्तानच्या पारड्यात झुकते माप टाकेल. महासत्ता चीन पाकचा कायमस्वरूपी मित्र आहे का? उद्या खरेच काश्मीरवरून भारत-पाकचे युद्ध भडकले तर चीन, रशिया, पाकिस्तान या महासत्ता कोणाच्या बाजूने असतील? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ब्लड टेलिग्राम हे गॅरी बास यांनी हजारो दस्तऐवजांचा अभ्यास करून लिहिलेले, दिलीप चावरे यांनी अनुवादित केलेले आणि डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले पुस्तक मदत करते. १९७१ म्हणजे रशिया आणि अमेरिकेमधील शीतयुद्ध शिगेला पोहोचलेला काळ. रिचर्ड निक्सन आणि किसिंजर यांनी केवळ इंदिरा गांधी आणि भारतीयांविषयी असलेल्या वैयक्तिक आकसापोटी पाकिस्तानला किती टोकाचे झुकते माप दिले. एवढेच नव्हे, तर भारताविरुद्ध युद्धात उतरण्यासाठी चीनची मनधरणीही केली होती. इंदिराजींची कूटनीती आणि भारतीय लष्कराचा पराक्रम यामुळे भारत ते युद्ध जिंकण्यात कसा यशस्वी ठरला होता, हे ब्लड टेलिग्राम वाचल्यावर स्पष्ट होते. आणि युद्ध नको, युद्ध नको, असा भारतीयांचा आग्रह असल्याचे चित्र प्रसारमाध्यमे आणि काही राजकीय पक्ष, धार्मिक संघटना सांगत असल्याचे तरी पाकिस्तानची निर्मिती भारतीयांना कधीच पसंत पडलेली नाही. एका युद्धाने ही निर्मिती पुन्हा संपवावी, अशी बहुतांश भारतीयांची (काँग्रेस समर्थकही) १९४७ पासूनची तीव्र इच्छा असल्याचेही या पुस्तकातून लक्षात येते. मानवाचा इतिहासच युद्धाने भरला आहे. प्रत्येक शंभर वर्षांत पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात कुठेना कुठे युद्ध झालेच आहे. कारण रक्त सांडणे, हिंसा करणे हा माणसाचा मूळ स्वभावच आहे. त्यापासून त्याची कोणताच धर्म सुटका करू शकला नाही. उलट धर्मानेच रक्त सांडण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांचे राज्यकर्ते कायम युद्धाच्या तयारीत असतात किंवा स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रे जमवून ठेवत असतात. त्याला भारतही अपवाद नाही. हे ब्लड टेलिग्राम वाचताना लक्षात येते. शिवाय बांगलादेशाच्या स्वातंत्र्याने नेमके काय सिद्ध झाले? भारताच्या पदरात काही पडले का? धार्मिक तेढीचे राजकारण करणारे काही धडा शिकले आहेत की नाही? काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान करत असलेले प्रयत्न म्हणजे भारताने १९७१ मध्ये केलेल्या पाकिस्तानच्या तुकड्यांचा परिणामच आहे हे स्पष्ट होते. आणि आता काश्मीरमध्ये पाकला रोखण्याचे आणि पाकचे आणखी तुकडे करण्याचे कोणते मार्ग आहेत, याचेही चिंतन करण्यास हे पुस्तक भाग पाडते. आणि अशा अनेक संदर्भ आणि चिंतनात्मक विषयांची एकत्रित मांडणी असल्याने ब्लड टेलिग्राम वाचकांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरते. भारताच्या वर्तमान आणि भविष्याची काळजी, आस्था असलेल्या प्रत्येक अभ्यासकाने ते आवर्जून वाचावे, एवढे त्याचे मूल्य निश्चितच आहे.

No comments:

Post a Comment