कुटुंब म्हणजेकेवळ परस्परांसोबत शरीराने राहणे नव्हे. कुटुंब म्हणजे केवळ हास्य, विनोद आणि आनंदच नव्हे, तर कुटुंब म्हणजे जबाबदारी, ताणतणाव आणि परस्परांच्या दु:खात, अडचणीत मदतीला धावून जाणेही आहे. कुटुंबातील सारे जण एकसारखे नसतात. भांड्याला भांडे लागतेच आणि त्यातून संघर्षाच्या ठिणग्या उडतात. कधी कोणाच्या वाट्याला अपमानाचे प्रसंगही येतात. पण ते बाजूला सारून पुढे वाटचाल करायची असते. तरच कुटुंब टिकून राहते. ही वस्तुस्थिती आहे. भारतीय समाज रचनेत तर कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका पिढीने दुसऱ्या पिढीचा सांभाळ करायचा हा संस्कार लहानपणापासूनच बहुतांश कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे केला जातो. अलीकडील काळात कुटुंबे लहान झाली आहेत. एकाच वाड्यात काका, काकू, त्यांची मुले, आजोबा, चुलत आजोबा, चुलती असे राहण्याचे दिवस संपले आहेत. त्याची जागा चौकोनी कुटुंबांनी घेऊन टाकली आहे. आता तर त्रिकोणी कुटुंबांचा जमाना येत आहे. मुलगा किंवा मुलगी आणि आई-वडील म्हणजे कुटुंब अशी धारणा होत चालली आहे. त्यात वृद्ध आई-वडिलांची कित्येकांना अडगळ वाटत आहे. म्हणूनच की काय वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. सध्या भारत जगाच्या पाठीवरील सर्वाधिक तरुणांचा देश असला तरी येत्या ४०-५० वृद्धांचा देश होणार आहे. वृद्धाश्रम कमी पडतील आणि आई-वडिलांना घरीच सांभाळण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी स्थिती नक्कीच येईल. एकीकडे लहान मूल आणि दुसरीकडे लहान मुलासारखे वागणारे माता-पिता अशी दुहेरी जबाबदारी शहरातील तरुणांना पार पाडावी लागणार आहे. पण माता-पित्यांना सांभाळायचे म्हणजे नेमके काय करायचे आणि आपणच का सांभाळायचे, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. त्याची उत्तरे ‘अस्तु’ या मराठी चित्रपटातून मिळतात. केवळ उत्तरेच मिळतात असे नाही, तर कुटुंब व्यवस्थेतील विलक्षण भावनिक ताकदीचा प्रत्ययही देतात.
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या केवळ मनोरंजन पर्वातून मराठी चित्रपट वेगाने बाहेर पडत आहे. अनेक नवे विषय हाताळले जात आहेत. मराठी मनाचे बदलते जग त्यातून समोर येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगण्यातील महत्त्वाच्या मूल्यांविषयी नव्या पिढीला रुचेल, पचेल आणि समजेल अशा पद्धतीने संस्कारही केला जात आहे. अस्तु चित्रपटात तर तो खूपच साध्या आणि तरीही विलक्षण ताकदीने केला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, एमजीएम, शांती नर्सिंग होमच्या वतीने रुक्मिणी सभागृहात तो दाखवण्यात आला. प्रेक्षागृह खच्चून भरले होते आणि अस्तु संपला तेव्हा सर्वांचे डोळे पाणावलेले आणि मन विचारांच्या कल्लोळात बुडाले होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. आणि हीच अस्तुची परिणामकारकता आहे. अल्झायमर या विस्मरणाच्या आजारावर आधारलेल्या या चित्रपटाची कहाणी साधी, सरळ. संस्कृतचे प्रकांड पंडित डॉ. चक्रपाणी शास्त्री म्हणजे मोहन आगाशे त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर मुलगी इरा पाठकच्या (इरावती हर्षे) पुण्यातील घरात राहत असतात. तिचा पती डॉ. माधव (मिलिंद सोमण) समंजस माणूस. तिची प्राध्यापक बहीण राही (देविका दफ्तरदार) मुंबईत एकटीच राहते. विस्मरणाच्या आजाराने ग्रस्त अप्पा एक दिवस इरासोबत बाजारात जातात आणि बाजारपेठेत फिरणारा हत्ती पाहून कारमधून उतरून जातात. वडील हरवल्याचे लक्षात येताच इरा भांबावून जाते. पोलिसांच्या मदतीने वडिलांना शोधू लागते. माधवही तिला मनापासून मदत करतो. अप्पा हरवल्याची बातमी कळल्यावर राहीदेखील इराकडे येते. पण ती इराइतकी हळवी नाही. ज्यांची स्मृतीच नष्ट झाली आहे तो माणूस मृत असल्यातच जमा आहे, असे म्हणत ती मुंबईकडे निघते. दुसरीकडे लहान मुलासारखे झालेले अप्पा माहुताच्या (नचिकेत पूर्णपात्रे) कुटुंबासोबत फिरू लागतात. माहुताची पत्नी चन्नम्मा (अमृता सुभाष) अप्पांना लहान मुलासारखे सांभाळू लागते. अखेरीस पोलिसांच्या शोधमोहिमेला यश येते आणि अप्पा सापडतात. त्यांना इराकडे सोपवताना चिन्नम्मा जे सांगते ते कुटुंब व्यवस्थेतील आशा, अपेक्षा आणि सुखाचे सार आहे. जे जसं असावंसं वाटतं तसं त्या क्षणाला असणं म्हणजे ‘अस्तु’ हा दोन शब्दांतील मोठा अर्थ उलगडतो. आपण कोण, असा प्रश्न हजारो वर्षांपासून प्रत्येक संवेदनशील मनाला पडतो. आपलं नाव, व्यवसाय, कुटुंबाची आठवण म्हणजे स्मृती हीच आपली ओळख आहे. पण स्मृतीच नष्ट झाली तर काय, असा विचारही हा चित्रपट मांडतो. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी खूपच तपशिलात दिग्दर्शन केले आहे. बुद्धिमान आणि प्रचंड स्मृती असलेला प्राणी अशी ओळख असलेल्या हत्तीचा त्यांनी वापर प्रतीकात्मक करून त्यांच्यातील प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. डॉ. मोहन आगाशे यांनी उभा केलेला अप्पा उत्तुंग उंचीवर जातो. लहानपणीच मातृछत्राला पारखे झाल्याने चन्नम्मात आई शोधणारे अप्पा सर्वांना हलवून टाकतात. इरावती हर्षे यांनी त्यांच्यातील एका शक्तिमान अभिनेत्रीचा परिचय करून दिला आहे. अमृता सुभाष यांची चन्नम्मा तर अफलातूनच. मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे, अदिती कुलकर्णी, संघर्षा संकट, डॉ. शेखर कुलकर्णी आदींच्याही भूमिका जमून आल्या आहेत. फक्त काही प्रसंगांची लांबी किंचित कमी केली असती तर आणखी चांगले झाले असते.
No comments:
Post a Comment