औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून गच्छंती करणे,
ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पण खासदार चंद्रकांत खैरे
यांनी ती चिकाटीने पाठपुरावा करत करून घेतली.
एवढेच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात कोणतेही स्वारस्य
नसलेल्या डॉ. दीपक सावंत यांची कदमांच्या जागी वर्णी
लावून घेतली. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना म्हणजे
मी कष्टातून बांधलेला वाडा. त्यात कोणत्या खोलीत कोणी राहायचे. किती भाडे द्यायचे. कोणी पोट भाडेकरू
ठेवायचे. प्रत्येकाने पाणी किती वापरायचे, हे ठरवण्याचा
अधिकार मलाच आहे, असे खैरे मानतात. मुंबईकर
साहेबांनीही त्यांना ही मोकळीक वेळोवेळी दिली आहे.
खैरे यांना नको असलेला एखादा पाहुणा मुंबईतून आला तर
त्याला खैरेंच्या मर्जीनुसार वागावे लागते. तसे झाले नाही
तर त्याची घरवापसी होते, याचा अनुभव औरंगाबादकरांनी
अनेकवेळा घेतला आहे. अगदी दिवाकर रावतेंसारख्या
दिग्गजालाही परत जावे लागले. त्यामुळे ज्या दिवशी
कदमांनी खैरेंच्या अत्यंत आवडत्या समांतर जलवाहिनी,
भूमिगत गटार योजनेत हस्तक्षेप केला. त्याच दिवशी ते
पालकमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, हे
स्पष्ट झाले होते. फक्त यावेळी फरक असा झाला की
कदम गेले असले तरी खैरे यांना पूर्वीसारखा संपूर्ण वाड्याचा
मालकी हक्क देण्यात आला नाही. अनेक भाडेकरू,
पोटभाडेकरूंना कदम आणि मातोश्रीच्या धाकट्या पातीकडून
संरक्षण मिळाले आहे. त्याची झलक आठवडाभरापूर्वी झालेल्या
मनपा सभेत पाहण्यास मिळाली. भूमिगत योजनेसाठी 98 कोटींचे
नवे कर्ज घेण्यासाठी खैरे आग्रही होते. त्याला कदमांचा विरोध होता.
ते गेल्यावर हा प्रस्ताव पुन्हा सभेसमोर आला. तेव्हा तो सहज
मंजूर होईल, अशी खैरे यांची अपेक्षा होती. पण कदम समर्थक
राजेंद्र जंजाळ, त्र्यंबक तुपे आदींनी आक्रमक पवित्रा घेत
प्रस्ताव रोखून धरला. आता 9 फेब्रुवारीला होणाऱ्या सभेत नेमके
काय होते, याकडे खैरे आणि कदम समर्थकांचे लक्ष लागले
आहे. मात्र, हे प्रकरण फार वाढणार नाही, अशी खैरे यांनी
बांधाबांध सुरू केल्याचे दिसून येत आहे. कारण वर्षभरात
लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.
त्यात भाजपसोबत युती नसेल तर शिवसेनेतील अंतर्गत
विरोध उफाळता कामा नये, हे खैरे यांनी ओळखले नसते
तरच नवल. म्हणून त्यांनी सर्वांशी मिळतेजुळते घेण्याचा
त्यांचा अत्यंत आवडता उपक्रम सुरू केला आहे. त्याचे पहिले
दर्शन कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रकरणात
पाहण्यास मिळाले. खैरेंच्या निधीतून झालेल्या विकास कामांचे
वाभाडे काढणारे जाधव `शांत` होऊन गेले. आणि दोन दिवसांपूर्वी
संत एकनाथ रंगमंदिरातील सत्कार सोहळ्यात त्याचा पुढचा भाग
पाहण्यास मिळाला. खैरे यांची नुकतीच शिवसेनेच्या नेतेपदी निवड
झाली आहे. त्याचवेळी त्यांचे कट्टर विरोधक आणि मनपाचे माजी
सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांना युवा सेनेचे उपसचिवपद देण्यात आले.
सध्याच्या पिढीचा विचार केला तर शिवसेना नेतेपद म्हणजे
उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील माणूस आणि पुढील पिढीचा
विचार केला तर युवा सेनेतील उपसचिवपद म्हणजे आदित्य ठाकरे
यांच्या जवळचा माणूस. राजकारणी मंडळी काळाची पावले ओळखणे
आणि त्यानुसार पाऊल टाकणे, यात माहिर असतात. खासदार खैरे
यांच्यात ते कसब कमालीचे आहे. त्याच्या बळावरच ते कोणतेही ठोस
विकास काम केले नसतानाही निवडून येतात. त्यामुळे त्यांनी
आपल्यासोबत जंजाळ यांचाही सत्कार होणार आहे, असे कळाल्यावर
त्यास विरोध दर्शवला नाही. आमदार संजय शिरसाट यांनी `खैरे साहेब,
तुम्ही कोणाचे ऐकून कोणाबद्दल काहीही बोलत जाऊ नका` असा थेट सल्ला
दिला. तरी ते त्यांच्यावर भडकले नाही. जंजाळ यांच्या कार्यपद्धतीचे
तोंडदेखले का होईना कौतुक केले. मात्र, जंजाळ यांनी मूळ पवित्रा सोडला नाही.
तुम्ही काहीही बोललात तरी तुमच्यापासून अंतर राखणारच, असे त्यांनी
अप्रत्यक्षरित्या सुचवले. वस्तुस्थिती पाहिली तर खैरे यांच्याकडे
राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांचा
संपर्क आहे. निवडणुकीच्या काळात कोणाला कसे जवळ करायचे,
हे त्यांना पुरते कळाले आहे. केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजप आणि काँग्रेस,
राष्ट्रवादीतील नेत्यांशीही त्यांचा दांडगा संपर्क आहे. सध्याच्या स्थितीत
त्यांच्या तुल्यबळ उमेदवार कोणत्याही पक्षाकडे नाही. पण दुसरीकडे
आदित्य ठाकरेंच्या वर्तुळात वर्णी लागल्याने जंजाळ पावरफूल झाले आहेत.
पुढील काळात कदम औरंगाबादेत नसले तरी ते त्यांच्या समर्थकांना
वाऱ्यावर सोडणार नाहीत. खैरे हिरो की झीरो हे काळच ठरवेल, असे
सूचक वक्तव्य त्यांनी केले आहेच. त्या दिशेने ते कोणत्या मोहीमा
आखून तडीला नेतात आणि अखेरच्या टप्प्यात मातोश्रीवरून
कोणाच्या पारड्यात वजन टाकले जाते, यावर खैरेंचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
No comments:
Post a Comment