जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर शांतता नांदलेली वर्षे अत्यंत कमी आढळतात. कारण हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. त्याच्या रोमारोमात कमी-अधिक फरकाने हिंसा भरलेली आहेच. रक्त सांडणे, सांडलेले रक्त पाहणे आणि रक्तपात करणाऱ्यांना विजयी वीराच्या नजरेने पाहणे हादेखील माणसाचा स्थायी भाव आहे. अगदीच एखाद्याला थेट हिंसाचार जमला नाही तर तो खालच्या पातळीवर उतरत किमान कोणाला तरी अर्वाच्य बोलून, शिव्या घालून हिंसेची भूक भागवेल. हेही जमले नाही तर एखादी मुंगी तरी मारेलच. अशा या माणसाला तर जाती-धर्माच्या नावाखाली हिंसा घडवून आणण्याची मोकळीक मिळाली तर तो राक्षसासारखा कसा वागतो, याचा अनुभव गेल्या आठवड्यात जुन्या औरंगाबादने घेतला. एकमेकांना पाहत लहानाची मोठी झालेली अनेक तरुण मुले एकमेकांवर तुटून पडली. दगडा-विटांचा मारा केला. पेट्रोल, रॉकेल बाँब फेकले. घरे, दुकाने, वाहने पेटवून दिली. पोलिसांवरही हल्ले चढवले. त्यात सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह अनेक पोलिस जखमी झाले. दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाचा, तरुण मुलाचा बळी गेला. हे सर्व करून अखेरीस काय साध्य झाले, असा प्रश्न हातात दगड, विटा, पेट्रोल बाँब घेणाऱ्यांनी स्वत:च्या मनाला प्रामाणिकपणे विचारला, तर काहीच हाती लागणार नाही. पण त्या वेळी दंगलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात आपण प्रतिकार केला नाही, चोख प्रत्युत्तर दिले नाही तर जगू शकणार नाही, असे भय वाटत होते. समोरच्याला आपली शक्ती दाखवून दिलीच पाहिजे, असेही काही जणांना वाटत होते. आणि हे भय निर्माण करून देणारे त्यांचेच भाईबंद होते. आता जेव्हा पोलिसी कारवाई सुरू होईल तेव्हा काही भाई जबाबदारीचा दरवाजा ‘बंद’ करतील. उरलेले दोन-तीन वर्षे मदत करतील आणि नंतर स्वत:च्या कामकाजात गुंग होऊन जातील. एखाद् दुसरा दंगलखोर नेता म्हणून तयार होईल. आणि मग तोही आपल्या समूहाच्या मनात भीती निर्माण करून स्वत:ची नेतेगिरी अधिक मजबूत कशी होईल, याचीच आखणी करू लागेल. कारण औरंगाबादेत पुढे जायचे असेल तर हिंसाचार करणे, तेढ वाढवणे हाच एकमेव मार्ग असल्याचे त्याला कळलेले असेल. याच मार्गावरून चाललो तर लोक आपल्यासोबत राहतील, हे त्याला पक्के ठाऊक झाले असणार. जोपर्यंत औरंगाबादकर हे रस्ते बंद करत नाहीत तोपर्यंत हिंसाचार होतच राहणार आहे. गरिबांचे मरण ओढवून तेढ वाढवणाऱ्यांचे खुंटे बळकट होत जाणार. शहराचे एकेक पाऊल मागे पडत राहणार. माजी महापौर रशीद मामू नेहमी असे सांगतात की, जेव्हा कधी औरंगाबादेत हिंदू-मुस्लिम समाज मागे जे झाले ते विसरून एक येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशी क्षुल्लक घटनेवरून एवढी पेटवापेटवी होते की दोन्ही समाज पुन्हा एकमेकांपासून दूर जातात. केव्हा केव्हा असे घडले याच्या नोंदीही ते देतात. पण एवढा गाढा अनुभव असला तरी नेमके कोण हे घडवून आणते, याविषयी त्यांच्याकडे ठोस माहिती नाही. मात्र, रशीद मामू म्हणतात तसे घडले आहे हे खरेच आहे. मोतीकारंजा येथील अनधिकृत नळ जोडणीविरुद्धची मोहीम कायद्याच्या चौकटीतीलच होती. वर्षानुवर्षे मोफत, मुबलक पाणी वापरणाऱ्यांवर उशिरा का होईना कारवाई सुरू झाली होती. त्यात एका धार्मिक स्थळाची जोडणी तोडण्यात आली. त्यावरून झालेला वाद मिटलाही होता. तेवढ्यात त्यावर एका गटाने फुंकर मारली आणि वणवा भडकला. शहागंज, राजाबाजार, नबाबपुरा, चेलिपुरा, काचीवाड्यात त्याच्या उडालेल्या भडक्याने औरंगाबादचे नाव जगभरात बदनाम करून टाकले. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणारे लच्छू पहिलवान आणि एमआयएमचे नगरसेवक विरोधी पक्षनेते फिरोज खान यांच्यातील वैयक्तिक वाद या सगळ्याच्या मुळाशी असल्याचे सांगण्यात येते. रमजान ईदनिमित्त शहागंज, सिटी चौकात भरणारा मीनाबाजारही एक निमित्त आहेच. या भागातील काही व्यापाऱ्यांचा मीनाबाजारच्या हातगाड्यांना कडाडून विरोध आहे. इतर भागांतील अनेक व्यापारी आमच्या दुकानांसमोर हातगाडी नकोच, अशी भूमिका घेत आहेत. त्यासाठी त्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली होती. पण त्यांना या तक्रारीत पोलिसांनी दखल द्यावी, असे काही वाटले नाही. प्रभारी कार्यभार असताना आणि अतिक्रमण हटावची मूळ जबाबदारी महापालिकेची असताना आपण किती हस्तक्षेप करावा, अशी त्यांची भूमिका होती. औरंगाबाद शहराच्या धार्मिक तेढीचा अभ्यास करून त्यांनी हाताळणी केली असती तर कदाचित पुढचे काही घडले नसते, असे आता वाटते. अर्थात हे सर्व तपासात कितपत ठळकपणे समोर येईल, याविषयी शंका आहे. नेमका दंगा पेटला त्याचवेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील औरंगाबादेत नसल्याचाही परिणाम दिसत आहे. प्रसारमाध्यमांत दीर्घकाळ काम केलेले आमदार इम्तियाज यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षांत वेळोवेळी कमालीची समंजस भूमिका घेतली. जेव्हा कधी वादाचे, तणावाचे प्रसंग आले तेव्हा त्यांनी त्यांच्या समर्थकांना समजुतीचे चार शब्द ऐकवले. एखादा ऐकण्यास तयारच नसेल तर त्याला फटकारण्यासही मागेपुढे पाहिलेले नाही. पण ११ मे रोजी मध्यरात्रीनंतर हिंसाचार उफाळला तेव्हा ते औरंगाबादेत नव्हते. शिवसेनेच्या बाजूने तर कोणी समजूतदार पूर्वीपासूनच नाही. मतपेटीची काळजी जशी आता एमआयएमला आहे, तशी शिवसेनेला आधीपासूनच आहे. त्यामुळे ११ मे रोजी मध्यरात्रीनंतर जे घडले ते पुन्हा कधीही घडू शकते. ते खरेच टाळायचे असेल तर पोलिस, वरिष्ठ अधिकारी, सर्व समाजाच्या धार्मिक तरीही समंजस असलेल्या नेत्यांना एकत्र येऊन शांतता आघाडी स्थापन करावी लागणार आहे. तणाव होण्याची चिन्हे दिसू लागताच तेथे धडकून शांततेचा फवारा मारावा लागणार आहे. सत्य उलगडून सांगावे लागेल. हिंसेने तुमचेच नुकसान होणार हे पटवून द्यावे लागेल. समाज पेटवण्यासाठी दोन हात, एक डोके पुरेसे असते. पण धार्मिक, जातीय आग शमवण्यासाठी शेकडो हात अन् निर्मळ मने लागत असतात. औरंगाबादेत तर असे शेकडो नव्हे हजारो हात, निर्मळ मने एकोप्याने पुढे यावी लागतील. एवढी निर्मळ मने, हजारो हात इथे आहेत का?
No comments:
Post a Comment