एक फोटो म्हणजे छायाचित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते, असे म्हणणे आणि त्यावरून वाद निर्माण करणे चुकीचे आहे. कारण दोन्ही माध्यमांची तशी तुलना होऊ शकत नाही. ज्या गोष्टी शब्दांनी आरपार होतात, तेथे फोटो कामाचा नाही. आणि जेथे फोटो बोलू लागतो तेथे शब्दांची गरज पडत नाही. फोटो या माध्यमाची एक स्वतंत्र शक्ती, अस्तित्व आहे. आभासी आणि वास्तव अशा दोन्ही जगात फोटो लख्ख प्रकाश टाकत असतो. काळाच्या सीमा ओलांडून फोटो आपल्या काहीतरी सांगतो. काही फोटोंच्या फ्रेम्स - चौकटी अशा असतात की त्यात त्याचा विषय पूर्णपणे सामावलेला असतो. विषयाचे तपशील त्या चौकटीतच शोधायचे असतात. किंवा ते तेथेच पसरलेले, विखुरलेले असतात. आणि काही फोटो असे असतात की जेथे त्याच्या चौकटी संपतात त्यापलिकडेही एक जग उभे असल्याची जाणिव करून देतात. केवळ जाणिव करून देत नाहीत तर ते जग शोधण्यासाठी तुमचे मन तो फोटो ताब्यात घेतो. मनाला जगाच्या कानाकोपऱ्याची सफर घडवून आणतो. अनुभवविश्वात फेरी मारण्यास भाग पाडतो. भूतकाळाच्या आठवणी जागवतो. अशा प्रकारचे फोटो काढणे प्रत्येक छायाचित्रकाराला शक्य नाही. कारण त्यासाठी दृष्टी, मन वेगळ्याच जगात नेऊन ठेवावी लागते. कमालीची भटकंती करत नवनवे विषय शोधावे लागतात. त्यावर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या छायाकृतींचे `देवळी – कोनाडा` प्रदर्शन पाहताना हे प्रकर्षाने जाणवले. भंडारे यांच्या विचारशक्तीतील वेगळेपण मनात ठसते. जुन्या आठवणी, बालपणाच्या गोष्टीत रमणे अनेकांना आवडत असते. विशेषतः वयाला चाळिशीचे वेध लागले की आपला मूळ उगम, उदय जेथे झाला तो परिसर खुणावू लागतो. त्यातील तपशील डोळ्यांसमोरून भिरभिरू लागतात. भंडारे यांनी देवळी प्रदर्शनात नेमका हाच वेध वेधला आहे. ५० वर्षांपूर्वी गावांमधून शहरात वस्तीस आलेल्या लोकांचे बालपण वाडा संस्कृतीत गेले आहे. काळाच्या ओघात गावकरी वाडे सोडून गेले. हळूहळू वाड्यांना घरघर लागली. त्यातील स्थापत्य वैशिष्ट्यांच्या खुणा, सांस्कृतिक वेगळेपण लयाला जाऊ लागले. आता तर वाडे नामशेषच झाले आहेत. एक प्रकारे आपली एक समृद्ध परंपरा आपण मोडीत काढली आहे. त्याचे प्रतीक म्हणून भंडारे यांनी शेकडो जुन्या वाड्यांतील देवळी म्हणजे कोनाड्याची विविध रुपे टिपली. त्याचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्रातर्फे एमजीएमच्या कलादीर्घ दालनात भरवले. प्रत्येक फ्रेम पाहताना त्यातील भावार्थ अधिक व्यापक असल्याचे जाणवते. त्या काळी वाड्याची देवळी म्हणजे एक जिवंत व्यक्तिमत्वच होते किंवा एक हक्काचा माणूसच समजा. कोणीही येता जाता देवळीत काहीही ठेवून जावे आणि तिने ते जीवाभावाने सांभाळावे, अशी स्थिती होती. त्यामुळे वाड्यांमध्ये देवळी तयार करताना तिच्यावर छानपैकी संस्कार केले जात. तिला विविध आकार दिले जात. कलाकुसरही केली जात असे. काही देवळ्या मोठ्या आकाराच्या, विशाल हृदयाच्या. तर काही देवळ्या छोटेखानी पण मनात अपार माया भरलेल्या, असे सारे चित्रण भंडारे यांच्या या प्रदर्शनात पाहण्यास मिळाले. छायाचित्रातील प्रत्येक देवळी नकळत आपल्याशी बोलू लागते. मी अमूक एका वाड्यातील. माझे मालक असे होते बरं...त्यांना इतकी मुलं-बाळं होती. त्यांच्या संसारात मी पण होते. पण एक दिवस सारे विस्कटून गेलं...अशी कहाणी ती सांगू लागते. विस्कटणेपणाचे साम्य असले तरी त्यातही विविध रंग भंडारे यांनी भरले आहेत. ते रंग फ्रेम बारकाईने पाहताना डोळ्याच्या कडा पाणावून टाकतात. अशा या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल प्रतिष्ठानचे निलेश राऊत, सुबोध जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. हे प्रतिष्ठान सातत्याने कोणताही दुजाभाव न करता कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहे. त्यासाठी झळही सोसत आहे, हे महत्वाचे.
टोकाचा जातीवाद, धर्मवाद पोसणाऱ्या औरंगाबाद शहराची दुसरी ओळख आता कचरा, खड्ड्यांचे, पाणीटंचाईशी झुंजणारे गाव अशी होऊ लागली आहे. येथे अनेक कलावंत मुंबईची चित्रपट-नाट्य दुनिया गाजवत असली तरी त्यांना येथे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. किंवा मिळाला तरी ते येथे थांबत नाहीत. फोटोग्राफीच्या दुनियेबद्दल बोलायचे झाले तर येथे नाट्य, संगीताप्रमाणेच ही कलाही फारशी बहरली नाही. मोहंमदभाई, कुमार खेकाळे, नरेंद्र लोंढे, पाठक गुरुजी, दीक्षित गुरुजी यांच्यासह काहीजणांनी १९४० ते १९९०च्या काळात औरंगाबाद परिसरातील घटना घडामोडी टिपल्या. १९९६-९७ मध्ये पंढरीनाथ गोंडे पाटील यांच्या पुढाकाराने वर्तमानपत्रातील छायाचित्रकारांनी एकत्र येऊन एक प्रदर्शन आयोजित केले होते. पण ते फक्त शिवसेना वर्तुळापुरते होते. खरेतर प्रसारमाध्यमांतील छायाचित्रकार हे शक्तीशाली, प्रभावी आणि सर्व ठिकाणी वावर असणारे असतात. त्यांच्यासमोरून हजारो बोलके क्षण, प्रसंग जात असतात. त्यापैकी काही त्यांनी छंद, आवड म्हणून टिपले किंवा जे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यालाच एका विचारसूत्रांत बांधत विशिष्ट चाळणी लावून त्याचे प्रदर्शन दर महिन्यातून एकदा भरवले तर औरंगाबादकर नक्कीच त्याचा आनंद घेऊन शकतील. काहीतरी वेगळे केल्याचा अनुभव छायाचित्रकारांनाही येऊ शकेल. भंडारे यांच्यापासून अशी प्रेरणा घेतली तर नयनरसिकांना ते हवेच आहे.
No comments:
Post a Comment