औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावर उतरून ज्युबिली पार्कमार्गे टाऊन हॉलच्या उड्डाणपुलावरून तुम्ही खाली उतरलात की डाव्या हाताला माझ्या अंगा-खांद्यावर लहान मुले, तरुण फुटबॉल खेळताना दिसतील. एका कोपऱ्यात पतंगबाजीही सुरू दिसेल. एका खांद्याला चिरून वर जाणारा रस्ताही लक्षात येईल. मग माझी ओळख सांगण्याची फारशी गरज नाही. तरीही औपचारिकतेचा भाग म्हणून सांगून टाकतो. मीच आमखास मैदान. होय. गेल्या जवळपास सहा दशकात औरंगाबादमध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा मी साक्षीदार आहे. खरं तर मला त्यापेक्षाही जुन्या काळातले पुसटसे आवडतंय. हिंदुस्थानचा शहेनशहा औरंगजेब माझ्यासमोरच्या जामा मशिदीमध्ये लवाजम्यासह आल्याचे मी पाहिले आहे. माझ्या पूर्वेकडील अंगाला लागूनच औरंगजेबाचा मुक्काम होता. सकाळच्यावेळी तो किलेअर्कच्या महालासमोर हातात जपमाळ घेऊन यायचा. नंतरच्या काळात उत्तरेकडे निघालेली पेशव्यांची फौज एकदा माझ्यासमोरून गेली होती, ते मला अंधुकसं आठवतंय. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी मी निजामाच्या ताब्यात होतो. पण माझं रूप तेव्हा एखाद्या ओसाड जागेसारखे होते. त्याला पटांगण, मैदानाचा आकार नव्हता. मोगलांच्या, निजामाच्या काळात सभा, समारंभाचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे माझा वापर त्या कारणासाठी झाला नाही. शिवाय औरंगाबाद शहर म्हणजे शेकडो खुल्या जागांचे एक मोठे गाव होते त्या काळी. म्हणूनही कदाचित राजकीय मंडळी माझ्याकडं वळाली नसतील.
मला माझा जुना काळ अगदी स्पष्टपणे आठवतो, डोळ्यासमोर उभा राहतो. तो भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरचा. निजामाचे जोखड इथल्या जनतेने झुगारून दिल्यावर विजयोत्सवाच्या मिरवणुका माझ्या अंगाखांद्यांवरून खेळत सुभेदारी विश्रामगृहाकडे गेल्या होत्या. त्यातील काही पथकांनी केलेला भारतमातेचा जयघोष माझ्या कानात घुमतोय. औऱंगाबादचे पहिले आमदार माणिकचंद पहाडे यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांची एक सभा गाजली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक जोशपूर्ण भाषणही मी ऐकले. त्यानंतरच्या काळात औरंगाबाद शहरातील सगळे राजकीय वातावरणच थंडावत गेले होते. पण तरुणाईचा माझ्याकडील ओढा वाढला होता. लहान मुले, कॉलेजमधील पोरे पतंगबाजीसाठी मोठ्या संख्येने येत होती. तेव्हा आताच्या एवढे फुटबॉलचे फॅड नव्हते. क्रिकेटच्या लढतीही रंगत. अशा सगळ्या वातावरणात मी पहिली जोरदार राजकीय सभा अनुभवली कामगारांचा बादशहा असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांची. आणिबाणी नुकतीच संपली होती. लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांचा ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू होता. त्याच काळात बीड, परभणीच्या दौऱ्यासाठी जॉर्ज औरंगाबादेत आले होते. तेव्हा बापूंच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्यांनी त्यांना विनंती केली. एवढ्या कमी वेळात गर्दी होईल का, अशी शंका जॉर्ज यांनी मिश्किल स्वरात विचारली होती. तेव्हा प्रचारकही थोडे विचारात पडले होते. कारण माझे आकारमान. तेव्हा मी चारही अंगाने पसरलेला होता. वरच्या बाजूला तटबंदीलगत घळी तयार झालेल्या होत्या. त्यातही लोक बसू शकत. त्यामुळे गर्दी किती होईल, मैदान किती भरेल असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. पण तो काळ काँग्रेसविरोधी लाटेचा होता. जॉर्ज यांच्याभोवती सामान्य व्यक्तिमत्वाचा असामान्य माणूस असे वर्तुळ होते. त्याचा परिणाम झाला. माझ्या शरीराचा एकही कानाकोपरा रिकामा राहिला नाही. जागा मिळेल तिथे अगदी एका पायावरही लोक उभे होते. महिलाही त्यात मागे नव्हत्या. त्याच सभेत औरंगाबादच्या लोकसभेचा निकाल लागला होता. मी खास झालो आम लोकांसाठी. त्यानंतरची मोठी सभा मला आठवते ती 1986ची. पंतप्रधान राजीव गांधी यांची. काँग्रेसने खूप गाजावाजा केला होता. पण अपेक्षेएवढे लोक आले नव्हते. आमखास मैदानाचा रिकामा भाग असं सांगणारी छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक सभा माझ्या साक्षीने झाली. तिला तुफान गर्दी उसळली होती. मग गर्दीकडे हात दाखवत बाळासाहेबांनी काँग्रेसची खिल्ली उडवली होती. आमखास मैदान भरवायचे म्हणजे अंगात दम लागतो, असं ते म्हणाले होते. आणि माझं नामकरण शिवाजी मैदान असेही करून टाकले होते. नंतर काय झाले कोणास ठावूक बाळासाहेब ठाकरे माझ्याकडे फिरकलेच नाही. त्यांनी माझा धाकटा बंधू असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे लक्ष वळवले होते. असो, ठाकरेंशिवाय पुढे चालून शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले, सोनिया गांधी यांच्याही सभा झाल्या. पण खच्चून गर्दी, पाऊल ठेवायला जागा नाही, असे कधी झाले नाही. त्यामुळे आता आपले काही खरे नाही, असे मला वाटू लागले. त्यातच चारही बाजूंनी अतिक्रमणे, बांधकामे होऊ लागली. आणि आता आपण कधीच भरणार नाही, अशी खात्री पटू लागली. ती अजूनही कायम आहे. अपवाद दोन-तीन वर्षांपासून होणाऱ्या असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांचा. त्यांच्या सभांना तरुणाईंची मोठी गर्दी उसळते आहे. ती आता किती दिवस, किती वर्षे कायम राहते. नवा एखादा दमदार नेता येतो का बघूयात.
No comments:
Post a Comment