कुठे नेऊन ठेवणार औरंगाबाद माझे?
कधीही दंगल उसळू शकते असा माहोल असलेले, धुळीने, खड्डयांनी माखलेले, पाणी टंचाईने त्रस्त झालेले औरंगाबाद शहर सध्या लुटारूंच्या धुमाकूळाने गांगरले आहे. विशेषत: व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. आपले संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलिस दल कधी हल्लेखोर, लुटारूंना जेरबंद करणार आहे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण अशा सरकारी यंत्रणांकडून वर्षानुवर्षे निराशा पदरी पडली आहे. त्याची आता सवयही झाली आहे. एकमेव पोलिस दलाचा आधार होता. तो देखील निखळत चालला आहे की काय, असे त्यांना वाटू लागले आहे. कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे, अशी सूर आता व्यक्त होत आहे. हे सारे सांगण्यामागे गेल्या दोन-तीन आठवड्यातील धक्कादायक, चिंताजनक घटना आहेत. वर्धमान नागरी सहकारी संस्थेचे पिग्मी एजंट म्हणून काम करणारे दिलीप शांतीलाल पांडे गेल्या बुधवारी म्हणजे २० फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास ग्राहकांकडून रक्कम गोळा करून कार्यालयाकडे परतत असताना जुन्या मोंढ्याजवळील तक्षशिलानगर येथे लुटारूंनी त्यांच्यावर हल्ला करत ५५ हजार रुपये पळवले. पांडे काल एका विवाह समारंभास आले होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. आपण सुरक्षित नाहीत, हीच भावना व्यक्त होत होती. त्या आधीच्या आठ दिवसात चार व्यापारी अशाच लुटारूंना सामोरे गेले. तुमच्या कारमधील ऑइल गळत आहे, असे सांगून त्यांच्याकडील पैसे पळवण्यात आले. आता कोणी पोलिसांच्या बाजूने असेही म्हणू शकते की मोठ्या शहरात चोरीच्या, लुटीच्या घटना घडणारच. जेथे पैसा आहे तेथे हल्ले होणारच. पोलिस नेमके कुठे कुठे लक्ष ठेवणार. प्रत्येक गल्लीबोळीत तर गस्त घालता येणार नाही. हा मुद्दा मान्य आहेच. पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता एवढी नजर ठेवणे शक्यच नाही. पण हल्ला झाल्यानंतर, लूटारू पसार झाल्यावर त्यांचा माग काढणे. काही तास तर सोडा पण काही दिवसांत लुटारूंना जेरबंद करणे तर पोलिसांना शक्य आहे ना? दुर्दैवाने ते झालेले नाही. व्यापाऱ्यांना लुटण्याच्या पाच-सहा घटनांतील एकालाही पकडण्यात यश आलेले नाही. हे निश्चितच गंभीर आहे आणि म्हणून कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे, असा सूर लागत आहे. दिव्य मराठीने या संदर्भात एक ऑनलाईन सर्वे केला. त्यात सुमारे ५०० व्यापारी सहभागी झाले होते. ८९.८ टक्के व्यापारी म्हणाले की, पोलिसांचा धाक नसल्यानेच लूटमार वाढली आहे. तर ८८.६ टक्के व्यापारी म्हणाले की, अशी लूटमार कधीही आपल्यासोबत होऊ शकते अशी भिती वाटते. त्यांना असे वाटणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे असे पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनाही निश्चितच वाटत नसणार. पण केवळ अभिमान वाटत नाही. या घटना गंभीर आहे. तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असे म्हणून त्यांना जबाबदारी ढकलता येणार नाही. तर कठोर पावले उचलून लुटमार करणारी टोळी गजाआड करावी लागणार आहे. बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते की, लुटीच्या सर्व घटना विशिष्ट भागांत झाल्या आहेत. लुटारूंची मोडस् ऑपरेंडी ठरलेली आहे. ही टोळी बाहेरच्या राज्यातील आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ सुगावा लागणे कठीण आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यात परराज्यातील आरोपी होते. त्यांच्या मुसक्या औरंगाबादेतील पोलिसांनीच काही दिवसांच्या आत आवळल्या होत्या. मग याच प्रकरणात ते शक्य का होत नाही, असे व्यापारी वर्गात विचारले जात असले तर त्यात गैर काय? पोलिसांची संख्या कमी असल्याचेही एक कारण दिले जाते. त्यात तथ्यही आहे. पण पोलिसांच्या मदतीला आता तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर का होत नाही? सेफ सिटी प्रकल्पांतर्गत १२४ कोटी रुपये खर्चून संपूर्ण औरंगाबाद शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत आणण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांनी केली होती. त्याची खूप वाहवा झाली. सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात फक्त ४८ कॅमेरे लागले आहेत. त्यातूनही फार मोठ्या गुन्ह्यांचा सुगावा लागलेले नाही. साताऱ्यात एक राज्य राखीव दलाचा जवान मंगळसूत्र चोरायचा. त्याला सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पकडण्यात आले. त्यानंतरचे मंगळसूत्र चोर बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आधी पाठपुरावा करून औरंगाबादला सेफ सिटी करण्याचा प्रकल्प मार्गी लावला पाहिजे. आणि हे केवळ आयुक्तांचेच काम आहे, असे बोट महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, इ्म्तियाज जलील, संजय शिरसाट, विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दाखवू नये. कारण या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व ही मंडळीही करतातच. या सर्वांनी एकत्र येऊन ठरवले तर महिनाभरात जागोजागी कॅमेरे लागू शकतात. पुढील काळात लुटमारीच्या घटना थांबू शकतात. लोकांचे प्रतिनिधी असे मिरवणाऱ्यांनी लोकांसाठी का होईना एकत्र आले पाहिजे, असे वाटते.
No comments:
Post a Comment