Monday, 6 July 2020

निष्पाप भावंडांचा काय गुन्हा होता?

शहराच्या मध्यभागातील ती वसाहत अशी होती की तिचा प्रत्येकाला अभिमान होता. चारही बाजूंनी सर्व धर्मांची धार्मिक स्थळे होती. मंदिर, मशिद, गुरुद्वारा, बौद्ध विहार, चर्च असे होते. त्या वास्तुही ऐतिहासिक म्हणजे दोन-चारशे वर्षांपूर्वीच्या असे म्हटले जात होते. शिवाय दहा फुटांच्या अंतराने पसरलेल्या लांबलचक दीडशे गल्ल्या. त्यात एकदम दाटीवाटीने घरे. ती देखील जुनाट. दुमजली. प्रत्येक घराच्या खालच्या मजल्यावर हमखास छोटेखानी दुकान, हॉटेल, ऑफिस किंवा पान टपरी, खानावळी. त्यातल्या काही खानावळी, हॉटेल्स, दुकाने तर शंभर वर्ष जुनी होती. या वसाहतीत येणार नाही, असा माणूस विरळाच. काहीही खरेदी करायचे असेल तरी अनेकजण या वसाहतीत येत. काहीजण भटकंती, काही नेत्रसुखासाठी येत. अगदी शरीर सुखासाठीही. कारण एक गल्ली कुंटणखान्यांनी भरलेली होती. पोलिसांच्या नाकावर टिच्चून नव्हे तर पोलिसांच्या मदतीने हा व्यवहार खुलेआम चालत असे. त्याची सर्वांना अगदी सवय झाली होती, असे म्हटले तरी चालेल. वसाहतीचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे अमर आणि राजेश हे लॉटरी तिकीट विक्रेते. आता वयाच्या चाळीशीत पोहोचलेल्या दोघांची दृष्टी लहानपणीच गेली होती. त्यांची विधवा आई धुणी-भांडी करायची. दृष्टीहीन लहान मुलांना कसे सांभाळणार असा प्रश्न तिच्यापुढे होता. नेमकी त्याचवेळी शहरात दंगल उसळली होती. त्यात दंगलखोरांनी तिच्या लॉटरीविक्रेत्या भावाच्या पोटात चाकू खुपसला होता. त्याने अखेरचा श्वास घेण्यापूर्वी तिकिटांचा गठ्ठा बहिणीच्या हातात सोपवला होता. तो तिने अमर-राजेशच्या हातात दिला. इकडून तिकडे फिरताना दोघेजण सिनेमाची गाणी म्हणत. दोघांचाही आवाज खणखणीत होता. अनेक लोकांना त्याचे कौतुक वाटे. ते त्यांच्याकडून तिकीटे खरेदी करत. कधीकधी बक्षिसी देत. काही दुकानदार, हॉटेलचालक त्यांना बोलावून घेत. गाणी म्हणण्यास सांगत. एका गाण्यासाठी कधीकधी शंभर रुपये मिळत. कधी कपभर चहा. एखाद्या ठिकाणी नुसती पाण्यावर बोळवण होत असे. पण मनाने दिलदार असलेल्या या भावंडांनी त्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. ते सकाळी नऊ ते दहापर्यंत सगळ्या धार्मिक स्थळांचा फेरफटका मारत. मग रात्री नऊपर्यँत या गल्लीतून त्या गल्लीत भटकत. दृष्टी नसली तर त्यांचे कान अतिशय तीक्ष्ण होते. शेकडो प्रकारचे वास ते ओळखत. अनेक वर्षे त्यांचे जगणे असेच सुरू होते. अगदी रिनाची अमरशी ओळख मर्यादेपलिकडे वाढेपर्यंत. कमला वर्षभरापूर्वी कुंटणखान्यात आली होती. दिसायला अत्यंत मादक, आकर्षक असलेल्या रिना गाण्याची शौकिन होती. गोड गळ्याची तिला देणगी होती. बाजारातून फिरताना तिच्या कानावर अमर-राजेशचे सूर पडले. तिने त्यांना बोलावून घेतले. आणि पाहता पाहता तिघांच्या जोरदार मैफली सुरू झाल्या. त्यातल्या त्यात शांत स्वभावाच्या अमरशी तिचे सूत अधिक जुळले होते. त्यामुळे ती त्याला स्वत:च्या खोलीत रात्री उशिरापर्यंत थांबवून घ्यायची. पहाटे दोघे भाऊ घराकडे परतायचे. त्यांना पाहिल्यावर त्यांची वृद्ध आई झाडलोट सुरू करायची. ती आता खूप थकली होती. अमर-राजेशचं लग्न झालं नाही. आता आपला वंश चालणार नाही, या कल्पनेने ती दु:खी, कष्टी झाली होती. वाड्यातल्या दोन खोल्या दोघांच्या नावावर करून मोकळं व्हावं, असं तिला वाटू लागलं होतं. कारण दिवसागणिक खोल्यांचं महत्व वाढत चाललं होतं. वाडा मालक जहागिरदार एका खोलीचे दहा लाख रुपये घेऊन बाहेर पडा, असं म्हणत मागे लागले होते. गल्लीच्या तोंडाशी हैदराबादी बिर्याणी हॉटेल चालवणारा हरमेश तीन हजार रुपये महिन्याने खोल्या मला भाड्याने द्या, असा तगादा लावत होता. इकडे या दोघांची रिनासोबत वाढत चाललेली जवळिक कुंटणखाना चालवणाऱ्या कमलाबाई आणि रिनाचे खास चाहते अमीरचंद यांना पसंत नव्हती. एका रात्री अमीरचंदने राजेश-अमरला रिनाच्या खोलीतून अक्षरश: धक्के मारून हाकलून दिले होते. असे सारे सुरु असताना वसाहतीतील एनएम ज्वेलर्सवर मध्यरात्रीनंतर दरोडा पडला. पाच-सात जणांनी मिळून पन्नास लाखांचे दागिने पळवले. दरोडेखोर पळून जात असताना राजेश-अमर रिनाच्या कोठ्यावरून येत होते. रिनाने त्यांच्याकडून खरेदी केलेल्या लॉटरी तिकीटावर एक कोटीचे बक्षिस लागल्याने दोघे खूप खुश होते. गाणी म्हणत होते. या दोघांनी आपल्याला पाहिले, असे त्यांना वाटले आणि दरोडेखोरांनी त्यांच्यावर सपासप चाकूचे वार केले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण त्यांचा मृत्यूपूर्व जबाब घेताना इन्सपेक्टर तालेवारांना काही शब्दच कळाले. त्यातून त्यांनी दरोडेखोर आणि हल्लेखोर, हल्ल्यामागील डोके शोधून काढलेॽ  


No comments:

Post a Comment