Wednesday, 15 July 2020

कलावंत लाईव्हज् मॅटर्स

काळ मोठ्या वेगानं धावत असतो. अनेकांच्या ते लक्षात येत नाही.कलावंतांच्या तर मोठ्या मुश्किलीनं कारण त्यांना आधी यशाचे शिखर गाठायचे असते. एकदा शिखरावर पोहोचले की आजूबाजूला चाहत्यांचा इतका गराडा असतो. पैशांचा महापूर वाहत असतो की काही वर्षानंतर हे सर्व उताराला लागणार आहे. त्यावेळी जीवन कंठण्यासाठी बेगमी केली पाहिजे, याचा विसर पडून जातो. हे तर झाले शिखरावर पोहोचणाऱ्यांचे. पण जे आयुष्यभर झगडून पायथ्याशीच राहतात. विशेषत: नाटक, सिनेमात बॅकस्टेजला काम करतात. त्यांचे काय? कोरोनाच्या संकटाने या प्रश्नाचे भयाण रुप पुन्हा एकदा जगासमोर आले. दररोजचा एखादा प्रयोग, शूटिंग. त्याचा रात्री खिशात पडणारा मेहनताना घेऊन घरी जायचे आणि निपूटपणे दुसऱ्या दिवसाची वाट पाहायची असा त्यांचा जीवनक्रम. कोरोनामुळे तो बंद झाला. जी काही थोडीफार बचत होत ती महिनाभरात संपली. मग स्वत: काय खायचे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे. त्यापैकी कित्येकांनी मित्रांची मदत मागितली. काहीजणांना मिळालीही.पण सगळेच एवढे सुदैवी नव्हते. चारही बाजूंनी अंध:कार दाटून आला होता. अशा प्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलावंत आघाडीने त्यांना मोलाची मदत केली. खरेतर राजकीय मंडळी फक्त मतदारांपुरते पाहतात. असे म्हटले जाते. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे म्हटले जाणे त्यांच्यापुरते पुसून टाकले आहे. कलावंतांना राजाश्रय द्यायचा म्हणजे काय करायचे असते ते दाखवून दिले. त्यांच्या या दातृत्वाचा परिणाम म्हणजे प्रख्यात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह काही प्रथितयश कलावंताचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश. खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. प्रिया म्हणजे तीन दशके मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी. पण त्यांची केवळ तेवढीच ओळख नाही. तर काळाची पावले ओळखण्याची शक्ती त्यांच्यात असावी. या शक्तीचा गरीब कलावंतांना लाभ देण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात आहे. लॉकडाऊनमध्ये राष्ट्रवादीने कोणताही गवगवा न करता तीन हजार लोक कलावंतांना प्रत्येकी तीन हजार रुपये मानधन दिले. त्यामुळे मी या पक्षाची निवड केली. असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून कायम सत्तेत असणारी मंडळी. त्यांची सुबत्ता आणि कलावंतांची गरज लक्षात घेता ही रक्कम पुरेशी नाही, असे काहीजण म्हणू शकतील. पण इतर गडगंज नेते, पक्ष काहीच देत नाहीत. त्यापेक्षा राष्ट्रवादीचे देणे कितीतरी महत्वाचे आहे. असो. राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना स्थान द्यावे. ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी. मालिका कलाकारांना तीस दिवसात मानधन मिळावे. असे प्रिया यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या राजकीय शक्तीचा प्रभावी वापर करून त्या हे सर्व प्रत्यक्षात आणतील. अशी अपेक्षा आहे. कलावंतांनी राजकारणात जावे की नाही या विषयी तीन-चार मतप्रवाह आहेत. राजकीय मंडळी कलावंतांचा काही काळासाठी फक्त वापर करतात, असा आरोप होतो. त्यात तथ्य आहेच. पण व्यवहारातील अंगभूत गुण लक्षात घेऊन काम केले तर राजकारणाातही कलावंतांना निश्चित यश मिळू शकते. दक्षिणेत तर कलावंत हमखास राजकारणाच्या वाटेवर जातात. प्रिया यांच्या रुपाने हा ट्रेंड मराठीमध्येही जोरात यावा. तरच कलावंतांची दु:खे सरकारला कळतील. त्यातील काही दूर करता येतील. प्रिया यांच्याकडे शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस असेही पर्याय होते. पण शिवसेनेत आधीच आदेश बांदेकर आणि मंडळी पाय रोवून आहेत. मनसेची कलावंत आघाडी तर आधीपासूनच कार्यरत आहे. भाजप, काँग्रेस राष्ट्रीयस्तरावर काम करणारे पक्ष. मराठी कलावंत हा निकष त्यांच्याकडे पाळला जाणे कठीण. त्यामुळेच प्रिया यांनी सत्तेच्या जवळ असणारा आणि मराठी माणसांचा बोलबाला असलेल्या राष्ट्रवादीची निवड केली असावी असे दिसते. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय वर्तुळात पाऊल ठेवण्यापूर्वी कोणीही मोठमोठी आश्वासने देतात. कालांतराने स्वत:ची प्रगती होऊ लागल्यावर आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळे गरीब कलावंतांसाठी लढण्याची जबाबदारी प्रिया आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना कायम स्मरणात राहिल. ‘कलावंत लाईव्हज मॅटर्स’ हाच त्यांचा मूलमंत्र असेल, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment