Monday, 14 December 2020

गणित चुकलेला विद्यार्थी

गणित चुकलेल्या विद्यार्थ्याने छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे या प्रख्यात कवी दासू वैद्य यांच्या कवितेतील ओळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आणि भाजप नेतृत्वाला लागू होण्यासारख्या आहेत २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही चव्हाण यांनी बोराळकरांवर सहज मात केली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. तेव्हा प्रचाराला वेळ मिळाला नाही. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात बूथनिहाय यंत्रणा उभी राहिली नाही, असा बोराळकरांचे म्हणणे होते. तेच सत्य मानून यंदाही त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तेथेच देवेंद्र फडणवीस यांचा पहिला डाव चुकला. कारण २०१४ ते २०२० या सहा वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारखी बलाढ्य शिक्षण संस्था ताब्यात आलेल्या चव्हाण यांचे बस्तान आणखी पक्के झाले होते. पदवीधरमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या मतदार नोंदणीत त्यांनी वैयक्तिक लक्ष घालत हक्काचे सुमारे दीड लाख मतदान नोंदवून घेतले. पक्षात उमेदवारीसाठी एकही विरोधक शिल्लक राहणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. विजयाच्या इमारतीचा पाया मजूबत करत एक-एक वीट नीटपणे रचत नेली. तर बोराळकरांनी केलेली नोंदणी चव्हाणांच्या पासंगालाही पुरणारी नव्हती. दुसरीकडे सहा वर्षांत प्रवीण घुगेंनी केलेल्या तयारीकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे घुगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे कमालीच्या दुखावल्या. तीन दशकांपासून संघ सेवेत असलेले घुगे आपल्याला उमेदवारी मिळणार असे गृहित धरून तयारीला लागले होते. त्यांनी स्वत:ची नोंदणी, स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभी केली. अगदी बंडखोरीपर्यंत ते पोहोचले. पंकजा यांनी समजूत घातल्यावर माघार घेत ते प्रचारात सहभागी झाले. पण या साऱ्यातून मुंडे समर्थकांना जो संदेश जायचा तो गेलाच. भाजपला डॅमेज कंट्रोल जमले नाही. आणि ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..! अशी प्रख्यात कवी सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे भाजप, बोराळकरांची अवस्था झाली.

No comments:

Post a Comment