परिवर्तनवादी विचारांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एक इतिहास रचला गेला. ‘दिव्य मराठी’च्या रातरागिणी उपक्रमात किमान १५ हजार महिला अंधारावर मात करण्यासाठी अंधारावर चालून गेल्या. औरंगपुरा येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष केला. इतिहासात नोंद झालेल्या या ऐतिहासिक घटनेचा पाया कसा रचला गेला. रातरागिणी उपक्रमाचा एकूण प्रवास कसा होता, हे वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सांगणे महत्वाचे आहे. तर झाले असे की, गेल्या वर्षी डिसेंबरच्या प्रारंभी सोयगाव तालुक्यात एका शिक्षकाने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. आणि ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटेसरांनी ठोस भूमिका घेतली. दिव्य मराठीची टीम सोयगावात पोहोचली. शोषणामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलींना धीर दिला. संवाद साधत बोलते केले. तेथे 'मौन सोडू चला बोलू' अभियानाचा प्रारंभ झाला. यानंतर ‘दिव्य मराठी’ महिलांवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेवर अतिशय संवेदनशील आणि आक्रमक मांडणी केली. आरोपींवर कठोर प्रहार केले. गर्भातच मुलींचे जीवन उद्धवस्त करणारी एक टोळी ‘दिव्य मराठी’ने गजाआड केली.
पण केवळ वार्तांकन करून थांबता येणार नाही. तर महिलांवर होणारे अत्याचार पाहता, त्यांच्या एकूण जीवनात बदल झाला पाहिजे. आणि या बदलांचे बीज आपणच रोवले पाहिजे, असा विचार ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे व्यक्त केला. आणि तातडीने अंधारावर चालून जातील रातरागिणी ही संकल्पना मांडली. तो दिवस होता १२ डिसेंबर २०१९. वर्षातील सर्वात मोठी रात्र अर्थात २२ डिसेंबर रोजी क्रांती चौकातून औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापर्यंत अंधारावर चालून जायचे ठरले. आणि त्यापुढील दहा दिवसांत आवटेसरांच्या मार्गदर्शनाखाली ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी चीफ रिपोर्टर शेखर मगर, रिपोर्टर रोशनी शिंपी यांच्या पुढाकारात संपादकीय सहकाऱ्यांची एक टीम रातरागिणी आयोजनासाठी झपाटून मैदानात उतरली. त्यावेळचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी स्थानिक पातळीवर नियोजन केले. या उपक्रमात अर्थातच समाजातील प्रत्येक घटकाचा, महिला, युवतींचा सहभाग आवश्यक होता. त्याकरिता विविध जाती, धर्म, संस्था, संघटना, विचारधारेच्या महिलांना ‘दिव्य मराठी’ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले. एका आवाजाला प्रतिसाद देत शेकडो प्रतिनिधी बैठकीला आल्या. संकल्पना ऐकल्यावर त्यांनी हा आमचा कार्यक्रम आहे, आम्ही तो यशस्वी करू असा निर्धार व्यक्त केला. महाविद्यालयीन तरुण, तरुणी देखील हिरीरीने सहभागी झाल्या. अगदी पाच वर्षांची चिमुकली ते ८० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने पाठबळ दिले. काहीजणींनी नियोजनासाठी मौलिक सूचनाही केल्या. औरंगाबाद शहरात रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरणार होत्या. त्यामुळे त्यांच्या वाहनांचे पार्किंग, शिस्तबद्ध मार्गक्रमण आणि घरी परतण्यासाठी बसची व्यवस्था अशी अनेक आव्हाने होती. पण तत्कालिन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेकजणांनी मदत केली.
औरंगाबाद शहरच नव्हे तर उपनगरातील महिलाही मोठ्या संख्येने क्रांती चौकात जमल्या. अपेक्षेपेक्षा दहापट अधिक संख्येने सहभागी होत त्यांनी रातरागिणीची कमान हातात घेतली. डॉक्टर, इंजिनियर, सीए, उद्योजक, परिचारिका, ड्रायव्हर, सामाजिक कार्यकर्ता, प्राध्यापक, शिक्षिका, कलावंत, गृहिणी अशा एक ना अनेक सहभागी झाल्या. मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत होते. लोक कुतूहलाने ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होत होते. क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठणगेट येथे मलखांबाच्या कवायती, पोवाडे, स्फूर्तीगीतांचे गायन असा माहोल होता. औरंगपुऱ्यात महात्मा फुले पुतळ्याजवळ एवढ्या मोठया संख्येने महिला आल्या होत्या की, रात्री बाराच्या सुमारास ‘अंधारावर मात करणारी पहाट झाली’ अशी नोंद जगाने घेतली. महिलांनी रात्री सातच्या आत घरात असलेच पाहिजे, या पुरुषांनी पेरलेल्या भितीयुक्त अंधारावर मात करून प्रकाश वाटेने त्या चालत गेल्या. त्या साऱ्या रातरागिणींना औरंगाबादकरांच्यावतीने लाख लाख धन्यवाद !
No comments:
Post a Comment