Tuesday, 2 March 2021
डफवाली
ओशो रजनीश प्रवचनात सांगत की, अग्नीवर नियंत्रण आणि चाक या दोन शोधांमुळे माणसाचे जीवन बदलून गेले. आगीचा वापर करून तो वन्य श्वापदांपासून स्वत:चे संरक्षण करू लागला. मांस भाजण्याची कलाही शिकला. चाकांमुळे त्याला प्रवास, स्थलांतर सोपे झाले. हा तर झाला बाहेरील शोध. पण माणसाला अंर्तमनातील आनंदाची पहिली वाट कशी सापडली असावीॽ प्रख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी एका व्याख्यानात याविषयी सांगितले. ते म्हणाले होते की, लाखो वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलात आदिवासी टोळीतील कोणीतरी लाकडाच्या पोकळ ओंडक्यावर हात आपटला आणि त्यातून ध्वनी निघाला. तो ऐकून त्याच्या मनात आनंदाचा तरंग निर्माण झाला. या तरंगाचे रुपांतर त्याने पुढे वाद्य संगीतात केले. कोणतेही वाद्य ऐकले की, माणसाचे मन आपोआप त्या ध्वनी तरंगाकडे आकर्षित होते. रक्ताभिसरणावर परिणाम करते. चित्र, नृत्य, नाट्य, अभिनयाप्रमाणेच संगीतही जात, धर्म, पंथ, प्रांताच्या भिंती एका क्षणात जमीनदोस्त करते. अत्युच्च दर्जाचे संगीत आनंदाच्या असंख्य लाटा उसळवते. इराणच्या प्रख्यात डफवादक नघमा फराहमंद जेव्हा डफावर ताल धरतात, तेव्हा हाच अनुभव येतो.
आपल्या मनात इराणची प्रतिमा कट्टर कलाविरोधी देश अशी आहे. त्यात तथ्यही असावे. पण तेथे कलेच्या प्रांतात काहीच घडत नाही. संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनयाची त्यांची कवाडे बंद झाली आहेत, हेही तितकेसे खरे नाही. जगद्विख्यात सिनेमा दिग्दर्शक माजेद माजिदी यांच्या सिनेमातून ते स्पष्ट होते. अनेक इराणी तरुण, तरुणी कलेवर निरासक्त प्रेम करतात. आपल्या कला कौशल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करतात. नघमा फराहमंद त्यात अग्रणी. सोशल मिडिआवर त्यांच्या नावाने सर्च केले तर एक इराणी सौंदर्यवती हातात डफ घेऊन तल्लीन झाल्याचे चित्र दिसते. एक क्षण असे वाटते की, सिनेमातील अभिनेत्रीने व्यक्तीरेखेची गरज म्हणून हातात डफ घेतला असावा. पण पुढे जाऊन पाहाल तर आश्चर्याचे धक्के बसत जातात. नघमांची नाजूक, लांबसडक बोटे अलगद डफाशी संवाद साधू लागतात. त्यातून प्रारंभी गंभीर ध्वनी ऐकू येऊ लागतो. पुढे काय होणार, असा प्रश्न मनाला पडत असताना काही मिनिटांतच डफ अक्षरश: हुंकारू लागतो. जणू काही डफाचा कोपरान् कोपरा बोलू लागतो. आपल्याला काहीतरी सांगू लागतो. पुढे नघमा यांची बोटे इतक्या वेगाने आणि विलक्षण आवेशाने फिरू लागतात. त्या अगदी सहजपणे हुंकाराचे रुपांतर कडकडाटात करतात. हा कडकडाट इतक्या टिपेला जाऊन पोहोचतो की आपण देहभान विसरून जातो. एवढी ताकद नघमा यांच्या वादनात आहे.
भारतात अनेक महिलांनी तालवाद्यांत निपुणता मिळवली आहे. पण धार्मिक बंधनात जखडलेल्या अरबी राष्ट्रांमधील तरुणी छंदापलिकडे जात कला जोपासना करत असतील. व्यावसायिक वादक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असतील, तर ते अधिक कौतुकास्पद आहेच. इराणचे प्रख्यात संगीतकार महमूद फराहमंद यांची कन्या असलेल्या नघमांनी वादन कौशल्य मर्यादित ठेवलेले नाही. त्या जगभरात मैफली करतातच. शिवाय डफ आणि इतर तालवाद्य वादनाचे प्रशिक्षणही देतात. आज युरोपातील अनेक देशात त्यांचे शिष्य आहेत.
त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी संगीतमय प्रवास सुरू केला. आधी त्या फरामर्झ पेव्हार, शांग कामकर यांच्या मार्गदर्शनात संतूर वादन शिकल्या. काही वर्षातच त्या डफ वादनाकडे आकर्षित झाल्या. कारण डफामध्ये आध्यात्मिक ध्वनी असल्याचे त्यांना वाटू लागले. वडिलांकडून वारसाने मिळालेली अलौकिक प्रतिभा, गुरुंचे मार्गदर्शन आणि प्रचंड मेहनत या बळावर नघमा पाहता पाहता पारंगत झाल्या. जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, फ्रान्स, इटली, कुवैत, ऑस्ट्रियातील अनेक महोत्सव त्यांनी गाजवले. त्यांचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्या केवळ इराणी, अरबी संगीत परंपरांच्या वर्तुळापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. बल्गेरियन, तुर्की, भारतीय आणि युरोपिअन संगीतातही त्या समरसून गेल्या आहेत. विविध संगीत संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. प्रख्यात कलावंत अँटोन आपोस्टोलोव्ह म्हणतात की, मी ज्या महिला तालवादकांसोबत काम केले. त्यात नघमा सर्वोत्कृष्ट आहेत. कारण त्या पारंपारिक पद्धतीने डफ वादन करताना नव्या शैलीचे अगदी सहजपणे मिश्रण करतात. त्यासाठीचे एक अतुलनीय तंत्र त्यांच्याकडे आहे. अरबी कलाप्रेमी युवतींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून नघमा परिचित झाल्या आहेत. त्यांनी तालवादक महिलांची एक पिढीच निर्माण केली. अर्थात हे सारे त्यांना इराणमधून बाहेर पडत २०१० मध्ये कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारल्यावर साध्य करता आले. यशप्राप्तीसाठी कोणती तरी चौकट मोडावीच लागते नाॽ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment