Thursday, 18 March 2021

अमेरिकी

जगावर दादागिरी करणारा, भांडवलशाहीचा महामेरू, स्वैराचारी अशी असंख्य दूषणे अमेरिकेला दिली जातात. पण कोणी कितीही नावे ठेवत असले तरी तो महाकाय, महाप्रचंड, अति प्रगत देश आहे. तेथे भौतिक सुविधांची रेलचेल तर आहेच. शिवाय वैयक्तिक स्वातंत्र्याचाही बोलबाला आहे. जगभरातील लोकांना आकृष्ट करणारी शेकडो पर्यटनस्थळे आहेत, ही वस्तु्स्थिती आहे. अनेकांनी त्याविषयी लिखाण केले आहे. प्रवास वर्णनेही आली आहेत. पण तेथील खाद्यसंस्कृती, सामाजिक, सांस्कृतिक जीवन कसे आहे. सामान्य अमेरिकन माणूस कसे जीवन जगतो. त्याचे राहणीमान कसे असते. संकटांना तो कसा सामोरा जातो. तेथील आरोग्य सेवा अत्युच्च दर्जाची आहे, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ती कशी आहे. अमेरिकी लोक परदेशी पाहुण्यांना कशी वागणूक देतात, याविषयी मराठीमध्ये एखाद्या गृहिणीकडून फारसे लिखाण झालेले नाही. ही कसर डॉ. मधु निमकर यांच्या ‘स्वातंत्र्यदेवतेच्या गावात’ या पुस्तकाने ठळकपणे भरून काढली आहे. २००८च्या सुमारास डॉ. निमकर अमेरिकेत वास्तव्यास होत्या. त्यावेळी बलाढ्य महासत्ता आतून कोसळत होती. आर्थिक आघाडीवर स्थिती वाईट होती. सुदैवाने बराक ओबामा अध्यक्ष झाले. त्यांनी एका विशिष्ट दिशेने निघालेल्या अमेरिकेला सर्वसमावेशकतेचा मंत्र दिला. हा सगळा कालखंड डॉ. निमकरांनी पाहिला. अनुभवला. त्यांच्याकडे भारतात असताना लिखाणाचा मजबूत अनुभव होता. एका मोठ्या कंपनीत त्यांनी जनसंपर्काचे विपुल काम केले होते. त्यामुळे त्यावेळी कृषीवलचे आणि आता दिव्य मराठीचे राज्य संपादक असलेले संजय आवटे यांनी त्यांना कृषीवलमध्ये लिहिण्याविषयी सुचवले. त्या लेखांचे पुस्तक म्हणजे ‘स्वातंत्ऱ्यदेवतेच्या गावात’ आहे. सप्तर्षी प्रकाशनाने ते प्रकशित केले आहे. ७० पेक्षा अधिक छोटेखानी लेख असलेल्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अमेरिका देश नेमका कसा आहे, हे अतिरंजित पद्धतीने उलगडून सांगण्याचा, समजावण्याचा डॉ. निमकरांनी मुळीच प्रयत्न केलेला नाही. उलट अमेरिकेकडे निघाल्यापासून ते तेथे स्थिरावण्यापर्यंतचा सारा प्रवास त्यांनी अतिशय सोप्या, सहज शब्दांत मांडला आहे. त्यामुळे प्रत्येक पानावर लेखिका आपल्याशी मनातील भावना व्यक्त करत सहजपणे बोलते आहे, असे वाटत राहते. सर्वात महत्वाचे हा संवाद एका सामान्य भारतीय गृहिणीचा आहे, असे जाणवत राहते. त्यामुळे त्यातील ओलावा, भावनिकता, आपुलकी मनाला भिडते. अमेरिकेची समाज रचना कशी आहे. तेथील दैनंदिन व्यवहार कसे चालतात. भारतीयांचे नेमके स्थान काय आहे. त्यांची तेथील जगण्याची लढाई कशी असते, याची सुरेख, ओघवती मांडणी डॉ. निमकरांनी केली आहे. वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी दिलेली परीक्षा, नायगारा फॉल्स, महानगरी न्यूयॉर्क, घर खरेदी असे अनुभ‌व त्यांच्यातील लेखिका, मुक्त पत्रकाराचा परिचय करून देतात. ग्रेट रिसेशन आणि अमेरिका प्रकरणात त्यांनी त्यावेळच्या आर्थिक संकटाचे अतिशय बोलक्या शब्दांत वर्णन केले आहे. या संकटाने तेथील भारतीयांचे जीवन कसे डळमळले. प्रत्येकाच्या संसारावर कसा परिणाम झाला, हे वाचताना ती कुटुंबेच डोळ्यासमोर उभी राहतात. एका आजारपणामुळे अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेचा आलेला अनुभवही थरथरून टाकतो. जणूकाही आपण सिनेमातील प्रसंग पाहतो की काय, असे वाटते, एवढा जिवंतपणा आला आहे. एकूणात हे पुस्तक अमेरिकेचे एक वेगळेच दर्शन घडवते. तेथील समाजजीवन आतून शोधते, याविषयी शंका नाही.

No comments:

Post a Comment