Tuesday, 11 May 2021
ममता आटवणारी मिनाक्षी
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील निकालांनी भाजपचे तारु जमिनीवर आणले. मोदी-शहांनी अतिरेकी ताकद पणाला लावूनही तृणमूलने प्रचंड बहुमत मिळवले. चाणाक्ष, धुरंधर राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपला शंभरीही गाठता आला नाही. पण महाकाय विजय मिळवणाऱ्या तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मोदी-शहांएवढीच शक्ती झोकून देऊनही नंदिग्राममध्ये पराभूत झाल्या. नंतर त्यांनी काहीही आरोप केले असले तरी आपला पराभव झाला, हे त्यांच्या अंतर्मनालाही लक्षात आले असावे. त्यांचे एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारींनी त्यांना धूळ चारली. पण लोकशाहीत मतांची फाटाफूटदेखील पराभवाचे एक कारण असते. हे लक्षात घेतले तर ममतांचा पराभव शुभेंदूंनी केला असे म्हणताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तरुण उमेदवार मिनाक्षी मुखर्जींनीही तो केला असे म्हणावे लागेल. शुभेंदू १९५६ मतांनी जिंकले आणि मिनाक्षींनी ६२६७ मते घेतली. त्यांनी नंदिग्राममध्ये ममता आटवली. त्यामुळे पक्ष जिंकूनही ममता पराभूत तर पराभूत होऊनही मिनाक्षी विजयी मुद्रेत आहेत. निवडणूक गमावली तरी मिनाक्षी जायंट किलर ठरल्या आहेत.
१९९५मध्ये नरसिंहरावांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे केंद्र सरकार गेले. आणि संख्याबळ हाच निकष असलेल्या भारतीय राजकारणात कम्युनिस्ट पक्षांचा दबदबा अधिक वाढला. त्यांच्याशिवाय देशात सरकार नाही, असे गणित १४ वर्षे म्हणजे २००९पर्यंत होते. पश्चिम बंगाल तर डाव्यांचा महाकाय किल्ला होता. त्यांच्या सत्तेचा सूर्य अस्ताला जाणे मुश्किल आहे, असे डावे, काँग्रेससमर्थक पत्रकारही हिरीरीने मांडत. ममता बॅनर्जींनी ती मांडणी मोडीत काढली. २०१६ मध्ये एकहाती डाव्यांचा धुव्वा उडवला.
त्यामुळे मार्चमध्ये नंदिग्राम विधानसभेसाठी जेव्हा भाकपने मिनाक्षी मुखर्जींना उमेदवारी दिली. तेव्हा त्या इतक्या धोकादायक ठरू शकतील, याचा अंदाज ममतांना आला नसावा. अवघे ३७ वर्ष वयाच्या, पदव्युत्तर पदवीधर असलेल्या मिनाक्षींच्या उमेदवारी अर्जावर त्यांची मालमत्ता एक लाख ३ हजार रुपये असल्याचे नमूद केले होते. यावरून त्यांची आर्थिक ताकद किती किरकोळ आहे, हे लक्षात येते. पण कम्युनिस्टांचे उमेदवार कायमच गोरगरिबांच्या पाठबळावर निवडणुकीत उतरतात. त्याला मिनाक्षी अपवाद नव्हत्या. एकीकडे भाजपचे धनाढ्य शुभेंदू दुसरीकडे बलाढ्य मुख्यमंत्री ममता अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी आक्रमक प्रचार केला. तृणमूल समर्थकांकडून सभा उधळण्याचे प्रकार झाल्यावरही त्या डगमगल्या नाहीत. उलट आणखी आत्मविश्वासाने लोकांशी संवाद साधत गेल्या. सगळा मिडिआ ममता आणि शुभेंदूंभोवती फिरत असताना त्यांनी एकेकाळी डाव्यांचा गड असलेला नंदिग्राम मतदारसंघ पिंजून काढला. ‘बंगालला स्वत:ची मुलगी मुख्यमंत्री हवी आहे’, अशी अस्मितेची हाक ममतांनी दिल्यावर त्याला मिनाक्षींनी ‘होय बंगालची मुलगीच मुख्यमंत्रीपदी हवी. पण ती ६५ वर्षांची नव्हे तर तरुण हवी’ असे प्रत्युत्तर देत प्रचार केला. भाजप आणि तृणमूल दोन्ही पक्ष धनदांडग्यांचे धनी आहेत. हे राज्य लुटणाऱ्या आणि लुटण्यासाठीच आलेल्यांना नाकारा. पु्न्हा आपल्या घराकडे म्हणजे कम्युनिस्टांकडे परत या, असे भावनिक आवाहनही केले. त्यामुळे नंदिग्राममध्ये जवळपास शू्न्यावस्थेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला सहा हजार मते मिळू शकली.
मिनाक्षी वर्धमान जिल्ह्यातील चालबलबूर गावच्या मूळ रहिवासी. त्यांचे वडिल मनोज मुखर्जी डाव्या चळवळीत तर आई पारुल ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन असोसिएशनमध्ये काम करतात. एका महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करत असताना २००८मध्ये त्यांनी नोकरी सोडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डीवायएफआय या तरुणांच्या संघटनेत प्रवेश केला. शब्दांचा तोलूनमापून वापर करत खर्जाच्या आवाजात तळमळीने बोलण्याची नैसर्गिक देणगी त्यांना मिळाली होतीच. त्यात कम्युनिस्टांमधील लढाऊपणाचा बाणा पेरला गेला. आणि केवळ दहा वर्षात डीवायएफआयच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. एवढेच नव्हे तर पक्षाच्या राज्य समितीतही नियुक्त झाल्या. अनेक आंदोलने त्यांनी स्वबळावर उभी केली. पश्चिम बंगालमध्ये एनआरसी, सीएएविरोधी लढ्याची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. यावरून त्यांच्यातील नेतृत्वशक्तीचा अंदाज येऊ शकतो.
वीस वर्षांपूर्वी शून्यावर असलेल्या ममता बॅनर्जी आज पश्चिम बंगालच्या सर्वसत्ताधीश आहेत. आणि जवळपास तीन दशके सत्तेत असलेले कम्युनिस्ट शून्यावर आले आहेत. असे म्हणतात की, धैर्याने लढण्याची तयारी असलेला कोणीच राजकारणात पूर्णपणे संपत नाही. मिनाक्षींचाही यावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी नंदिग्रामचा निकाल जाहीर होताच पुन्हा लोकांसोबत जाऊन काम करणे सुरू केले आहे. काय सांगावे पुन्हा राजकारणाची चक्रे फिरतील आणि २०४१मध्ये मिनाक्षी मनोज मुखर्जी पश्चिम बंगालच्या सर्वसत्ताधीश होतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment