Tuesday, 27 April 2021
मनो‘भावे’विश्व
सिनेमाच्या दुनियेत थोडंसं स्थिरसावर होऊ लागलं की कलावंतांसमोर एक पेच उभा असतो. तो म्हणजे लोकांना आवडेल असं आपण घडायचं की आपल्याला जे मनापासून आवडतं तेच करत राहायचं. बहुतांश कलावंत लोकांसोबत जाण्याचं ठरवतात. कारण त्यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. खूप मोठ्या वर्गासोबत तुम्ही जोडले जातात. मात्र, काहीजण विशिष्ट वर्तुळात राहणं पसंत करतात. स्वत:ला मनापासून भावणाऱी कला निर्मिती करत राहतात. सातत्याने त्याच वर्तुळात राहिल्याने त्यांना काही तोटे सहन करावे लागतात. पण टिकून राहिल्यावर कालांतराने फायदेही मिळतात. तळागाळातील अस्सल रसिकांपासून हे कलावंत शेकडो मैल दूर असले तरी मिडिआ, अभिजन वर्गावर त्यांची मजबूत पकड कायम असते. ही पकड असण्यामागे अनेक कारणे असली तरी एक महत्वाचे म्हणजे त्यांना विषयाचे उत्तम भान असते. कोणता विषय चर्चेत येऊ शकतो किंवा कोणत्या विषयावर उच्च वर्गात, मिडिआत अधिक चर्चा घडून येऊ शकते, याचा अंदाज त्यांना असतो. त्यामुळे ही कलावंत मंडळी सातत्याने उजळत राहतात. प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, लेखिका, पटकथाकार सुमित्रा भावे, अशाच उजळलेल्या होत्या. त्यांनी अतिशय मनापासून सिनेमाचे माध्यम हाताळले. कोणी सहसा वाटेला जाणार नाही, अशा विषयांना हात घालत स्वत:चे भाव विश्व सर्वांसाठी खुलं केलं होतं. त्यामुळं त्यांचं जाणं क्लेशदायी आहे.
पडद्यावर मांडण्यासाठी सशक्त गोष्ट समाजात घडणाऱ्या, दिसणाऱ्या घडामोडींतूनच उचलण्याची एक अजब शक्ती त्यांच्यात होती. कासव सिनेमातून त्यांनी ते सिद्ध केले. त्यावर राष्ट्रीय पारितोषिकाची मोहरही उमटली. पण त्यापलिकडे ‘हा भारत माझा’ या सिनेमाचं उदाहरण आहे. २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन सुरू केलं होतं. बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सहभागी झाला. देशभर एकच धुरळा उडाला. चॅनेलवाले, मिडिआवाले हात धुऊन घेत होते. पण या प्रश्नाचं मूळ काय होतं. अण्णांच्या आंदोलनाचा गाभा काय होता. त्याचा आणि सामान्य भारतीय तरुणाचा काय संबंध होता, याची अतिशय मर्मभेदी मांडणी सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी ‘हा भारत माझा’मध्ये केली होती. त्याचं कथानक असं होतं की, इंजिनिअर होण्याची इच्छा असलेल्या इंद्र सुखात्मे नावाच्या एका मुलाला बारावीत ९० टक्के मिळालेत. आणि प्रवेश ९१ टक्क्यांवर थांबलाय. वडिलांना वाटतंय त्यानं खासगी कॉलेजात पैसे देऊन प्रवेश घेण्यापेक्षा थोडी स्वस्तातली, वेगळी वाट शोधावी. आहे त्यात समाधान मानावं. पण आई म्हणते की, मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे. सरळ मार्गानं जाऊन यशस्वी कसं व्हायचं? भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भारतात असं यश मिळवता येतं का, असा प्रश्न सुमित्रा भावे यांनी उपस्थित केला होता. त्या सिनेमाला दहा वर्ष होत आली. अजूनही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. सिनेमाचा विषय आजही तेवढाच ताजा आहे. एवढी दूरदृष्टी आणि समाजमनाचे आकलन त्यांच्याकडे होते. सिनेमा पाहून बाहेर पडणारा प्रेक्षक सिनेमाच्या विषयात दीर्घकाळ गुंतून राहिल, अशी क्षमता त्यांच्यात होती, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण त्यातही एक वेगळेपण असे होते की, त्यांची मांडणी सामाजिक प्रश्नांना, विषयाला धरून असली तरीही कुठे त्यात उपदेशाचा सूर त्यांनी लावला नाही. मांडणीचे अवडंबर, अतिशयोक्ती नाही. भपका तर नाहीच नाही. तुमच्या आजूबाजूला जे घडतंय तेच मी तुम्हाला सांगत आहे. असं बीज पेरून त्या कथावस्तूविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडत.
‘संहिता' सिनेमाही असाच वेगळ्या वळणाचा. म्हणजे असा की, चार महिला. त्यातील एक सिनेमा दिग्दर्शिका, दुसरी निर्माती, तिसरी लेखिका आणि चौथी अभिनेत्री. यातल्या दिग्दर्शिकेला मनासारखा शेवट असलेली कथा लिहायची आहे. पण असं शक्य आहे का? चौघींना आपल्या कथेचा शेवट सुखात करता येईल का, या प्रश्नाभोवती सुमित्रा भावेंनी अख्खा सिनेमा फिरवला आहे. त्या सांगत की, माझा स्वतःचा दिग्दर्शक म्हणून प्रवास निराळा असतो. माझ्या सिनेमांची कथा मला इतर कुणी देत नाही. मलाही नुसती स्वतंत्र कथा म्हणून सुचत नाही. तर सगळा सिनेमा डोळ्यांसमोर उलगडल्याप्रमाणे दिसू लागतो आणि मग मी तो कागदावर उतरवते. कथा-पटकथा-संवाद, कला-वेशभूषा इतकंच काय पण कॅमेरा-साऊंड यांच्या सूचनांसह अशी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिते. आधी लिहिले मग अंमलात आणले, असे त्यांचे तंत्र होते. म्हणूनच तर त्या अभिजन वर्गासाठी अनेक दमदार सिनेमे देऊ शकल्या. नव्या पिढीतील लेखक, दिग्दर्शकांसाठी हे तंत्र दिशादर्शक नक्कीच आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment