Thursday, 19 August 2021

सरोज नावाची खाण

काळाचा प्रवाह मोठा गतिमान, सगळं काही सोबत वाहून नेणारा आहे. कालपर्यंत आपल्यासोबतचा माणूस अचानक निघून जातो. काही दिवस त्याची आठवण टोचत राहते. हळूहळू ती टोचणी बोथट होत जाते. एक दिवस टोचणीच गायब होऊन जाते. पण ती व्यक्ती कर्तृत्ववान असेल तर तिची आठवण येत राहते. रितेपणा, कमतरता जाणवते. भारतीय सिनेमासृष्टीवर जवळपास ४० वर्षे राज्य गाजवणाऱ्या नृत्य दिग्दर्शक सरोज खान अशा व्यक्तींपैकीच एक. वर्षभरापूर्वी ३ जुलैला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कोरोनाने या उर्जावान महिलेला आपल्यातून हिरावून नेले. त्या वेळी निर्बंध काटेकोर होते. मृत्यू वाढत असल्याने भारतीय जनमानस भयभीत होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याची, कर्तृत्वाची अपेक्षित नोंद झालीच नाही. एखाद्या राजा, सम्राटाचा सुवर्णकाळ असतो. तसा प्रत्येकाचा काही वर्षांचा काळ असतो. अगदी व्यवसाय, उद्योग, कलेचाही असतो. अगदी अलिकडील उदाहरण द्यायचे झाले तर स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, पंडित नेहरू, मोहंमद अली जिना आदी बॅरिस्टर होते. त्यांना पाहून अनेकजण वकिली व्यवसायात गेले. आता मुले डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी धावत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी सिनेमा-नाटकात काम करणे म्हणजे वेडेपणा, वाया जाणे समजले जात होते. आता काय स्थिती आहे, ते तुम्ही पाहतच आहात. तर मुद्दा असा आहे की, प्रत्येक क्षेत्राचा एक काळ येतो. त्यासाठी एखादी व्यक्ती कारणीभूत असते. प्रचंड मेहनत, असामान्य प्रतिभा, नाविन्याची ओढ आणि इतरांना उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता असलेले नेतृत्व अशा गुणांचा संगम या व्यक्तीत असतो. सरोज खान यांनी हिंदी सिनेमातील अत्यंत महत्वाच्या पण तरीही दुर्लक्षित अशा नृत्याला सुवर्णाची झळाळी मिळवून दिली. गाण्याचे शब्द, संगीताइतकाच पावलांचा ठेका, चेहऱ्यावरील हावभावालाही महत्व असते, हे त्यांनी सांगितले. कधीकधी तर शब्द, संगीताची कमतरता नृत्य भरून काढू शकते याची अनेक उदाहरणे सादर केली. सरोज नावाच्या या खाणीमुळे जगाला एकापेक्षा एक सरस नृत्य रत्ने पाहण्यास मिळाली. मूळ नाव निर्मला नागपाल असलेल्या सरोज खान यांचे व्यक्तिगत जीवन एखाद्या कथानकासारखेच. अवघे तेरा वर्ष वय असताना त्या ४१ वर्षांचे डान्स मास्टर सोहनलाल यांच्या प्रेमात पडल्या. ते आधीच विवाहित आहेत हे त्यांनी सरोज यांना सांगितले नाही. जेव्हा कळाले तोपर्यंत तीन मुले पदरात पडली होती. अल्प शिक्षणामुळे पोटापाण्यासाठी हातपाय हलवणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून समूह नृत्यात पाय थिरकवणे सुरू केले. पण म्हणतात ना, तुमच्यात उच्च दर्जाची प्रतिभा असेल तर तुम्ही ठरवले तरी लपून राहू शकत नाही. सरोज यांचे तसेच झाले. ‘गीता मेरा नाम’ सिनेमात त्यांना पहिल्यांदा नृत्य दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. आणि त्यानंतर त्यांना वळून पाहण्याची गरज पडली नाही. अगदी ठोकळा असलेल्या नट-नट्यांचे चेहरे त्यांनी बोलके केले. त्यांना थिरकणे शिकवले. आणि त्यांचे थिरकणे लोकांना आवडेल इथपर्यंत नेऊन ठेवले. महानायक अमिताभ बच्चन सरोज यांच्याविषयीच्या एका आठवणीत सांगतात की, सत्तरच्या दशकात मुमताज नृत्याची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्री होत्या. एका सिनेमात त्यांच्यामागे गर्दीत सरोज नाचत होत्या. त्यात एक क्षण असा आला की मुमताज यांच्याऐवजी सरोज लक्ष वेधत होत्या. बच्चन यांची ही आठवण या महान नृत्य दिग्दर्शिकेची ताकद सांगणारी आहे. एकेकाळच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनीही सरोज यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त सांगितलं की, त्यांचे जीवन नृत्यासाठी पूर्ण जीवन समर्पित होते. अचूकता हा त्यांचा प्राण होता. सहजसोप्या पदन्यास असताच कामा नये, असे त्यांचे ठाम मत होते. देवदास सिनेमातील ‘मार डाला’ गीतातील एका ठेक्यावर चेहऱ्यावरील भाव सहा प्रकारे दाखवला जावा, असा त्यांचा आग्रह होता. तो हळूहळू त्यांनी निग्रहात रुपांतरित केला. आणि एक अख्खी रात्र केवळ सहा भावमुद्रांचे चित्रीकरण करण्यात आले. अशी जिद्द, चिकाटी आणि नवे काही करण्याचा ध्यास असेल तरच कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च स्थानावर जाता येते. प्रदीर्घ काळ टिकता येते. हाच सरोज नामक अमूल्य खाणीच्या जीवनाचा संदेश आहे.

No comments:

Post a Comment