Tuesday, 31 August 2021
सलिमा : रक्षणासह शांतता
तिकडं काबूल पडलं आणि इकडं जणूकाही नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तालिबान्यांचा झेंडा फडकला आहे. हातात मशिनगन्स घेऊन तालिबानी चांदनी चौकात फिरू लागले आहेत. संसद भवनात त्यांनी सभा भरवली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी तालिबानच्या मदतीने कश्मिर स्वतंत्र करून टाकला आहे. १३५-१४० कोटींचा भारत देश गुडघे टेकून शरणागती पत्करतो आहे, असं वाटण्याइतपत कोलाहल प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाला. युद्ध नको. त्यांच्याशी बोलाचाली सुरू करा. त्यांना समजून घ्या, असेही सल्ले देण्यात आले. दुसरीकडं पाकिस्तान, चीनलाच कसा धोका आहे, असंही पत्रपंडित भरभरून बोलू लागले. लिहू लागले. खरंतर कोणी कितीही म्हणत असलं तरी क्रौर्य, हिंसा, अतिरेक, द्वेष, अहंकार, गर्व माणसाच्या रक्ताच्या थेंबाथेंबात ठासून भरला आहे. त्यामुळे त्याच्यातील प्रेम, ओलावा, आपुलकी, माणुसकी असे तुलनेने कमी प्रभावी असलेले गुण क्वचित प्रगट होऊन दिसेनासे होतात. माणसाला शांतता हवी असते पण ती कोणाला तरी संपवूनच मिळू शकते, यावर मोठ्या समूहाचा ठाम विश्वास आहे. म्हणून कोणी कितीही म्हटलं तरी पृथ्वीच्या पाठिवर कुठेना कुठे युद्ध सुरू असतं किंवा युद्धासाठीचं वातावरण तयार होत असतं. माणसाला युद्धासाठी फक्त एक कारण हवं असतं. त्यात काहीजण जिवावर उदार होऊन लढतात. तळहातावर शिर घेऊन मैदानात उतरतात. कारण त्यांना त्यांच्या भूमीचं, अस्तित्वाचं, संस्कृतीचं रक्षण करायचं असतं. तर काहीजणांना या रक्षण करणाऱ्यांचं शिरकाण करायचं असतं. लढणाऱ्या आणि रक्षणकर्त्यांमध्ये मुख्यत्वे पुरुषांचा समावेश असला तरी काही महिलाही त्यात आघाडीवर असतात. काही महिलांनी थेट फौजांचे नेतृत्व केले आहे. रणांगणातून पळ काढणाऱ्या पुरुषांना त्यांनी लढण्यासाठी प्रेरणा दिली आहे. अशा काही लढवय्या, धाडसी महिलांमध्ये अफगणिस्तानातील सलिमा माझारी यांचा समावेश झाला आहे. महिनाभरापूर्वी त्या जागतिक प्रसिद्धीच्या पडद्यावर आल्या. एकीकडे महासत्तेने प्रशिक्षित केलेले अश्रफ घनी समर्थक सैन्य अक्षरश: एकही गोळी न झाडता शरणागती पत्करत होते. दुसरीकडे सलिमा तालिबान्यांच्या फौजेशी झुंज देत होत्या. लढता लढता त्यांना तालिबानने कैद केले.
सलिमा या शब्दाचा अरेबिक भाषेमधील अर्थ संरक्षण, शांतता असा आहे. या दोन्ही शब्दांना परिपूर्ण अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे व्यक्तिमत्व. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल डिफेन्स अकॅडमीची द्वारे मुलींसाठी खुली करण्याचा ऐतिहासिक निर्णय गेल्याच आठवड्यात दिला. त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तर सलिमांचे लढवय्येपण अधिक अधोरेखित होते. त्या मूळ अफगाणी. हाजरा समूहाच्या प्रतिनिधी आणि शिया पंथीय. रशियाने अफगणिस्तानात घुसखोरी केली. तेव्हा त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून इराणमध्ये पोहोचले. तेथे १९८०मध्ये सलिमांचा जन्म झाला. तेहरान विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत काम सुरू केले. अमेरिकेने तालिबानचा पाडाव करण्यासाठी घुसखोरी केल्यावर त्या अफगणिस्तानात त्यांच्या मूळ गावी चहारकित येथे पोहोचल्या. २०१८मध्ये त्यांच्या जिल्ह्यासाठी गर्व्हनरपद भरले जाणार असल्याचे कळाल्यावर त्यांनी अर्ज केला. त्यांची निवड झाली. अफगणिस्तानातील त्या पहिल्या महिला गर्व्हनर ठरल्या. या पदावरून लोकांची सेवा करणे त्यांनी सुरू केले. विशेषत: महिलांचे शिक्षण, त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळवून देणे, यासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी सुमारे १०० तालिबानी अतिरेक्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला. सलिमांच्या शब्दांनी तो चमत्कार घडवला होता. पुढे काही महिन्यातच अमेरिकन फौजा अफगणिस्तानमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. आणि या फौजांची माघार सुरू होताच तालिबान देशाचा ताबा घेण्यासाठी हल्ले करतील. त्यांची राजवट म्हणजे महिलांना सर्वाधिक धोका हे सलिमांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांच्या बाल्ख प्रांतासाठी सैन्य बांधणी सुरू केली. त्यांच्या आवाहनावरून लोकांनी गाई, म्हशी, घरे विकून शस्त्रे खरेदी केली. सलिमांनी तरुणांच्या तुकड्या स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देणे, लढाईसाठी प्रेरणा देणे सुरू केले. त्यांच्या नेतृत्वातील छोटेखानी दलाने तीन दिवस कडवी लढत दिली. पण अखेर तालिबान्यांनी त्यांना पकडले. अजूनपर्यँत त्यांची खबरबात नाही. पण त्यांना मारण्यात आले असावे, असा त्यांच्या समर्थकांचा कयास आहे. तसे झाले असेल अफगणिस्तानने खरेच संरक्षण, शांतता गमावली असे म्हणावे लागेल. नाही का?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment