Saturday, 23 January 2021
अम्मीचा गौरव
Thursday, 7 January 2021
विस्तव आणि वास्तव
संभाजीनगर – औरंगाबाद असा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा शिवसेनेच्या पोतडीतून पुन्हा एकदा वर काढण्यात आला आहे. हिंदुत्ववादी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या राजकारण्यांना या मुद्याची निवडणुकीच्या तोंडावरच गरज भासते. भावनिक मुद्यावरच मतदान झाले पाहिजे, अशी शिवसेनेची उघडउघड आणि इतर काही पक्षांची छुपी भावना असते. औरंगाबाद महापालिकेचा राजकीय इतिहास पाहिला तर मोठ्या संख्येने औरंगाबादकरांनी भावनेच्या आहारी जाऊनच मतदान केल्याचे दिसते. पण एकदा निवडणुका झाल्या की नामांतराचा मुद्दा गुंडाळून ठेवला जातो. त्याचा जाब कोणीही विचारत नाही, ही या शहराची खासियत आहे. पण या वेळी पेच थोडा गुंतागुंतीचा आहे. कारण, सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. आणि नामांतराला कायम विरोध असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत भागिदार आहेत. आणि आतापर्यंत शिवसेनेच्या साथीला असलेला भाजप विरोधात बसल्याने शिवसेनेच्या कोंडीची संधी शोधत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी दिलेला शब्द खरा ठरणार की नाही, अशी वक्तव्ये करून सत्ताधाऱ्यांमध्ये फटी पाडण्याचे काम भाजप करत आहे. तर आमच्यासाठी सत्ता दुय्यम अशी टोकाची भूमिका काँग्रेसने जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही हाच सूर लावला आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर भडका उडवण्याचे शिवसेनेचे धोरण दिसते. त्यामुळे बाजूने आणि विरोधात ठिणग्या अधिक उडत आहेत. त्याची झळ अर्थातच औरंगाबादकरांना बसणार आहे. खरे तर मराठवाड्याची राजधानी असे बिरुद विनाकारण मिरवणाऱ्या या शहरात आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. नवी पाणी योजना प्रत्यक्षात येईलच, अशी हमी कोणीही देऊ शकत नाही. अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटलेला नाही. कोरोनाच्या संकटातून अजून सुटका झालेली नाही. औरंगाबादचे खरे वैभव असलेल्या आणि शेकडो तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या मोगल आणि निजामकालीन वास्तूंना पुर्नवैभव मिळवून देण्यात ‘औरंगाबाद’प्रेमींनाही स्वारस्य नाही. अशा स्थितीत भावनेच्या आहारी जायचे की पाणी, रस्त्यांसाठी राजकारण्यांना धारेवर धरायचे, याचा निर्णय लोकांना घेण्याची हीच ती वेळ आहे.
Monday, 28 December 2020
प्रकाश वाटेच्या मानकरी
परिवर्तनवादी विचारांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एक इतिहास रचला गेला. ‘दिव्य मराठी’च्या रातरागिणी उपक्रमात किमान १५ हजार महिला अंधारावर मात करण्यासाठी अंधारावर चालून गेल्या. औरंगपुरा येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष केला. इतिहासात नोंद झालेल्या या ऐतिहासिक घटनेचा पाया कसा रचला गेला. रातरागिणी उपक्रमाचा एकूण प्रवास कसा होता, हे वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सांगणे महत्वाचे आहे. तर झाले असे की, गेल्या वर्षी डिसेंबरच्या प्रारंभी सोयगाव तालुक्यात एका शिक्षकाने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. आणि ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटेसरांनी ठोस भूमिका घेतली. दिव्य मराठीची टीम सोयगावात पोहोचली. शोषणामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलींना धीर दिला. संवाद साधत बोलते केले. तेथे 'मौन सोडू चला बोलू' अभियानाचा प्रारंभ झाला. यानंतर ‘दिव्य मराठी’ महिलांवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेवर अतिशय संवेदनशील आणि आक्रमक मांडणी केली. आरोपींवर कठोर प्रहार केले. गर्भातच मुलींचे जीवन उद्धवस्त करणारी एक टोळी ‘दिव्य मराठी’ने गजाआड केली.
पण केवळ वार्तांकन करून थांबता येणार नाही. तर महिलांवर होणारे अत्याचार पाहता, त्यांच्या एकूण जीवनात बदल झाला पाहिजे. आणि या बदलांचे बीज आपणच रोवले पाहिजे, असा विचार ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे व्यक्त केला. आणि तातडीने अंधारावर चालून जातील रातरागिणी ही संकल्पना मांडली. तो दिवस होता १२ डिसेंबर २०१९. वर्षातील सर्वात मोठी रात्र अर्थात २२ डिसेंबर रोजी क्रांती चौकातून औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापर्यंत अंधारावर चालून जायचे ठरले. आणि त्यापुढील दहा दिवसांत आवटेसरांच्या मार्गदर्शनाखाली ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी चीफ रिपोर्टर शेखर मगर, रिपोर्टर रोशनी शिंपी यांच्या पुढाकारात संपादकीय सहकाऱ्यांची एक टीम रातरागिणी आयोजनासाठी झपाटून मैदानात उतरली. त्यावेळचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी स्थानिक पातळीवर नियोजन केले. या उपक्रमात अर्थातच समाजातील प्रत्येक घटकाचा, महिला, युवतींचा सहभाग आवश्यक होता. त्याकरिता विविध जाती, धर्म, संस्था, संघटना, विचारधारेच्या महिलांना ‘दिव्य मराठी’ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले. एका आवाजाला प्रतिसाद देत शेकडो प्रतिनिधी बैठकीला आल्या. संकल्पना ऐकल्यावर त्यांनी हा आमचा कार्यक्रम आहे, आम्ही तो यशस्वी करू असा निर्धार व्यक्त केला. महाविद्यालयीन तरुण, तरुणी देखील हिरीरीने सहभागी झाल्या. अगदी पाच वर्षांची चिमुकली ते ८० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने पाठबळ दिले. काहीजणींनी नियोजनासाठी मौलिक सूचनाही केल्या. औरंगाबाद शहरात रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरणार होत्या. त्यामुळे त्यांच्या वाहनांचे पार्किंग, शिस्तबद्ध मार्गक्रमण आणि घरी परतण्यासाठी बसची व्यवस्था अशी अनेक आव्हाने होती. पण तत्कालिन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेकजणांनी मदत केली.
औरंगाबाद शहरच नव्हे तर उपनगरातील महिलाही मोठ्या संख्येने क्रांती चौकात जमल्या. अपेक्षेपेक्षा दहापट अधिक संख्येने सहभागी होत त्यांनी रातरागिणीची कमान हातात घेतली. डॉक्टर, इंजिनियर, सीए, उद्योजक, परिचारिका, ड्रायव्हर, सामाजिक कार्यकर्ता, प्राध्यापक, शिक्षिका, कलावंत, गृहिणी अशा एक ना अनेक सहभागी झाल्या. मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत होते. लोक कुतूहलाने ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होत होते. क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठणगेट येथे मलखांबाच्या कवायती, पोवाडे, स्फूर्तीगीतांचे गायन असा माहोल होता. औरंगपुऱ्यात महात्मा फुले पुतळ्याजवळ एवढ्या मोठया संख्येने महिला आल्या होत्या की, रात्री बाराच्या सुमारास ‘अंधारावर मात करणारी पहाट झाली’ अशी नोंद जगाने घेतली. महिलांनी रात्री सातच्या आत घरात असलेच पाहिजे, या पुरुषांनी पेरलेल्या भितीयुक्त अंधारावर मात करून प्रकाश वाटेने त्या चालत गेल्या. त्या साऱ्या रातरागिणींना औरंगाबादकरांच्यावतीने लाख लाख धन्यवाद !
Saturday, 19 December 2020
परिवर्तनाचा हुंकार
खुरपं
गेल्या १००-१२५ वर्षांत अनेक मराठी साहित्यिकांनी महिलांचे भावविश्व यथार्थपणे मांडले. त्यांच्या जगण्यातील दु:खवेदनांना आवाज मिळवून दिला. पण त्यातील बहुतांश कथानके, व्यक्तिरेखा शहरी तोंडवळ्याच्या आहेत. कारण मूळ ग्रामीण भागातील असले तरी ही लेखक मंडळी शहराशी नाळ जोडलेली होती. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदींनी ग्रामीण महिलांच्या व्यक्तिरेखा चित्रित केल्या. पण त्या बहुतांश विनोदी अंगाने होत्या. त्यामुळे शेतात अपार कष्ट करणाऱ्या, विहीरीवर पाणी शेंदून हाताला घट्टे पडलेल्या आणि कायम ग्रामीण समाजरचनेच्या तळाला राहणाऱ्या महिलांचे चित्रण तेवढ्या ताकदीने, विविध अंगाने, खोलवरपणे फारसे आलेच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे खेड्यापाड्यातील संस्कृतीत जगलेल्या महिलांकडून कसदार, विपुल लिखाण दिसत नाही. त्यामुळे एकूणात मराठी साहित्य विश्व त्या दृष्टीने अपुरे होते.
मात्र, संवेदनशील, आश्वासक कथालेखिका सुचित्रा घोरपडे यांनी ‘खुरपं’ या त्यांच्या कथासंग्रहातून हे अपुरेपण बऱ्याचअंशी भरून काढले आहे. पुण्यातील आर्ष पब्लिकेशन्सने हा कथासंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.घोरपडे यांच्या या कथासंग्रहात दहा कथा आहेत. प्रत्येक कथा कसदार, आशयघन तर आहेच. शिवाय त्यातील मांडणीचा प्रवाहही चकित करणारा आहे. खेड्यांमधील बोलीभाषा कथेत अचूकपणे वापरणे म्हणजे पुरुषांचा प्रांत हा अनेक वर्षांचा समजही घोरपडे यांनी मोडीत काढला आहे. ग्राम्य बोलीभाषेतील अनेक शब्द त्यांनी अतिशय चपखलपणे आणि भावार्थासह जागोजागी पेरले आहेत. अवदस, माचुळी, येडताक, चईत, डबरणी, किनव्या ही त्यांच्या काही कथांची नावे आहेत. यावरून कथांमधील शब्दांची ताकद आणि परिघ लक्षात येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे लेखिकेने एकाही कथेची मांडणी, व्याप्ती पसरट केलेली नाही. अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. व्यक्तिरेखा आपण कधीतरी पाहिल्या आहेत, असे वाटत राहते किंवा अशी व्यक्तिरेखेशी आपले जवळकीचे नाते असावे, असे जाणवत राहते. जणूकाही आपण एखाद्या खेडेगावात राहण्यासच गेलो आहोत, असे वातावरण घोरपडे यांची लेखणी तयार करते. म्हणूनच ‘खुरपं’मधील प्रत्येक कथा हृदयात रुतून राहते.
‘खुरपं''मध्ये गावगाड्यातील महिलांच्या जीवनाचे स्पंदन आहे. ग्रामीण संस्कृती, मोडक्या -तोडक्या घरांत आणि वाड्यामध्ये निर्माण झालेले आचपेच, भाऊबंदकीतील तणाव, नातेसंबंधातील घुसमट, डोळ्यातच निष्प्राण झालेले अश्रू अशा अनेक पैलूंना वाचा फोडणाऱ्या कथा यात आहेत. घोरपडे यांनी गेल्या काही वर्षांत शब्दालय, युगांतर, पर्ण, शब्दशिवार, विवेक, अक्षरदान, चौफेर समाचार यासारख्या दिवाळी अंकातून लेखन केले आहे. शिवाय स्टोरीटेलसाठी ऑडिओ कथालेखन, डेलीहंटच्या माध्यमातून ब्लॉग लेखन, वृत्तपत्रांमध्ये कथा, लेख आणि सदर लेखन केलेले आहे. आता ‘खुरपं’मुळे त्यांच्या रुपाने एक सशक्त कथालेखिका साहित्य विश्वाला मिळाली आहे, असे वाटते.