Monday, 28 December 2020

प्रकाश वाटेच्या मानकरी

परिवर्तनवादी विचारांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एक इतिहास रचला गेला. ‘दिव्य मराठी’च्या रातरागिणी उपक्रमात किमान १५ हजार महिला अंधारावर मात करण्यासाठी अंधारावर चालून गेल्या. औरंगपुरा येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष केला. इतिहासात नोंद झालेल्या या ऐतिहासिक घटनेचा पाया कसा रचला गेला. रातरागिणी उपक्रमाचा एकूण प्रवास कसा होता, हे वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सांगणे महत्वाचे आहे. तर झाले असे की, गेल्या वर्षी डिसेंबरच्या प्रारंभी सोयगाव तालुक्यात एका शिक्षकाने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. आणि ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटेसरांनी ठोस भूमिका घेतली. दिव्य मराठीची टीम सोयगावात पोहोचली. शोषणामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलींना धीर दिला. संवाद साधत बोलते केले. तेथे 'मौन सोडू चला बोलू' अभियानाचा प्रारंभ झाला. यानंतर ‘दिव्य मराठी’ महिलांवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेवर अतिशय संवेदनशील आणि आक्रमक मांडणी केली. आरोपींवर कठोर प्रहार केले. गर्भातच मुलींचे जीवन उद्धवस्त करणारी एक टोळी ‘दिव्य मराठी’ने गजाआड केली.

पण केवळ वार्तांकन करून थांबता येणार नाही. तर महिलांवर होणारे अत्याचार पाहता, त्यांच्या एकूण जीवनात बदल झाला पाहिजे. आणि या बदलांचे बीज आपणच रोवले पाहिजे, असा विचार ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे व्यक्त केला. आणि तातडीने अंधारावर चालून जातील रातरागिणी ही संकल्पना मांडली. तो दिवस होता १२ डिसेंबर २०१९. वर्षातील सर्वात मोठी रात्र अर्थात २२ डिसेंबर रोजी क्रांती चौकातून औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापर्यंत अंधारावर चालून जायचे ठरले. आणि त्यापुढील दहा दिवसांत आवटेसरांच्या मार्गदर्शनाखाली ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी चीफ रिपोर्टर शेखर मगर, रिपोर्टर रोशनी शिंपी यांच्या पुढाकारात संपादकीय सहकाऱ्यांची एक टीम रातरागिणी आयोजनासाठी झपाटून मैदानात उतरली. त्यावेळचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी स्थानिक पातळीवर नियोजन केले. या उपक्रमात अर्थातच समाजातील प्रत्येक घटकाचा, महिला, युवतींचा सहभाग आवश्यक होता. त्याकरिता विविध जाती, धर्म, संस्था, संघटना, विचारधारेच्या महिलांना ‘दिव्य मराठी’ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले. एका आवाजाला प्रतिसाद देत शेकडो प्रतिनिधी बैठकीला आल्या. संकल्पना ऐकल्यावर त्यांनी हा आमचा कार्यक्रम आहे, आम्ही तो यशस्वी करू असा निर्धार व्यक्त केला. महाविद्यालयीन तरुण, तरुणी देखील हिरीरीने सहभागी झाल्या. अगदी पाच वर्षांची चिमुकली ते ८० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने पाठबळ दिले. काहीजणींनी नियोजनासाठी मौलिक सूचनाही केल्या. औरंगाबाद शहरात रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरणार होत्या. त्यामुळे त्यांच्या वाहनांचे पार्किंग, शिस्तबद्ध मार्गक्रमण आणि घरी परतण्यासाठी बसची व्यवस्था अशी अनेक आव्हाने होती. पण तत्कालिन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेकजणांनी मदत केली.

औरंगाबाद शहरच नव्हे तर उपनगरातील महिलाही मोठ्या संख्येने क्रांती चौकात जमल्या. अपेक्षेपेक्षा दहापट अधिक संख्येने सहभागी होत त्यांनी रातरागिणीची कमान हातात घेतली. डॉक्टर, इंजिनियर, सीए, उद्योजक, परिचारिका, ड्रायव्हर, सामाजिक कार्यकर्ता, प्राध्यापक, शिक्षिका, कलावंत, गृहिणी अशा एक ना अनेक सहभागी झाल्या. मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत होते. लोक कुतूहलाने ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होत होते. क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठणगेट येथे मलखांबाच्या कवायती, पोवाडे, स्फूर्तीगीतांचे गायन असा माहोल होता. औरंगपुऱ्यात महात्मा फुले पुतळ्याजवळ एवढ्या मोठया संख्येने महिला आल्या होत्या की, रात्री बाराच्या सुमारास ‘अंधारावर मात करणारी पहाट झाली’ अशी नोंद जगाने घेतली. महिलांनी रात्री सातच्या आत घरात असलेच पाहिजे, या पुरुषांनी पेरलेल्या भितीयुक्त अंधारावर मात करून प्रकाश वाटेने त्या चालत गेल्या. त्या साऱ्या रातरागिणींना औरंगाबादकरांच्यावतीने लाख लाख धन्यवाद !


Saturday, 19 December 2020

परिवर्तनाचा हुंकार

वर्षानुवर्षे एका साचेबद्ध पद्धतीने जगणाऱ्या, घुसमट हेच आपले प्राक्तन असे मानणाऱ्या समाजात परिवर्तन झाले पाहिजे. अन्याय करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, यासाठी खडतर वाटचाल करणारे काहीजण साहित्य विश्वात आहेत. महेश खरात हे त्यापैकीच एक. ते सातत्याने परिवर्तनाची लढाई लढत आहेत. शिवाय एक साक्षेपी, परखड समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे परिवर्तनवादी विचारवंत, समीक्षक अशी दुहेरी ओळख असलेले खरात स्वतःचे अनुभवविश्व, विचारांमागील भूमिका ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ या पहिल्या कविता संग्रहात विविध रचनांच्या रुपात मांडतात. तेव्हा त्याला एक विशिष्ट उंची आणि एक खोलीही प्राप्त होते. एकेक ओळ, त्यातील भावार्थ कसदार असल्याची जाणिव होते. लोकवाङ्मयगृहाने ४० रचनांचा हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. प्रख्यात पुरोगामी विचारवंत, कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांचे भाष्य आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची बारा पानांची दीर्घ प्रस्तावना या ‘ओळ तुझ्या-माझ्या...’ संग्रहाला लाभली आहे. यावरून तिचे साहित्य व्यवहारातील महत्व अधोरेखित होऊ शकते. साहित्य वर्तुळात प्रदीर्घ काळापासून वावर असलेल्या खरात यांच्या विचारात, लेखणीत धारदारपणा आहे. तो त्यांच्या साहित्य कृती समीक्षणात दिसून येतो. समीक्षक म्हणून त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते मांडण्यात मुळीच हयगय केली नाही. अनेक वर्षे इतरांच्या लेखनाविषयी भाष्य करत असताना खरात यांच्या मनामध्येही अनेक प्रकारचे विचार उसळी घेत होते. आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटना, समाजाचे साचलेपण, काही घटकांचे एकारलेपण अनुभवत होते. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत गेली. असे म्हणतात की, कवितांच्या ओळी अस्वस्थतेच्या गर्भातूनच जन्माला येत असतात. तसेच काहीसे ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ कविता संग्रहात झाले असावे. खरात यांचा मूळ पिंड समीक्षकाचा. त्यात कवीमनही जोडले गेले. सभोवताली जे काही घडते आहे. ते पाहून निर्माण होणारी संतप्तता ते मांडतात. त्यात कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. थोडासा धागा मांडायचा आणि त्याचा विस्तार करणे सोडूनच द्यायचे. किंवा त्यातून अंग काढून घ्यायचे, असा काही कवींचा पवित्रा असतो. त्याला खरात यांनी पहिल्याच कविता संग्रहात छेद दिला आहे. म्हणूनच त्यांची कविता वास्तवाला भिडणारी आणि परिवर्तनाचा विचार अधिक टोकदार, आक्रमक, व्यापकपणे मांडणारी झाली आहे.'ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची''मधील सर्वच कवितांचा केंद्रबिंदू माणूस आहे.‘चक्र परिवर्तनाचे'', ''सुरकुतलेल्या चेहऱ्याआड'' आणि ‘पासवर्ड आनंदाचा'' अशा तीन विभागात प्रा. खरात यांनी कवितेची विभागणी केली आहे. सामान्य माणसाला कोणकोणत्या पातळ्यांवर लढावे लागते, याची अतिशय प्रभावी मांडणी खरातांच्या कवितेत आहे. विशेष म्हणजे ते एक प्रकारचा आशावादही निर्माण करतात. एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी बोलल्या जातात. दुसरीकडे भेदभाव, द्वेष्, अहंकार वाढत चालला आहे. एक वर्ग झपाट्याने प्रगती करतोय तर दुसरा झपाट्याने तळाला जातोय. यात बदल झाला पाहिजे. अशा अन्यायकारक वागण्याला जबाबदार असणाऱ्यांना कडक शब्दांत प्रश्न विचारले पाहिजेत, असे खरात सूचित करतात. त्यामुळे एकूणात हा कवितासंग्रह परिवर्तनाचा हुंकार देणारा ठरला आहे.

खुरपं

गेल्या १००-१२५ वर्षांत अनेक मराठी साहित्यिकांनी महिलांचे भावविश्व यथार्थपणे मांडले. त्यांच्या जगण्यातील दु:खवेदनांना आवाज मिळवून दिला. पण त्यातील बहुतांश कथानके, व्यक्तिरेखा शहरी तोंडवळ्याच्या आहेत. कारण मूळ ग्रामीण भागातील असले तरी ही लेखक मंडळी शहराशी नाळ जोडलेली होती. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदींनी ग्रामीण महिलांच्या व्यक्तिरेखा चित्रित केल्या. पण त्या बहुतांश विनोदी अंगाने होत्या. त्यामुळे शेतात अपार कष्ट करणाऱ्या, विहीरीवर पाणी शेंदून हाताला घट्टे पडलेल्या आणि कायम ग्रामीण समाजरचनेच्या तळाला राहणाऱ्या महिलांचे चित्रण तेवढ्या ताकदीने, विविध अंगाने, खोलवरपणे फारसे आलेच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे खेड्यापाड्यातील संस्कृतीत जगलेल्या महिलांकडून कसदार, विपुल लिखाण दिसत नाही. त्यामुळे एकूणात मराठी साहित्य विश्व त्या दृष्टीने अपुरे होते.

मात्र, संवेदनशील, आश्वासक कथालेखिका सुचित्रा घोरपडे यांनी ‘खुरपं’ या त्यांच्या कथासंग्रहातून हे अपुरेपण बऱ्याचअंशी भरून काढले आहे. पुण्यातील आर्ष पब्लिकेशन्सने हा कथासंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
घोरपडे यांच्या या कथासंग्रहात दहा कथा आहेत. प्रत्येक कथा कसदार, आशयघन तर आहेच. शिवाय त्यातील मांडणीचा प्रवाहही चकित करणारा आहे. खेड्यांमधील बोलीभाषा कथेत अचूकपणे वापरणे म्हणजे पुरुषांचा प्रांत हा अनेक वर्षांचा समजही घोरपडे यांनी मोडीत काढला आहे. ग्राम्य बोलीभाषेतील अनेक शब्द त्यांनी अतिशय चपखलपणे आणि भावार्थासह जागोजागी पेरले आहेत. अवदस, माचुळी, येडताक, चईत, डबरणी, किनव्या ही त्यांच्या काही कथांची नावे आहेत. यावरून कथांमधील शब्दांची ताकद आणि परिघ लक्षात येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे लेखिकेने एकाही कथेची मांडणी, व्याप्ती पसरट केलेली नाही. अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. व्यक्तिरेखा आपण कधीतरी पाहिल्या आहेत, असे वाटत राहते किंवा अशी व्यक्तिरेखेशी आपले जवळकीचे नाते असावे, असे जाणवत राहते. जणूकाही आपण एखाद्या खेडेगावात राहण्यासच गेलो आहोत, असे वातावरण घोरपडे यांची लेखणी तयार करते. म्हणूनच ‘खुरपं’मधील प्रत्येक कथा हृदयात रुतून राहते.
‘खुरपं''मध्ये गावगाड्यातील महिलांच्या जीवनाचे स्पंदन आहे. ग्रामीण संस्कृती, मोडक्या -तोडक्या घरांत आणि वाड्यामध्ये निर्माण झालेले आचपेच, भाऊबंदकीतील तणाव, नातेसंबंधातील घुसमट, डोळ्यातच निष्प्राण झालेले अश्रू अशा अनेक पैलूंना वाचा फोडणाऱ्या कथा यात आहेत. घोरपडे यांनी गेल्या काही वर्षांत शब्दालय, युगांतर, पर्ण, शब्दशिवार, विवेक, अक्षरदान, चौफेर समाचार यासारख्या दिवाळी अंकातून लेखन केले आहे. शिवाय स्टोरीटेलसाठी ऑडिओ कथालेखन, डेलीहंटच्या माध्यमातून ब्लॉग लेखन, वृत्तपत्रांमध्ये कथा, लेख आणि सदर लेखन केलेले आहे. आता ‘खुरपं’मुळे त्यांच्या रुपाने एक सशक्त कथालेखिका साहित्य विश्वाला मिळाली आहे, असे वाटते.

Monday, 14 December 2020

पदवीधरच्या निकालाचा धडा

कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की, त्याच्या आड दडलेल्या काही गोष्टी सर्वांसमोर येणे आवश्यक असते. कारण या गोष्टी विजेत्याची शक्तीस्थाने सांगतात. पराभूत उमेदवाराच्या मोठ्या किंवा त्याला किरकोळ वाटत असलेल्या चुका समोर आणतात. या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर पराभूत उमेदवार किंवा त्याचा एखादा अनुयायी पुढील काळात विजयी होऊ शकतो. पराभूत पक्षाचे प्रमुख नेतेही यातून काही धडा घेऊ शकतात. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत गेल्यावेळपेक्षा सुमारे २७ टक्के अधिक मतदान झाल्याने प्रस्थापिताच्या विरोधात कौल असे पारंपारिक गृहीतक मांडले गेले. ते सतीश चव्हाण यांच्या विजयाने चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात हे पदवीधर मतदारसंघात होऊ शकते, हेही तेवढेच खरे आहे. आता विजय-पराभवाच्या काही मूळ कारणांकडे वळूयात. १) आपल्याला मतदान करण्याची हमी असलेल्या अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करून घेणे. भलेही त्यांच्या सर्व समस्या सोडवणे शक्य नसले तरी त्यांच्याशी अतिशय नम्रपणे, कायम संपर्कात राहणे. मतदानाच्या दिवशी स्वतंत्र, अत्यंत भरवशाची यंत्रणा लावून त्यांचे मतदान करून घेणे. ही यशाची पहिली पायरी आहे. च‌‌‌‌‌व्हाण यांना दोन निवडणुकांचा तगडा अनुभव असल्याने त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली पायरी ओलांडली होती. २) पक्षाची यंत्रणा, पक्षाची ध्येयधोरणे, राष्ट्रीय किंवा राज्य, देशाच्या बड्या नेत्याचे वलय याचा प्रचारात फायदा होतो. पण अशा गोष्टी निकाल शंभर टक्के बदलू शकत नाही. विरोधकाला कमी लेखणे तर सर्वाधिक धोकादायक असते. बोराळकर बड्या नेत्यांचे वलय, पक्ष यंत्रणेच्या पूर्णपणे भरवशावर राहिले. तर चव्हाण शिवसेनेच्या यंत्रणेची मदत घेताना व्यक्तिगत हितसंबंधाचे धागेदोरे बळकट करत गेले. बोराळकर तुल्यबळ आहेत, असे मानत प्रचार केला. ३) कोणतीही लढाई लढायची असेल तर आधी आपल्याला पक्षाचा खरेच किती पाठिंबा आहे, याची माहिती हवी. नेत्यांचा पाठिंबा हवाच पण कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी केवळ आपल्यासाठी लढण्यास तयार आहे का, हे उमेदवाराने शांतपणे तपासून पाहिले पाहिजे. चव्हाण यांच्या उमेदवारीला प्रतिस्पर्धी नव्हता. आपल्यासाठी संपूर्ण ताकदीने लढू इच्छिणाऱ्यांची मोठी फळी त्यांनी बांधून ठेवली होती. त्या उलट नेत्यांपासून कार्यकर्ते बोराळकरांच्या विरोधात होते. ४) कोणी काहीही म्हणत असले तरी जातीपातीची गणिते हा तर भारतीय राजकारणाचा पाया आहे. मोठा वर्ग त्याच निकषावर मतदान करतो. त्यामुळे त्यानुसार मतदार नोंदणी करून घेणे आणि ती खरेच झाली आहे की नाही, याचा खरा अभ्यास, पडताळणी करावी लागते. चव्हाण यांनी यात शंभर टक्के गुण मिळवले. तर बोराळकर अभ्यास झाला आहे, या भ्रमात राहिले, असे निकाल सांगतो. ५) तसे तर आपण कोणाच्या मदतीला धावून गेलो तरच लोक आपल्याला मदतीला येतात. हा साधा नियम आहे. राजकारणात तर कमीतकमी त्रास देणारा, अडीअडचणीला किमान संपर्कात असणारा उमेदवार हवा अशी मतदार, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा चव्हाण यांनी अंमलात आणली असे दिसते. ६) कोणत्याही प्रस्थापिताला पराभूत करायचे असेल तर समोर समर्थ पर्याय आहे का? ज्याला निवडून द्यायचे तो आपल्या काही समस्या सोडवू शकतो का. किमान शांतपणे ऐकून घेऊ शकतो का. वेळोवेळी उपलब्ध होईल का? याचाही विचार मतदार काही प्रमाणात करतात. त्यामुळे प्रस्थापिताविरुद्ध प्रचंड असंतोष धुमसता हवा. तरच त्याला हवा देता येते. प्रस्थापिताचे पक्षांतर्गत विरोधक खरेच किती ताकदीचे आहेत, याचीही खरी, खोलात जाऊन तपासणी करावी लागते. चव्हाण महाविकास आघाडीचे सरकारचे उमेदवार असल्याने बोराळकर समर्थ पर्याय आहेत, असे मतदारांनी वाटले नाही. शिवाय चव्हाण यांच्याविरुद्ध धुमसता असंतोष असल्याचे वातावरण शेवटपर्यंत नव्हते. चव्हाण यांचे पक्षांतर्गत विरोधक फारसे शक्तीमान नाहीत. काहीजणांनी फसवी आश्वासने दिली होती, हे आतातरी बोराळकरांच्या लक्षात आले असावे, अशी अपेक्षा आहे.

गणित चुकलेला विद्यार्थी

गणित चुकलेल्या विद्यार्थ्याने छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे या प्रख्यात कवी दासू वैद्य यांच्या कवितेतील ओळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आणि भाजप नेतृत्वाला लागू होण्यासारख्या आहेत २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही चव्हाण यांनी बोराळकरांवर सहज मात केली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. तेव्हा प्रचाराला वेळ मिळाला नाही. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात बूथनिहाय यंत्रणा उभी राहिली नाही, असा बोराळकरांचे म्हणणे होते. तेच सत्य मानून यंदाही त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तेथेच देवेंद्र फडणवीस यांचा पहिला डाव चुकला. कारण २०१४ ते २०२० या सहा वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारखी बलाढ्य शिक्षण संस्था ताब्यात आलेल्या चव्हाण यांचे बस्तान आणखी पक्के झाले होते. पदवीधरमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या मतदार नोंदणीत त्यांनी वैयक्तिक लक्ष घालत हक्काचे सुमारे दीड लाख मतदान नोंदवून घेतले. पक्षात उमेदवारीसाठी एकही विरोधक शिल्लक राहणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. विजयाच्या इमारतीचा पाया मजूबत करत एक-एक वीट नीटपणे रचत नेली. तर बोराळकरांनी केलेली नोंदणी चव्हाणांच्या पासंगालाही पुरणारी नव्हती. दुसरीकडे सहा वर्षांत प्रवीण घुगेंनी केलेल्या तयारीकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे घुगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे कमालीच्या दुखावल्या. तीन दशकांपासून संघ सेवेत असलेले घुगे आपल्याला उमेदवारी मिळणार असे गृहित धरून तयारीला लागले होते. त्यांनी स्वत:ची नोंदणी, स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभी केली. अगदी बंडखोरीपर्यंत ते पोहोचले. पंकजा यांनी समजूत घातल्यावर माघार घेत ते प्रचारात सहभागी झाले. पण या साऱ्यातून मुंडे समर्थकांना जो संदेश जायचा तो गेलाच. भाजपला डॅमेज कंट्रोल जमले नाही. आणि ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..! अशी प्रख्यात कवी सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे भाजप, बोराळकरांची अवस्था झाली.

Sunday, 15 November 2020

गुढतेचा अलंकार

मानवी मनाला कायम गुढतेचे आकर्षण राहिले आहे. एखाद्या काळ्यामिट्ट गुहेत कोणी ध्यानस्थ साधू आहे का. जीर्णशीर्ण वस्त्रात गुंडाळलेल्या भल्यामोठ्या लाकडी पेटीत मृतदेह आहे का असा प्रश्न अनेकांना असतो भेसूर चेहऱ्याच्या माणसाचं जगणं कसं असावं हेही जाणून घ्यायचे असते हे सर्वांना मान्य असलेले सत्य तरीही मराठीच काय एकूणच सर्व भाषिक साहित्य विश्वात गुढ मांडणी गुढ कथानकाला अतिशय कमी स्थान मिळाले आहे विनोदाप्रमाणे गुढता हाही मुख्य प्रवाहच नाही या प्रांतातील अस्सल निर्मितीसाठी फार काही करावे लागत नाही गुढ कथानकाने समाजमन ढवळून निघत नाही अशी मराठी साहित्यिकांची पक्की धारणा झाली आहे वस्तुत: असे काही लिहिण्यासाठी खूप एकांतप्रिय नाविन्य शोधणारी सृजनता लागते. मराठी साहित्य विश्वावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनात ती जागोजागी दिसते. पण त्यांच्यानंतर तेवढ्या ताकदीचा लेखक झाला नाही. जीवनाचे एक वेगळेच दर्शन घडवणारी गुढ कथा, कादंबरी नजरेत आली नव्हती. रसिकांमध्ये खूप चर्चेत नव्हती. जणू काही गुढतेचा प्रवाहच एखाद्या काळ्याकुट् खोल दरीत गडप झाला की काय असे वाटत होते. पण असे म्हणतात ना की जगात काहीच कायमस्वरूपी संपत नाही. ते कालांतराने रुप पालटून कमी अधिक प्रमाणात प्रकट होतच असते तसेच काहीसे मूळ कवीचा पिंड असलेल्या संतोष विठ्ठल घसिंग यांच्या ‘विधाराद्रोण’ कादंबरीतून लक्षात येते. वाचकांना अद्भुत, थरारक, रोमांचकारी दुनियेत घेऊन जाणारी गुढमय संपन्न अलंकार धारण केलेली ही कलाकृती आहे. विशेष म्हणजे ती आशय मांडणीतही चमकदार आहे. जेष्ठ कवी, कादंबरीकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रीकांत देशमुख विधाराद्रोण आणि घसिंग यांच्याविषयी सांगतात ते मनाला पटते. विधाराद्रोण म्हणजे नंदन शिकाऱ्याची कथा तशी अगदी साधी पण प्रचंड गुंतागुंतीची. वाघाची शिकार करायला बाहेर पडलेला नंदन जे काही या प्रवासात भोगत जातो ती म्हणजे मानवी जीवनाची अंधारगुह जाणिवा गोठून जाव्यात असा हा प्रवास एका अकल्पित जगातून जाणारा. एखाद्या गूढकथेतला हा गहनगूढ प्रवास आपल्या आकलनाची कुवत जोखणारा. अतिशय अनघड भाषा खूपदा मनाचे तुकडे करणारी. एक वेगळे प्रतिमाविश्व अनाकलनीय आणि संमोहक. उदाहरणार्थ आयुष्य फुलावरल्या दवाप्रमाणे क्षणभंगुर दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रज्योत. असंख्य प्रतिमा. संपूर्ण कादंबरी या प्रतिमांनी लखकून जाते. कधी व्याकुळ होते. कधी मरणप्राय वेदना सोसत पुढे सरकते. घसिंग यांनी ही रचना एक कथा दुसरी कथा कथेतील कथा बाहेरची कथ अशी केली आहे. या सर्वांना जोडून येणारा व्यापक पट वेगवेगळ्या जंगलातुन गुहांमधून जाणारा जसे की कनकेश्वर मंदिराचे यातले वर्णन मुळातून वाचावे असे आहे. जितसामा, बुधलीबाई, रक्त वृक्ष, पुतळाबाई, नगरवधू अशी कितीतरी पात्रे घसिंग यांनी निर्माण केली आहेत. ती या कादंबरीत आपापले गूढ विश्व घेऊन भेटतात. हे सगळे वाचतांना मनाला सुन्न करणारी भोवळ येते. वाचताना कधीकधी ओठ कोरडे पडतात. एक विचित्र विश्व आपल्या भोवती फेर धरू लागते.पण विधाराद्रोण केवळ काहीतरी अगम्य रंजक दुनियेच्या वर्णनापुरती मर्यादित राहत नाही. तर ती आपल्याला हळूहळू मानवी जीवनाच्या गाभाऱ्याकडे नेऊ लागते. त्यावेळेसचा प्रवास आपल्याला गुंतवून ठेवतही भानावर आणत जातो. तेथे या कादंबरीची भाषा हा एक अलौकिक ठेवा असल्याचे ठळकपणे जाणवते. डॉ. गणेश मोहिते म्हणतात त्याप्रमाणे, मानवी मनाचा तळपरीघ मोह, माया, मत्सर, इच्छा - आकांक्षा, असुया, भावना, वासना यातील द्‌वंद्वाने व्याप्त आहे. त्यातून मानवी मन व्यामिश्र अनाकलनीय बनले आहे. कोऽहम... मी कोण हा अनंत काळापासून अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. त्यच्या उत्तरासाठी तर असंख्य विद्वानांनी अगाध तत्वज्ञान प्रसवले आहे. साहित्यिक, लेखक, नाटककारांनी लेखणी चालवली. मन अन् वर्तन नियमन करणारे न्याय नीति धर्मतत्वे आकाराला आली. मानवाच्या जीवनविषयक धारणांची जडणघडण करुन विशिष्ट विचारव्यूह आखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्नही झाले. जीवनानुभूतींची संगती व नेणीवेतील विचारकलहाचा अन्वयार्थ लावून अनंत संज्ञा सिद्धांत जन्माला आले. तरीही माणसाचा स्वत्व शोधाचा प्रवास कधी थांबला नाही, असे विधाराद्रोण मांडते. त्या सोबत ही कादंबरी असेही सांगते की, संवेदनांचा भाषिक आविष्कार नेहमी नवे तत्वज्ञान, सिद्धांतांना जन्म देणारा असतो. त्याची कालपरत्वे निकड अधिक असते. काळ कोणताही असो आभासी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरत धडपड करण्यात मश्गुल राहून आनंदी असण्याचा सार्वत्रिक भ्रम पैदा करणे हा मानव जातीचा अट्टाहास आहे.मात्र खरे असे की तत्वतः मानवाला जगण्यासाठी ज्ञानापेक्षा आनंद अधिक उपयुक्त असतो. त्याकरिता निसर्गतः जगण्याचा अर्थ आणि अर्थातील 
'आनंद' कळायला हवा. असे आत्यंतिक मौलिक जीवनभाष्य करणारी कलाकृती म्हणून संतोष विठ्ठल घसिंग यांची 'विधाराद्रोण' ही कादंबरी अद्वितीय ठरते. चार वेगवेगळ्या गुढ रुपकथांच्या माध्यमातून ही कादंबरी मानवी वर्तनाचे परिनियम आणि जीवनाचे सारसूत्र सांगते. मौखिक कथन परंपरेचा घाट स्वीकारुन निवेदक मानवी अस्तित्व शोधाच्या कल्पित परंतु तितक्याच जिवंत कहाण्या प्रसवतो. नायकाचा  आत्मसंवाद घडवून आणण्यात लेखक कमालीचा यशस्वी होतो. स्वःशोधाचा आत्मस्वर सापडल्याचा अतर्क्य आनंद कलाकृती वाचकांना देते. कथन वगळता कादंबरी रुपकदृष्ट्या ठळक न होताही आशयातील तात्विक  जीवनभाष्याला अनुलक्षून आलेले भाषासौंदर्य वाचकांना नवं जीवनानूभुती प्रदान करणारे आहे. एखादे चित्र डोळ्यासमोर उभी करणारी अचूक प्रतिमा उभी करणे किंवा डोके लख्ख करणारी उपमा देणे हे जीए कुलकर्णी यांचे विलक्षण कसब होते. त्याच प्रकारचा अनुभव काही ठिकाणी ‘विधाराद्रोण’मध्येही येतो. प्रेरणा पाचपुते यांचे मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाला अचूकतेने पकडणारे आणि नजरेला ताण देणारे आहे. एकूणात मानवी जीवन मूल्ये आणि मनाच्या परिघांमध्ये कायम सुरू असलेली असंख्य आंदोलने यांचा एक वेगळा पट कसा असू शकतो, हे जाणून घेण्यासाठी विधाराद्रोण नक्की उपयुक्त ठरेल.
 
-   
 

Friday, 21 August 2020

सगळेच अनैतिक ...

तीन दिवसांपासून दुकान बंद. गेल्या दहा वर्षांत तर असे कधीच झाले नाही. रितेशने मोबाईलवर कॉल केला. तर स्वीच ऑफ. त्याचा धीर सुटला. त्याने पलिकडच्या हरदीपला दुकानावर बोलावून घेतलं. दोघांनी बराच विचार केला. आणि घाबरत घाबरतच इन्सपेक्टर बुधवंतांसमोर जाऊन बसले. आम्ही दोघे वंडर आर्केडमधील दुकानदार आहोत. दोघांची मोबाईल, स्पेअर पार्ट विक्री आणि दुरुस्तीची छोटी दुकाने आहेत. दोघांच्या मध्ये कापडाचं दुकान आहे. त्याचा मालक सदानंद आमचा मित्र. दहा वर्षांपासून आमची दुकाने बाजूबाजूला. गेल्या तीन दिवसांपासून त्याचं दुकान बंद, मोबाईल स्वीच ऑफ आहे. एका दमात रितेशनं सांगून टाकलं. इन्सपेक्टर बुधवंतांनी तक्रार नोंदवून घेतली. मग हवालदार मसलेंना ‘वंडर आर्केडकडे चक्कर मारा. तिथं सीसीटीव्ही आहेत का पहा. सदानंदचं घर शोधा. खबऱ्यांना कळवा.’ अशा सूचना केल्या. रात्री नऊच्या सुमारास ते ठाण्यात परतले. तेव्हा महत्वाचा पण दुर्देवी क्ल्यू हाती लागला होता. पश्चिमेकडील डोंगराच्या पायथ्याशी एक प्रेत सापडलं होतं. ते बहुधा सदानंदचं असावं, असा हवालदार मसलेंचा अंदाज होता. त्यांनी दिवसभरात बरीच माहिती गोळा करून आणली होती.

त्या भागातील सर्वोत्तम कापड दुकानदार अशी कधी स्पर्धा झाली असती तर सदानंद शंभरजणांमध्ये पहिल्या पाचात नक्की आला असता. निवृत्त शिक्षक-शिक्षिकेचा तो एकुलता एक मुलगा होता. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्याने नोकरी करायची नाही. काका म्हणजे लक्ष्मणसारखा कापडाचा व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं. म्हणून मोठी धडपड करून एका टपरीत दुकान सुरू केलं. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं महिलांसाठी खास कापड तयार होत होते. ते सदानंद आणायचा. गरज पडली तर घरपोच कपडे पोहोचवायचा. बोलण्यात अत्यंत मिठ्ठास आणि न कंटाळता पाठपुरावा, ही त्याला मिळालेली देणगी होती. कितीही तापदायक ग्राहक असेल तरी तो कापड खरेदी करायला लावायचाच. तेही चढ्या भावाने. त्यामुळे तो झपाट्याने लोकप्रिय तर झालाच शिवाय पैसाही कमावू लागला. मग टपरीत माल ठेवणं त्याला शक्य होईना. म्हणून त्याने वंडर आर्केडमध्ये चांगला मोठा गाळा घेतला. बचतीचे वीस लाख रुपये टाकले. फर्निचर तयार केले. आपण कधी माल खरेदीसाठी बाहेरगावी गेलो तर दुकान चालवण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून चुणचुणीत दीपाची नियुक्ती केली. एकीकडे कॉलेजमध्ये तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या दीपाचे कापड विक्री व्यवसायात स्वारस्य वाढले होते. त्यामुळे सदानंद तिच्यावर जास्त विसंबून राहू लागला होता. त्याला घरची फार जबाबदारी नव्हती. आई-वडिलांसाठी दरमहा वीस हजार रुपये पाठवलं की तो मोकळा होत होता. त्यांचीही त्याच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती. दर महिन्याला पैसे पाठवण्यापेक्षा सुनबाईचं मुख पाहू दे, असा धोशा त्यांनी लावला होता. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोराचा संसार लवकरात लवकर मार्गी लागावा, असा ते निकराचा प्रयत्न करत होते. नातेवाईकांमध्ये चांगली मुलगी शोधत होते. पण बहुतेक मुली विवाह होऊन सुखानं नांदत होत्या. चाळिशीच्या सदानंदसाठी पस्तिशीची पोरगी कुठून मिळेल, या नातेवाईकांच्या प्रश्नावर निरुत्तर होत होते. पण सदानंदला त्याची चिंता नसावी. तो फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागला होता. शहरातील प्रख्यात कपडा व्यापारी प्रतिभाराणीसोबतचे संबंध सध्या पुरेसे आहेत, असे त्याला वाटत होते. पाच-सात वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त त्याची प्रतिभासोबत भेट झाली. पतीचे अपघाती निधन झाल्याने त्यांनी दुकान सांभाळणे सुरू केले होते. पन्नाशीच्या जवळपास असलेल्या प्रतिभा दिसायला अत्यंत मादक, आकर्षक. काम करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे अल्पावधीतच त्या लखपती झाल्या. एकाची तीन दुकाने झाली. त्यातले एक त्यांनी पहिला सावत्र मुलगा प्रवीण आणि दुसरे प्रीतेशच्या नावावर करून दिले. तर तिसरे स्वत:कडे ठेवले. सदानंद एवढेच वय असलेल्या प्रवीण, प्रीतेशला सावत्र आईचे म्हणजे प्रतिभाचे सदानंदसोबतचे संबंध खटकत होते. पण प्रतिभा केवळ सदानंदवर अवलंबून नव्हती. दोन वर्षांपूर्वी तिचा नाट्यगृह मालक तनसुखसोबत याराना वाढला होता. आणि हा तनसुख सदानंद नसताना दुकानावर येऊन दीपाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. प्रवीण, प्रीतेशही दीपाच्या मागे हात धुऊन लागले होते. एकूणात सगळेच नातेसंबंध अनैतिकतेच्या चक्रात फिरत होते. इन्सपेक्टर बुधवंतांनी सारे कसब पणाला लावले. खुनी कोण, खुनाचा कट कोणी रचला असावा, हे शोधले.