Tuesday, 16 November 2021
गुलजार सिनेमा
सिनेमा पेराडिजो नावाचा एक नितांत सुंदर सिनेमा आहे. १९८८चा. त्यात अभिनय, कहाणी, मांडणी, दिग्दर्शन तर अप्रतिम आहेच पण सिनेमा टॉकीजची वास्तूही त्यात अभिनय करते. सिनेमा संपल्यावरही ती डोळ्यासमोर रेंगाळत राहते. खुपत राहते. खूप काही सांगत, बोलत राहते. चाळिशी ते नव्वदीत असणाऱ्या अनेक सिनेमाप्रेमींसाठी सिंगल स्क्रीन म्हणजे एक पडद्यावाली टॉकीज ही केवळ पैसे घेऊन मनोरंजन देणारी इमारत नव्हे तर एक टुमदार, उबदार घरच होते. मनापासून, हृदयापासून प्रेम असलेले. त्या घराच्या भिंतींना, पडद्यांना एक सुरेख गंध होता. टॉकीजच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कुटुंबासारखा वाटत होता. १९७०च्या दशकात औरंगाबाद शहर म्हणजे अशा अनेक टुमदार, उबदार घरांची वसाहत होती.
त्यातली एक होती गुलजार. नावच किती छान आहे ना. गुलजारला जाऊन येतो, असं म्हणताना त्या काळी मनात आनंदाच्या लाटा उसळत. जणूकाही एखाद्या आवडत्या मैत्रिणीनं बोलावलंय, असा भाव चेहऱ्यावर उमटत असे. गुलमंडीकडून पानदरिब्याकडं जाताना केळीबाजार ओलांडला की डाव्या बाजूला गुलजारचं दर्शन घडतं. आजही तिथं बाहेरच्या बाजूला जुन्या सिनेमांची भली मोठी पण अंधुक, पुसट झालेली पोस्टर्स दिसतील. पन्नास – साठ वर्षांपूर्वी ही पोस्टर्स अतिशय ठळक होती. गुलजारमध्ये कोणता सिनेमा लागणार आहे, याची घोषणा करणारा एक टांगा फिरायचा. त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाची पोस्टर्स बांधलेली असायची. मानेपर्यंत कुरळे केस रुळत असलेला, कपाळाला गंध लावलेला गुलजारचा कर्मचारी त्यात बसलेला असायचा. तो मोठ्या कर्ण्यावरून (माईक) आइए गुरुवार को देखीए पाच शो. ग्रेट गँबलर के. अमिताभ, झीनत, नीतू के साथ. असं सांगत फिरायचा. पाच-सात वर्षांची अनेक पोरं चड्डी सावरत त्या टांग्याच्या मागे मागे अक्षरश: सात-आठ किलोमीटर फिरायची. माझ्या आठवणीप्रमाणे गुलजारला कधी बिग बजेट सिनेमा पहिल्या स्लॉटमध्ये लागला नाही. रिपीटमध्ये मात्र गुलजारने कोणालाही सोडलं नाही. त्या काळी धार्मिक म्हणजे रामायण, महाभारत असे सिनेमेही गुलजारची मक्तेदारी होती. मोडकळीस आलेल्या पाच-सहाशे खुर्च्या असलेल्या या टॉकीजचा पाठिराखा दुय्यम, तिय्यम दर्जाचा प्रेक्षक होता. त्याला दर्जेदार कहाणी, सामाजिक संदेशाशी फारसे देणेघेणे नव्हते. दिवसभर काम करून आंबलेले मन मनोरंजनात बुडवून टाकण्यासाठी येथे लोक संध्याकाळ आणि रात्रीच्या शोला गर्दी करत. त्यामुळे सकाळ, दुपारचा शो म्हणजे प्रेमी, लफडेबाजांसाठी सुवर्णसंधी होती. मल्टीप्लेक्सवाले जशी गर्दी पाहून तिकिटाचा दर कमी जास्त करून टाकायचे. तशी सोय तेव्हा नव्हती. नाहीतर प्रेमी जोडप्यांकडून भलीमोठी कमाई करता आली असती. जुन्या औरंगाबादचे वैभव असलेली गुलजार टॉकीज माझ्या अंदाजाप्रमाणे दहा हजार चौरस फुट जागेत बसलेली असावी. त्यातील चार हजार खुली जागा होती. त्यावर संध्याकाळ, रात्रीच्या शोला मध्यंतरात मोठी मजा असायची. चटकदार भेळ, गरमागरम भजी, वडे, समोशाचे दोन गाडे असायचे. भल्यामोठ्या परातीत शेंगदाणे रचून त्यावर एक छोट्याशा मातीच्या भांड्यात भट्टी लावलेले तीनचारजण लोकांना खेचायचे. शिवाय गोटी सोडाची एक हातगाडी होती. त्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या, चॉकलेटी रंगाच्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या. मध्यंतरात गाडीला सोडाप्रेमींचा गराडा पडायचा. सोडावाला आणि त्याचा कर्मचारी मोठ्या झोकात बाटलीचं झाकण उघडायचा. त्याचा टॉ … S S S क असा आवाज यायचा. फेस उसळायचा. सोड्याच्या चव घशात ठेवूनच लोक पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी पळायचे.
गुलजारकडून थोडं पुढं सराफ्याकडं जाताना अगदी चिंचोळ्या, अंधारलेल्या गल्लीत रिगल टॉकीज होती. खरं तर एवढ्या दाटीवाटीच्या वस्तीत चांगली सहा-सातशे खुर्च्यांची टॉकीज म्हणजे आश्चर्यच होतं. पण जुन्या औरंगाबादमध्ये त्या काळात ते सहज शक्य झालं. कारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी शहर फारसे गजबजलेले नव्हते. आणि निर्जन ठिकाणी टॉकीज करणं वेडेपणा. त्यामुळं मला वाटतं १९५१-५२मध्ये मालकानं योग्य निर्णय घेतला. हळूहळू रिगलला दुकानांनी घेरले. मग ती बंद पडली. आणि १९८०-८१मध्ये पुन्हा रसिकांच्या सेवेत आली. त्या काळी सोशल मिडिआ नाही. अनेक पेप्रावाले सिनेमाबद्दल सांगणं म्हणजे भ्रष्ट झालो, असा अविर्भाव आणत. त्यामुळं रिगल पुन्हा सुरू झाल्याची बातमी कळाल्यावर खूप लोक तिथं गल्लीत येऊन दुकानदारांना विचारून खात्री करून घेत. रविवार दिवस इथं खास असायचा. लष्करी छावणीतील वीस-बावीशीतले सैनिक सायकली घेऊन शहरात यायचे. किरकोळ खरेदी, एखाद्या हॉटेलात नाश्ता पाणी आणि सिनेमा असा त्यांचा बेत असायचा. मजबूत अंगकाठीच्या, उंचापुऱ्या, खळखळून हसणाऱ्या सैनिकांची गर्दी रिगलपाशी जास्त असायची. कारण काचीवाडा आणि इतर भागांतील पंधरा-वीस वेश्या तिथं दुपारच्या वेळी आलेल्या असायच्या. सैनिक येत म्हणून त्या यायच्या की वेश्यांवर तरुणाईतील गर्मी उधळण्यासाठी लष्करी यायचे, हे नक्की सांगता येणार नाही. पण मागणी तसा पुरवठ्याचा नियम यातही लागू होतोच. तर रंगरंगोटी केलेल्या, भडक रंगाचे ब्लाऊझ, साडी नेसलेल्या या वेश्या दुकानांसमोर, टॉकीजच्या दरवाजाजवळ उभ्या असायच्या. त्यांच्याजवळ तिकीटे असायची. यातील बहुतांशजणी सैनिकांपेक्षा थोड्या अधिक वयाच्या असाव्यात. तीस-बत्तीशीच्या. ज्या सैनिकासोबत त्यांचा व्यवहार पक्का होत असे. त्याला घेऊन त्या टॉकीजमध्ये जात. जणूकाही नवरा – बायको अशा झोकात डोअरकिपरला तिकीट देत. त्यालाही हे सारं माहिती असल्यानं तो गालातल्या गालात हसत असे. पण काही सैनिकांना सिनेमात स्वारस्य नसे. मग तो तिला सायकलवर बसवून मोठ्या खुशीत, शिट्टी वाजवत घेऊन जायचा. शहागंज भागातून तिला एखादं घड्याळ, साडी किंवा चप्पल खरेदी करून द्यायचा. त्या काळात किमान सैनिक-वेश्येच्या किमान तीन चार प्रेम कहाण्या रिगलच्या साक्षीने फुलल्या असतील. १९९५नंतर पुन्हा रिगल वादात अडकली आणि बंद पडली. ती कायमचीच.
सात-आठ वर्षांपूर्वी विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला डर्टी पिक्चर प्रचंड गाजला. त्यात तिनं १९७० ते १९९० मध्ये प्रचंड गाजलेल्या साऊथ सेक्स बाँब सिल्क स्मिताची भूमिका केली. डर्टी पिक्चरमध्ये अर्थातच अनेक गरमागरम प्रसंगांची रेलचेल होती. शिवाय त्यातून सिल्क स्मिताच्या व्यक्तिगत जीवनाची थोडीशी माहिती सर्वांसमोर आली. कमालीची मादक, सेक्स बाँब असली तरी ती माणूस म्हणून पूर्णपणे अपयशी होती. तिनं काहीजणांचे आणि काहीजणांनी तिचं शोषण केलं. प्रेम मिळत नाही, असं म्हणून तिनं अकाली जीवन संपवलं. आणि ती प्रसिद्धीच्या आणखी एका लाटेवर आरुढ झाली. तिची औरंगाबादकरांना पहिली ओळख सदमा सिनेमातून १९८३ मध्ये झाली. पण तिचा सर्व वर्गात प्रचार, प्रसार झाला तो शहागंज सिटी चौक रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत लपलेल्या मोहन टॉकीजमध्ये. एखाद्या गोदामासारखं रूप असलेल्या मोहनची सुरुवात धर्मेंद्र – झीनत अमानच्या शालिमार सिनेमानं झाली होती. पहिला शो सकाळी आठ वाजताच होता. तुफान गर्दी उसळली होती. जेवढ्या वेगात शालिमार वर गेला तेवढ्याच वेगानं खाली आला. पुढं मोहनमध्ये मुकद्दर का सिकंदर, सरगम असे सिनेमे प्रचंड चालले. पण बहुधा बडे सिनेमा वितरक आणि मोहनच्या मालकांचा खटका उडला असावा. मोठ्या बॅनरचे, लोकप्रिय सिनेमे येणे कमी होत गेले. त्यांची जागा देशी ब्ल्यू फिल्म कॅटेगरीत टाकता येतील, अशा दक्षिणेतील सिनेमांनी घेतली. टॉकीजच्या एंट्री पॉईंटला म्हणजे अगदी वर्दळीच्या रस्त्यावर या सिनेमातील नट्यांची तुफानी पोस्टर्स लागलेली असायची. अजिंठा पेपरमध्ये भल्यामोठ्या टायपात अत्यंत उत्तेजक जाहिराती असायच्या. सोबत इतर उत्तान फोटो. तो पाहून लोक जायचे. त्यांना काहीवेळा रंगात आलेला सिनेमा ऑपरेटर थेट पाश्चिमात्य सिनेमाचा काही भाग दाखवायचा. चेकाळलेली तरुणाई ऑपरेटरची करामत मीठ मसाला लावून दहा मित्रांना सांगायची. मग काय प्रत्येक शो हाऊसफुल्ल. पाऊल ठेवायला जागा नसायची. पाच रुपयांचं तिकीट पंचवीसलाही मिळवता मिळवता मारामार व्हायची. मोहनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मागील बाजूला नाचगाण्याचे कोठे होते. शौकिन लोक सिनेमा पाहून तिथं जात. वीस – पंचवीस वर्षांपूर्वी कोठेवाल्या परागंदा झाल्या. काहीजणींनी कुंटणखाने सुरू केले. इकडे मोहनच्या इंग्रजी सिनेमा प्रेमाची महती पोलिसांकडे पोहोचली. मग त्यांनी धाडी टाकण्याचे नाटक केले. खिसे गरम होताच नाटकावर पडदा पाडला. महत्वाचा मुद्दा म्हणजे मोहनमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची मालिका सुरू होण्याच्या काळात रंगारगल्लीसह काही ठिकाणी व्हिडिओ पार्लर सुरू झाली होती. तिथं थेट ब्ल्यू फिल्म दाखवल्या जायच्या. पार्लर खच्चून भरलेले असायचे. पण एकाच वेळी वीस-पंचवीसपेक्षा जास्त शौकिनांसाठी जागा नसायची. शिवाय ब्ल्यू फिल्म म्हणजे त्यात ना कहाणी ना भारतीयपणा, ना भारतीय चेहरे. त्यामुळे पार्लरनी मोहनचे फारसे नुकसान केले नाही. मोहनचा धंदा जोरात सुरू राहिला. तो तसाच राहिलाही असता. पण म्हणतात ना की, कोणतीही गोष्ट मग ती चांगली असो की वाईट. टिपेला जाऊन तुटते. तिची घसरण होतेच. हा निसर्गाचा नियम आहे. त्याला या जगाच्या इतिहासात कोणीही आव्हान दिलेलं नाही. तर मोहनच्या गरमागरम सिनेमांना इंटरनेटचं ग्रहण लागलं. मोठ्या पडद्यावर जे काटून छाटून दाखवलं जात होतं. त्याच्या एक हजार पटींनी जास्त उघडंनागडं, बिभत्स मोबाईलवर दोन-तीन रुपयांत मिळू लागलं. मग मोहनकडं जाणाऱ्यांचा ओघ कमी कमी होत गेला. अर्थात तो अजून पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाचं संकट संपल्यावर कदाचित पुन्हा मोहन फुलेल. मोठ्या पडद्यावर सर्व काही पाहण्याची मौज लुटणारे आंबटशौकिन मोहनला तारतील. त्यावेळी बहुधा शहागंजातील स्टेट टॉकीजशी मोहनची स्पर्धा असेल. कारण स्टेटमध्येही १९९० नंतर अश्लिल सिनेमांचे माहेरघर तयार झाले. खरेतर स्टेट म्हणजे औरंगाबादच्या सिनेइतिहासाचा मानबिंदू. अनेक मोठ्या कलावंतांनी स्टेटला भेट दिली. हिंदी सिनेमा जगात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलेला शोले इथेच लागला होता. तेव्हा औरंगाबादलगतच्या खेड्यातून लोक टांगा, बैलगाडीनं येत. स्टेटच्या आवारात टांगा, बैलगाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था होती. तेव्हाच्या पेप्रात स्टेटच्या मालकांविषयी बरंच चांगलं छापून येत असे. मुबलक पैसा बाळगणाऱ्या स्टेटच्या मालकांना बहुधा कौटुंबिक अडचणींनी ग्रासलं असावं. त्यामुळे त्यांचे लक्ष कमी होत गेले. वितरकांशी संबंध बिघडले असावेत. त्यामुळे चांगल्या सिनेमांचे प्रमाण झपाट्याने घसरत गेले. त्याऐवजी भडक सिनेमे झळकू लागले. इंटरनेटच्या आक्रमणानं मोठ्या पडद्यावरील सेक्सचे आकर्षण संपवून टाकले. त्याचा परिणाम स्टेटवर होत गेला. कोरोनापूर्वीच्या तीन-चार वर्षात स्टेट फक्त बातम्यांपुरतीच चर्चेत राहिली.
जवळपास मोहन, स्टेटएवढेच आयुष्य आणि त्याच स्वरूपातील अडचमी असलेल्या सादिया टॉकीजने कधी कायमस्वरूपी आंबट मार्ग स्वीकारला नाही. जुन्या औरंगाबादच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सादियाला समोरच्या बाजूनं मोठं मोकळं मैदान लाभलं होतं. इथं औरंगाबादकरांना नेहमीच चांगले सिनेमे पाहण्यास मिळाले. अधूनमधून इंग्रजी सिनेमेही लागत पण तेही दर्जेदार असतील, याची काळजी टॉकीजमालक घेत. मल्टीप्लेक्सचे युग सुरू झाल्यावरही ते सिंगल स्क्रिनवर कायम राहिले. त्याचा तोटा त्यांना झाला. हक्काचा प्रेक्षक कमी कमी होत गेला. सादियाच्या कँटीनमध्ये त्या काळात मिळणारे सँडविच अफलातून होते. अत्यंत चविष्ट असे हे सँडविच खाण्यासाठी ठिकठिकाणाहून खवय्यै येत. तृप्त होऊन जात. आता जर तो सँडविचवाला असता तर नक्कीच वर्षभरात लखपती आणि नंतर करोडपती झाला असता.
मल्टीप्लेक्स अवतरण्यापूर्वी औरंगाबादचा सिनेमा अंजली टॉकीजनं बदलला. १९८१मध्ये सावे कुटुंबियांनी सुरू केलेल्या अंजलीनं दर्जेदार सेवा म्हणजे काय याचा अनुभवर रसिकांना दिला. प्रशस्त जागा. आरामदायक खुर्च्या आणि उच्चप्रतीचा पडदा, असा त्रिवेणी संगम अंजलीत होता. भारतातील सर्व मोठ्या वितरकांशी सावे कुटुंबियांची थेट ओळख असल्याने त्या काळात सर्वोत्तम सिनेमे अंजलीतच येत. जेम्स बाँड, उर्सूला अँड्रेसच्या सिनेमांचे दर्शन अंजलीनेच घडवले. सुपरमॅन, सुपरवुमन असे हॉलिवूडपट येथेच पाहण्यास मिळाले. एवढेच नव्हे तर नट-नट्यांच्या पत्रकारांशी गप्पा असा नवा ट्रेंड त्या वेळी सावेंनी सुरू केला. टॉकीजवर टॉकीज हा प्रकारही औरंगाबादकरांनी अंजली – संगीताच्या रुपात पाहिला. संगिता म्हणजे आजकालच्या मल्टीप्लेक्ससारखं रूप होतं. फार झालं तर दीड-दोनशे खुर्च्या होत्या. त्यात लोकांना बऱ्यापैकी मराठी आणि दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे पाहण्यास मिळत.
औरंगाबादमध्ये नव्या संस्कृतीचा पाया रचणारी आणखी एक टॉकीज होती सत्यम. रेल्वे स्टेशन एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला सत्यमची सुंदर, आखीव, रेखीव इमारत होती. हॉरर इंग्रजी सिनेमे पाहायचे असतील तर सत्यमशिवाय पर्यायच नाही, अशी १९९०मध्ये स्थिती होती. इंग्रजीप्रेमी रसिकांची चांगली गर्दी होत होती. पण तेवढ्यावर बहुधा टॉकीजचा खर्च चालत नसावा. सिनेमे आणून लोकांचे मनोरंजन करण्यापेक्षा निवासी इमारती बांधून पैसा कमावणं टॉकीजमालकाला सोपं वाटलं असावं. एक दिवस सत्यम बंदची घोषणा झाली. रॉक्सी टॉकीजचंही हेच झालं. तिथं आता दुकानंच दुकानं झाली आहेत. एकीकडं असं चित्र असताना मोक्याच्या जागेवरील अंबा-अप्सरा, अभिनय, अभिनित टॉकीज सर्व संकटांना तोंड देत उभ्या आहेत. औरंगाबादेतील सिनेमाहॉल संस्कृती टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या मालकाला, व्यवस्थापनाला जेवढे सलाम करावेत, तेवढं कमी आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका महाकाय माध्यम समूहाच्या एमडींनी सिनेमा टॉकीजचे काय होणार ते सांगितले. ते म्हणाले होते की, नेटफ्लिक्स ही अमेरिकन कंपनी पुढील काही वर्षांत भारतामध्ये किमान २५ हजार कोटी रुपये ओतणार आहे. बिग ते लो बजेट सिनेमे मोबाईलवरच रसिकांना पाहण्यास मिळावेत, अशी व्यवस्था नेटफ्लिक्स करणार आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्स संस्कृती येत्या काही वर्षांत मोडकळीस येणार आहे. अर्थात भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. सिनेमा ही टॉकीजमध्ये जाऊनच पाहायची गोष्ट असते, यावर ठाम विश्वास असलेले कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे मल्टीप्लेक्स सुरू राहतील. फक्त मध्यम, उच्च मध्यमवर्गीय रसिक मोबाईलवर झपाट्याने वळेल. त्यामुळे टॉकीजची भरभराट होणे कठीण आहे. हळूहळू त्यांची आर्थिक गाडी घसरू लागेल. दहा-बारा वर्षांत हे सर्व होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. तो दोन वर्षांतच खरा ठरू लागला आहे. अर्थात त्यात कोरोनाचा वाटा खूप मोठा आहे. पण एक गोष्ट अत्यंत सत्य आहे की, संकटं कायमस्वरूपी मुक्कामी नसतातच. एकदा माणूस लढण्यासाठी तयार झाला की ती माघार घेतात. पळून जातात. त्यामुळं येत्या वर्षाच्या मार्चमध्ये कोरोना अखेरचे आचके घेत असेल. तोपर्यँत टॉकीज नव्या रुपात, पूर्ण ताकदीनं उभ्या राहतील. मोबाईलमधून बाहेर पडलेल्या रसिकांच्या वर्दळीनं गजबजतील. मल्टीप्लेक्सची जागा वेगळ्याच रचनेतील सिंगल स्क्रिन घेतील. टॉकीज संस्कृती मोडीत काढण्याचं नेटफ्लिक्सवाल्यांचं स्वप्न मोडीत निघेल. उलट ते त्यांचे सिनेमे टॉकीजमध्ये दाखवू लागतील. सिनेमाच्या मध्यंतरामध्ये पुन्हा सोड्याच्या बाटलीची झाकणं टॉ … क असा आवाज करून उघडू लागतील. वडे, भेळ, समोसे, भज्यांचा गंध दरवळेल. औरंगाबादचं जग गुलजार होऊन जाईल, असं वाटतंय.
Wednesday, 10 November 2021
फाळणी : द्वेषाची पेरणी
धर्म, जात असं काही नसतं. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म. धर्म म्हणजे अफुची गोळी. धर्माच्या आधारावर निर्माण होणाऱ्या राष्ट्राचे काही खरं नाही, असा प्रचार, प्रसार गेल्या काही वर्षांपासून जगभरात सुरु असला तरी प्रत्यक्षात धर्म, जातीभोवतीच गेली किमान दहा हजार वर्षे पृथ्वी फिरत आहे. माणुसकीचा अनुभव वैयक्तिक पातळीवर येत असला तरी मानवी समूहातून ती केंव्हाच परांगदा झालीय. धर्माच्या नावाखाली निर्माण झालेली बहुतांश राष्ट्र बऱ्यापैकी जगत आहेत. खडतरपणे का होईना पाकिस्तान, बांगलादेश या कट्टर इस्लामी देशांची वाटचाल सुरु आहे. ते भारतात सामिल, विलीन होण्याची शक्यता नाही. पश्चिम आणि पूर्व जर्मनीसारखं भारतीय उपखंडात होणे नाही. कारण दुसऱ्या महायुद्धातील विजयानंतर कम्युनिस्ट आणि भांडवलशाही शक्तींनी जर्मनीचे राजकीय विचारसरणीनुसार तुकडे पाडून घेतले होते. दोन्ही बाजूंच्या जर्मनांमध्ये एकमेकांविषयी खरेच प्रेम होते. रक्ताच्या थेंबाथेंबात मुरलेल्या धर्माचा, त्यातील द्वेषाचा मुद्दा नव्हता. बर्लिनची भिंत पाडण्यासाठी दोन्ही बाजूंचे लोक धावले होते. तशी स्थिती इथे नाही. उलट कमालीचा द्वेष पसरला आहे. फाळणीने तो कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट लढतीत त्याचा अनुभव आला. भयंकर महायुद्ध. ते भारत जिंकणारच. जिंकायलाच हवे, अशी मिडिआवाल्यांनी हवा तयार केली. तशा बातम्या छापून आणल्या गेल्या. दाखवल्या गेल्या. आणि भारताने हजार टक्के सपाटून मार खाल्ला. मग भारतातील कश्मिर प्रांताच्या तरुणांनी पाक जिंकल्याचा जल्लोष साजरा केला. त्यानं भारतात पाकविषयी धार्मिक द्वेष आणखी वाढला. खरं तर दोन कब्जेदारांत प्रॉपर्टीची वाटणी झाली. सुरुवातीची काही वर्षे दोघेही जे हवे ते मिळाले म्हणून खुश होते. हलके हलके का होईना एकमेकांचे गोडवे गात होते. त्यामुळे झालं ते बरंच झालं. धार्मिक द्वेष आटोक्यात राहिल, असं जगाला वाटू लागलं. पण नंतर गोडव्याचे सूर अत्यंत कडवट, हिंसक होत गेले. एकाच्या दोन फाळण्या होऊन भारत, पाकिस्तान, बांगलादेशात कायम अस्वस्थता आहे. तिन्ही देशांतील लोक भूभागाचे तुकडे करण्यातून द्वेषापलिकडे काहीही शिकलेले नाहीत. अडीच महिन्यांपूर्वी अफगणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यावर जी राजकीय, सामाजिक, आर्थिक समीकरणे तयार होत आहेत. देशांच्या सीमेवर ज्या घडामोडी होत आहेत. तिन्ही देशात आणि आसपास राजकारण जे वळण घेत आहे. ते पाहता फाळणीविषयी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार विचारमंथन करणे आवश्यक आहे. या मंथनासाठी प्रतिभा रानडे यांचे फाळणी ते फाळणी हे दस्तावेजी पुस्तक भरीव मदत करते. येणाऱ्या काळात काय घडू शकते, याचे संकेत देते. फाळणीच्या पोटात दडलेला द्वेष समजून घेण्यात, समजावून सांगण्यात महत्वाची भूमिका बजावते. एक तपापूर्वी म्हणजे २००९ मध्ये राजहंस प्रकाशनातर्फे ‘फाळणी ते फाळणी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्या वेळेपेक्षा आता त्यातील माहितीमूल्य निश्चित वाढले आहे. काही संदर्भ अधिक खोलवर जाऊन काही सांगत आहेत, असे लक्षात येते. रानडेंनी इतिहासकाराप्रमाणे अतिशय चिकाटी, तटस्थपणे फाळणीचा, पाकिस्तान जन्माचा अभ्यास केला. त्यासाठी आवश्यक पुस्तके अमेरिकेतून मिळवली. मुंबई विद्यापीठातील एशियन सर्व्हे आणि इतर देशी-विदेश नियतकालिकांचे वर्षानुवर्षांचे अंक अभ्यासण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यामुळेच त्यांना या चार प्रकरणांच्या २०९ पानी पुस्तकात सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या अनेक गोष्टी सांगता आल्या आहेत. उदा. फारुख अब्दुल्लांचे वडिल शेख अब्दुल्ला पाकिस्तानकडे कसे झुकले होते, याची माहिती त्या देतात. मोहंमद अली जिनांनी २३ जुलै १९४३ रोजी फाळणीविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेण्याचे ठरवले होते. आणि या भेटीची बातमी पेप्रांमध्ये प्रसिद्ध होऊ नये, अशी व्यवस्थाही केली होती, असं त्या सांगतात. १९५३ साली लाहोरमध्ये अहमदिया पंथियांचे शिरकाण झाले. त्याच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती मोहंमद मुनीर, कयानी यांचा आयोग नेमण्यात आला. त्याच्यासमोर घटना समितीचे सदस्य भूपेंद्रकुमार दत्त, राजकुमार चक्रवर्ती काय म्हणाले. आणि शेवटी न्यायमूर्ती मुनीर यांनी काय् अहवाल दिला, या सह रानडे यांनी पानापानांवर सांगितलेल्या अनेक गोष्टी चारही दिशांना चौकसपणे पाहण्यास सांगतात. मिडिआतून जे पेरले जाते. त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा संदेश देतात. विशिष्ट अजेंडा ठरवून काहीजण काहीही लिहित, बोलत असले तरी प्रत्यक्षात काय घडते, हेच महत्वाचे असते. म्हणून ऐतिहासिक तथ्य, पुराव्यांतून मांडणी करणारे ‘फाळणी विरुद्ध फाळणी’ पुस्तक आता नव्या घडामोडी डोक्यात ठेवून अभ्यासू मनाने वाचावे असे नक्कीच आहे.
Saturday, 30 October 2021
शालिन तलवार
भारतातील सर्वात मोठे राज्य, सर्वाधिक मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या प्रचाराचा ढोल-ताशे आतापासूनच वाजण्यास सुरूवात झाली आहे. जात-धर्म हा भारतीय समाजाचा राजकीय पाया आहेच. तो उत्तर प्रदेशात अत्यंत मजबूत आणि गुंतागुंतीचाही आहे. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी काँग्रेस, समाजवादी आणि इतर काही पक्षांची धडपड सुरू आहे. त्याचा आधार घेत भाजप हिंदू मतांची मोट बांधत आहे. जसजसे निवडणुकीचे वातावरण तापत जाईल तसतसे धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रकार वाढीस लागणार आहेत. त्यासाठी नवनवीन फंडे वापरले जातील. काही दशकांपूर्वी उत्तर प्रदेशात राजकारण्यांच्या तेढीला साहित्य जगतातून ठोस उत्तर दिले जात असे. ते ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्या समाजातील काही मंडळी चूक करत असतील. प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील. साहित्यिक मंडळी समाजाचा एकोपा कायम राखण्यासाठी धडपडत. त्यांच्या कलाकृतींमधून प्रागतिक विचारांचा संदेश दिला जात असे. पण हळूहळू असे तडाखेबंद, निस्पृह आणि प्रगतीशील साहित्यिक झुंडशाहीमुळे लोप पावत आहेत. जे काही शिल्लक आहेत त्यांचा आवाज क्षीण होत आहे. राजकारण तर बाजूला राहू द्या दुटप्पी समाजावर प्रहार करण्याचाही त्यांना विसर पडला आहे. हे सगळे पाहून इस्मत जुगताई यांची प्रकर्षाने आठवण येते. ३० वर्षांपूर्वी म्हणजे २४ ऑक्टोबर १९९१ रोजी या जगाचा निरोप घेणाऱ्या इस्मत यांचे जीवनचरित्र, लेखन अतिशय हृदयस्पर्शी, बोलके होते. वैयक्तिक जीवन एका रंगाचे आणि लेखन अनेकरंगी असा दुहेरी चेहरा त्यांनी ठेवला नाही. वेळप्रसंगी समाजाशी संघर्ष करण्याची, चुकीच्या प्रथांवर बोट ठेवण्याची हिंमत त्यांच्यात होती.
त्या उर्दूतील नवसाहित्याच्या आधारस्तंभ होत्या. इस्मतचा अरेबिकमध्ये अर्थ पवित्र तसेच शालिन, नम्र असा होतो. साहित्यिक भाषेतच बोलायचे झाले तर त्या पवित्र तर होत्याच. शिवाय शालिन तरीही धारदार तलवार होत्या. मुक्तपणे आणि अत्यंत निर्भयतेने त्यांनी लिखाण केले. तत्कालिन समाजव्यवस्थेवर टीका केली. बिनधास्त मांडणी करत समाजमन ढवळून काढले. असे असले तरी त्यांच्या सर्व लिखाणात मानवी समूहाविषयी कमालीची करूणा दिसून येते. उत्तर प्रदेशातील बदायू शहरात २१ ऑगस्ट १९१५ रोजी नुसरत आणि कासीम बेग चुगताई दांपत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. चुगताई कुटुंबातील दहा मुलांमध्ये त्यांचा क्रमांक नववा होता. वडिल न्यायाधीश होते. त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे इस्मत यांचे बालपण अलिगढ, आगरा, जोधपूरसह अनेक शहरात गेले. त्या वेळी त्यांनी जी भारतीय संस्कृती पाहिली, अनुभवली त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या बहिणी वयाने त्यांच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. विवाह होऊन त्या सासरी गेल्याने इस्मत यांचे बालपण भावांसोबत गेेले. म्हणून मुलांमध्ये असलेला एक प्रकारचा बंडखोरपणा त्यांच्यात आला. घरात साहित्यिक वातावरण होतेच. विविध प्रकारचे भरपूर साहित्य त्यांनी वाचले. वाचनाचा दिनक्रम सुरू असताना लोकांना जे आवडते ते लिहिणार नाही. मला जे वाटते तेच लिहिन असा निश्चय त्यांनी केला होता. हा निश्चय त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत अंमलात आणला. स्वातंत्र्यपूर्व काळात लिहाफ ही त्यांची पहिलीच कथा प्रचंड वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल झाला.
तेव्हा त्यांच्या सासरेबुवांनी इस्मत यांच्या पतीला म्हणजे शाहीद यांना एक पत्र लिहिले. त्यात म्हटले होते की, ‘लिखाणासाठी खटला दाखल होणे ही काही फार चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इस्मतने रोज अल्लाह आणि प्रेषितांचे नामस्मरण करावे. आम्हाला तिची काळजी वाटते.’ अशा प्रकारचा काळजीवजा पाठिंबा सासरच्या मंडळींकडून त्यांना मिळाला. या बाबत त्या नशिबवानच होत्या. त्यामुळे घराबाहेरील लढाई त्यांना खंबीरपणे लढता आली. भारतीय साहित्यातील वास्तववादी, परखड लेखक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. आता ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनेक साहित्यिक मंडळी मनासारखा वापर करतात. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांना अधिकार आहे, असे त्या मानत. त्यानुसार त्या जगल्या. प्रत्येक साहित्यकृतीतून स्त्री-पुरुष समानतेचा घोष केला. त्यांनी कायम निम्नमध्यमवर्गीय मुस्लिम समाजातील शोषित, पिडित महिलांच्या जीवनाचे चित्रण केले. कथा लेखन हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. शिवाय गरम हवा, जुगनू, छेडछाड आदी तेरा सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. अशा या चतुरस्त्र लेखिकेची उणिव दिवसेंदिवस वाढत आहे, हीच त्यांच्या व्यक्तिमत्व आणि लेखनाची ताकद आहे. होय ना?
Tuesday, 19 October 2021
कितीजण विहीर उपसतील?
केवळ औरंगाबाद, मराठवाडाच नव्हे तर पूर्ण राज्यभरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळात प्रचंड वावर असलेले प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा भयानक पद्धतीने खून झाला. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजेपासून सोशल मिडिआवर ही बातमी व्हायरल होताच खळबळ उडाली. उच्चवर्गीय वसाहतीत, आलिशान बंगल्यात राहणाऱ्या प्राध्यापकाचा खून म्हणजे चोरी किंवा दरोड्याचा प्रकार असावा, असेच वाटले. पण घरातून एकही वस्तू चोरीस गेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काही लागला नाही. शिंदेंना चाकूने भोसकले नाही तर त्यांचा गळा चिरला, दोन्ही हातांच्या नस कापण्यात आल्या. हे कळाल्यावर काहीतरी वेगळाच प्रकार आहे, या दिशेने चर्चा सुरु झाली. प्रा. शिंदे देखणे, उमदे, लोकप्रिय हायप्रोफाईल व्यक्तिमत्व. त्यांच्या पत्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापक. त्यामुळे घटनेचं महत्व लक्षात घेऊन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा फार झालं तर सायंकाळी मारेकरी जेरबंद होणार अशीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी ठोस पुरावेच नव्हते. मोठ्या शिताफीने कट रचून प्रा. शिंदेंना मारण्यात आलं होतं. कुठेही मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हेत. शिंदेशी झटापट झाल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. रात्री बारानंतर घरात कोणी आलं आणि बाहेर पडलं, असंही दिसत नव्हतं. मनीषा शिंदे आणि त्यांची मुले एकच घटनाक्रम सातत्याने सांगत होती. त्यात विसंगती सापडत नव्हती. त्यामुळे मारेकरी समोर दिसत होता. त्याचा वावर, त्याचे बोलणे, खून होण्यापूर्वी त्याने वापरलेला मोबाईल डेटा हे सारे त्याच्या दिशेने जात असले तरी त्याच्याभोवती घेराबंदी करणे पोलिसांना मुश्किल होत गेले. मग त्याला बोलते करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. एसआयटी स्थापन झाली. काही महिला अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली. चारही बाजूंनी हलकल्लोळ केल्यावर मारेकऱ्यानं हत्यारे शिंदेंच्या बंगल्याजवळील विहीरीत टाकल्याची कबूली दिली. आणि वडिलांना का मारले, याचेही एक कारण सांगितले. अनेक तास विहीरीतील पाणी, कचरा उपसून हत्यारे काढण्यात आली. मग ही घटना कशी आणि का घडली. याचा उलगडा १८ ऑक्टोबरला सायंकाळी पोलिसांनी केला. तरीही पूर्ण उलगडा झालाच नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. कारण प्रा. शिंदेंवर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडिलांना कसे कळाले नाही. कळाले तर त्यांनी त्याला रोखले का नाही. वडिल रक्ताच्या थारोळ्यात असताना गाढ झोपेतील आईला न उठवता मुले रुग्णवाहिका आणण्यासाठी घराबाहेर कशी पडू शकतात. प्रा. शिंदे यांच्या आई-वडिलांनी या बद्दल नेमकी काय माहिती दिली. मुलीविषयी शिंदेची विचित्र वागणूक होती काय? एकूणातच शिंदे कुटुंबातील परस्परांशी नाते कसे होते, याविषयी उलटसुलट माहिती येत आहे. त्याची ठोस उत्तरे उलगड्यातून मिळत नाहीत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू होताच जोडीदाराचा नवा चेहरा दिसल्याचे शेकडो पती-पत्नीला वाटू लागले. त्यातूनही काही दुरावलेले संबंध जुळून आले. धाडस दाखवून अनेकांनी स्वत:च्या खासगी आयुष्याची गाळाने भरलेली विहीर उपसली. कुटुंब हीच खरी संपत्ती. प्रामाणिकपणे नाती जपली तरच जीवन आनंदी ठरते, याचा शोध त्यांना लागला. अशी विहीर उपसण्याची आणखी किती जणांची तयारी आहे, हा प्रा. शिंदे प्रकरणाने समाजासमोर उभा केलेला खरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
Wednesday, 13 October 2021
भानुमतीची माया
कोणत्याही समस्येवर राजकारणी मंडळींची आश्वासने म्हणजे तथ्य कमी आणि बडेजाव, पोकळपणा जास्त असतो. यात मरण सामान्य माणसाचं, गरिबांचं होतं. त्याचं एक उदाहरण गेल्या महिन्यात अनुभवास आलं. झालं असं की, एका पक्षाच्या लोककलावंत आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गरिबांचा मसिहा अशी प्रतिमा असलेले मंत्री महोदय खास पाहुणे होते. त्यात या महोदयांनी विरोधी सरकारवर जबर टीकास्त्र सोडले. गरिबांच्या मदतीसाठी केलेल्या घोषणा ते सरकार कसे विसरले, याची उजळणी केली. त्यावर कलावंतांनी एका स्थानिक नेताजींमार्फत मंत्रीसाहेबांना आठवण करून दिली की, साहेब, तुमच्या सरकारनं आम्हाला ठोस मदतीचं आश्वासन दिलं होतं. कित्येक महिने उलटून गेले. मदत बेपत्ता, फरार झालीय. त्यावर कसलेल्या त्या मंत्र्यानं ‘लवकरच होईल. थोडं थांबा’ एवढंच म्हणत पुन्हा विरोधी सरकारकडे तोफेचे तोंड वळवले. ते पाहून लोककलावंत कमालीचे निराश झाले. आपलं आपल्यालाच लढावं लागणार. राजाश्रयाच्या भाकड गप्पा ऐकण्यापेक्षा लोकाश्रयाकडं वळालं पाहिजे, असं त्यांच्यातील काहीजणांना वाटलं असावं. त्यांच्यासाठी, खऱ्याखुऱ्या दानशूर रसिकांसाठी केरळच्या ए. भानुमती यांची ही खरीखुरी कहाणी.
केरळ म्हणजे शास्त्रीय, परंपरागत नृत्य कलांचे आगार. महाराष्ट्राएवढी नसली तरी नाट्यकला तेथे स्थिरावली आहे. पर्यटकांसमोर कथ्थकली आणि अन्य नृत्यांचे सादरीकरण झाल्यावर एखादे छोटेसे नाटक सादर करणारे ग्रुप तेथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. केरळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. ते बऱ्यापैकी पैसे बाळगत असल्याने नाट्य कलावंतांना कुटुंब चालवण्यापेक्षा थोडी जास्तही कमाई होत होती. त्रिसूर येथील ए. भानुमती अशा कलावंतापैकी एक होत्या. वयाच्या पंचवीशीत असताना त्यांनी नाट्यकलेतून पोट भरण्याचा मार्ग निवडला. छोट्या, किरकोळ भूमिका त्या पार पाडत. शिवाय ग्रुपच्या प्रमुखांनी सांगितली ती कामंही करत. त्यातून सुखाचे चार घास मिळत होते. पण पन्नाशी ओलांडली असताना कोरोनाचं संकट कोसळलं. अतिथी हाच देव असलेल्या केरळची अक्षरश: नाकेबंदी झाली. पर्यटकच नाही म्हटल्यावर अर्थकारण ठप्प झालं. अशा स्थितीत सरकारकडून आश्वासनाच्या पलिकडं काहीही मिळणार नाही, हेही भानुमतींच्या लक्षात आलं. त्यांनी बरीच शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना मराठी कलावंतांच्या एकपात्री प्रयोगाची आठवण झाली असावी. वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघालंय लंडनला हे एकपात्री नाटक गिनीज बुकात नोंदवले गेले. त्या काळात, तत्पूर्वी आणि नंतरही अनेकांनी एकपात्रीत यश मिळवले. वऱ्हाडचे सादरीकरण सुरुवातीच्या काळात एखाद्या घराच्या गच्चीवर अगदी चार-पाच प्रेक्षकांपुढे होत असे. त्याच धर्तीवर भानुमतींना सुचलेला प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी रंगचेतना नावाचा नाट्यग्रुप मदतीला धावून आला. नवरात्रोत्सवाची चाहूल लागली तेव्हा त्यांनी या प्रयोगांना प्रारंभ केला. त्यासाठी त्या राहत असलेल्या एका खोलीच्या भाड्याच्या घरात नेपथ्य रचना केली. कोरोनापूर्वी ज्यांच्या रिक्षातून त्या नेहमी प्रवास करत ते रिक्षाचालक एकमेव श्रोते बनले. त्यांच्यासमोर त्यांनी स्वत: लिहिलेला एकपात्री प्रयोग सादर केला. त्याची संहिता म्हणजे कोरोनामुळे कलावंतांचे काय हाल होत आहेत, याचीच कहाणी होती. त्याचे थेट प्रक्षेपण रंगचेतनाच्या सोशल मिडिआ पेजवर करण्यात आले. भानुमतींची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रसिक मायबापांनी इच्छेनुसार मदत करावी, अशी ओळ प्रक्षेपणाच्या खाली ठळकपणे सांगण्यात आली. आणि राजाश्रयापेक्षा लोकाश्रय किती मोलाचा, भरवशाचा असतो,याचा अनुभव भानुमतींना आला. तासाभरात त्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा झाले होते. रंगचेतना ग्रुपच्या चौघांचाही रसिक दात्यांमध्ये समावेश होता.
पण एका महिला कलावंताने स्वत:च्या अस्तित्वासाठी केलेला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि त्याला नाट्यसंघाने केलेली मदत इथं ही गोष्ट संपत नाही. तर सुरू होते. ठरवलं असतं तर त्या स्व केंद्रित सहज राहू शकल्या असत्या. पण त्यांनी मदतीचं जग आपल्याभोवती ठेवले नाही. उलट त्याचा विस्तार केला. असं म्हणतात की, नवरात्र म्हणजे देवीच्या विविध रुपांची आठवण करून देणारा उत्सव. देवीचं एक रुप शैलपुत्री म्हणजे कणखर, खंबीर, निडर. दुसरं रुप कात्यायनी म्हणजे संगोपन, सांभाळ करणारी आणि तिसरं स्कंदमाता म्हणजे करुणामयी. चौथं सिद्धीयात्री म्हणजे प्राविण्य कमावलेली. तर भानुमतीचा अर्थ जादू करणारी, माया रचणारी असा आहे. त्रिसूरच्या भानुमतींमध्ये देवीच्या चारही रुपांचा संगम झाला आहे. त्या कणखर, खंबीर, निडर आहेत. आपल्यासोबतच्या लोकांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना आहे. स्वत:हून मदतीला धावून जाणे, यात त्यांची करुणा दिसते. सर्वात म्हणजे त्यांच्यातील कलागुणामध्ये त्यांनी निपुणता, प्राविण्य मिळवले आहे. कोरोनापूर्वी कदाचित त्यांच्या अभिनयगुणाला एवढा प्रतिसाद मिळाला नसता. तो त्यांच्यातील नाविन्यतेमुळे मिळाला. त्यांनी स्वत:च्या नावाप्रमाणे रसिकांवर अक्षरश: जादू केली. रंगचेतनाच्या मदतीने त्यांनी प्रयोगांचा धडाका लावला. आणि पाहता पाहता १५ कलावंतांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळवून दिली. ती देखील सन्मानाने. सरकारी यंत्रणेपुढे हात न पसरता. रंगचेतनाचे अध्यक्ष ई. टी. वर्गिस सांगतात की, भानुमती यांनी जे केले ते अफलातून होते. त्यांनी जे काही भोगले तेच त्यांनी मांडल्याने त्यातील अस्सलता रसिकांच्या हृदयाच्या आरपार गेली, यात शंकाच नाही. ही मालिका आता थांबणार नाही. कारण हरीश पेराडीसारखे नामवंत कलावंत यात सादरीकरण करून इतरांना स्वत:च्या खिशातून मदत करत आहेत. त्या मागे अर्थातच भानुमती यांच्या प्रयोगाची प्रेरणा आहे. एक सामान्य अभिनेत्री जर हे करू शकते तर आपण मागे का, असा विचार केरळमधील अनेक स्थिरावलेले कलावंत करू लागले आहेत. नवरात्रोत्सव आणि पुढील सणांच्या काळात मालिका अधिक व्यापक होणार आहे. किमान १०० गरजू रंगकर्मींना मदतीचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मराठी कलावंतापासून प्रेरणा घेऊन भानुमतींनी शोधलेल्या या मार्गावरून मराठी लोककलावंत चालले तर त्यांनाही सरकारच्या भरवशावर राहून कपाळमोक्ष करून घेण्याची गरज भासणार नाही. होय नाॽ
Tuesday, 28 September 2021
धरतीमातेच्या डॉ. धिर्ती
प्रा. डॉ. इश्तियाक अहमद प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि राजकीय घडामोडींचे परखड अभ्यासक. ते मूळ पाकिस्तानी. पण स्वीडनच्या विद्यापीठात विभागप्रमुखपदी दीर्घकाळ काम केले. तेथेच स्थायिक झाले. त्यांनी भारतीय उपखंडाचा इतिहास मुस्लिम, इस्लाम या अंगाने अत्यंत बारकाईने अभ्यासला आहे. त्यांची अनेक पुस्तके कमालीची वाचकप्रिय आहेत. मोहंमदअली जिना यांच्याविषयी त्यांनी अलिकडील काळात काही नवीन विधाने केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळाचे ते साक्षीदार असल्याने त्यांच्या लेखनात, व्याख्यानांमध्ये अनेकवेळा भारताची जडणघडण, हिंदू समाज, हिंदुत्ववादी विचारसरणीचा उल्लेख येतो. अशाच एका व्याखान मालिकेत हिंदूधर्मियांतील सामाजिक सुधारणा या विषयावर बोलताना त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, रॉय यांनी त्या काळात म्हणजे १८२०च्या दशकात हिंदू समाजातील वाईट गोष्टी, रुढी मोडीत काढण्याचा चंगच बांधला होता. महिलांना त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेनुसार जगता आले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच सतीच्या प्रथेविरुद्ध त्यांनी अक्षरश: रान पेटवले होते. इंग्रजांकडे पाठपुरावा करून त्यांनी ती प्रथा कायद्याने बंद केली. दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. अन्यथा हिंदू धर्मातील इतर अनेक अनिष्ट गोष्टी त्यांनी त्या काळातच संपवल्या असत्या. किंवा त्या दिशेने हिंदूना वाटचाल करण्यास भाग पाडले असते, एवढी त्यांची त्या काळात ताकद होती. असे सांगून डॉ. इश्तियाक अहमद किंचित थबकले आणि म्हणाले, अर्थात कोणताही समाज नवे बदल सहजासहजी स्वीकारत नाहीच. काही वेळा तर छोट्या बदलांसाठीही त्यासाठी खूप वर्षे वाट पाहावी लागते. जिद्दीने पाठपुरावा करावा लागतो. तशी खंबीर, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे जन्माला यावी लागतात. डॉ. इश्तियाक यांचे हे म्हणणे किती सत्य आहे, असे सांगणारी घटना गेल्या महिन्यात घडली. १०५ वर्षे जुन्या झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेच्या संचालकपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती झाली. त्यांचे नाव आहे डॉ. धिर्ती बॅनर्जी. विशेष म्हणजे त्याही राजा राममोहन रॉय यांच्या पश्चिम बंगालमधील आहेत. निसर्ग, धरतीमातेवर निरातिशय प्रेम असलेल्या डॉ. धिर्ती यांचा प्राण्यांचा अधिवास, वर्गीकरण, आकारमान या विषयात गाढा अभ्यास आहे. जंगलातील विविध प्राण्यांचे राहण्याचे क्षेत्र ठरलेले असते. ते क्वचितच क्षेत्र ओलांडतात. त्या मागे नेमकी काय कारणे असू शकतात. हे प्राणी पुढे कुठल्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात, याची सखोल माहिती त्यांच्याकडे आहे. झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही अर्थातच इंग्रजांनी भारताला दिलेली एक देणगी आहे, असे म्हणावे लागेल. विपुल निसर्गसंपत्ती आणि हजारो प्रकारच्या प्राणी, श्वापदांचा अभ्यास करणे. त्यांची नोंद ठेवणे यासाठी ही संस्था १९१६ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. संस्थेची १६ विभागीय केंद्रे असून पर्यावरण, वन आणि पर्यावरण बदल मंत्रालयांतर्गत ही संस्था काम करते. येथे सुमारे ३०० संशोधक आहेत. डॉ. धित्री या पहिल्या महिला संचालक असल्या तरी या संस्थेत काम करणाऱ्या पहिल्या महिलेचा मान १९४९ मध्ये मीरा मनसुखानी यांच्या नावावर आहे. डॉ. धिर्ती बॅनर्जी १९९०मध्ये झुऑलॉजिकल सर्वेमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी महिला संशोधकांचे प्रमाण २४ टक्के होते. आता ते ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे.
डॉ. धिर्तींनी भारतातील सर्व जंगले पादाक्रांत केली आहेत. व्याघ्रारण्यांमध्ये भटकंती केली आहे. आणखी एक वेगळी गोष्ट त्यांच्यात आहे. ती म्हणजे किटक, माशांविषयी त्यांचा अभ्यास आहे. कोणताही प्राणी मरण पावला की, त्यावर विशिष्ट प्रकारच्या माशा घोंघावू लागतात. अशा माशा पाहून तो प्राणी किती वेळापूर्वी मृत पावला याचा अचूक अंदाज त्या व्यक्त करतात. प्राण्यांकडून मानवाकडे काही जीवघेणे रोग संक्रमित होत असतात. डॉ. धिर्ती यांनी त्याविषयीही संशोधन केले आहे. ते पुढील काळात मानवजातीला उपयुक्त ठरू शकते. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले ते महत्वाचे. त्या म्हणाल्या की, नोकरी आणि कुटुंब यांचा सुरेख समन्वय साधत काम करण्याची नैसर्गिक शक्ती महिलांमध्ये असतेच. पण मला पती, मुले आणि कुटुंबीय, गुरुजनांकडून मोठे पाठबळ मिळाल्याने आवडत्या कामात अधिकाधिक लक्ष घालणे शक्य झाले, असे भाग्य अधिकाधिक महिलांना मिळाले तर भारतीय समाज निश्चित खऱ्या अर्थाने प्रगत होईल.
Friday, 24 September 2021
दळणासाठी जाते बदलून काय होईल?
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत मुंबई वगळता प्रभाग म्हणजे बहुसदस्यीय पद्धतीने लोकांना मतदान करायला लावायचे, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांचे निराकरण करणे आणि कामांची एकत्रित जबाबदारी घेणे, हे एका प्रभागात तीन नगरसेवक निवडणूक पद्धतीमुळे सोपे जाते, असे सरकारी कारण पुढे करण्यात आले आहे. पण ते तद्दन गुळगुळीत आहे. खरे म्हणजे बहुसदस्य निवडीमध्ये एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात अनुकूल एकगठ्ठा मतदान करून घेणे शक्य असते. त्यात अपक्षांची कोंडी होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही पक्षाच्या खुल्या प्रवर्गातील कोणत्याही स्थानिक नेत्याला मैदानात उतरण्याची अधिकाधिक संधी मिळते. असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा युक्तीवाद आहे. तो त्यांनी रेटत नेला. आणि इतक्या ताकदीने रेटला की चार वर्षांपूर्वी एक वॉर्ड एक नगरसेवक अशा घोशा लावणाऱ्या शिवसेनेलाही कोलांटउडी घ्यावी लागली. तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने काही ठिकाणी बहुसदस्य पद्धतीला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे या निर्णयाचा अध्यादेश निघून तो कितपत टिकेल, याविषयी शंका आहे. जरी तो टिकला तरी पुन्हा वॉर्डांचे आरक्षण, चतु:सीमा म्हणजे हद्दी ठरवणे यासाठी सारी यंत्रणा जुंपावी लागणार आहे. त्यावर पुन्हा कोर्ट कचेऱ्यांचा फेरा पडणार आहेच. बरे, एवढे सगळे करून महाविकास आघाडी सरकारला जे ध्येय गाठायचे आहे, ते प्रत्येक शहरात शक्य होईलच, याची कोणतीही हमी नाही. कारण प्रभाग असो की एक वॉर्ड एक नगरसेवक पद्धत. त्यात आपल्या कामाचा कोण, हे जनता बऱ्यापैकी ओळखते. त्यामुळे बहुसदस्यीय निवडणुकीचा निर्णय म्हणजे मनासारखे दळण पाहिजे म्हणून ज्वारीऐवजी जाते बदलण्यासारखे वाटते आहे.
Subscribe to:
Posts (Atom)