Wednesday, 16 November 2016

एक्स्पर्ट ग्लोबलची जागतिक भरारी








जालन्यातून देशभरातलोखंडाचा पुरवठा होतो. नांदेड, लातूर, हिंगोलीत छोटे-मोठे उद्योग आहेत. तरीही औरंगाबाद हेच मराठवाड्याचे उद्योग केंद्र आहे. कारण येथे इतर शहरांपेक्षा अधिक उद्योग आहेतच. शिवाय त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होतो. आजमितीला किमान तीन लाख लोक औरंगाबादमधील उद्योगांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. पुढील काळात डीएमआयसीमुळे (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर) अनेक उद्योग येऊ घातले आहेत. त्यात काही जागतिक पातळीवरील कंपन्याही आहेत. त्या येण्याची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे. मात्र, ते सारे परदेशी पाहुणे आहेत. आपल्याकडील काही उद्योजक आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योगांमध्ये सहभागी कधी होतील, औरंगाबादचे नाव जगाच्या नकाशावर केव्हा नोंदवतील, असा प्रश्न सर्वांना, विशेषत: तरुणाईला पडला होता. त्याचे उत्तर सोमवारी मिळाले. स्वयंचलित कारसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान संपूर्ण जगाला औरंगाबादेतूनच मिळणार आहे. ही ऐतिहासिक आणि प्रत्येक औरंगाबादकरांना अभिमान वाटावा, अशी भरारी घेतली आहे प्रशांत देशपांडे यांच्या एक्स्पर्ट ग्लोबल कंपनीने. त्यासाठी जर्मनीतील सी-मोर ऑटोमोटिव्ह कंपनीसोबत करार झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही भरारी म्हणजे केवळ परदेशी कंपनीसाठी तंत्रज्ञान विकसित करून देण्यापुरती नाही, तर त्या कंपनीत एक्स्पर्ट ग्लोबलची भागीदारीही राहणार आहे. सी-मोर आणि ग्लोबल एक्स्पर्ट लवकरच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये स्वतंत्र उद्योग उभा करणार आहेत. शहरातील अनेक उद्योजक उद्योगांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाव कमावून आहेत. त्यांची उत्पादने युरोपमध्ये गेल्या काही वर्षांपासून जात आहेत. मात्र, जर्मनीतील कंपनीसोबत स्थानिक उद्योगाची अशा स्वरूपातील भागीदारी ही बाब केवळ उद्योजकांनाच नव्हे तर तमाम तरुणाईला नवी ऊर्जा देणारी आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी करणे उद्योजक प्रशांत देशपांडे यांना कसे शक्य झाले, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत दडलेले आहे. अत्यंत मृदुभाषी आणि संयमी व्यक्तिमत्त्व असलेले प्रशांत म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातील मंदाताई (शिशुविकास मंदिर शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका) आणि कै. विजय देशपांडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक) यांचे सुपुत्र. शालेय जीवनापासूनच हुशार आणि मेहनतीचा मंत्र जपणारा विद्यार्थी अशी प्रशांत यांची ओळख होती. अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतल्यावर जवळपास दहा वर्षे ते अमेरिकेत राहिले. तेथील अनुभव गोळा केला. खरे तर त्यांना तेथेच राहून उद्योजक होण्याची संधी होती. पण आपण भारताचे काही देणे लागतो. त्यामुळे भारतात आणि तेही आपल्या मूळ शहरातच उद्योग, व्यवसाय केला पाहिजे, या जाणिवेतून ते औरंगाबादेत आले. कायम नावीन्य आणि काहीतरी वेगळे करण्याकडे त्यांचा कल होताच. त्यामुळे त्यांनी २५ वर्षांपूर्वी शहरात एक्स्पर्ट ग्लोबल या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. आज सात देशांमध्ये एक्स्पर्ट ग्लोबलच्या उपकंपन्या आहेत. ऑटोमोटिव्ह म्हणजे वाहन उद्योगांसाठी लागणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याचे काम धडाक्यात सुरू केले आणि त्या माध्यमातून जगभरातील उद्योजकांशी चांगला संपर्कही ठेवला. काही वर्षांपूर्वी स्वयंचलित, चालकविरहित कार रस्त्यावर आणण्याची चर्चा सुरू झाली. तेव्हा त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आपण पुरवू शकतो, असा आत्मविश्वास प्रशांत यांना होता. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यास जर्मनीची सी-मोर कंपनीकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुणे, बंगळुरूसारखी आयटी क्षेत्रासाठी नामवंत मानली जाणारी शहरे सोडून सी-मोरच्या व्यवस्थापनाने ग्लोबल एक्स्पर्टची निवड केली. ही ग्लोबलच्या जागतिक दर्जाच्या ज्ञानाची पावतीच म्हणावी लागेल. मात्र, त्याचे श्रेय प्रशांत स्वत:कडेच घेता औरंगाबादच्या तरुणाईला देतात, हेही त्यांच्यातील लीडरशिप क्वालिटीचे उत्तम उदाहरण आहे. ग्लोबलमधील विभागप्रमुख मिताली मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कंपनीतील ५० जणांची टीम चालकविरहित कारसाठी लागणारे सॉफ्टवेअर विकसित करणार आहे. सी-मोर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्रेगर मेटेनर, रिचर्ड वॉलर यांनी जे सांगितले ते तर खूपच महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, ग्लोबलसोबत आम्ही तीन वर्षांपासून काम करत आहोत. या कंपनीतील स्थानिक गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा आम्हाला भावला. सध्या अॅपल, गुगल, स्टेला कंपन्या चालकविरहित कार निर्मितीसाठी काम करत आहेत. आम्हीही याच स्पर्धेत उतरलो आहोत. पुढील दहा वर्षांत जगातील बहुतांश लक्झरी कार स्वयंचलित होणार आहेत. त्यासाठी लागणारे सर्वोत्तम तंत्रज्ञान औरंगाबादेतच तयार होणार आहे. वळणावर, स्पीड ब्रेकरवर कारची गती आपोआप कमी होणे आणि सरळ रस्त्यावर वाढणे. वाहतुकीचे नियम स्वयंचलित पद्धतीने पाळणे जाणे, यासाठीची प्रणाली औरंगाबादमध्ये विकसित होणार आहे. एक्स्पर्ट ग्लोबल, सी-मोर ऑटोमोटिव्ह मिळून तयार होणारी स्वतंत्र कंपनी मर्सिडीझ, बीएमडल्ब्यूसह जगातील दिग्गज कार कंपन्यांसाठी सॉफ्टवेअरचे संशोधन, विकासाचे काम करणार आहे. जागतिकीकरणामुळे सामाजिक पातळीवर अनेक गुंतागुंतीचे आणि बिकट प्रश्न निर्माण केले असले तरी कोणत्याही शहरातील प्रतिभावंताला जगाच्या नकाशावर स्वत:चे स्थान निर्माण करून देण्याची संधी मिळाली आहे, हे ग्लोबल एक्स्पर्टच्या भरारीवरून लक्षात येते. गरज आहे ती फक्त नावीन्याचा ध्यास घेण्याची आणि त्यासाठी चिकाटी, जिद्दीने परिश्रम करण्याची. प्रशांत देशपांडे यांच्यात हे दोन्ही गुण आहेतच. शिवाय त्यांचे पायही जमिनीवर आहेत. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना त्यांनी कायम जपली आहे. औरंगाबाद शहराच्या विकासात्मक उपक्रमांत त्यांचा सातत्याने सहभाग असतो. त्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादेतील इतर अनेक तरुण पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केला, सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही, अशी ओरड करता भरारी घेतील, अशी अपेक्षा निश्चित करता येईल.

No comments:

Post a Comment