Wednesday, 23 November 2016

अशी स्वारी झाली तर येईल खरी बहार




जुन्या आठवणीत रमणे, त्यात दंग होऊन जाणे अनेक जणांना कमी-अधिक फरकाने आवडतेच. कारण मागे वळून पाहताना भूतकाळ नेहमीच सुखावह वाटतो. आणि अलीकडील काळात जगण्याची रोजची लढाई इतकी तीव्र झाली आहे की गेल्या आठवड्यातील दिवस सुखाचा होता, असे अनेकांना वाटू लागले आहे. म्हणूनच शाळा, महाविद्यालयांमध्ये वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन सोहळे प्रचंड प्रतिसादात आयोजित होऊ लागले आहेत. त्या काळात एका बाकावर बसत केलेल्या गमतीजमती आठवून आताचा ताण घालवण्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरत आहेत. शिवाय त्यातून शाळा, महाविद्यालयांना काही देणग्या, उपयोगी वस्तूही मिळत आहेत. म्हणजे जुन्या आठवणींचा उजाळा सामाजिक पातळीवरही उपयोगी ठरू लागला आहे. असाच एक सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी रविवारी आयोजित केला होता. तोही धमाल रंगला होता. आयोजनाची जोरदार तयारी बऱ्हाणपूरकर, प्रा. जयंत शेवतेकर, प्रा. अशोक बंडगर आणि विद्यमान प्राध्यापक मंडळींनी केली होती. रंगभूमी, चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेल्या आणि इतर क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्यांना रीतसर निमंत्रणे दिली होती. मात्र, एकेकाळी विभागात दिवस-रात्र तालमी करून नावलौकिक कमावत यशाच्या शिखरावर जाऊन बसलेले अनेक कलावंत सोहळ्याकडे फिरकले नाहीत. शिखराकडे निघू पाहणारे संजय सुगावकर, शिव कदम आले होते. गीत, नाटक अकादमीचे माजी संचालक विजयकुमार गवई, प्रा. डॉ. दिलीप घारे यांच्यासह हौशी, व्यावसायिक रंगभूमीवर थोडीफार कामगिरी करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामुळे माजी विद्यार्थ्यांचा सोहळा खऱ्या अर्थाने कौटुंबिक वातावरणात पार पडला. सेलिब्रिटी मंडळी आली असती तर त्यांच्या भाषणात, लाडात, कौतुकातच विद्यार्थीपण हरवून गेले असते. मेळाव्याला आलेल्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यातील प्रमुख होता तो म्हणजे आपल्या विभागाची बाहेर बदनामी कोण अन्् का करतो? माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब यांनी त्यांच्या खास शैलीत विभागाची बदनामी बाहेरचे कोणी नाही, आपण करतो, असे ठणकावून सांगितले. आणि त्यामागे राजकारण असल्याचेही उघड केले. त्यांचे हे बोलणे काही जणांना कटू वाटत असले तरी ते सत्य आहे. कलेच्या प्रांतात शिखरावर पोहोचलेले अनेक विद्यार्थीच विभागाचे नाव घेणे टाळतात किंवा त्याविषयी खासगीत अनुद‌्गार काढतात. प्राध्यापक मंडळींमधील वादाने आमचे नुकसान झाले, असे सांगतात. त्यात तथ्यांश असला तरी विभागाने काहीच दिले नाही, असे म्हणणे कोतेपणाचे लक्षण ठरेल. नाट्यशास्त्रात पारंगत असलेल्या प्राध्यापक मंडळींमध्ये कमालीचे हेवेदावे असले, त्यांनी जातीपातीची छोटी-मोठी तटबंदी उभारली असली तरी त्यांच्यापैकी एकानेही कोणाला कधी तालमी करण्यापासून रोखले नाही. चांगल्या सादरीकरणाचे तोंडभरून कौतुक केले नसले तरी प्रयोग हाणून पाडण्यापर्यंत ते कधीच गेले नाही. हेही नसे थोडके. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे, प्रा. कुमार देशमुख, प्रा. आलोक चौधरी, प्रा. प्रताप कोचुरे, प्रा. अचलखांब, प्रा. बऱ्हाणपूरकर यांनी कलावंतांच्या दोन-तीन पिढ्या घडवल्या. सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्यांनी तशी मनमोकळी कबुली दिली. आजकाल कोणीच कोणाला कोणत्याही चांगल्या घटनांचे श्रेय देत नसताना गुरुजनांनी आमच्या जीवनाला आकार दिला, असे काही विद्यार्थी नाटकाच्या क्लायमॅक्सप्रमाणे २५ वर्षांनंतर का होईना सांगत असतील तर नाटकाच्या पहिल्या अंकाचा शेवट गोड आहे, असे म्हणावे लागेल.
अचलखांब यांनीच मांडलेला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण मराठवाड्यातील कलावंत मंडळी (इतर क्षेत्रांप्रमाणे) सारखे मागासलेपणाचे चऱ्हाट लावत असतो. खरे तर आपल्यातच अस्सलपणा आहे, जिवंतपणा आहे. त्यामुळे कोणापुढे झुकण्याची गरजच नाही. आपले नाणे खणखणीत आहे तर ते खणखणीतपणेच वाजवले पाहिजे, हे त्यांचे म्हणणे पूर्ण सत्य आहे. फक्त असे करताना आपण पूर्णपणे व्यावसायिक आहोत ना, याची खात्री करून घेतली पाहिजे. कारण मुंबईत कलावंत म्हणून अस्सलपणा कदाचित नसेलही; पण तेथील व्यावसायिकता खरेच शिकण्याजोगी आहे. वेळेला महत्त्व आणि अंग झोकून काम करणे, ही मुंबईची ताकद आहेच. म्हणून आपण नेमके कोण आहोत, खरेच प्रतिभावंत आहोत का, कलेच्या प्रांतातील कोणत्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता आहे, हे लक्षात घेऊनच मुंबईत पाऊल टाकावे, असा सल्लाही शिखराकडे निघालेल्यांनी सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या नव्या कलावंतांना दिला. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा निघाला जुने विद्यार्थी आता विभागाला काय देणार? त्यात कमलेश वर्मा यांनी वीस वर्षांपूर्वी विभागातून नेलेला एक ड्रेस परत आणून देत प्रामाणिकपणा दाखवून दिला. दिवंगत प्राध्यापकांच्या नावाने पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आला. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. पण एवढ्याने मराठवाड्यातील रंगकर्मींचे समाधान होणार नाही. त्यांना माजी विद्यार्थ्यांकडून एका सर्वोत्तम नाट्यप्रयोगाची अपेक्षा आहे. ती पूर्ण करणे तसे अवघडच आहे. कारण बहुतांश मंडळी चित्रपट, सिरियल्स किंवा इतर व्यवसायांमध्ये अडकली आहेत. पोटपाणी बाजूला ठेवून इथे केवळ रंगभूमीच्या सेवेसाठी येणे त्यांच्यापैकी किती जणांना जमेल याविषयी शंकाच आहे. सोहळ्यात बोलणे सोपे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी त्यापेक्षा कठीण असतेच. पण खरेच या कलावंतांनी प्रयोग सादर केला तर ती रसिकांसाठी अमूल्य देणगी ठरेल. प्रा. अचलखांब सरांच्याच भाषेत सांगायचे झाले तर मराठवाड्यातील कलाकारांनी पूर्ण तयारीनिशी नेहमी स्वारी केली पाहिजे. एका प्रयोगापुरती का होईना अशी स्वारी करणे जमले तर बहार येईल, नाही का?


No comments:

Post a Comment