God`s Creation
Sunday, 6 November 2016
‘तलवारीच्या छायेतच स्वर्ग’
‘तलवारीच्या छायेतच स्वर्ग’
अब्दुल्लाह बिनअबू औफा यांच्या कथनानुसार :
अल्लाहचा दूत (त्याला शांती लाभो) म्हणाला,
‘तलवारीच्या छायेतच स्वर्ग’ आहे, हे जाणून घ्या.
(सहीह अल् बुखारीमधील ‘बुक ऑफ जिहाद’मधून)
ही थरारक आणि मनाची पकड घेणारी सुरुवात आहे, प्रख्यात पत्रकार आणि भारताचे विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लिहिलेल्या ‘तलवारीच्या छायेत’ या पुस्तकाच्या सूरह आणि आयत या पहिल्या प्रकरणाची.
ही पहिली ओळच पुस्तकात नेमकं काय असावं, याविषयी उत्सुकता निर्माण करते. आणि मग लेखकाने मांडलेल्या तपशिलामागे आपण कळत नकळत धावू लागतो. धावता धावता गुंतूनही जातो. सप्टेंबर २००१ रोजी मोहंमद अत्ता आणि त्यांच्या साथीदारांनी जागतिक महासत्ता अमेरिकेचे नाक कापले. या घटनेने जगाचा चेहरामोहरा बदलण्याला वेग आला. चवताळलेल्या अमेरिकेने अफगाणिस्तान, इराकमध्ये युद्ध सुरू केले. सद्दाम, लादेनला ठार मारले. तरीही अजून परिस्थिती जैसे थेच आहे. फक्त अल कायदाची जागा इसिसने घेतली. युद्धभूमी सिरिया झाली आहे आणि फ्रान्स, रशियाची विमानेही बाँबफेक करत आहेत.
अमेरिकेवरील हल्ल्यानंतर पाश्चिमात्य जग जागे झाले आणि इस्लाम, जिहाद याविषयी त्या जगात जोरदार चर्चा सुरू झाली. बहुतांश युरोपियन, अमेरिकन अधिकारी, राजकारणी, पत्रकार, नागरिक कुराणात नेमके काय म्हटले आहे, जिहाद कशाला म्हणतात, हे शोधू लागले. पण त्यांनाही कुराण वाचून जागतिक धार्मिक संघर्षाचे मूळ नेमके काय हे फारसे कळले नाही. ते कळले असते तर पुढील घटना टळण्याची शक्यता होती. इस्लाम धर्माच्या निर्मितीमागे नेमकी कोणती तत्त्वे आहेत. महान प्रेषित मोहंमद पैगंबरांनी नेमके काय सांगितले होते. त्यांच्या शिकवणुकीचा खरा अर्थ काय? मुस्लिमांच्या सतत लढण्याच्या वृत्तीमागे कोणती कारणे आहेत. ख्रिश्चन राष्ट्रे मुस्लिम देशांना टाचेखाली का ठेवू पाहतात? त्यामागे फक्त तेल संपत्ती आणि राजकारण एवढेच कारण असल्याचा कुणाचा समज असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा लागेल. इतक्या खोलपर्यंत हे पुस्तक वाचकाला नेऊन ठेवते. आणि पुढे काय होऊ शकते, याचाही अंदाज देते. मुस्लिमांना संरक्षण पुरवण्याच्या उद्देशाने ज्याची निर्मिती झाली त्या पाकिस्तानातच मुस्लिमांकडून मुस्लिमांची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. असे का? या कठीण प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्नही एमजे यांनी या पुस्तकातून केला आहे
विषयप्रवेशाची मांडणी करताना अखेरीस एमजे म्हणतात, ‘पाश्चिमात्य जगालाही असेच वाटते आहे, किंबहुना त्यांची खात्रीच झाली आहे की, अरब राष्ट्रांचे अस्तित्व आता त्यांच्या म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून असल्यामुळे १९७३ मध्ये इस्रायलविरुद्ध लढला गेलेला जिहाद हा शेवटचाच जिहाद होत. मुस्लिमांच्या हौतात्म्याची असोशी या पाश्चिमात्य राष्ट्रांना पुरती कळलेलीच नव्हती. तलवारीच्या छायेत निवांतपणे बागडणाऱ्या या बाळाला त्यांनी ओळखलेच नव्हते.’ ‘ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधील संघर्ष पुरातन आहे. इस्लामच्या जन्मापासून आहे. वेळोवेळी, विशिष्ट परिस्थितीत श्रद्धावंतांनी धर्मरक्षणाखातर पवित्र युद्ध करत आपले रक्त सांडावे, अशीही इस्लामची अपेक्षा असते. श्रद्धावंत कधीही पराभवाने पराभूत होत नाही. ते धीर खचू देत नाहीत. अढळ श्रद्धा ठेवतात आणि अंतिम विजय मिळेपर्यंत पुनःपुन्हा जिहाद करत राहतात. श्रद्धेच्या बदल्यात या विजयाचे आश्वासन अल्लाहनेच त्यांना दिलेले असल्याचे कुराणात स्पष्टच म्हटले आहे. मानवी जीवनव्यापारात युद्ध हे अनिवार्य वास्तव होय, ही गोष्ट कुराण नेहमीच मान्य करत आले आहे आणि त्या युद्धाची नैतिक आणि राजकीय कक्षादेखील त्याने ठरवून दिली आहे. इस्लाम या शब्दाच्या अर्थानुसारच त्यात हिंसेला थारा नाही. पण त्याचबरोबर मुकाट शरणागती पत्करण्यालाही इस्लाम मान्यता देत नाही. विशिष्ट परिस्थितीत सर्व मुस्लिमांनी धर्मरक्षणासाठी लढले पाहिजे, असा इस्लामचा आदेश आहे’, असेही एमजे म्हणतात एकुणात इस्लाम, जिहाद आणि ख्रिश्चन जगत याविषयी अरब, पाश्चिमात्य, आशियाई जगातील बारा ते चौदाशे वर्षांतील हजारो संदर्भ तपासून केलेली मांडणी ही या पुस्तकाची सर्वात मोठी ताकद आहे. एमजे अतिशय जाणकार पत्रकार असल्याने वाचकांना नेमके काय, कोणत्या शैलीत वाचायला आवडेल याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच त्यांनी ‘तलवारीच्या छायेत’चे ४५५ पानांत अगदी गोळीबंद लिखाण केले आहे. शिवाय अनेक प्रकारची मनोरंजक, चित्तवेधक आणि गतकाळात घेऊन जाणारी विविध प्रकारची माहिती मोठ्या खुबीने पेरली आहे. रेखा देशपांडे यांनी त्याचे मराठीकरण ज्या पद्धतीने केले आहे ते कौतुकाच्या पलीकडे आहे. २०१३ मध्ये या पुस्तकाची पहिली मराठी आवृत्ती चिनार पब्लिशर्सने प्रसिद्ध केली. त्या वेळी एमजे मंत्री नव्हते. त्यामुळे ‘तलवारीच्या छाये’त अधिक धारदार झाले आहे.
ओसामा बिन लादेनने अमेरिका, इस्रायलसोबत भारतदेखील शत्रूराष्ट्र असल्याचे का म्हटले होते, इसिससाठी भारत टार्गेट का, पाकिस्तान सातत्याने धर्माच्या नावाखाली भारतावर हल्ले का करतो, याची उत्तरे या पुस्तकात मिळू शकतात. त्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरील घटना-घडामोडींचे अन्वयार्थ, विश्लेषण करत भविष्यकालीन घटनांसाठी हे पुस्तक आपल्या किमान धारणा तयार करू शकते. आपल्या ज्ञानातही निश्चित भर टाकू शकते.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment