Tuesday, 13 December 2016

सय : कलात्मक आत्मकथनासोबत रंगकर्मींच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही






नाटक म्हणजे काय. त्याचा विषय कसा सुचतो. कागदावर कसा उतरतो. नाटक बसवताना काय काय विचार करावा लागतो. कलावंतांची जमवाजमव कशी केली जाते. चित्रपटाचा विषय प्रत्यक्षात कसा येतो. त्यासाठी दिग्दर्शक, निर्मात्याला कोणत्या खस्ता खाव्या लागतात. टीव्ही सिरियल्स, लघुपटाच्या कल्पना कशा सूचतात. असे अनेक प्रश्न तरुण रंगकर्मींसोबत रसिकांनाही पडत असतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी मग मान्यवरांना गाठावे लागते. त्यांना बोलते करावे लागते. किंवा त्यांनी एखाद्या समारंभात ही सारी रहस्ये स्वतःहून उलगडून सांगेपर्यंत वाट पाहावी लागते. पण आता बऱ्याच अंशी ही प्रतीक्षा महान लेखिका, दिग्दर्शक सई परांजपे यांनी संपवली आहे. त्यांचे `सय` पुस्तक म्हणजे कलात्मक आत्मकथनासोबत रंगकर्मींसाठी अदभुत खजिना असून त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप पेरली गेली आहेत. मराठी माणसाने भारतीय चित्रपट, नाट्य कला जगताला अनेक उत्तम कलावंत, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ दिले आहेत. त्यात दोन महिलांचे स्थान अढळ आहे. एक म्हणजे विजया मेहता आणि दुसऱ्या सई परांजपे. दोघीही प्रचंड प्रतिभावंत, कर्तृत्ववान. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात त्यांनी सर्वांना सोबत घेऊन निर्माण केलेल्या सर्वच कलाकृती प्रचंड गाजल्या. सादरीकरणाचे वेगवेगळे फॉर्म त्यांनी निवडले. प्रत्येक संहितेत काहीतरी वेगळेपण असेल. त्याची नाळ थेट लोकांशी जोडलेली असेल, असे प्रयोगही केले. त्यामुळे त्यांच्याविषयी रसिक, रंगकर्मींमध्ये कमालीचे औत्सुक्य. त्यांच्या कला प्रवासाविषयी जाणून घेणे सर्वांसाठीच महत्त्वाचे होते. काही वर्षांपूर्वी विजया मेहता यांनी झिम्मा या आत्मकथनपर पुस्तकात त्यांच्याविषयी बरेच काही सांगितले. त्याचवेळी सई परांजपे यांच्याविषयी कधी जाणून घेण्यास मिळेल, अशी चर्चा सुरू होती. त्यांच्या नाटक, चित्रपटांविषयी त्यांनी महत्त्वाचे काही सांगावे, अशी अपेक्षा होती. ती राजहंस प्रकाशनाने आणलेल्या `सय`च्या रूपाने बऱ्याच अंशी पूर्ण झाली आहे. आकाशवाणीपासून टीव्ही चॅनेल्सपर्यंत आणि बाल नाट्यापासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत सई यांनी ठसा उमटवला आहे. चष्मेबद्दूर, कथा, दिशा, स्पर्श, साज या त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या जगात मोलाची भर घातली आहे. पुण्यातील जगद्विख्यात परांजपे कुटुंबात जन्मलेल्या सई परांजपेंनी देशातील महान दिग्दर्शकांमध्ये स्थान मिळवले. त्यामागे कौटुंबिक जडणघडण, आईने त्यांच्यावर बालवयात केलेले संस्कार हेच महत्त्वाचे ठरल्याचे त्या स्पष्टपणे सांगतात. पण त्यासोबत त्यांनी प्रत्येक कलाकृती प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेली धडपड अतिशय रंजक पद्धतीने सांगतात. नाटकाचा विषय सुचल्यावर रंगमंचावर आणण्यासाठी काय करावे लागते, याचा जो प्रवास त्यांनी मांडला आहे. तो नव्या रंगकर्मींसाठी विशेषत: लेखकांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही जर स्वत:ला कलावंत म्हणवून घेत असाल आणि संपूर्ण आयुष्य कलावंत म्हणूनच जगण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला पूर्णपणे कला प्रांतात झोकून देता आले पाहिजे. नव्हे झोकून दिलेच पाहिजे. प्रत्येक क्षण लेखन, सादरीकरणाचा विचार करत राहा. त्यातच मग्न होऊन जा. म्हणजे काहीतरी नित्य सुचत राहील. आणि जे सुचेल त्याला थोडासा आकार येताच कागदावर उतरवून पाहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्जनशील, नावीन्यतेचा शोध घेणाऱ्यांना शोधा. त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्याभोवतीचे वर्तुळ तुमच्यासारखेच सकारात्मक ऊर्जेने भारलेले असेल याची काळजी घ्या, असा संदेश या आत्मकथनातून रंगकर्मींना मिळतोच. शिवाय चित्रपट, लघुपट, सिरियल्सचा पाया नाटकातूनच रचला जातो. नाटक हीच त्याची जननी असून रंगमंचावर भक्कमपणे पाय रोवले की पुढील वाटचाल ठामपणे करता येते, असेही त्या सांगतात.
मिश्किल, प्रेमळ आणि काहीशा थेटपणे मते व्यक्त करणाऱ्या सई नर्मविनोदी आणि स्वतःच्या मतांविषयी कमालीच्या आग्रही आहेत. एखादा निर्णय का घेतला हे त्या गूढ ठेवत नाहीत. त्यांची बाजू निर्मळपणे मांडून टाकतात. चित्रपटसृष्टीत नाव असलेले बासू भट्टाचार्य प्रत्यक्षात कसे होते. कुख्यात निर्माता अशी त्यांची प्रतिमा होती म्हणजे नेमके काय होते. नाना पाटेकरांनी त्यांना कसा त्रास दिला. आणि नंतर कसे जुळवून घेतले. साज चित्रपटातील गाणे लिहिण्यावरून जावेद अख्तर कसे भडकले होते आणि काही दिवसानंतर कशी माघार घेतली. याचीही कहाणी त्यांनी सांगितली आहे. पण हे सांगताना त्यात द्वेष उतरणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे आत्मकथन म्हणजे दुसऱ्या कोणालातरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे. त्याला फेलावर घेणे याकडे झुकत नाही. तर ते निखळपणे गप्पा मारत असल्यासारखे उलगडत जाते आणि हे उलगडवणूक होत असताना जास्वंदी, सख्खे शेजारी, आलबेल, पत्तेनगरी, जादूचा शंख, भटक्याचे भविष्य, धीक ताम, माझा खेळ मांडू दे, पपीहा, दिशा आदी चित्रपट, नाटक, बालनाट्यांचे विषय कसे सुचले यापासून ते रंगमंचावर, पडद्यावर आणण्यासाठी काय काय उपद्व्याप केले हे त्या सहजपणे सांगतात. काही नाटके आणि चित्रपटांच्या आठवणी सांगताना त्यांनी त्यातील व्यक्तिरेखांचे संवादही दिले आहेत. पडद्यावर दृश्य दाखवण्यासाठी काय विचार केला हे पण सांगितले आहे. त्यातील सहजता संवाद आणि पटकथा लेखकांसाठी निश्चितच उपयुक्त आहे. या आत्मकथनात सई यांनी स्वतःच्या काही चुका खुलेपणाने कबूल केल्या आहेत. विशेषतः जागतिक कीर्तीची निर्मिती करूनही व्यवहारज्ञानात शून्य राहिल्याने किती, कसे नुकसान झाले. हे त्या प्रांजळपणे सांगतात. तोही नव्या पिढीसाठी धडा आहे. सुभाष अवचट यांचे मुखपृष्ठ, शेखर गोडबोले, राजू देशपांडे यांची मांडणी पुस्तकाला उंचीवर घेऊन जाणारी. मोज्यक्या पानांवर मुद्रित शोधनाच्या किरकोळ त्रुटी दिसतात. त्या पुढच्या आवृत्तीत दुरुस्त झाल्या तर रंगकर्मींच्या ज्ञानात भर टाकणारा हा कलाप्रवास आणखी समृद्ध होईल.

No comments:

Post a Comment