Wednesday, 21 December 2016

तारेवरचा वारकरी






 

मा. भगवान घडामोडे ऊर्फ बापू,

महापौर, औरंगाबाद

यांना जय हरी विठ्ठल


सर्वच अर्थांनी ऐतिहासिक असलेल्या औरंगाबाद शहराचे महापौर झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. राजकारणातच जीवन घालवण्याचे ठरवलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याचे स्वप्न असलेले महापौरपद आपण मिळवले. ही विठूरायाचीच किमया. या पदाच्या दर्शनासाठी तुम्हाला तब्बल २० वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सामान्य कुटुंबातून आलेल्या, राजकारणाचा कोणताही ठोस वारसा नसलेल्यांना मोक्याची पदे मिळण्याची संधी दिवसेंदिवस दुरापास्त होत चालली आहे. त्यामुळे तुम्हाला मिळालेले पद म्हणजे साध्या कार्यकर्त्याला राजकारणात अजूनही किंचित संधी असल्यासारखे दिसते. संधीची वाटचाल करताना तुम्हाला कमालीचा संघर्ष करावा लागला. दुर्गम भागातील वारकऱ्यासाठी पंढरीची वाट बिकट असल्याचे म्हटले जाते. त्याचा अनुभव तुम्ही घेतला. १९९५ मध्ये तुम्ही पहिल्यांदा भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आलात. मोठ्या मोबदल्याची अपेक्षा ठेवता लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा तुमचा स्वभाव त्या वेळी हरिभाऊ बागडेंना भावला होता. शिवाय त्या काळी भाजपला तुमच्यासारख्या धडाडीच्या, बहुजन समाजातील कार्यकर्त्याची गरज होतीच. राजकीय जीवनात पहिली संधी मिळताच तुम्ही वॉर्डातील समस्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्या वेळी मनपात शिवसेनेची एकहाती सत्ता आणि डॉ. भागवत कराड यांच्यासारखे मातब्बर मुंडे समर्थक स्पर्धेत असताना उपमहापौरपद मिळणे शक्य नाही, हे तुम्ही जाणून होतात. म्हणून तुम्ही पदासाठी फिल्डिंग लावली; पण आक्रमक, आग्रही राहिला नाहीत. पाच वर्षांनंतर तुमचा वॉर्ड राखीव झाला. तुमच्यासाठी राजकारणाचे दरवाजे एका अर्थाने बंदच झाले होते. पण तुमची विठूरायावरील आणि पक्षावरील निष्ठा कामी आली. जाणता कार्यकर्ता म्हणून तुम्ही स्वीकृत नगरसेवकपद मिळवले. स्वीकृताला महापौर, उपमहापौर किंवा महापालिकेच्या खजिन्याची किल्ली हाती असलेले स्थायी समितीचे पद मिळू शकत नाही, हे माहीत असल्याने तुम्ही शांत राहिलात. पण सर्वसाधारण सभांमधून, प्रशासनाकडे पाठपुरावा करत तुम्ही लोकांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवून घेणे सोडले नाही. म्हणूनच की काय तुम्हाला लोकांनी पुन्हा एकदा निवडून दिले. या वेळी भाजपची अन् तुमचीही ताकद वाढलेली होती. शहरातील राजकारणाची समीकरणे बरीच बदलली होती. त्यामुळे तुम्हाला उपमहापौरपदाची संधी मिळाली. आता भाजपचे शहराध्यक्ष असलेले किशनचंद तनवाणी त्या वेळी शिवसेनेकडून महापौर झाले होते. अत्यंत आक्रमक आणि एकहाती सत्ता राबवण्याच्या तंत्रावर विश्वास असलेल्या तनवाणींशी तुम्ही त्या वेळी जुळवून घेतले. एवढेच नव्हे, तर शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी नेमकी कशी राखावी आणि हे राखण करत असताना पक्षाचा, वॉर्डाचा आणि टप्प्याटप्प्याने स्वत:चा विकास कसा करून घ्यावा, याचेही धडे गिरवले. वॉर्ड राखीव झाल्यावर पत्नीला नगरसेवक करत आणि स्वत: भाजप शहराध्यक्ष होत सत्ता घरातच ठेवण्यात तु्म्हाला फारशा अडचणी आल्या नाहीत. गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यातील गटबाजी टिपेला पोहोचल्यावर दोन्ही गटांपासून समान अंतर राखण्याची कला तुम्ही प्राप्त केली. केवळ नेतेच नव्हे, तर नेत्यांच्या जवळ राहणाऱ्या आणि कायम कान फुंकण्यात मग्न असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तुम्ही जवळचे वाटाल, असेही तंत्र तुम्हाला जमले आहे. त्याचा उपयोग तुम्हाला महापौरपदाची उमेदवारी मिळवण्यात झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात उमेदवार ठरवण्यावरून ओढाताण सुरू झाली होती. बागडे यांनी त्यांचे मानसपुत्र मानले जाणारे राजू शिंदे यांच्या पारड्यात वजन टाकले होते. सर्व अर्थांनी बलिष्ठ असलेल्या शिंदेंना मागे टाकणे तसे कठीणच होते. कारण दानवेही तुम्हाला बागडेंच्या गटाचे मानत होते. पण तुम्हाला तुमची सरळमार्गी, अत्यल्प महत्त्वाकांक्षी आणि वरिष्ठांचे ऐकून घेणारा अशी प्रतिमा कामाला आली. काही वर्षांपूर्वी शिंदे यांनी पक्षाशी केलेली बंडखोरी दानवे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात तुमच्या समर्थकांना यश मिळाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार अतुल सावे यांनीही तुमच्या महापौरपदात महत्त्वाची भूमिका बजावली. औरंगाबादेत भाजपमधील सर्व निर्णय मीच घेतो, असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीही तुमच्या उमेदवारीवर फारशी खळखळ केली नाही. एकूणात महापौरपदापर्यंतची तुमची वाटचाल खडतर असली तरी ती विठूरायाच्या कृपेने आणि तुमच्यातील स्वभावगुणामुळे यशस्वी झाली. मात्र, आतापर्यंत जे झाले ते तुमच्यासाठी लाभाचे होते. आता औरंगाबादेतील सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यावर औरंगाबादकरांनाही काही लाभ व्हावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि हे करण्याची वाटचाल म्हणजे पंढरीच्या वारकऱ्यासाठी तारेवरची कसरत आहे. कारण, मनपाच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट असल्याने विकासाची कामे ठप्प आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असले तरी त्याचे दृश्य परिणाम अजूनही औरंगाबादकरांना दिसलेले नाहीत. रस्त्यांची धूळधाण झाली आहे. ११ वर्षांपासून समांतर जलवाहिनीचा गुंता कायम आहे. लोकांची पाण्यासाठी दैना सुरू आहे. पाणीपट्टीचा बोजा माथ्यावर मारण्यात आला आहे. भूमिगत गटार योजनेत खोदलेले रस्ते तशाच अवस्थेत आहेत. रस्त्यातील पथदिव्यांचे खांब वाकुल्या दाखवत उभे आहेत. कामाचा फडशा पाडण्याऐवजी निधीचा फडशा पाडण्यात सारेच मश्गुल आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारे लक्ष नागपूर, विदर्भाकडे आहे. ते औरंगाबादकडे वळवत त्यांच्याकडून मुबलक निधी मिळवणे आणि तो नगरसेवक, ठेकेदारांच्या साखळीतून बाहेर काढून कमीत कमी टक्केवारीत दर्जेदार कामे करून घेणे. किरकोळ बिलांच्या फायलीमागे धावता लोकहिताच्या कामांना गती देणे. जुने लोकविरोधी निर्णय रद्द करून नवे अमलात आणणे. काही अतिमहत्त्वाकांक्षी पदाधिकारी, नगरसेवक अन् भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवून काम करून घेणे अत्यंत कठीण आहे. म्हणून अशी कठीण, लोकांच्या हिताचीच कामे सहज मार्गी लावण्याची शक्ती विठूराया तुम्हाला देवो. तुमच्या चांगल्या कामात अडथळे आणण्याची सद््बुद्धी विठूराया शिवसेना-भाजपच्या नेते मंडळींना देवो, हीच तमाम औरंगाबादकरांच्या वतीने सदिच्छा. 



आपला
एक औरंगाबादकर

No comments:

Post a Comment