Tuesday, 27 December 2016

औरंगाबादकरांचे वऱ्हाड थेट परदेशात कधी जाणार?




प्रख्यात अभिनेते आणि गिनीज बुकात नाव नोंदवलेले ‘वऱ्हाड’कार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे नाटक पाहिलेले किंवा ऐकलेले नाही, असा जुन्या पिढीतील मराठी रसिक विरळाच. १९८०-२००० च्या दशकांत वऱ्हाडने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. बबन्या, जानराव, काशीनाथ, बप्पा अशा जवळपास ५२ व्यक्तिरेखा ते रंगमंचावर जिवंत करत होते. ही सारी मंडळी त्या काळी घराघरात पोहोचली होती. ‘वऱ्हाड’च्या लोकप्रियतेमागे प्रा. देशपांडे यांचा उत्तुंग अभिनय तर होताच, शिवाय त्याचे कथानकही मराठी रसिकाला विलक्षण भावले होते. कारण त्यातील बरेचसे प्रसंग त्यांच्या जीवनाशी मिळतेजुळते होते. आणि सर्वात मोठे आकर्षण होते विमान प्रवासाचे. त्या काळात विमानाची फेरी म्हणजे मुंबई, पुण्यातील उच्चवर्गीय वगळता अन्य सर्वांसाठी अत्यंत अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळे लग्नाचे वऱ्हाड विमानाने लंडनला ही कल्पनाच सर्वांना विलक्षण भावली. अनेक जण ‘वऱ्हाड’चा प्रयोग पाहिल्यावर चिकलठाणा विमानतळावर खरेच विमान कसे दिसते, कसे उडते हे पाहण्यासाठी येत होते. त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की, खेडेगावातील ही वऱ्हाडी मंडळी आधी गावातून बैलगाडीने छोट्या शहरात, तेथून रेल्वेने मुंबईला आणि मुंबईहून लंडनला रवाना होतात.
काळाच्या ओघात सामाजिक, आर्थिक क्षेत्रात बराच बदल झाला. जी मंडळी विमान पाहण्यासाठी येत होती त्यांची मुले परदेशात गेली. त्यांना भेटण्यासाठी विमानाने जाण्याची संधी अनेकांना मिळाली. एखाद्या जुनाट रेल्वेस्टेशनसारखे भासणारे चिकलठाणा विमानतळ महाकाय झाले. दररोज मुंबई, दिल्लीला विमाने उडू लागली आणि नजीकच्या काळात औरंगाबादचा प्रचंड विकास होणार, देश-विदेशातील पर्यटक थेट चिकलठाणा विमानतळावर उतरतील. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक मकबरा, पाणचक्की, सोनेरी महल, औरंगाबाद लेणी आणि अन्य वास्तू पाहतील. दौलताबादच्या किल्ल्याला भेट देतील. त्यातून मुबलक रोजगार उपलब्ध होईल. एवढेच नव्हे, तर चिकलठाण्यावरून थेट लंडन, न्यूयॉर्कला जाता येईल, अशी स्वप्ने बारा वर्षांपूर्वी दाखवण्यात आली. प्रत्यक्षात विमानतळाचा आकार वाढण्यापलीकडे काहीही घडले नाही. रेल्वेने मुंबईला जाण्याऐवजी चिकलठाणा विमानतळावरून विमानाने दिल्ली, मुंबईला जात येते, एवढाच काय तो फरक पडला आहे. वऱ्हाड निघालंय लंडनला नाट्यप्रयोगातील बुंग अजूनही उडालेले नाही आणि नजीकच्या काळात ते उडण्याचीही शक्यता दिसत नाही. परदेशातील पर्यटक आजही आधी मुंबई, दिल्ली आणि तेथून औरंगाबादला येत आहेत आणि औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील कोणाला परदेशात जायचे असेल तर आधी मुंबई, दिल्लीलाच जावे लागत आहे. असे होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यातील प्रमुख म्हणजे पर्यटकांची अपेक्षित वर्दळ नाही आणि दुसरे म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बडी राजकारणी मंडळी आठवड्यातून एक-दोन वेळा मुंबई, दिल्लीची विमान वारी करतात. वर्षातून एखादी चक्कर परदेशातही होते; पण त्यांना इतर नागरिकांविषयी फारशी कळकळ नाही. ज्यांना जायचेच असेल त्यांनी मुंबईहून विमान पकडावे, अशी त्यांची भूमिका दिसते. पर्यटकांचा ओघ वाढवणे म्हणजे कोंबडी आधी की अंडे अाधी, अशातला प्रकार आहे. कारण परदेशी पर्यटकांची विमाने जर थेट चिकलठाणा विमानतळावर उतरली पाहिजेत, अशी सरकारची इच्छा असेल तर त्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण गरजेचे आहे. पण सरकारी पातळीवर मात्र आधी पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे, असा धोशा लावला जात आहे. सरकारपुढे कोणाचे चालत नाही आणि राजकारण्यांना सरकारकडून काम करून घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे सगळा तिढा निर्माण झाला आहे. म्हणूनच गेल्या पाच-सात वर्षांपासून चर्चेत असलेला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव किमान तीन वर्षे लांबणीवर पडला आहे. आंतरराष्ट्रीय एअर ट्रॅफिक नाही म्हणजे पुरेशी हवाई वाहतूक नसल्याने धावपट्टी वाढवण्यासह इतर कामे लांबणीवर टाका, असे फर्मान निघाले आहे. डीएमआयसीसारख्या महत्त्वाकांक्षी औद्योगिक वसाहतीचे काम सुरू झाले आहे. त्यासोबतच चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावे, अशी मागणी उद्योजकांंच्या संघटनांनी गेल्या चार वर्षांपासून लावून धरली होती. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्याचा काहीसा परिणाम झाला. सरकारी यंत्रणा हलली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ७०० कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आला. तो त्याच अवस्थेत आहे. टुरिस्ट ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष जसवंतसिंह यांनी या दिरंगाईबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. किती परदेशी पर्यटक येतात, यावर विमानतळाचे आंतरराष्ट्रीयीकरण कसे अवलंबून असू शकते, असा त्यांचा सवाल आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेर जाणारे देशी पर्यटक जास्त असले तरीही आंतरराष्ट्रीय दर्जा मिळू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. चीन, जपान, कंबोडिया, व्हिएतनाम, कोरिया आदी बुद्धिस्ट राष्ट्रांतील पर्यटकांची संख्या लक्षात घेता चिकलठाणा विमानतळाला बुद्धिस्ट सर्किटशी जोडले तरीही पर्यटक वाढू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. उद्योजकांच्या मते धावपट्टीची लांबी वाढवली तरी पुरेसे आहे. मात्र, त्याकडेही सरकार गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. विमानतळ आंतरराष्ट्रीय हाेण्यासाठी आणखी किमान २०० एकर जागा अधिग्रहित करावी लागणार आहे. सध्या विमानतळ प्राधिकरणाकडे ५०० एकर जागा असून आठ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर १८२ एकर जागा संपादित करण्याला गती देण्यात आली होती. तरीही जैसे थे स्थिती आहे. उद्योजक, टूर ऑपरेटर यांनी अशीही माहिती दिली आहे की, मुंबई विमानतळावर इतकी गर्दी असते की, जागेअभावी काही विमाने अहमदाबाद येथे उतरवावी लागतात. अहमदाबादच्या तुलनेत औरंगाबाद मुंबईपासून जवळ आहे. तेथे विश्रांतीसाठी येणारी विमाने औरंगाबादेत उतरवली जाऊ शकतात. दुसरीकडे ज्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यांच्या डोक्यावरही टांगती तलवार आहे. त्यांची शेती बुडित खात्यात जमा होत आहे. एकीकडे शेती संपादित करणार, असे सांगायचे आणि दुसरीकडे विस्तारीकरण लांबणीवर टाकत राहायचे, हा खेळ आणखी किती वर्षे सुरू ठेवणार, असा प्रश्न राजकारणी मंडळी सरकारला विचारणार नाही. तीही जबाबदारी औरंगाबादकरांनाच उचलावी लागणार, अशी स्थिती आहे.

No comments:

Post a Comment