मराठवाड्याचा अनेक क्षेत्रात बॅकलॉग आहे. तो आणखी किती वर्षे राहिल माहिती नाही. पण कलाप्रांतात तो राहिलेला नाही. उलट मुंबई-पुण्याच्या कलानगरीवर इथले कलावंत ठसा उमटवत आहेत. रसिकांच्या हृदयात स्थान मिळवत आहेत. दरवर्षागणिक त्यांची संख्या वाढतच आहे. एकपात्री प्रयोगाचा किल्ला लढवणारे, अस्सल व्यक्ती आणि इरसाल वल्ली असलेले प्रभाकर निलेगावकर त्यापैकी एक आहेत. अतिशय जिद्दीने त्यांनी रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नवीन शोधले पाहिजे. सादर केले पाहिजे. रसिकांचे मनोरंजन करण्याचे, त्यांना हसवण्याची जबाबदारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे, अशा कमिटमेंटनी ते कार्यरत आहेत, हे सर्वात महत्वाचे आहे. टीव्ही मालिका असो की चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकला, तांत्रिक कौशल्य साऱ्यात मराठवाड्याचे कलावंत अलिकडील काही वर्षांत क्लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेतच. पण मला जे प्रमुख वाटते ते असे की अस्सलपणा, जिवंतपणा, जीवनाशी भिडण्याची, लढण्याची आणि त्यातून कला निर्मितीची शक्ती ग्रामीण भागाकडे वळाली आहे. आणि कृत्रिमतेत अडकून पडलेली सृजनता बाहेर येत आहे. मुंबई-पुणेकरांनाही तिचे महत्व कळाले आहे. आपली निर्मिती एका विशिष्ट चाकोरीतील आहे. दिवाणखाण्यातच ती फिरते. तिच्यात रसरशीतपणा, तजेलदारपणा नाही, असे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणून त्यांनी ग्रामीण भागातून, भारताच्या छोटेखानी शहरांतून येणाऱ्या कलावंतांना स्वीकारणे सुरू केले आहे. त्यामुळेच मूळ औरंगाबादकर आणि आता पुण्यात स्थायिक निलेगावकर यांच्या कलाकृतींना भरभरून दाद मिळत आहे. त्यांचा ‘पुलंच्या व्यक्ती – वल्ली आणि गणगोत’ हा एकपात्री प्रयोग सध्या चर्चेत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात काही वर्षांपूर्वी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केलेले निलेगावकर निवृत्तीनंतर निवांतपणे जीवन व्यतित करू शकले असते. पण अंगातील अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वयाचे कारण पुढे करून आराम करणे हा संस्कार त्यांच्यावर कधीच नव्हता. म्हणून त्यांनी पुलंच्या व्यक्ती-वल्लीची स्वतः निर्मिती केली. त्याचे दिग्दर्शन जुन्या पिढीतील प्रख्यात अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केले आहे. अनेक दशके विशिष्ट वर्गातील रसिकांना मनसोक्त हसवणारे पु. लं. देशपांडे यांनी अनेक व्यक्तिरेखा निर्माण केल्या. त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवले. कारण त्यामागे पुलंची सिद्धहस्त लेखणी तर होतीच शिवाय अतिशय सूक्ष्म असे निरीक्षणही होते. केवळ शब्दांच्या मांडणीतून त्यांनी साऱ्या व्यक्तिरेखा अशा काही चितारल्या की त्या साक्षात आपल्याशी बोलू लागतात. मनातले सारे काही सांगू लागतात. त्यांच्याबद्दल वाचताना आपण कधी त्यांच्यात गुंतून जातो, हेच लक्षात येत नाही. पण दुसरीकडे हेच सामर्थ्य अभिनेत्यांची परीक्षा घेणारे ठरते. म्हणजे व्यक्तिरेखेचा प्रचंड तपशील उपलब्ध. त्यातील नेमका कोणता उचलायचा कोणता वगळायचा, असा प्रश्न अभिनेता, दिग्दर्शकासमोर उभा राहतो. बरं, या व्यक्तिरेखा पुलंसह अनेक नामवंतांनी यापूर्वी साकारल्या आहेत. रसिकांच्या मनावर त्यांचे चित्रण झाले आहे. ते पुसून किंवा बाजूला ठेऊन नव्या रुपात, चेहऱ्याने सादर करणे म्हणजे तशी अग्निपरीक्षाच. ती प्रभाकर निलेगावकर यांनी दिली आहे. या धाडसाबद्दल त्यांचे मराठी रसिकांनी आणखी मनापासून कौतुक केले पाहिजे. त्यांनी बारकाव्यांनिशी टिपलेला हरीतात्या डोळ्यात पाणी आणतो. पेस्तनजी सादर करताना ते ज्या खुबीने अभंग म्हणतात. त्याला तोडच नाही. अंतुबर्वा हा पुलंच्या लिखाणातील उत्तुंग माणूस. अतिशय फाटक्या अंतु बर्व्याला पुलंनी जी शब्दांची श्रीमंती मिळवून दिली. तीच रंगमंचावर आणण्यात निलेगावकर बरेच यशस्वी झाले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन तास चालणाऱ्या या प्रयोगात त्यांनी आवाजाचा विविध लयीत, शैलीत वापर केला आहे. त्याचा अनुभव प्रत्यक्ष प्रयोगात घेणे अधिक चांगले.
आवाजाच्या वापराचे हे कौशल्य निलेगावकरांमध्ये मुळात असणारच. पण त्याला आणखी सफाईदारपणा आला तो वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्यामुळे. निलेगावकर वऱ्हाडकारांचे शिष्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात प्रा. डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे त्या काळी गिरवले. वऱ्हाडकार ऐन बहरात असताना निलेगावकरांनी ‘अस्सल माणसे, इरसाल नमुने’ या एकपात्री नाट्यप्रयोगाची निर्मिती केली. त्यात ते त्यांना भेटलेल्यांचे खास मराठवाडी स्टाईलने सादरीकरण करत. खुद्द वऱ्हाडकारांनी त्या प्रयोगाचे कौतुक केले. आज ‘अस्सल माणसं इरसाल...’ 2200 पेक्षा अधिक प्रयोगांचा टप्पा ओलांडला आहे. त्यावरूनही निलेगावकरांमधील अस्सल कलावंतपणा लक्षात येतो. यापुढील काळात हे अस्सलपण आणखी निखरत राहो, हीच शुभेच्छा.

No comments:
Post a Comment