Thursday, 4 April 2019

सवाईचा टिळा

एका वर्षीच्या नोव्हेंबरपासून सुरू होणारा सांस्कृतिक सोहळे, स्पर्धांचा मोसम दुसऱ्या वर्षाच्या फेब्रुवारीअखेरीस मावळतीला येऊ लागतो. या चार-पाच महिन्यात तमाम कलावंत मंडळी नाविन्याच्या शोधात स्वतःला झोकून देत असतात. रंगभूमीवर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहतात. त्यातील कित्येकजण यशस्वीही होतात. अशा यशस्वीतांचे प्रमाण औरंगाबादेत, मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहे, हे पाहून मनात एक सुखद अभिमानाची भावना निर्माण होते. वर्षानुवर्षे एकांकिका, राज्य नाट्य, कामगार असो की शॉर्ट फिल्मची स्पर्धा अनेक ठिकाणी आपले कलावंत सर्वांना चकित करत आहेत. वर्षानुवर्षे अशा स्पर्धांवर राज्य गाजवणाऱ्या मुंबई-पुणेकरांना मागे टाकत आहेत, हे केवळ कला प्रांतातीलच नव्हे तर मराठवाड्याच्या सर्वच क्षेत्रातील लोकांना आनंद देणारेच आहे. त्यापैकी तीन घटना अलिकडील म्हणून त्याविषयी. 
एककाळ असा होता की सवाई एकांकिका स्पर्धेत सहभागी व्हायचे एवढेच औरंगाबादमधील नाट्यकर्मींचे स्वप्न असायचे. बक्षिसाचा कशाला विचार करायचा. एकदा सवाईचा टिळा लावून घेऊ. स्पर्धा कशी असते ते बघू. अनुभव घेऊ, अशी चर्चा व्हायची. कारण सवाईचा दर्जा आपल्या विचारक्षमतेबाहेर आहे. तिथल्या परीक्षकांना आवडेल असा विषय आपल्याकडे असूच शकत नाही, असा सूर असायचा. अशा त्या सवाईच्या स्पर्धेत औरंगाबादच्या मॅट्रीक या एकांकिकेने सर्वोत्कृष्टचा बहुमान पटकावला. शेखर ढवळीकर, चिन्मय मांडलेकर, निपुण धर्माधिकारी या दिग्गज परीक्षकांनी ही निवड केली. प्रवीण पाटेकर लिखित, दिग्दर्शित ही एकांकिका केवळ बक्षिसपात्र ठरली नाही तर तिने राज्यभरातील नाट्य अभ्यासकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. प्रवीण पाटेकर कायम नवीन काहीतरी सांगू पाहणाऱ्या, ग्रामीण भागातील वास्तव टिपणाऱ्या संवेदनशील रंगकर्मींपैकी एक. त्याच्या मांडणीतही एक प्रकारची धार असते. त्यामुळे येत्या काही वर्षांत तो एकूण नाट्य, चित्रपट क्षेत्रातील आघाडीचा लेखक, दिग्दर्शक झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना त्याची पावले आता त्या दिशेने पडावीत, अशी अपेक्षा आहे. मॅट्रीकमधील भूमिकेसाठी संतोष पैठणेलाही पुरस्कार मिळाला आहे. त्याचेही विशेष कौतुक. आता थोडेसे मागील काळाविषयी. मुंबई-पुण्याच्या स्पर्धांमध्ये धडक मारण्याची परंपरा प्रा. कुमार देशमुख यांनी १९८० च्या दशकात सुरू केली. त्यांच्या स्मारक नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत इतिहास रचला. पद्‌मनाभ पाठक दिग्दर्शित अचानकने तब्बल २५ वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती केली. मधल्या काळात चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी यांनी स्पर्धांऐवजी दुसरा मार्ग जवळ करत व्यावसायिक रंगभूमी काबीज केली. स्पर्धांच्या निमित्ताने औरंगाबादकरांची खरी आक्रमणे सुरू झाली ती १९९३-९४मध्ये. प्रा.दासू वैद्य यांनी लिहिलेल्या ‘देता आधार का करू अंधार’ एकांकिकेने नाट्य दर्पण स्पर्धा गाजली. मराठी चित्रपटांचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे, दमदार अभिनेता मंगेश देसाई याच स्पर्धेतून गाजले. किरण पोत्रेकर, सचिन गोस्वामी, प्रा. कमलेश महाजन, संजय सुगावकर यांच्यासह अनेकांनी  अशाच काही स्पर्धांतून स्वतःला सिद्ध केले. ती परंपरा प्रवीण पाटेकर, राबवा गजमल आणि त्यांचे तमाम सहकारी कलावंत पुढे नेत आहेत, उंचावत आहेत.
एकीकडे मॅट्रीक सवाईमध्ये गाजत असताना दुसरीकडे प्रा. अनिलकुमार साळवे यांनी दिग्दर्शित केलेल्या 15 ऑगस्ट लघुपटाने आणखी एक पुरस्कार पटकावला. माय ठाणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात तो सर्वोत्तम ठरला आहे. प्रा. साळवे म्हणजे नव्या पिढीतील अनुभवी, संवेदनशील आणि सामाजिक वेदना मांडणारे लेखक-दिग्दर्शक आहेत. देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असताना ते नवी पिढीही घडवत आहेत. विविध स्पर्धांमध्ये त्यांचे विद्यार्थी चमकत आहेत. पण हे करत असताना स्वतःतील कलावंतही जिवंत ठेवत आहेत. 
औरंगाबाद-मराठवाड्याच्या सांस्कृतिक जगताचे ते अतिशय नम्रपणे प्रतिनिधीत्व करताना दिसतात असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
स्पर्धा आणि नाटकाच्या पलिकडे जे झाले ते म्हणजे एमजीएमच्या महागामीचा शारंगदेव महोत्सव. कमलकिशोर कदम, अंकुशराव कदम यांनी एमजीएमच्या रुपाने एक शैक्षणिक साम्राज्य उभे केले आहे. त्यातील काही अभ्यासक्रम खरेच समाजमन घडवणारे आहेत. महागामी त्यापैकी एक. त्याचे खरे श्रेय पार्वती दत्ता यांनाच द्यावे लागेल. जवळपास दोन तपांपासून त्या शास्त्रीय नृत्य परंपरा कायम ठेवून आहेत. एका विशिष्ट समाज, वर्तुळापुरतीच मानली जाणारी शास्त्रीय नृत्य कला सर्वस्तरांपर्यंत नेण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न त्या करतात. शारंगदेव महोत्सव त्याचाच एक भाग होता. यंदा त्यांनी शास्त्रीय नृत्यासोबत लोककला, सुफी कव्वालीलाही स्थान दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ परफॉर्मन्स एवढाच दत्ता यांचा फोकस नसतो. तर कलावंतांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देतात. यातून कलेच्या विविध पैलूंची ओळख होते. ती रसिकांसाठीही पर्वणी असते. यापुढील काळातही हा प्रवाह आणखी रुंद आणि वैविध्यपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.  

No comments:

Post a Comment