Thursday, 4 April 2019

कलावंत घडवणारा जवाहिर

ते तुमच्यासमोर आले आणि तुम्ही त्यांच्या नजरेला नजर भिडवलीच तर काळजात थर्र होते. एवढी तीक्ष्ण, भेदक नजर. त्यात पुन्हा बोलणे म्हणजे जाब विचारल्यासारखे. इकडून तिकडे आरपार करणारे. पण हे सारे पहिल्या काही मिनिटांपुरतेच. नंतर हा माणूस म्हणजे स्वतःच्या क्रिएटिव्हीटी, विचार प्रवाहात इतरांनाही अलगदपणे सहभागी करून घेणारा दयाळू, कनवाळू अवलिया असल्याचे कळते. आणि त्याच्यासोबत बांधलेला धागा सुटणे शक्य नाही, असेही लक्षात येते. पुढील प्रवासात हा माणूस अक्षरशः झपाटून टाकतो. आपलं जीवन घडतंय. त्यात नवनिर्मितीचा रस ओतला जातोय. आपल्या आतील आवाज बुलंद करण्याची शक्ती मिळतीय. पण ही शक्ती अतिशय विवेकाने वापरायची असते, याचीही जबाबदारी आपल्यावरच असल्याचे समजत जाते. इतक्या साऱ्या गुणवैशिष्ट्याचा संगम झालेला, ठाण मांडत नाट्य, चित्रपटांचे अनेक कलावंत घडवणारा जवाहिर म्हणजे प्रा. दिलीप महालिंगे. १५ फेब्रुवारी रोजी वयाची ५४ वर्षे पूर्ण करणाऱ्या या जवाहिर गुरुंचा सत्कार त्यांच्या शिष्योत्तमांनी १७ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. प्रा. महालिंगेंना नाट्यक्षेत्रात येण्यास कारणीभूत ठरलेले त्यांचे गुरु म्हणजे मास्तर डॉ. रविंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कृतज्ञता सोहळा होत आहे.
ज्यांना आपण घडवलं. ज्यांच्या आयुष्यात आपण काही रंग भरले. त्यांनी त्याची आठवण ठेवावी. रस्त्यावर कधी चुकून भेट झाल्यावर त्यांच्या नजरेत ते दिसावे. माघारी कधीतरी आपल्याबद्दल दोन शब्द सांगावेत, एवढी कोणत्याही गुरुची रास्त अपेक्षा असते. पण प्रा. महालिंगे त्याच्या पलिकडे पोहोचले आहेत. फक्त परफॉर्मन्स चांगला कर. आणि माणूस म्हणून स्वतःतील माणूसपण जिवंत ठेव. बाकी काही नाही, असा संस्कार ते विद्यार्थ्यांवर करतात. त्यामुळेच की काय त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे मोल अवर्णनीय आहे. 
प्रा. महालिंगेंचा नाट्य चळवळीतील प्रवास नाट्यमय आहे. घरी अगदी जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले सर उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी. तेथे नाटकासाठी ऑडिशन्स होत्या. काय सुरू आहे, असे कुतुहलापोटी पाहण्यासाठी ते गेले. तेथे रविंद्र ठाकूरसर होते. त्यांनी ऑडिशनसाठी बोलावले. तर प्रा. महालिंगे मागे सरले. ठाकूर म्हणाले, भितोस की कायॽ झाले. तेवढ्या एका शब्दाने चमत्कार झाला. तिथून महालिगेंनी वळून पाहिले नाही. अनेक स्पर्धा गाजवल्या. बक्षिसे मिळवली. १९८८मध्ये विवेकानंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाल्यावर तर कर्तृत्वाला जणू धुमारेच फुटले. मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव अशा अनेक मित्रांसोबत त्यांचे विश्व विस्तारत गेले. १९९२ नंतर युवक महोत्सवात सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचा दबदबा काहीसा कमी होत चालला होता. त्याची जागा विवेकानंद महाविद्यालयाने पटकावली. ती देखील प्रचंड मेहनत आणि नाविन्यपूर्ण कल्पना साकारत. एक दोन नव्हे तर १६ वर्षे विवेकानंद युवक महोत्सवाची जनरल चँपिअनशिप पटकावत आहे. यावरून प्रा. महालिंगे या माणसात कलावंत घडवण्याची किती शक्ती असावी, याचा अंदाज येऊ शकतो. सर फक्त तालमीपुरते सर नसतात. तर ते विद्यार्थ्यांचे पूर्ण विश्व व्यापून टाकतात. कलावंत आणि माणूस म्हणून मुलगा-मुलगी पूर्णपणे तयार झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. आणि मग ते एका विलक्षण जिद्दीने पेटून जात एकेका पैलूवर काम करतात. एकांकिका, प्रहसन, मूकाभिनयाची तालीम म्हणजे एक परीक्षाच. त्यात परफेक्शन असेलच पाहिजे, असा प्रा. महालिंगेचा हट्ट असतो. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी अनेक एकांकिकांचे लेखन केले. त्यात मांडलेले विषय पाहिले तर लक्षात येते की प्रा. महालिंगे केवळ बक्षिसे किंवा टाळ्या मिळवण्यासाठी कलाकृती निर्माण करत नाही. तर त्यामागे त्यांचा सामाजिक बांधिलकीचा विचार आहे. आपल्या आजूबाजूला जे काही घडते आहे ते हजारो रसिकांसमोर नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तेही धारदारपणे. टोकदारपणे. पण हे करत असताना संतुलन बिघडणार नाही, यावरही त्यांचा कायम कटाक्ष राहिला आहे. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांसाठी त्यांनी नाट्य प्रयोगांतून त्या काळात एक लाख रुपयांचा निधी उभा केला होता. एकदा ते असेच भटकत अजिंठ्याजवळच्या लेणीपूर गावात गेले असता तेथे आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नसल्याचे कळाले. मग औरंगाबादला परतताच त्यांनी काही सुहृद मित्रांच्या मदतीने त्या गावात आरोग्य शिबिर घेतले. आजारींवर उपचार केले. एवढी संवेदनशीलता प्रा. महालिंगे यांनी स्वतः जपली आहे. या वाटचालीत त्यांना पत्नीची पूर्ण साथ मिळाली. रात्री – बेरात्री तालिम संपल्यावर भुकेजल्या ५०-५० विद्यार्थी कलावंतांना गरमागरम पोटभर जेवण करून वाढणे त्यांनी कधी सोडले नाही. त्यामुळे सरांच्या यशात निम्मा वाटा त्यांच्या पत्नीचा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रा. महालिंगेना प्रसिद्धीचा अजिबातच सोस नाही. कशाचेही भांडवल न करता आपण आपले काम करत राहायचे. पडद्यामागेच राहायचे, असा त्यांचा दुर्मिळ स्वभाव. म्हणूनच ते रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरुण कलावंताचे दिशादर्शक यंत्र झाले आहेत. या दिशादर्शकाची उंची उत्तरोत्तर वाढत जाईल. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालत शेकडो तळमळीचे, संवेदनशील, नवनिर्मितीची आस असलेले कलावंत घडतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

No comments:

Post a Comment