Tuesday, 13 April 2021

बुशरा : परिपूर्ण ... तरीही

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक असलेले बॅ. मोहंमद अली जीना हळूहळू बदलत गेले. २० मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये झालेल्या मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत. ते एकत्र, एकाच छताखाली कधीच नांदू शकत नाहीत, असे सांगितले. २३ मार्च १९४० रोजी पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढे काय झाले हे सर्वांना माहिती आहेच. भारतीय उपखंडाचे दोन तुकडे झाले. कोट्यवधी लोकांना, प्रचंड हिंसाचारात मायभूमी सोडावी लागली. दोन्ही देशांच्या आरपार घुसलेला फाळणीचा भाला अजूनही कायम आहे. कधीच भरून निघणार नाही, एवढे नुकसान झाले. क्रिकेट आणि कलेच्या प्रांतात तर ते खूपच हुरहुर लावणारे, खुपणारे आहे. भारत एकच देश असता तर आपला क्रिकेटचा संघ किती बलाढ्य असता, अशी चर्चा चार दशकांपूर्वी असायची. आपल्या दिलीपकुमार, माधुरी दीक्षित, हेमामालिनी, अमिताभ बच्चनवर फिदा झालेले कोट्यवधी पाकिस्तानी रसिक आहेत. तसेच तिकडेही अनेक अत्यंत प्रतिभावान कलावंत आहेत. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिकांमध्ये झळकणाऱ्या, गायिका-लेखिकाही असलेल्या बुशरा अन्सारी त्यापैकीच एक आहेत. आपल्या वहिदा रहेमान, आशा पारेख यांच्या अभिनयशैलीचे एक अप्रतिम मिश्रण त्यांच्यात आहे. शिवाय त्यांच्यात खळाळता विनोद निर्माण करण्याची क्षमता आहे. पुढील महिन्यात १५ मे रोजी ६६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बुशरा जेव्हा पडद्यावर अवतरतात. तेव्हा पडदा पूर्णपणे व्यापून टाकतात. चाळीसपेक्षा अधिक सिनेमा, सहा टीव्ही मालिका, दहा नाटकांमधून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण केला आहे. पण त्या केवळ कलावंतच आहेत, असे नाही तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत जागृत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना खडे बोल सुनावण्यास मागेपुढे पाहत नाहीत. इतिहासात जे घडले ते घडले. कुटुंबे वेगळी झाली म्हणून मुलांमध्ये कटूता कशासाठीॽ असा त्यांचा सवाल आहे. दोन वर्षांपूर्वी भारत – पाकिस्तानात तणाव वाढला. अणुयुद्ध होणार का, असे वातावरण मिडिआवाले तयार करू लागले. तेव्हा बुशरा यांनी ‘हमसाये माँ जायी’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली. मिडिआवाले, राजकारण्यांना बाजूला सारत आता भारत पाकिस्तानातील गृहिणींनाच दोन्ही देशांची काळजी घ्यावी लागणार आहे. युद्धाचे वातावरण थांबवून मुलांमध्ये प्रेम भावनेची पेरणी करावी लागेल, असा संदेश देणारे हे गीत बुशरा यांची एक बहीण नीलम अहमद बाशेर यांनी लिहिले. त्यात बुशरांनी हिंदू तर त्यांची दुसरी बहिण अस्मा अब्बास यांनी पाकिस्तानी मुस्लिम गृहिणीची भूमिका केली आहे. अगदी शंभर चौरस फुटाच्या सेटवर चित्रीत झालेल्या या गाण्याने लाखो पाकिस्तानी रसिकांनाही अंर्तमुख केले. गाण्याचा भावार्थ समजून तसे वागले पाहिजे, अशा प्रतिक्रियाही सोशल मिडिआवर लोकांनी दिल्या. त्यामुळे बुशरांचे बळ वाढले. पण केवळ व्हिडिओ करून त्या थांबल्या नाहीत तर प्रत्येक मंचावर हा विचारही ठणकावून मांडला. ‘बुशरा’ नावाचा अर्थ अचूकता. परिपूर्णता, अचूकतेचा ध्यास असलेली व्यक्ती असा आहे. हा अर्थ त्यांनी सार्थ केला आहे. अर्थात कलावंत होण्याचे, व्यक्तीस्वातंत्र्याच्या कट्टर समर्थक असण्याचे बीज त्यांच्यात वडिलांकडून पेरले गेले. त्यांचे वडिल अहमद बाशी प्रख्यात व्यावसायिक लेखक होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्या बाल कलावंत म्हणून काम करू लागल्या. पण त्यांना खरी ओळख मिळाली १९७८ मध्ये पीटीव्हीवर आलेल्या फिफ्टी-फिफ्टी या विनोदी मालिकेतून. १९८३मध्ये त्यांच्या ‘आंगन तेडा’ मालिकेने एकच खळबळ उडवून दिली. कारण त्यात त्यांनी पाकिस्तानची कायम मुस्कटदाबी करणाऱ्या लष्करी राजवटीवर टीका केली होती. त्यामुळे त्या काही काळ अडचणीतही आल्या होत्या. पण त्यांनी माघार घेतली नाही. अन्वर मकसूद हे पाकिस्तानच्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ लेखक, विचारवंत. त्यांची ‘लूज टॉक’ मालिका प्रचंड लोकप्रिय होती. त्यात ते आणि ताकदीचे अभिनेते मोईन अख्तर समाजातील दांभिक लोकांच्या चिंधड्या उडवत. या मालिकेतील काही भागांमध्ये बुशराही होत्या. त्यात भूमिका साकारताना बुशरा यांनी जी वेगवेगळी रुपे धारण केली आहेत ती त्यांच्यातील समर्थ, बहुगुणी अभिनेत्रीची साक्ष देतात. पण, तरीही असे वाटते की, त्यांच्यातील प्रतिभेला तेवढा वाव मिळाला नाही. त्यांचा चाहता वर्ग, भुमिकांमधील वैविध्य पाकपुरतेच मर्यादित राहिले. फाळणीच झाली नसती तर त्यांच्यातील अभिनयाचा आणखी कस लागला असता. त्यांना विविधांगी भूमिका मिळाल्या असत्या. अन् भारतात आणखी एका रुपवान, परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या अभिनेत्रीची भर पडली असती.

No comments:

Post a Comment