Tuesday, 13 April 2021

चांदणी शिशिराची

जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात. एखादी का होईना पणती कोणीतरी धाडसाने पेटवतं. काळ्याकुट्ट काळोख्या अवकाशात एक चांदणी प्रकाशमान होतेच. ही निसर्गाची अद्भुत लीला आहे. मानवी जीवनातही असेच घडत असते. त्याचा अनुभव यंदा जागतिक महिला दिनी बांगलादेशाने घेतला. माणूस म्हणून अस्तित्वच नाकारलेल्या, ना मर्द ना औरत असे म्हणून कायम हिणावल्या गेलेल्या तृतीयपंथीयांच्या जमातीतील तश्नुवा अनान शिशिरने प्रख्यात बौशाखी या न्यूज चॅनेलवर अँकर म्हणून काम सुरू केले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणून तेथील मध्यमवर्गीयांनी या घटनेचे क्रांतीकारी असे वर्णन करत स्वागत केले आहे. १९४७मध्ये भारत आणि १९७१मध्ये पाकिस्तानातून वेगळ्या झालेल्या बांगलादेशात कट्टरपंथीयांचा धुमाकूळ कायम सुरू असतो. १६ कोटी लोकसंख्येच्या या देशात अल्पसंख्यांकांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना नेहमीच घडतात. धर्मविरोधी लिखाण केल्याचा ठपका ठेवून तस्लिमा नसरीन या प्रख्यात लेखिकेला परागंदा होण्यास भाग पाडणारा देश अशीही एक ओळख आहेच. तेथे २९ वर्षीय तनुश्वामधील उपजत गुणाला, कौशल्याला वाव मिळाला. तिला एक सन्मानाचे काम देण्यात आले, हे महत्वाचे आहे. घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ फांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ कानावर आली अनंतातुनी हाक विसरूनि पंख पाखरु उडाले एक या प्रख्यात रॉय किणीकर यांच्या ओळींची ‘विसरुनि समाजाचे डंख, पाखरु उडाले एक’ अशी रचना करत तनुश्वाने झेप घेतली आहे. अर्थात हे झेपावणे महाकठीण होते. तिच्या लढाईची सुरूवात घरापासूनच झाली. आपल्या घरात मुलाच्या रुपात मुलगी जन्माला आली आहे, असे कळताच तिच्या माता-पित्यांनी तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अक्षरश: लाथाडून हाकलले. वडिलांनी बोलणेच बंद केले. शेजारी टोमणे मारू लागले. मग तिने ढाका शहरातील एका वस्तीत राहण्यास सुरुवात केली. तेथे पदोपदी होणारा अपमान गिळत लढाईला प्रारंभ केला. अंगी उपजत हुशारी होतीच. त्या बळावर तिने शिक्षण पूर्ण केले. हॉर्मोन बदलाची शस्त्रक्रिया करून तिचे मूळ स्त्री रुप मिळवले. इतर तृतीयपंथीयांसारखे रस्त्यावर भीक मागत जगायचे नाही हे तर तिने ठरवलेच होते. म्हणून तिने स्वत:ला सांस्कृतिक जगात झोकून दिले. नटुआ, बोटोआ नावाच्या दोन कलापथकांमध्ये काम केले. उत्तम नर्तक आणि आवाजावर प्रभुत्वाची देणगी आपल्याला मिळाली आहे, याची जाणिव तिला याच काळात झाली. कला प्रांतातील अनुभव घेतल्यावर तिने सामाजिक क्षेत्राकडे लक्ष वळवले. तरुण, महिलांसाठीच्या संस्थांमध्ये काम करू लागली. बंधू समाजकल्याण संस्था, बांगलादेश मानवाधिकार संघटनेत तिने कर्तृत्वाचा ठसा उमटवला. बांगलादेशात १० हजार तृतीयपंथीय आहेत. पंतप्रधान हसिना शेख यांनी २०१३मध्ये त्यांची स्वतंत्र नोंद करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये मतदानाचा अधिकार दिला. देशाच्या सर्वोच्च नेत्याने दिलेल्या बळामुळे तश्नुवाला आणि तिच्यासारख्यांच्या पाठिशी उभे राहू इच्छिणाऱ्यांना धीर मिळाला. तनुश्वाच्या नेमणुकीसाठी पुढाकार घेणारे बौशाखी चॅनेलचे उपकार्यकारी संचालक टिपू अलोम म्हणाले की, आपल्या पंतप्रधान धाडसी निर्णय घेत असतील तर आपणही काही केले पाहिजे, असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही तनुश्वासोबत आणखी एका तृतीयपंथीयाला नाट्य विभागात नियुक्त केले आहे. बंधू समाजकल्याण संस्थेत दीर्घकाळापासून काम करणारे तनवीर इस्लाम तनुश्वाला पडद्यावर अत्यंत विश्वासाने बातम्या देताना पाहून कमालीचे सुखावले. धर्माच्या पोलादी भिंतीत बंदिस्त बांगलादेशासारख्या देशात असे काही घडणे ही चांगल्या बदलांची सुरुवात आहे, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि ते म्हणाले ते सत्यच असावे. कारण तनुश्वाला नुकतेच दोन सिनेमांसाठी साईन करण्यात आले. त्यातील एका सिनेमात ती फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तृतीयपंथीयांमधील उत्तम नर्तक, अभिनेत्री आणि प्रसारमाध्यमांच्या अभ्यासकांना एक चांगला मंच मिळवून देण्यासाठी ती कार्यरत राहणार आहे. त्यामुळे शिशिराची चांदणी दिवसेंदिवस प्रकाशमान होत राहिल. तिच्यासोबत इतर तारकाही चमकू लागतील. त्यांच्या नशिबात तनुश्वासारखा खडतर प्रवास येऊ नये, एवढीच पुरुष आणि स्त्री म्हणून जन्मण्याचे भाग्य लाभलेल्यांकडून अपेक्षा आहे. अखेर थोडेसे भारत आणि पाकिस्तानबद्दल. भारतात २०१४ मध्ये तमिळनाडूतील लोटस् नामक न्यूज चॅनेलवर पद्मिनी प्रकाश या तृतीयपंथीयाला अँकर म्हणून संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे २०१८मध्ये मर्विया मलिक कोहीनूर या पाकिस्तानी चॅनेलवर झळकली. जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात, असेच तर तनुश्वा शिशिर, पद्मिनी प्रकाश, मर्विया मलिक सांगत आहेत.

No comments:

Post a Comment