खासगीकरणातून कचरा संकलनाच्या ठेक्यात जे अडथळे आणले जात आहेत. ठरवून काही गोष्टी सुरू आहेत. ते पाहून या शहराचे भले चिंतणारा प्रत्येकजण निराश होत आहे. औरंगाबादच्या दुर्दैवाचे दशावतार कधी संपणार कोणास ठाऊकॽ असा प्रश्न त्याला पडू लागला आहे. इथल्या कामांवर लक्ष देण्यासाठी निवडून दिलेले कारभारीच स्वतःच्या जबाबदारीबद्दल पूर्ण प्रामाणिक नाहीत. लोकांचे भले करण्याची आश्वासने देऊन आपण निवडून आलो आहोत, याचा त्यांना केव्हाच विसर पडलाय, ही तर आता नव्याने सांगण्याची गोष्ट राहिलेलीच नाही. पण त्यात आता अशी भर पडली आहे की, गाव वसवण्याआधीच लुटालूट सुरू झाली आहे. म्हणजे बहुतांश लुटारू, ठग मंडळी आधी एखादे संपन्न आहे का, याची चौकशी करत. गावातील सुगीचा मोसम संपल्यावर हल्ला करत. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, एखादा रस्ता असो की ड्रेनेज लाईन, इमारत बांधणी. थोडेसे काम सुरू झाल्यावर त्याचा दर्जा खराब करण्यासाठी ठेकेदाराशी संगनमत केले जायचे. त्यातून आर्थिक वाटाघाटी व्हायच्या. सरळ बोटाने पाहिजे तेवढे तुप निघत नाही, असे लक्षात आल्यावर सर्व पक्षांची कारभारी मंडळी सर्व मतभेद विसरून एकत्र येत. मिडिआला हाताशी धरून आरडाओरड करत. आणि मग काम बऱ्यापैकी दर्जा राखून पूर्ण होत असे. पण आता जे काही अगदी पायंडा म्हणून सुरू आहे. ते अस्वस्थ करणारे तर आहेच. शिवाय संपूर्ण शहराला एका खोल, काळ्या दरीत ढकलून टाकणारे आहे. सर्वच कारभारी यात सहभागी नाहीत. पण मूक पाठिंबा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अधिकाऱ्यांबद्दल तर विचारायची सोयच नाही. वाटाघाटीसाठी सर्व काही विसरणाऱ्या या अधिकाऱ्यांकडे कोणी भ्रष्ट म्हणून बोट दाखवले तर लगेच ते जाती-धर्माचे अस्त्र बाहेर काढतात. अमूक काम करा, शिस्त पाळा, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा, असे म्हटले की अधिकारी, कारभाऱ्यांचे आणि काही सेवाभावी संस्थांचे कोंडाळे शिस्त लावणाऱ्यालाच घेरते. खालच्या पातळीवर पोहोचत हल्ले करते. तेच पुन्हा समोर येत आहे. सहा महिन्यांपासून रेड्डीज कंपनीला कचरा संकलन ठेका देण्याची प्रक्रिया सुरू होती. दहा वर्षांपूर्वी रॅम्के नावाची अशीच संस्था आली होती. पाच-सहा महिने होताच रॅम्केचे काम चांगले नाही. कचराच उचलला जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी सुरू केली. दुसरीकडे मनपाच्या कर्मचाऱ्यांना रॅम्केने सामावून घ्यावी, असा धोशा सुरू झाला. आंदोलने, घोषणाबाजी, काम बंद असेही झाले. शेवटी ती संस्था पळून गेली. त्यातून कोणताही धडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही, असे आता दिसते. कारण रॅम्कीच्या वेळी जे झाले त्याच दिशेने रेड्डीज संस्थेची वाटचाल सुरू झालीय. ती देखील कामकाजाला सुरूवात होण्याच्याआधीच. दहा वर्षांपूर्वी जे झाले त्याच्या अनेक कहाण्या समोर येतात. त्यापैकी जी सर्वचजण वारंवार सांगतात ती अशी होती की, रॅम्कीच्या व्यवस्थापनाने आपली माणसे घ्यावीत, असा दबाब तत्कालिन नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी टाकला. त्यात आजी-माजी आमदार सहभागी झाले होते. त्यापेक्षाही पुढील हद्द काहीजणांनी गाठली होती. त्यांनी विशिष्ट वॉर्डातील कचरा उचलण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट घशात घातले होते. पण काम करण्यास ते तयार नव्हते. रॅम्कीने माझ्याच रिक्षा कचरा उचलण्यासाठी लावल्या पाहिजेत, असा दबाब ते टाकत होते. आताही यापेक्षा काही वेगळे सुरू असेल असे वाटत नाही. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना कचरा विषयाचे तज्ज्ञ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आणले. पण विषयाचे तज्ज्ञ असणे आणि कचऱ्यातून कमाईवरच डोळा ठेवणाऱ्या टोळीशी लढणे, यात जमीनअस्मानाचा फरक आहे. तो डॉ. निपुण यांच्या लक्षात येऊ लागला आहे. म्हणूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी भलामोठा दगड उचलणे सोपे पण मनपात काम करणे कठीण असे ट्विट केले होते. डॉ. निपुण यांच्या कार्यपद्धतीतील एक दोष म्हणजे ते संवेदनशील नागरिक, प्रसारमाध्यमांना टाळून टोळीशी लढू इच्छितात. त्यात त्यांना यश येणे कठीणच आहे. कारण टोळी खूपच मोठी आणि पसरलेली आहे. टोळीतील अनेकांनी चेहऱ्यावर चांगुलपणाचे बुरखे चढवले आहेत. त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. अनेक अधिकारी, ठेकेदारांशी त्यांचे सूत जुळलेले आहे. गाव वसण्याआधीच लूटालुट करायची असे ठरवून ते घोड्यांवर स्वार होत गावामध्ये दाखल झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांच्याकडून कमीत कमी भ्रष्टाचारात किमान दर्जाचे काम करून घेण्याकरिता डॉ. निपुण यांना व्यवहारात आणखी निपुण व्हावे लागेल. शहरासाठी काही चांगले करू इच्छिणारे लोक तसेच प्रसारमाध्यमांची मदत घ्यावीच लागणार आहे. अन्यथा कचरा संकलनाची आखलेली योजना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडेल. यात निपुण यांचे फारसे काही बिघडणार नाही पण १५ लाख औरंगाबादकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होईल. एवढे नक्की.
Thursday, 31 January 2019
Sunday, 13 January 2019
एकपात्री अस्सल, इरसाल
मराठवाड्याचा अनेक क्षेत्रात बॅकलॉग आहे. तो आणखी किती वर्षे राहिल माहिती नाही. पण कलाप्रांतात तो राहिलेला नाही. उलट मुंबई-पुण्याच्या कलानगरीवर इथले कलावंत ठसा उमटवत आहेत. रसिकांच्या हृदयात स्थान मिळवत आहेत. दरवर्षागणिक त्यांची संख्या वाढतच आहे. एकपात्री प्रयोगाचा किल्ला लढवणारे, अस्सल व्यक्ती आणि इरसाल वल्ली असलेले प्रभाकर निलेगावकर त्यापैकी एक आहेत. अतिशय जिद्दीने त्यांनी रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नवीन शोधले पाहिजे. सादर केले पाहिजे. रसिकांचे मनोरंजन करण्याचे, त्यांना हसवण्याची जबाबदारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे, अशा कमिटमेंटनी ते कार्यरत आहेत, हे सर्वात महत्वाचे आहे. टीव्ही मालिका असो की चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकला, तांत्रिक कौशल्य साऱ्यात मराठवाड्याचे कलावंत अलिकडील काही वर्षांत क्लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेतच. पण मला जे प्रमुख वाटते ते असे की अस्सलपणा, जिवंतपणा, जीवनाशी भिडण्याची, लढण्याची आणि त्यातून कला निर्मितीची शक्ती ग्रामीण भागाकडे वळाली आहे. आणि कृत्रिमतेत अडकून पडलेली सृजनता बाहेर येत आहे. मुंबई-पुणेकरांनाही तिचे महत्व कळाले आहे. आपली निर्मिती एका विशिष्ट चाकोरीतील आहे. दिवाणखाण्यातच ती फिरते. तिच्यात रसरशीतपणा, तजेलदारपणा नाही, असे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणून त्यांनी ग्रामीण भागातून, भारताच्या छोटेखानी शहरांतून येणाऱ्या कलावंतांना स्वीकारणे सुरू केले आहे. त्यामुळेच मूळ औरंगाबादकर आणि आता पुण्यात स्थायिक निलेगावकर यांच्या कलाकृतींना भरभरून दाद मिळत आहे. त्यांचा ‘पुलंच्या व्यक्ती – वल्ली आणि गणगोत’ हा एकपात्री प्रयोग सध्या चर्चेत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात काही वर्षांपूर्वी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केलेले निलेगावकर निवृत्तीनंतर निवांतपणे जीवन व्यतित करू शकले असते. पण अंगातील अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वयाचे कारण पुढे करून आराम करणे हा संस्कार त्यांच्यावर कधीच नव्हता. म्हणून त्यांनी पुलंच्या व्यक्ती-वल्लीची स्वतः निर्मिती केली. त्याचे दिग्दर्शन जुन्या पिढीतील प्रख्यात अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केले आहे. अनेक दशके विशिष्ट वर्गातील रसिकांना मनसोक्त हसवणारे पु. लं. देशपांडे यांनी अनेक व्यक्तिरेखा निर्माण केल्या. त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवले. कारण त्यामागे पुलंची सिद्धहस्त लेखणी तर होतीच शिवाय अतिशय सूक्ष्म असे निरीक्षणही होते. केवळ शब्दांच्या मांडणीतून त्यांनी साऱ्या व्यक्तिरेखा अशा काही चितारल्या की त्या साक्षात आपल्याशी बोलू लागतात. मनातले सारे काही सांगू लागतात. त्यांच्याबद्दल वाचताना आपण कधी त्यांच्यात गुंतून जातो, हेच लक्षात येत नाही. पण दुसरीकडे हेच सामर्थ्य अभिनेत्यांची परीक्षा घेणारे ठरते. म्हणजे व्यक्तिरेखेचा प्रचंड तपशील उपलब्ध. त्यातील नेमका कोणता उचलायचा कोणता वगळायचा, असा प्रश्न अभिनेता, दिग्दर्शकासमोर उभा राहतो. बरं, या व्यक्तिरेखा पुलंसह अनेक नामवंतांनी यापूर्वी साकारल्या आहेत. रसिकांच्या मनावर त्यांचे चित्रण झाले आहे. ते पुसून किंवा बाजूला ठेऊन नव्या रुपात, चेहऱ्याने सादर करणे म्हणजे तशी अग्निपरीक्षाच. ती प्रभाकर निलेगावकर यांनी दिली आहे. या धाडसाबद्दल त्यांचे मराठी रसिकांनी आणखी मनापासून कौतुक केले पाहिजे. त्यांनी बारकाव्यांनिशी टिपलेला हरीतात्या डोळ्यात पाणी आणतो. पेस्तनजी सादर करताना ते ज्या खुबीने अभंग म्हणतात. त्याला तोडच नाही. अंतुबर्वा हा पुलंच्या लिखाणातील उत्तुंग माणूस. अतिशय फाटक्या अंतु बर्व्याला पुलंनी जी शब्दांची श्रीमंती मिळवून दिली. तीच रंगमंचावर आणण्यात निलेगावकर बरेच यशस्वी झाले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन तास चालणाऱ्या या प्रयोगात त्यांनी आवाजाचा विविध लयीत, शैलीत वापर केला आहे. त्याचा अनुभव प्रत्यक्ष प्रयोगात घेणे अधिक चांगले.
आवाजाच्या वापराचे हे कौशल्य निलेगावकरांमध्ये मुळात असणारच. पण त्याला आणखी सफाईदारपणा आला तो वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्यामुळे. निलेगावकर वऱ्हाडकारांचे शिष्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात प्रा. डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे त्या काळी गिरवले. वऱ्हाडकार ऐन बहरात असताना निलेगावकरांनी ‘अस्सल माणसे, इरसाल नमुने’ या एकपात्री नाट्यप्रयोगाची निर्मिती केली. त्यात ते त्यांना भेटलेल्यांचे खास मराठवाडी स्टाईलने सादरीकरण करत. खुद्द वऱ्हाडकारांनी त्या प्रयोगाचे कौतुक केले. आज ‘अस्सल माणसं इरसाल...’ 2200 पेक्षा अधिक प्रयोगांचा टप्पा ओलांडला आहे. त्यावरूनही निलेगावकरांमधील अस्सल कलावंतपणा लक्षात येतो. यापुढील काळात हे अस्सलपण आणखी निखरत राहो, हीच शुभेच्छा.
आवाजाच्या वापराचे हे कौशल्य निलेगावकरांमध्ये मुळात असणारच. पण त्याला आणखी सफाईदारपणा आला तो वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्यामुळे. निलेगावकर वऱ्हाडकारांचे शिष्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात प्रा. डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे त्या काळी गिरवले. वऱ्हाडकार ऐन बहरात असताना निलेगावकरांनी ‘अस्सल माणसे, इरसाल नमुने’ या एकपात्री नाट्यप्रयोगाची निर्मिती केली. त्यात ते त्यांना भेटलेल्यांचे खास मराठवाडी स्टाईलने सादरीकरण करत. खुद्द वऱ्हाडकारांनी त्या प्रयोगाचे कौतुक केले. आज ‘अस्सल माणसं इरसाल...’ 2200 पेक्षा अधिक प्रयोगांचा टप्पा ओलांडला आहे. त्यावरूनही निलेगावकरांमधील अस्सल कलावंतपणा लक्षात येतो. यापुढील काळात हे अस्सलपण आणखी निखरत राहो, हीच शुभेच्छा.
विधात्या...कादरखानसाहेबांना परत पाठव
मला
माहिती नाही कादरखान साहेब
की तुमच्याबद्दलचा माझ्या
मनातील
आदर, प्रेम
मी योग्य शब्दांत व्यक्त करतोय
की नाही.
पण
तुमच्या कोट्यवधी चाहत्यांपैकी
मी एक आहे.
त्यापोटीच
मी व्यक्त होतोय. तुमच्या
उत्तुंग, वैविध्यपूर्ण
अभिनयाने
स्तिमित झालेल्यांपैकी
मी आहे. कदाचित
स्वत:ला
उच्च दर्जातील
समीक्षक
मानणाऱ्यांना हे पसंत पडणार
नाही. पण
कोणताही सो कॉल्ड
चेहरा नसतानाही
विलक्षण बोलणारा तुमचा चेहरा,
पडद्यावरचा
वावर, कधी
खर्जातील गोळीबंद तर विनोदी
फिरकी घेणाऱ्या आवाजात थेट
प्रेक्षकांच्या
हृदयाला
भिडणे हे सारेच अलौकिक होते.
प्रत्येक
चित्रपटात तुमचे नवे रूप
पाहता
पाहता माझ्यासारखे अनेकजण
कधी तुमचे फॉलोअर्स होऊन गेलो,
ते आम्हालाच
कळाले नाही. साहेब,
माझा तुमचा
पहिला परिचय ‘सुहाग’
सिनेमात झाला. परभणीच्या
नाझ टॉकीजमध्ये अमिताभ बच्चन,
शशीकपूर,
अमजदखानचा
म्हणून सुहाग पाहण्यासाठी
गेलो. त्या
दिग्गजांच्या गर्दीतही
तुम्ही
स्वत:ची
छाप सोडली होती. तुमचा
निष्ठूर गँगस्टर पाहून ७५
पैशांचे तिकीट
खरेदी केलेले
अस्सल सिनेमादर्दी परभणीकर
तुमच्यावर कमालीचे संतापले
होते,
हे
मला आजही आठवतंय. पुढे
औरंगाबादला मुकद्दर का सिकंदर
पाहिला.
तुमच्यासोबत
पुन्हा एकदा महानायक अमिताभ
होते. तुफान
सोसाट्याचा
वारा सुटलेल्या
त्या स्मशानभूमीत महानायकाला
तुम्ही अशा काही शब्दांत
जीवनाचे तत्वज्ञान ऐकवले की
सारे थिएटर अवाक होऊन गेले
होते.
मिस्टर
नटवरलाल, नसीब,
यारानामधील
तुमच्या भूमिका तुमच्यातील
खलनायकी अभिनयाचे वैविध्य
दाखवणाऱ्याच होत्या.
पण,
नाविन्याची
आस
म्हणून तुम्ही विनोदी
भूमिकांकडे वळालात.
जितेंद्र,
श्रीदेवीचा
हिंमतवाला पाहून
आलेला माझा
एक मित्र म्हणाला,
‘कादरखानसाठी
पाहा. फार
धमाल उडवलीय.’
आणि
मग मी पण तुमच्या अनोख्या
अंदाजातील विनोदाचा आनंद
मनमुराद लुटला.
माझ्यासोबतचे
लोक तुम्ही पडद्यावर येताच
लोटपोट होऊन हसत होते.
तरीही साहेब,
हिंमतवालाच्या
चित्रपट परीक्षणात एका स्थानिक
समीक्षकाने
तुमची अवहेलना
केली. तुम्ही
एक सुमार दर्जाचे विनोदी
अभिनेते आहात,
असे
म्हटले. देशभरातील
समीक्षकांचा असाच सूर होता.
पण तुम्ही
त्याला
दाद दिली नाही.
भूमिकेशी
प्रामाणिक राहत प्रेक्षकांचे
भरपूर मनोरंजन
करण्याच्या
मूळ उद्दिष्टापासून ठळला
नाहीत. आणि
मग जस्टीस चौधरी, मवाली,
पाताल भैरवी,
जानी दोस्त,
मकसद गिरफ्तारमध्येही
तुमच्यातील विनोदवीराची
अनेक
रुपे आम्ही मनात साठवली.
त्याचा मनसोक्त
आनंद घेतला.
‘घर
एक मंदिर’मधील तुमचा सेठ धरमदास
कोण विसरू शकेल. शोभा
खोटे,
असरानींसोबतची
तुमची जुगलबंदी म्हणजे शाब्दिक
करामतीचा अस्सल नमुना होता.
त्यात जितेंद्र,
मिथुन हिरो
असले तरी खरे हिरो तुम्हीच
होतात.
गोविंदासोबतचा कुली नं. १
तर केवळ अफलातून. त्यात
तुम्ही रुपेरी
पडद्यावरील
विनोदी अभिनय किती निखळ,
सात्विक असू
शकतो, हे
सिद्ध करून दाखवले.
अंगारमधील
तुमच्या ‘डॉन’ने समीक्षकांची
तोंडेच बंद
करून टाकलीत.
साहेब,
तुम्ही दिग्गज
नाट्यकर्मी, ताकदीचे
लेखक. त्याचा
अनुभव मी घेतला. औरंगाबादेतील
१९९० च्या सुमारास एका एकांकिका
स्पर्धेत भगवान होमिओपॅथीक
महाविद्यालयाच्या संघाने
‘
भुखे पेट भजन न होए गोपाल’
एकांकिका सादर केली.
भिकारी,
अनाथांच्या
जीवन संघर्षाविषयी तुम्ही
त्यात हृदयापासून केलेले
भाष्य प्रत्येक संवादागणिक
डोळ्यात अश्रू आणणारे होते.
एकांकिका
संपल्यावर
टाळ्यांचा कडकडाट
झाला. कलावंतांचे
कौतुक तर झालेच पण दिग्गज
अभिनेते
कादर खान यांचे लिखाण
असल्यानेच त्यात एवढा अणकुचीदारपणा
आल्याचेही
सांगितले गेले.
एक रंगकर्मी,
चित्रपटप्रेमी
म्हणून माझ्या मनात तुमच्याबद्दलचा
आदर आणखीनच उंचावला.
कादरखान साहेब,
दहा-बारा
वर्षांपूर्वी तुमच्याविषयी
अनेक वावड्या उठवल्या जात
होत्या. त्यातील
एक होती की, कादरखान
यांच्या बंगल्यावर आयकर
खात्याची धाड पडली आहे.
तुम्ही बंगल्यातून
चॅनेलच्या अँकरला फोन केला
आणि सांगितले...‘माझ्या
घरात कोणी आयकरवाले आले असतील
तर तुम्हीच
त्यांना मला भेटण्यास
सांगा. कारण
मी तर घरात निवांतपणे बसलो
आहे.
हल्ली
इकडे कोणी फिरकतही नाही.
आणि माझ्याकडे
कोणतीही अवैध संपत्ती नाही.
असलीच तर ती
अगणित चाहत्यांच्या प्रेमाची
आहे. ती
हवी असल्यास आयकरवालेच
काय
तुम्हीही घेऊन जाऊ शकता.’
असेही तु्म्ही
जाहीर केले.
एक
माणूस म्हणूनही तुम्ही खरेच
किती उंची व्यक्तिमत्व होता,
याचा अंदाज
यावरून त्या नाठाळ चॅनेलवाल्याला
आला नाही. पण
माझ्यासारख्या कोट्यवधी
चाहत्यांना नक्कीच ते पुन्हा
एकदा ठामपणे कळाले. साहेब,
तुमचा पुर्नजन्मावर
विश्वास आहे की नाही माहिती
नाही...पण
माझी त्या विधात्याकडे नक्कीच
प्रार्थना राहिल, तुम्हाला
त्याने काहीशी विश्रांती
घेऊन पुन्हा पाठवावे...
तुमच्या
अभिनयाने आमचे जीवन समृद्ध
करून टाकण्यासाठी...
निरागस : सुंदर माझी शाळा
चेहऱ्यावर कायम हास्य, वागण्या-बोलण्यात कमालीचा आनंद. हालचालीही उत्साहाने भरलेल्या. अशा एकापेक्षा एक सरस देणग्या मिळालेला गणेश प्रल्हाद घुले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पदाधिकारी. निलेश राऊत, सुबोध जाधव यांच्यासोबत कायम कार्यरत असलेला. त्याच्यात हा अमाप उत्साह नेमका कुठून येतो. हा सारखा ताजातवाना, हसतमुख कसा राहू शकतो, असा प्रश्न माझ्यासारखा अनेकांना पडत असावा. त्याचे उत्तर काही दिवसांपूर्वी मिळाले आणि मोठा उलगडा झाला. गणेश घुले केवळ सामाजिक कार्यकर्ता नाही तर एक तरल, संवेदनशील आणि जागरूक कवी असल्याचे कळाले. खरेतर तो कवितेच्या जगात प्रसिद्ध माणूस. पण मलाच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागला म्हणा किंवा त्यानं त्याच्या वागण्याबोलण्यातून ते कधी जाणवू दिलंच नाही. सुंदर माझी शाळा या त्याच्या बालकवितांच्या पुस्तक प्रकाशनाची पत्रिका घेऊन तो सुबोध जाधवसोबत भेटला. तेव्हा गणेश आपल्या परिचयाचा आहे, याची जाणिव होऊन मन आनंदित झालं. आणि प्रतिभासंपन्न कवीला आपण यापूर्वी का ओळखू शकलो नाही, असा प्रश्न पडून खजिलही झालो. गणेश यांच्या कवितांचे ‘सुंदर माझी शाळा’ पुस्तक वाचताना त्याच्यात एवढी उर्जा नेमकी कुठून येते याचा शोध लागला. लहान मुलांसोबत कोणीही काम करत असो. त्याच्यात एक निरागसपण येते. चैतन्य अंगात भरते. नाविन्याची कायम ओढ लागते. गणेश यांना ते सारेकाही चिमुकल्यांसाठी मनापासून काम करत असताना मिळाले. पण महत्वाचे म्हणजे मिळालेला आनंद, निरागसपणा त्यांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. स्वतःच्या पोतडीत भरून ठेवला नाही. तर तो त्यांनी सुंदर माझी शाळा पुस्तकातून सर्वांना खुला करून दिला. हा केवळ बाल गीतांचा-कवितांचा संग्रह नाही तर तो मोठ्यांनाही छोट्यांच्या जगात घेऊन जातो. मोठ्यांचे मन रमवून टाकतो. एवढी शक्ती, प्रतिभा गणेश यांच्या लेखनात आहे. सामाजिक जाणिवा अतिशय तीव्र आणि जबाबदारीने स्वीकारल्या असल्याने मनोरंजन करता करता त्यांच्या कविता लहान मुलांवर दाट संस्कारही करतात. रसायनशास्त्रात एम.एस्सी., मराठीत एम.ए. आणि नंतर बी.एड. करणारे गणेश यांचा मूळ पिंड चांगला माणूस असण्याचा आणि इतरांमध्ये चांगलेपण पेरण्याचा आहे. ते रसायन त्यांच्यात काठोकाठ भरलेले असल्याचे ‘कचरा, डस्टर, पैसा, तिरंगा, शिपाईमामा’ या कवितांतून लक्षात येते. आजकाल मुलांवर छडी उगारणे म्हणजे गुन्हा असे सांगितले जात असताना, शिस्त लावणाऱ्या मास्तरांवरच हल्ला करणारे वाढत असताना छडीचे महत्व सांगण्याचे धाडसही गणेश करतात. मोबाईलच्या जगात गुंग होऊन मुलांना विसरणारे आई-बाप ही अलिकडच्या काळातील एक नवी सामाजिक समस्या. त्यावर मुलांना खरंच काय वाटतं हे सांगणारी ‘मोबाईल’ नावाची कविता तिरकस बाण सोडत धमाल उडवते त्याचवेळी पण मनाला हलवते, रुतते. ‘मामाच्या गावाला जाऊया’ ही रचनाही अप्रतिम. कवीवर्य ‘ग. दि. माडगुळकरांची क्षमा मागून’ असे नमूद करत घुले यांनी मामाचे गाव पाणीटंचाईच्या संकटाशी कसे लढते आहे, याचे अत्यंत कमी शब्दांत पण मर्मभेदी चित्र उभे केले आहे. नव्या पिढीला कळतील, उमजतील आणि लक्षात राहतील, अशाच एक दोन नव्हे तर बेचाळीस रचना त्यांनी अतिशय सहजतेने केल्या आहेत. कोठेही अतिरेक नाही. किंवा आता मुलांचे मनोरंजन झालेच पाहिजे. त्यांच्यावर संस्कार केलाच पाहिजे, असा हट्ट किंवा अतिरेकही नाही. सारे कसे एखाद्या खळाळत्या ओहळासारखे आपल्यासमोर वाहत येते. पावसाचे हलके हलके थेंब अंगावर यावेत आणि त्यांनी मन प्रफुल्लित करून टाकावे. भिजता भिजता गावाकडील उजाड रानाचीही आठवण यावी अन् विचार थबकून जावेत, अशी भावना हा कविता संग्रह वाचल्यावर निर्माण होते. आणि हेच या संग्रहाचे बलस्थान आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील पाडुळी नावाचे छोटेसे गाव. तेथे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर गणेश औरंगाबादेत शिक्षणासाठी आले. पण गावची नदी, शेती, फुले, सवंगडी यांच्याशी त्यांनी नाते तोडले नाही. कवितांच्या रुपात ते जपून ठेवले. पुढे निलेश राऊत, कवी पी. विठ्ठल, गेनू शिंदे यांच्या पाठिंब्याने वर्षभरापूर्वी ‘सुंदर माझी शाळा’ या कार्यक्रमाची निर्मिती झाली. त्यात गणेश यांच्या बालकवितांना श्रीराम पोतदार यांनी सुरेख चालींमध्ये बांधले. अभ्युदय फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगलीच दाद मिळू लागली. त्यानंतर घुले यांनी कविता पुस्तक रूपात उपलब्ध करून देण्याचा चांगला निर्णय घेतला. दत्ता बाळसराफ, पद्मभूषण देशपांडे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुरेश हिंगलासपूरकर यांच्या पुढाकाराने अतिशय सुऱेख रुपात हा संग्रह रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. घुले यांच्या रचनांना दृश्यात्मक रुपात पुंडलिक वझे यांनी अर्थवाही केले आहे. त्यांनी मुखपृष्ठासह आत केलेली रेखाटने काही क्षण थांबून, निरखून पाहावीत, अशी आहेत.
Thursday, 20 December 2018
एक कोटी २० लाखांचे पान
एका
गावात एक रिकामटेकडा तरुण
होता. एक-दोन
वर्षे थोडीफार कष्टाची कामे
केल्यावर त्याच्या डोक्यात
आपण झटपट श्रीमंत झाले पाहिजे,
असा विचार घोळू
लागला. अशा
श्रीमंतीचा मार्ग नेमका कोण
दाखवेल, याचा
त्याने शोध सुरू केला.
गावातील
प्रत्येकाला तो गाठून गाठून
मला कोणीतरी भेटवून द्या म्हणू
लागला. तेव्हा
एकाजणाने सांगितले, त्या
चार डोंगराच्या पलिकडे एका
झोपडीत फकीर राहतो.
त्याच्याकडे
झटपट श्रीमंत होण्याचा मंत्र
आहे. झाले.
खूप मागे लागलास
तर मिळेल तुला मंत्र.
तरुण फकीराकडे
पोहोचला आणि म्हणाला,
‘मला श्रीमंत
होण्याचा मंत्र द्या’.
फकीर म्हणाला,
अरे बाबा असा
काही मंत्र नाही माझ्याकडे.
पण तरुण हट्टाला
पेटला होता. झोपडीत
मुक्काम ठोकत त्याने फकिरामागे
एकच भुणभुण लावली. कंटाळून
फकिराने त्याला एका झाडाच्या
पानावर काहीतरी खरडून दिले.
हा मंत्र दहा
लाख वेळा म्हटला की,
श्रीमंत होशील,
असे सांगितले.
तरुणाला अत्यानंद
झाला. पान
घेऊन तो पळत सुटला. फकिराने
ओरडून सांगितले, हे
पहा मंत्र म्हणत असताना मनात
लोण्याच्या गोळ्याचा विचारही
आला तर मंत्राचा प्रभाव राहणार
नाही. त्यावर
‘अहो मी तो लोण्याचा गोळा काय
असतो तेच मला माहिती नाही.
तर त्याचा
विचार कसा येईल.’ असे
म्हणत तरुण गावात पोहोचला.
मंत्राचा जप
सुरू करण्यापूर्वी फकिर
लोण्याच्या गोळ्याचे काय
सांगत होता बरं, असे
त्याने आठवून पाहिले.
आणि झाले
त्याच्या डोळ्यासमोर लोण्याच्या
गोळ्याचे चित्र फिरू लागले.
दहा-बारा
वेळा मंत्र म्हणताच पुन्हा
पुन्हा लोण्याचा गोळा दिसू
लागला. कितीही
प्रयत्न केले तरी लोणी काही
नजरेसमोरून हटेना. वर्षभर
हाच प्रकार चालला. लोक
तरुणाला वेडा म्हणून लागले.
अखेर कंटाळून
त्याने मंत्र लिहिलेले पान
चोळामोळा करून टाकले.
ओशो
रजनीशांनी सांगितलेल्या एका
बोधकथेचा हा काहीसा बदललेला
सारांश. तो
आठवून दिला महापालिकेच्या
कारभाराने. गेल्या
आठवड्यात स्थायी समितीच्या
बैठकीत एक कोटी २० लाख रुपयांच्या
उधळपट्टीचा विषय आला.
औरंगाबादच्या
मानगुटीवर मनपाचे कारभारी,
पदाधिकाऱ्यांनी
कचऱ्याचा प्रश्न टाकला आहे.
तो सोडवण्याच्या
नावाखाली कमाईचे नवे रस्ते
कसे शोधले जात आहे, याचे
दर्शन त्यात घडले.
महापालिकेच्या
कर्मचाऱ्यांनी वारंवार
सांगूनही लोक ओला-सुका
कचरा वेगळा करत नाहीत.
म्हणून लोकांचे
उद्बोधन, प्रबोधन
करण्यासाठी आयुक्त डॉ.
निपुण विनायक
यांनी दिल्ली येथील फीडबॅक
फाऊंडेशन, नॉलेज
लिंक आणि नांदेडच्या अॅक्शन
फॉर बेटर टुमारो संस्थांना
पाचारण केले. पाच
महिन्यात प्रत्येकी दहा लाख
रुपये असे एका संस्थेला चाळीस
लाख म्हणजे एकूण एक कोटी २०
लाख रुपये देऊन झाल्यावर या
संस्थांनी नेमके काय काम केले.
त्याचा फायदा
झाला की नाही, हे
शोधण्यासाठी स्थायी समितीने
त्या संस्थांच्या अधिकाऱ्यांची
उलटतपासणी केली. त्यात
एकवेळा महापौर, सभापती
राहिलेले गजानन बारवाल यांनी
घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख
नंदकिशोर भोंबे यांना कोंडीत
पकडले. कुठे
झाले काम. कोणत्या
वॉर्डांत केले प्रबोधन,
उद्बोधन अशी
विचारणा केली. स्थायी
समितीचे सभापती राजू वैद्य
यांनीही बारवालांप्रमाणेच
तिन्ही संस्थाचे काम निरुपयोगी
असल्याचे मत नोंदवले.
एवढ्यावर
प्रकरण थांबले नाही तर दस्तुरखुद्द
भोंबे यांनी संस्थांच्या
प्रबोधनाचा अपेक्षित उपयोग
झालाच नाही. लोक
ओला-सुका
कचरा वेगळा करत नाहीत,
असे सांगितले.
मग सभापतींनी
फेरमूल्यांकनाचे आदेश दिले.
आतापर्यंतचा
अनुभव लक्षात घेता या आदेशातून
काहीही साध्य होणार नाही.
तिन्ही संस्थांच्या
कर्मचाऱ्यांनी निकराचे प्रयत्न
केले. लोकांना
विनवणी केली. पण
लोकांनी त्याला फारसा प्रतिसाद
दिला नाही. कारण
ओला-सुका
कचरा वेगळा ठेवण्यासाठी
त्यांच्याकडे ड्रम नाहीत,
असा निष्कर्ष
निघेल. संस्थांना
दिलेला पैसा पुन्हा वसूल
करण्याची व्यवस्था नाही.
त्यामुळे
एखाद्या अधिकाऱ्याची त्यात
चौकशी लावली जाईल. प्रबोधन,
उद्बोधनासाठी
इंदूर, भोपाळ,
नागपूर,
पुणे,
मुंबईच्या
नामवंत संस्थांनाच बोलवावे,
असा फर्मान
निघून सहा महिन्यांत अशा
संस्था कामकाजही सुरू करतील.
मूळात प्रश्न
आहे की, या
संस्था प्रबोधन करतात की नाही,
हे चार महिने
एकाही नगरसेवकाने का पाहिले
नाही. संस्थेचे
कर्मचारी काहीच करत नाही,
हे त्यांनी
आयुक्तांना का सांगितले नाही.
की संस्थांना
कोंडीत पकडण्यासाठी डावपेच
आखले जात आहेत. सर्वात
महत्वाचा मुद्दा म्हणजे आता
औरंगाबादकरांनी करापोटी
महापालिकेच्या तिजोरीत जमा
केलेले १ कोटी २० लाख लोकहिताच्या
नावाखाली उधळल्याचे प्रकरण
दफन केले जाईल. कारण
ओशो रजनीशांनी सांगितलेल्या
कथेनुसार इथे लोण्याच्या
गोळ्याचा ध्यास असलेल्यांची
कमतरता नाही. केवळ
एका मंत्राचा जप करून श्रीमंत
व्हायचे आहे. आपण
लोकांच्या सेवेसाठी निवडून
आलो आहोत. लोकांच्या
सेवेसाठी नोकरीत आहोत.
लोकांनी कष्टाने,
पै पै करून
जमवून दिलेल्या पैशातून आपला
पगार होतो, याचा
विसर पडला आहे. हा
पैसा आपल्या खिशात घालण्यासाठी
दिलेला नाही, हे
तर त्यांना मान्यच नाही,
अशी स्थिती
आहे.
Wednesday, 12 December 2018
मुक्या प्राण्यांचातरी दुआ घ्या
दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठा-वेरुळच्या लेण्या झाल्या. हजार – बाराशे वर्षानंतर दौलताबादचा किल्ला उभा राहिला. चारशे वर्षांनी बिवी का मकबरा, पाणचक्की, निर्माण झाली. मग सगळे दुष्काळ पडल्यासारखे कोरडेठाक झाले. हे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त मनमोहनसिंग यांना ४० वर्षांपूर्वी खटकले. म्हणून औरंगाबाद शहराच्या वैभवात भर टाकणारे सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय उभे राहिले. आता एकदा ते वैभव म्हटले की त्याची निगा राखण्याची जबाबदारी वैभवाच्या तळ्याभोवती बसून दिवसा एक – एक लोटा आणि रात्रीच्या वेळी मनसोक्त पाणी पिणाऱ्यांचीच आहे की नाहीॽ पण औरंगाबादमध्ये असे कोणतेही नियम, अलिखित संकेत नाहीत. ज्या कामात फारसा पैसा नाही ती कामे लोकांसाठी कितीही महत्वाची असली तरी सगळ्यात शेवटी ठेवायची, असे धोरण कायम राहिले. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय बंद करण्याची नोटीस केंद्रीय झू ऑथॉरिटीने काढली आहे. आता ती रद्द करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले लवाजमा घेऊन दिल्लीची वारी करणार आहेत. त्या दौऱ्यावर किमान ६०-७० हजार रुपये ते खर्च करतीलच. अर्थात हा पैसा जनतेचा असल्याने त्यावर कोणीही, कधीही आक्षेप घेणार नाही. महापौर, आयुक्तांनाही त्याचे काहीच वाईट वाटणार नाही. जनतेचा पैसा अशाच कामांसाठी वापरण्याची सवय पूर्वापार चालत आली आहे. तर महापौर दिल्लीला जाऊन झू ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना भेटतील. सोबत अर्थातच खासदार चंद्रकांत खैरे असतील. आणि मग काही दिवसांची मुदतवाढ मिळवून महापौर परततील. वर्ष-सहा महिन्यांनी पुन्हा हाच प्रसंग पाहण्यास, ऐकण्यास मिळेल. कारण खरे पाहिले तर ही कहाणी २००६-०७ पासून सुरू आहे. तेव्हा प्राणीसंग्रहालयाचे तत्कालिन संचालक डॉ. एस. व्ही. रिझवी यांनी हरीण, वाघाच्या कातडीचा गैरव्यवहार केला, अशी बातमी फुटली. रिझवी यांच्यावर खार खाणाऱ्या त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांनीच ती प्रसारमाध्यमांना पुरवली असावी. त्यामुळे पुढे सारे काही नियोजनबद्धरितीने झाले. गैरव्यवहार झाला की नाही, याचा खरा तपास लागलाच नाही. डॉ. रिझवी निलंबित झाले. त्यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. लगोलग एक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. ही समिती महापालिका प्रभाव क्षेत्राच्या किंचित बाहेर असल्याने संवेदनशीलतेने प्राणी संग्रहालयाची तपासणी झाली. तेव्हा एवढ्या कमी क्षेत्रफळावर एवढ्या मोठ्या संख्येने प्राणी ठेवणे चुकीचे आहे, असे समितीने स्पष्ट केले. काही प्राण्यांचे पिंजरे तातडीने बदला, अशी सूचना केली. तर केंद्रीय झू ऑथॉरिटीने तत्काळ प्राणीसंग्रहालय शहराबाहेर हलवा, असे म्हटले होते. त्यास आता किमान दहा वर्षे होऊन गेली आहेत. महापौरांनी दिल्लीवारी जरूर करावी. पण एकदा जुनी कागदपत्रेही चाळून बघावीत. थोडा अभ्यास करून गेलात तर प्राणीसंग्रहालयाच्या विषयावर ठोस मार्ग काढता येईल. कारण मधल्या काळात काहीच झाले असे नाही. पण जे व्हायला हवे होते, ते झालेलेच नाही. सरकारी कारभाराच्या कासवगतीने कासवालाही लाजवले. मिटमिटा – शरणापूर येथे प्राणीसंग्रहालयासाठी १२५ एकर जागेच्या १२५ वेळा घोषणा झाल्या. खुल्या, मोकळ्या जागेत जगण्याची स्वप्ने पाहत पाहत अनेक प्राण्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. जे जगताहेत त्यांच्याही आशा मावळल्या आहेत. जे कारभारी लाखो लोकांना पाणी देण्यासाठी पंधरा-पंधरा वर्षे घेतात. ते आपल्यासाठी किमान ५० वर्षे तरी काही करणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली असावी. पण काही प्राणी, औरंगाबादचे नागरिक अजूनही आशावादी आहेत. वाटे-हिस्से करून का होईना, आमदारपदाची स्वप्ने पडत असल्याने का असेना शहरासाठी थोडेफार काम करण्याची घोडेले यांची इच्छा सध्यातरी दिसते. त्यामुळे ते मुदतवाढीसोबत मिटमिटा-शरणापूर येथे अप्रतिम प्राणीसंग्रहालय तातडीने कसे सुरू करता येईल, याकडे लक्ष देतील. केवळ लक्ष देणार नाहीत तर अंमलातही आणतील, असे वाटते. तसे झाले तर औरंगाबादकरांसाठी एक बहारदार पिकनिक स्पॉट तयार होईल. आता जसे लोक सिद्धार्थ उद्यानासाठी मनमोहनसिंग यांचे नाव घेतात, तसे घोडेले यांचे नाव होऊ शकते. असे म्हणतात की चांगुलपणा नेहमीच जगात अल्पसंख्य असतो. लुटारू, कपटींची संख्या जास्तच असते. तरीही चांगुलपणाचे सामर्थ्य अधिकच असते. जसे काळोख्या अंधाराला एक पणती वितळवून टाकते, तशी स्थिती असते. बहुतांश वेळा चांगुलपणा तळागाळात जाऊन पडलेला असतो. दफन अवस्थेत पडतो. लुटारू, कपटींचेच राज्य येते. चांगुलपणावर विश्वास असलेली माणसे गलितगात्र होतात. आणि एका क्षणी सगळी शक्ती एकवटून उफाळून वर येतात. लुटारू, कपटी वृत्तीला पराभूत करतात. वाईटातून चांगले जन्माला येण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. ती घोडेले यांनाही पक्की ठावूक आहे. महापौरपदाची सूत्रे खाली ठेवण्यापूर्वी लोकांच्या लक्षात राहणारी किमान तीन कामे करण्याची त्यांची इच्छा आहेत. त्यात त्यांनी प्राणी संग्रहालयाच्या स्थलांतराचा समावेश केला. वाघ, सिंह, नीलगायींसह सर्वच प्राण्यांना आणखी मोठ्या, खुल्या हवेत जगू दिले तर हे मुके प्राणी त्यांना नक्कीच आशिर्वाद देतील. तो घेण्याची संधी महापौरांनी घालवू नये, असे वाटते.
दशा, दिशेचे नाट्य
हिंदू धर्म, भारतीय समाजाला लागलेला सर्वात काळाकुट्ट डाग म्हणजे वर्ण, जाती व्यवस्था. हजारो वर्षांपासून हा डाग कायम आहे. जाती-पातीच्या या अमानवीय, क्रूर पद्धतीतून महामानव, तेजसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना बाहेर काढले. तु देखील माणूस आहे. तुलाही स्वाभिमान आहे. तो मुळीच हरवू नको. या देशावर तुझाही सवर्णांइतकाच अधिकार, हक्क आहे. तो मिळवण्याचा, अबाधित राखण्याचा मार्ग मी तयार करत आहे., असे बाबासाहेबांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सवर्णांनी पुढील काळात दलितांना चिरडून टाकू नये म्हणून कायद्याचे संरक्षण दिले. उत्तम शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देताना इतरांप्रमाणे चांगल्या दर्जाची सरकारी नोकरी मिळेल, अशी व्यवस्था केली. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारणातही दलितांचे स्थान अबाधित राहिल. त्यांनाही सत्तेत वाटा कसा मिळू शकेल, हे सांगितले. एकदा सत्तेत वाटा मिळाला सत्ताधारी जमात होऊन हे दलित नेते खालच्या पायरीवर उभ्या आपल्या बांधवांना मदत करून वरच्या पायरीवर आणतील, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. नेमकी ही अपेक्षाच फोल ठरत चालल्याची भावना आंबेडकरी चळवळीत रक्त सांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या २५–३० वर्षांत कमालीची वाढली आहे. स्वाभिमानाने चळवळ कशी चालवायची. कोणाविरुद्ध लढायचे. कोणाला फटकारायचेॽ सगळ्या सवर्णांना एका तराजूत तोलणे खरंच योग्य आहे काॽ आणि हे सगळं करत असताना व्यावहारिक जगात जगायचं कसंॽ हलाखीच्या चक्रातून बाहेर कसं पडायचंॽ असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिले आहेत. कारण सत्ताधारी जमात होण्याच्या नावाखाली राजकीय तडजोडी करत अनेक नेते वरच्या पायरीवर गेले. पण बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी खालच्या पायरीवर उभ्या तमाम दलित समाजाला वरती आणण्यासाठी सत्ता वापरलीच नाही. स्वतःच्या समर्थकांपुरतेच ते मर्यादित राहिले. आणि इतरांना सत्तेच्या सोपानापासून कसे रोखता येईल, यासाठीच शक्ती पणाला लावू लागले. महाराष्ट्रात, मराठी मुलुखात हे अधिक प्रमाणात झाले, असे सिद्धहस्त साहित्यिक, समीक्षक आणि नियोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांना जाणवले. ही जाणिव त्यांना कमालीची टोचू लागली. अस्वस्थ करू लागली. ही अस्वस्थता त्यांनी ‘भाई तुम्ही कुठे आहात’ या दोन अंकी नाटकात अधोरेखित केली आहे. आंबेडकरी चळवळीच्या दशा, दिशेला अतिशय कमी, मोजक्या पण जहाल शब्दांत वाट दाखवणारे हे नाट्य आहे. जहालता असली तरी त्यात विखार, द्वेष नाही. उलट सगळा समाज आंबेडकरी जनतेसोबत जोडण्याचा एक आशावादी सूर डॉ. कांबळे या नाट्यातून ठामपणे मांडतात. आंबेडकरांच्या नावावर मोठ्या झालेल्या नेत्यांना प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करताना, त्यांच्यावर कठोर प्रहार करतानाही त्यात कोठेही आक्रस्ताळेपणा नाही. त्यामुळे ‘भाई तुम्ही कुठे आहात’ अधिक व्यापक भूमिकेचे असल्याचे जाणवत जाते. परिणाम करत राहते.
दोन अंकात आणि बारा दृश्यात डॉ. कांबळे यांनी नाट्याची मांडणी केली आहे. मंत्री झालेले भाई, एकेकाळी त्यांच्यासोबत दलितांच्या हक्कासाठी लढलेला मिलिंद, भाईंचे सहकारी दिनकरराव, भाईंना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गोंडस नावाखाली त्यांच्यातील लढवय्येपणाची धार बोथट करणारे भास्करराव यांच्यातील संघर्ष, संवाद, प्रवास बारा प्रवेशात आहे. त्यात एक प्रवेश दलितांच्या हक्कासाठी स्वजातीयांशी वैर पत्करणाऱ्या एका ब्राह्मण दांपत्याचाही आहे. आंबेडकरी चळवळीची दशा नेमकी काय झालीय, दिशा काय आहे आणि प्रबोधन करणे, कार्यकर्त्याच्या मनातील खदखद नेत्यांपर्यंत पोहोचवणे, हेच डॉ. कांबळे यांच्या लेखनाचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी संपूर्ण मांडणी उद्दिष्टाला पूरकच केली आहे. नाटक लोकप्रिय, वादग्रस्त, मसालेदार करण्यासाठी ओढूनताणून नाट्यमयता, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स किंवा अन्य विशिष्ट गणिते पेरलेली नाहीत. एका निखळ, प्रामाणिक भावनेतून त्यांनी लिखाण केले आहे. त्यामुळे ते दिग्दर्शकालाही प्रचंड संधी उपलब्ध करून देते. नाट्य लेखकाला रंगमंचावर व्यक्तिरेखा कशा उभ्या राहतात, हे संवादांमधून सांगावे लागते. आणि दोन संवादांमधील निःशब्द क्षणांतून त्याला अभिनयाच्या जागा दाखवून द्यायच्या असतात. यात डॉ. कांबळे यशस्वी झाले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि सरस्वती भुवन महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. दिलीप घारे यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बवर म्हटल्याप्रमाणे हे नाटक सत्ताधाऱ्यांमधील किंवा विशिष्ट उच्चभ्रू जातींमधील दोषांवर प्रखऱ भाष्य करते. पण त्याचबरोबर दलित चळवळी संबंधात आपल्याला अंतर्मुख करते. भारतीय विशेषतः मराठी सामाजिक रचनेवर भाष्य करताना आजच्या काळात सशक्त दलित चळवळ का उभी राहू शकत नाही, असा प्रश्न उभे करते. त्याची काही उत्तरेही देण्याचा निश्चित प्रयत्न करते. त्यामुळे ‘भाई तुम्ही कोठे आहात’ दलितविषयक प्रश्नांची मांडणारी करणारे दुर्मिळ, मौल्यवान नाटक आहे. औरंगाबादच्या चिन्मय प्रकाशनाचे दीपाली कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांनी ते पुस्तक रूपात प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संतुक गोळेगावकर यांचे मुखपृष्ठ नेमकेपणा सांगणारे. आता दोन वाक्ये सादरीकरणाविषयी. या नाटकाचे काही प्रयोग झाले. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. आता येत्या काळात आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक संस्था, महाविद्यालय, वसाहतीत प्रयोग व्हावेत. म्हणजे डॉ. कांबळे यांना हृदयापासून तळमळीने जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. नेत्यांचे हृदय परिवर्तन होण्याची, त्यांना कोणाची कणव येण्याची शक्यता नाहीच. पण समाजावर त्याचा परिणाम होऊन एक दोन चांगले सामाजिक बदल झाले तरी ते पुरेसे आहे.
दोन अंकात आणि बारा दृश्यात डॉ. कांबळे यांनी नाट्याची मांडणी केली आहे. मंत्री झालेले भाई, एकेकाळी त्यांच्यासोबत दलितांच्या हक्कासाठी लढलेला मिलिंद, भाईंचे सहकारी दिनकरराव, भाईंना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गोंडस नावाखाली त्यांच्यातील लढवय्येपणाची धार बोथट करणारे भास्करराव यांच्यातील संघर्ष, संवाद, प्रवास बारा प्रवेशात आहे. त्यात एक प्रवेश दलितांच्या हक्कासाठी स्वजातीयांशी वैर पत्करणाऱ्या एका ब्राह्मण दांपत्याचाही आहे. आंबेडकरी चळवळीची दशा नेमकी काय झालीय, दिशा काय आहे आणि प्रबोधन करणे, कार्यकर्त्याच्या मनातील खदखद नेत्यांपर्यंत पोहोचवणे, हेच डॉ. कांबळे यांच्या लेखनाचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी संपूर्ण मांडणी उद्दिष्टाला पूरकच केली आहे. नाटक लोकप्रिय, वादग्रस्त, मसालेदार करण्यासाठी ओढूनताणून नाट्यमयता, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स किंवा अन्य विशिष्ट गणिते पेरलेली नाहीत. एका निखळ, प्रामाणिक भावनेतून त्यांनी लिखाण केले आहे. त्यामुळे ते दिग्दर्शकालाही प्रचंड संधी उपलब्ध करून देते. नाट्य लेखकाला रंगमंचावर व्यक्तिरेखा कशा उभ्या राहतात, हे संवादांमधून सांगावे लागते. आणि दोन संवादांमधील निःशब्द क्षणांतून त्याला अभिनयाच्या जागा दाखवून द्यायच्या असतात. यात डॉ. कांबळे यशस्वी झाले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि सरस्वती भुवन महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. दिलीप घारे यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बवर म्हटल्याप्रमाणे हे नाटक सत्ताधाऱ्यांमधील किंवा विशिष्ट उच्चभ्रू जातींमधील दोषांवर प्रखऱ भाष्य करते. पण त्याचबरोबर दलित चळवळी संबंधात आपल्याला अंतर्मुख करते. भारतीय विशेषतः मराठी सामाजिक रचनेवर भाष्य करताना आजच्या काळात सशक्त दलित चळवळ का उभी राहू शकत नाही, असा प्रश्न उभे करते. त्याची काही उत्तरेही देण्याचा निश्चित प्रयत्न करते. त्यामुळे ‘भाई तुम्ही कोठे आहात’ दलितविषयक प्रश्नांची मांडणारी करणारे दुर्मिळ, मौल्यवान नाटक आहे. औरंगाबादच्या चिन्मय प्रकाशनाचे दीपाली कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांनी ते पुस्तक रूपात प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संतुक गोळेगावकर यांचे मुखपृष्ठ नेमकेपणा सांगणारे. आता दोन वाक्ये सादरीकरणाविषयी. या नाटकाचे काही प्रयोग झाले. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. आता येत्या काळात आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक संस्था, महाविद्यालय, वसाहतीत प्रयोग व्हावेत. म्हणजे डॉ. कांबळे यांना हृदयापासून तळमळीने जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. नेत्यांचे हृदय परिवर्तन होण्याची, त्यांना कोणाची कणव येण्याची शक्यता नाहीच. पण समाजावर त्याचा परिणाम होऊन एक दोन चांगले सामाजिक बदल झाले तरी ते पुरेसे आहे.
Subscribe to:
Posts (Atom)