Tuesday, 19 May 2020

डल्ला मंदिराच्या दागिन्यांवर


भय्यासाहेब वट्टमवार म्हणजे मातब्बर असामी. त्यांचे कुटुंब भलेमोठे. नऊ भाऊ आणि सात बहिणी. प्रत्येकाचे एक कापडाचे आलिशान दुकान. शिवाय किमान पन्नास एकर शेती. बहिणीही अतिशय सुखवस्तू घरात दिल्या होत्या. कोणे एकेकाळी म्हणजे अडीच – तीनशे वर्षांपूर्वी भय्यासाहेबांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील एका खेडेगावातून या शहरात आले. गावाचे सेवेकरी म्हणून पूर्वज काम करू लागले. हळूहळू पैसा पैसा जोडत त्यांनी मोठे साम्राज्य निर्माण केले. पण जे काही वैभव आहे. ते तिरुपती बालाजीच्या कृपेने आहे, असे ते ठामपणे सांगत. तीनशे वर्षांत वट्टमवार वंशाचा विस्तार किमान तीन हजार सदस्यांमध्ये झाला असावा. प्रत्येक घरात तिरुपती हेच दैवत. भय्यासाहेबांच्या पूर्वजांनी त्या काळात एक छोटेसे बालाजीचे मंदिर बांधले होते. मंदिर पूर्ण झाल्यावर उत्कर्ष सुरू झाला अशी त्यांची धारणा होती. गावकऱ्यांनीही ते डोळ्यांनी पाहिल्याने मंदिराचे महत्व दिवसेंदिवस वाढत गेले. ज्यांना दर्शनाचा फायदा झाला. त्यांनी तिरुपतीप्रमाणे इथंही सोनं-नाणं देणे सुरू केले. मूर्तीवर पन्नास लाखांचे दागिने चढले. शेकडो लोकांचे अर्थकारण मंदिराभोवती फिरू लागलं. सरकारचीही त्यावर नजर होतीच. त्यामुळं मंदिराच्या कारभारासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. जिल्हाधिकारी ट्रस्टचे कायमस्वरूपी अध्यक्ष राहतील. वट्टमवार कुटुंबियातील एक व्यक्ती सचिव असेल. त्याच्याकडंच बहुतांश आर्थिक अधिकार असतील आणि ट्रस्टवरील नऊ कार्यकारी सदस्यांमध्येही सहाजण वट्टमवारच असतील, अशी घटना तयार झाली. कामाचा व्याप वाढत चालला. त्यामुळे मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि दागिन्यांच्या सुरक्षेसाठी भय्यासाहेबांनी काही वर्षांपूर्वी एमकेएस एजन्सीची नियुक्ती केली होती. एजन्सीचे दहा गार्ड आणि त्यांचा प्रमुख अरविंदसिंग कायम नजर ठेवून असत. गाभारा वगळता सगळीकडे सीसीटीव्ही होते. मंदिराच्या आवारात मुख्य पुजारी प्रल्हादअप्पा, त्यांची तीन मुले नारायण, शिवानंद, कालिचरण आणि त्यांच्या बायका राहत होत्या. अलिकडील काळात भय्यासाहेबांच्या खालोखाल कर्नाटकातील कुठल्यातरी खेडेगावातून आलेल्या प्रल्हादअप्पांचं महत्व वाढलं होतं. कारण ते थेट बालाजींशी संवाद साधतात, अशी वदंता पसरली होती. त्यांनी दिलेले दोन-तीन तोडगे फार फायद्याचे ठरले, असे सोन्या-चांदीचा प्रख्यात व्यापारी लालचंद सगळीकडं सांगत फिरत होता. भय्यासाहेबांच्या कानावर ही गोष्ट पडली. तेव्हा त्यांनी अप्पांकडं नाराजी व्यक्त केली. हे मंदिर खऱ्या श्रद्धाळूंसाठी आहे. त्याचे रुपांतर अंधश्रद्धांमध्ये होणार नाही, याची काळजी घ्या, असं त्यांनी कडक शब्दांत बजावलं. तेव्हा अप्पांची तिन्ही मुले आणि सुनाही साक्षीदार होत्या. भय्यासाहेब बाहेर पडताच कालिचरण भडकला. आम्ही एवढी मनापासून मंदिराची काळजी घेतो. सर्व व्यवस्था पाहतो. कधी त्यांच्याकडं कुठली तक्रार जाऊ देत नाही. एका पैशाचा घोळ नाही. तरीही केवळ लालचंदवरून त्यांनी असं बोलणं योग्य नाही, असं त्याचं म्हणणं होतं. तर नारायणला मनातल्या मनात विचार करत होता की, मंदिर परिसरातील दुकानांच्या भाड्यातून काही रक्कम आपण परस्पर खिशात घालतोय. हे बहुधा अजून भय्यासाहेबांना कळालेलं नाही. तर लालचंद आपल्या बापाबद्दल बाहेर काही चांगलं सांगत असेल तर त्यात आपल्या बापाची काय चूक आहे, हे शिवानंदला कळत नव्हतं. रात्री उशिरा गाभारा बंद करताना त्यानं मनातली खदखद अरविंदसिंगकडं बोलून दाखवली. तेव्हा अरविंदचा खास माणूस असलेल्या हरीसिंगनं ते पटकन टिपून ठेवलं. नंतर तो म्हणाला सुद्धा की, मंदिरात लवकरच काहीतरी गडबड होईल, अशी शंका वाटते. अरविंदसिंगनं त्याला खोदून खोदून विचारलं पण त्यानं समाधानकारक उत्तर दिलं नाही. मात्र, मंदिरातील भाडेकरूंच्या खोलीत राहण्यास आलेली अलकादेवी आणि तिची मुलगी मंगला संशयास्पद वाटतात. त्या बारकाईनं मंदिर बघत सारखं भटकत असतात. रात्री उशिरापर्यंत जाग्या असतात. आता त्या शिवानंदच्या नातेवाईक आहेत. म्हणून त्यांना थेट काही बोलता येत नाही, असं सांगू लागला. हरीसिंगच्या बोलण्याकडं अरविंदसिंगनं फारसं लक्ष दिलं नाही. पण त्याची ती चूक ठरली. भल्या पहाटे प्रल्हादअप्पा मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा उघडण्यास गेले तर तो उघडाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी जोरात बोंब ठोकली. सगळं शहर जागं झालं. पोलिसांचं पथक आलं. भय्यासाहेब, वट्टमवार कुटुंबातील अनेक सदस्य आले. बालाजीच्या मूर्तीवरील वीस लाखांचे दागिने गायब झाले होते. अंगभर काळे कपडे पांघरून आलेले तिघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. इन्सपेक्टर कदम काही दिवसांत चोरट्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचले.

Thursday, 7 May 2020

आधे – अधुरे : पूर्ण नाट्य

मराठी रंगभूमीवर चमकदार कामगिरी करणारे अनेकजण एनएसडी म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. पण एनएसडीवर कायम हिंदी भाषकांचेच वर्चस्व राहिले. तेथील सादरीकरणाची भाषा हिंदीच राहिली. एकतर त्यांच्या प्रांतात हे स्कूल आहे. दुसरे म्हणजे तिथल्या शिक्षकांमध्ये मराठी दुर्मिळच. जे होते. त्यांना मराठीचा दुस्वास होता किंवा सवतासुभा निर्माण केल्याची कुठेही नोंद नाही. पण तरीही हिंदी पट्ट्यातील विद्यार्थी जास्त. प्रेक्षकांमध्येही तेच. त्यामुळे अनेक दमदार मराठी नाटके तेथे सादर होण्याचा वेग कमी राहिला. त्यात १९६०नंतर महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध दाक्षिणात्य, मराठी विरुद्ध इंग्रजी असे राजकारण पेटले. समाजकारण धुमसून निघाले. त्याचा बराचसा फायदा त्यावेळच्या मराठी तरुणांना झाला. राजकारणी यशस्वी झाले. पण सांस्कृतिकदृष्ट्या पडलेले अंतर कायम राहिले. प्रसारमाध्यमांतून मराठी लेखक, अभिनेते, तंत्रज्ञ हिंदी भाषिकांसमोर जात राहिले. तरीही त्यांच्यातील प्रतिभेचे दर्शन सातत्याने घडलेच नाही. मराठी आणि हिंदी रंगभूमीमध्ये एकमेकांत मिसळून जाण्याची भावना कधी निर्माण झालीच नाही. किमान निकोप, गुणवत्तेची स्पर्धाही झालेली दिसत नाही. भाषेचा, संस्कृतीचा पोलादी पडदा कायम राहिला. अगदी नाट्य पंढरी मानल्या गेलेल्या मुंबईत मराठी रंगभूमी वेगळी आणि हिंदी वेगळी अशीच राहिली. हिंदीतील सर्वोत्तम नाट्य कलाकृती मराठीत फारशा आल्याच नाहीत. स्वीकारल्या गेल्या नाहीत.

अर्थात त्याला एक-दोन नाटकांचा अपवाद राहिला. यामध्ये सर्वात अग्रक्रमावर राहिले ते मोहन राकेश यांचे ‘आधे – अधुरे’. त्याचे शेकडो प्रयोग मराठी रंगभूमीवर झाले. कित्येक दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रींनी त्यात भूमिका करून स्वत:तील ताकद जोखून घेतली. केवळ ४७ वर्षांचे आयुष्य लाभलेले प्रतिभावान लेखक मोहन राकेश १९७२मध्ये जग सोडून गेले. त्यांच्या नाट्य लिखाणाचा अखेरचा टप्पा सुरू असताना मराठी रंगभूमी बहरात येत होती. विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, चिं. त्र्यं. खानोलकर असे अनेक लेखक उदयास आले होते. दिवाणखान्यात, हास्यविनोदात आणि कौटुंबिक विवंचनेत अडकलेले नाटक वास्तववादी करण्यात ते यशस्वी होत होते. मोहन राकेश यांना अधिक आयुष्य लाभले असते तर कदाचित मराठी-हिंदीतील दुरावा त्यावेळी काही प्रमाणात दूर झाला असता. कारण ते केवळ लिखाणात वास्तववाद मांडत नव्हते. तर प्रत्यक्ष जीवनातही वास्तवाशी भिडणारे होते. तेंडुलकरांप्रमाणेच सामाजिक विषमता, कुटुंब व्यवस्थेतील दांभिकता त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू होता. त्यांनी हिंदी रंगभुमीला एक वेगळा चेहरा मिळवून दिला.
तर मुद्दा असा आहे की, त्यांच्या आधे-अधुरेचा प्रयोग आजही ताजा, समकालीन वाटतो. अगदी हे नाट्य १९६०च्या दशकातील भारतीय शहरी संस्कृतीतील असले तरी. कारण त्यात त्यांनी ठसठशीतपणे आणि अगदी खोलवरपणे मानवी जीवनातील मूल्ये पेरली आहेत. एका ओळीत त्याचे कथानक एका कनिष्ठ मध्यमववर्गीय स्त्रीची विविध रुपे दर्शन असे आहे. त्याची सुरवात अगदी वेगळी. गुंतागुंतीची. पण ही गुंतागुंत हळूहळू उलगडू लागते आणि एकूणच भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीचे काय स्थान आहे. हे स्थान बदलण्यासाठी तिला काय करावे लागत आहे. संपर्कात येणाऱ्या पुरुषाशी ती कशी नाते संबंध प्रस्थापित करत जाते. आणि मग टप्प्या-टप्प्याने स्वतःच कशी तुटत जाते, याचे विदारक चित्रण होत जाते. त्यामुळे लेखकाला नाटकाची नायिका भारतीय समाजव्यवस्थेच्या, मानवी जीवन मूल्याच्या रुपात मांडायची आहे, असे लक्षात येते. केवळ भारतीयच नव्हे तर पुरुषी संस्कृतीतील अनेक घरांमध्ये कमी अधिक फरकाने असेच घडत असणार, असेच ठसत जाते. त्यासाठी मोहन राकेश यांनी अतिशय टोकदार संवाद लिहिले आहेत. दोन ओळींमध्ये दिलेली विश्रांती विलक्षण बोलकी केली आहे. जितक्या ताकदीचा अभिनेता, अभिनेत्री तेवढी व्यक्तिरेखा खुलत राहिल. दिग्दर्शक जेवढा कल्पक तेवढ्या सादरीकरणात दिग्दर्शकीय जागा तयार करता येतील. अशी लेखनात एक अजबता असलेली कलाकृती म्हणजे ‘आधे - अधुरे’ आहे, असे म्हटले तरी चालेल. कोरोनामुळे सगळे जग एकमेकांजवळ येत चालले आहे. जात, धर्म, पंथ, भाषांचे भेदभाव काही उपयोगाचे नाही, हे काहीजणांना कळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याचा फायदा घेऊन कोरोनानंतर आधे-अधुरे किंवा मोहन राकेश यांच्याच आषाढ का एक दिन किंवा अन्य हिंदी लेखकांच्या नाटकांचे अधिकाधिक प्रयोग झाले तर दोन भाषांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होण्यास थोडीशी मदत होईल, असा लॉकडाऊनच्या काळात टोचणारा विचार.


घरभेदी

एकेकाळी लोकप्रिय कामगार नेता असलेल्या रामपालसिंगवर गोळीबार झाला. दोन गोळ्या छातीत आणि एक पोटात गेली. तो ज्या वसाहतीत राहत होता. त्याच्या मागील बाजूस असणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काही घरगुती सामान खरेदी करण्यासाठी तो निघाला होता. तेव्हा मारेकऱ्यांनी डाव साधला. एकाच दुचाकीवरून आलेले तिन्ही हल्लेखोर तोंडाला रुमाल, मफलर बांधलेले होते. रामपाल पोहोचण्याच्या दहा मिनिटे ते कॉम्प्लेक्सपाशी आले. त्यातल्या दोघांनी सिगारेटी फुंकल्या. मग ते निघून गेले आणि रामपाल येण्याच्या दोन मिनिटे पुन्हा परत आले. गोळीबार करून भरधाव निघून गेले. दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. पण ती जुनी इंड सुझुकी मोटारसायकल असावी, असे सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांच्या लक्षात आल्याचे बातम्यांमध्ये सांगण्यात आले. रामपालसिंग एकेकाळचा गाजलेला कामगार नेता. त्याची दहशत होती आणि लोकप्रियताही. पण तो काळ ओसरला. त्याच्याभोवतीचे वलय कमी झालं, असा पोलिसांचा अंदाज होता. तो साफ चुकीचा ठरला. त्याच्या अंत्ययात्रेला तोबा गर्दी होती. दहा-बारा वर्ष कामगारांच्या हक्कासाठी आंदोलने करण्यात रामपाल आघाडीवर होता. त्याचे अनेक राजकीय शत्रू होते. कंपन्यांचे मालक तर खार खाऊन होते. त्या काळात त्याच्यावर एक – दोन खुनी हल्लेही झाले होते. त्यामुळे काही मित्रांच्या आग्रहावरून तो नेतेगिरी सोडून फ्लॅट विक्री, प्लॉटिंगच्या धंद्यात उतरला. वर्ष, दोन वर्षांत स्थिरावला. त्याचे राजकीय विरोधक म्हणत प्लॉटिंगचा धंदा तर बनाव आहे. खरेतर कंपनी मालकांकडून त्याला दरमहा घसघशीत रक्कम मिळते. त्यामुळे जुने वैमनस्य हल्ल्याचे एक कारण असू शकते, असे म्हणत रेड्डी यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा खबऱ्यांकडून एक एक माहिती मिळत गेली. रामपालचे सर्वात गाजलेले, हिंसक आंदोलन प्राईम प्लास्टिक इंडस्ट्रीजमधले होते. अगदी कंपनी मालक हरप्रीतसिंग गिल यांच्या कॉलरला हात घालण्यापर्यँत रामपाल पोहोचला होता. नंतर कंपनी बंद झाली. गिल निवर्तले. त्यांची दोन्ही मुले कॅनडात निघून गेली. मुलगी प्रीतमकौरने एका उद्योजकाशी लग्न केले. प्राईम बंद झाल्यावरच रामपालने नेतेगिरीतून बाहेर पडण्याचे ठरवले. त्याने गावाकडे शेती सुरू केली. तेव्हा चुलतभाऊ शिवपालसिंग, जसपालसिंगसोबत यांच्यासोबत त्याची तुफान हाणामारी झाली. अगदी एकमेकांवर बंदुका ताणण्यापर्यँत प्रकरण गेले होते. त्यानंतर शेतीच्या वाटण्यावरून सख्खे भाऊ अवधेश, जगमोहन यांच्याशी वाद झाले. दोन्ही भावांनी मिळून रामपालला चांगलेच तुडवून काढले होते. त्यामुळे त्याने गावाकडचा गाशा गुंडाळला. शहरात परतल्यावर तो गुंडगिरीकडे वळण्याच्या बेतात असताना अचानक त्याचे आयुष्य बदलले. त्याच्या आंदोलनामुळेच बंद पडलेल्या एका कंपनीतील रिसेप्शनिस्ट रेखा त्याच्या संपर्कात आली. दोघे प्रेमात पडले आणि तिने त्याला प्लॉटिंगच्या धंद्याकडे वळवले. कारण तिच्या बहिणीचा नवरा शरद हेच काम करत होता. रामपाल, रेखा आणि शरद या त्रिकुटाने कंपन्यांच्या रिकाम्या पडलेल्या जागा त्यांनी झपाट्याने बिल्डरांच्या घशात घातल्या. त्यातल्या दोन कोटींच्या देवाणघेवाणीवरून बिल्डर गहलोत, वर्मांसोबत त्याची अलिकडेच कटकट झाली होती. देखण्या, अतिमहत्वाकांक्षी, उच्चशिक्षित रेखाशी त्याचे खटके उडू लागले होते. तिची बिल्डरांशी वाढलेली घसट त्याला मान्य नव्हती. तिने त्यांच्या पार्ट्यांमध्ये जाता कामा नये, असे रामपाल बजावत होता. तर हाय सोसायटीत बस्तान बसवण्यासाठी हे सगळे करावेच लागणार. मी फक्त बिल्डरांना थोडे झुलवत आहे. त्यांच्याकडून दहा पैसे जास्त मिळवत आहे. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत नाहीये. मी तुझे जीवन बदललेय हे विसरू नको, असे ती सांगत होती. उलट प्रॉपर्टी डिलिंगमध्ये कागदपत्रे तयार करून देणाऱ्या दोन मुलांची आई असूनही अत्यंत आकर्षक असलेल्या वकिल निलोफरसोबत तु गुंतत चालला आहे. तिच्या घरी विनाकारण फेऱ्या मारतोयस. असा म्हणत रामपाललाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत होती. त्यामुळे भाडोत्री हल्लेखोरांच्या मागे डोके कोणाचे असावेॽ असा प्रश्न इन्सपेक्टर रेड्डींपुढे होता.