भय्यासाहेब वट्टमवार
म्हणजे मातब्बर असामी. त्यांचे कुटुंब भलेमोठे. नऊ भाऊ आणि सात बहिणी. प्रत्येकाचे
एक कापडाचे आलिशान दुकान. शिवाय किमान पन्नास एकर शेती. बहिणीही अतिशय सुखवस्तू
घरात दिल्या होत्या. कोणे एकेकाळी म्हणजे अडीच – तीनशे वर्षांपूर्वी
भय्यासाहेबांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील एका खेडेगावातून या शहरात आले. गावाचे
सेवेकरी म्हणून पूर्वज काम करू लागले. हळूहळू पैसा पैसा जोडत त्यांनी मोठे
साम्राज्य निर्माण केले. पण जे काही वैभव आहे. ते तिरुपती बालाजीच्या कृपेने आहे,
असे ते ठामपणे सांगत. तीनशे वर्षांत वट्टमवार वंशाचा विस्तार किमान तीन हजार
सदस्यांमध्ये झाला असावा. प्रत्येक घरात तिरुपती हेच दैवत. भय्यासाहेबांच्या
पूर्वजांनी त्या काळात एक छोटेसे बालाजीचे मंदिर बांधले होते. मंदिर पूर्ण
झाल्यावर उत्कर्ष सुरू झाला अशी त्यांची धारणा होती. गावकऱ्यांनीही ते डोळ्यांनी
पाहिल्याने मंदिराचे महत्व दिवसेंदिवस वाढत गेले. ज्यांना दर्शनाचा फायदा झाला.
त्यांनी तिरुपतीप्रमाणे इथंही सोनं-नाणं देणे सुरू केले. मूर्तीवर पन्नास लाखांचे
दागिने चढले. शेकडो लोकांचे अर्थकारण मंदिराभोवती फिरू लागलं. सरकारचीही त्यावर
नजर होतीच. त्यामुळं मंदिराच्या कारभारासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला.
जिल्हाधिकारी ट्रस्टचे कायमस्वरूपी अध्यक्ष राहतील. वट्टमवार कुटुंबियातील एक
व्यक्ती सचिव असेल. त्याच्याकडंच बहुतांश आर्थिक अधिकार असतील आणि ट्रस्टवरील नऊ
कार्यकारी सदस्यांमध्येही सहाजण वट्टमवारच असतील, अशी घटना तयार झाली. कामाचा
व्याप वाढत चालला. त्यामुळे मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि दागिन्यांच्या सुरक्षेसाठी
भय्यासाहेबांनी काही वर्षांपूर्वी एमकेएस एजन्सीची नियुक्ती केली होती. एजन्सीचे
दहा गार्ड आणि त्यांचा प्रमुख अरविंदसिंग कायम नजर ठेवून असत. गाभारा वगळता
सगळीकडे सीसीटीव्ही होते. मंदिराच्या आवारात मुख्य पुजारी प्रल्हादअप्पा, त्यांची
तीन मुले नारायण, शिवानंद, कालिचरण आणि त्यांच्या बायका राहत होत्या. अलिकडील
काळात भय्यासाहेबांच्या खालोखाल कर्नाटकातील कुठल्यातरी खेडेगावातून आलेल्या
प्रल्हादअप्पांचं महत्व वाढलं होतं. कारण ते थेट बालाजींशी संवाद साधतात, अशी
वदंता पसरली होती. त्यांनी दिलेले दोन-तीन तोडगे फार फायद्याचे ठरले, असे
सोन्या-चांदीचा प्रख्यात व्यापारी लालचंद सगळीकडं सांगत फिरत होता.
भय्यासाहेबांच्या कानावर ही गोष्ट पडली. तेव्हा त्यांनी अप्पांकडं नाराजी व्यक्त
केली. हे मंदिर खऱ्या श्रद्धाळूंसाठी आहे. त्याचे रुपांतर अंधश्रद्धांमध्ये होणार
नाही, याची काळजी घ्या, असं त्यांनी कडक शब्दांत बजावलं. तेव्हा अप्पांची तिन्ही
मुले आणि सुनाही साक्षीदार होत्या. भय्यासाहेब बाहेर पडताच कालिचरण भडकला. आम्ही
एवढी मनापासून मंदिराची काळजी घेतो. सर्व व्यवस्था पाहतो. कधी त्यांच्याकडं कुठली
तक्रार जाऊ देत नाही. एका पैशाचा घोळ नाही. तरीही केवळ लालचंदवरून त्यांनी असं
बोलणं योग्य नाही, असं त्याचं म्हणणं होतं. तर नारायणला मनातल्या मनात विचार करत
होता की, मंदिर परिसरातील दुकानांच्या भाड्यातून काही रक्कम आपण परस्पर खिशात
घालतोय. हे बहुधा अजून भय्यासाहेबांना कळालेलं नाही. तर लालचंद आपल्या बापाबद्दल
बाहेर काही चांगलं सांगत असेल तर त्यात आपल्या बापाची काय चूक आहे, हे शिवानंदला
कळत नव्हतं. रात्री उशिरा गाभारा बंद करताना त्यानं मनातली खदखद अरविंदसिंगकडं
बोलून दाखवली. तेव्हा अरविंदचा खास माणूस असलेल्या हरीसिंगनं ते पटकन टिपून ठेवलं.
नंतर तो म्हणाला सुद्धा की, मंदिरात लवकरच काहीतरी गडबड होईल, अशी शंका वाटते.
अरविंदसिंगनं त्याला खोदून खोदून विचारलं पण त्यानं समाधानकारक उत्तर दिलं नाही. मात्र,
मंदिरातील भाडेकरूंच्या खोलीत राहण्यास आलेली अलकादेवी आणि तिची मुलगी मंगला
संशयास्पद वाटतात. त्या बारकाईनं मंदिर बघत सारखं भटकत असतात. रात्री उशिरापर्यंत
जाग्या असतात. आता त्या शिवानंदच्या नातेवाईक आहेत. म्हणून त्यांना थेट काही बोलता
येत नाही, असं सांगू लागला. हरीसिंगच्या बोलण्याकडं अरविंदसिंगनं फारसं लक्ष दिलं
नाही. पण त्याची ती चूक ठरली. भल्या पहाटे प्रल्हादअप्पा मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा
उघडण्यास गेले तर तो उघडाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी जोरात बोंब
ठोकली. सगळं शहर जागं झालं. पोलिसांचं पथक आलं. भय्यासाहेब, वट्टमवार कुटुंबातील
अनेक सदस्य आले. बालाजीच्या मूर्तीवरील वीस लाखांचे दागिने गायब झाले होते. अंगभर
काळे कपडे पांघरून आलेले तिघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. इन्सपेक्टर कदम
काही दिवसांत चोरट्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचले.
No comments:
Post a Comment