एकेकाळी लोकप्रिय कामगार नेता असलेल्या रामपालसिंगवर गोळीबार झाला. दोन गोळ्या छातीत आणि एक पोटात गेली. तो ज्या वसाहतीत राहत होता. त्याच्या मागील बाजूस असणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काही घरगुती सामान खरेदी करण्यासाठी तो निघाला होता. तेव्हा मारेकऱ्यांनी डाव साधला. एकाच दुचाकीवरून आलेले तिन्ही हल्लेखोर तोंडाला रुमाल, मफलर बांधलेले होते. रामपाल पोहोचण्याच्या दहा मिनिटे ते कॉम्प्लेक्सपाशी आले. त्यातल्या दोघांनी सिगारेटी फुंकल्या. मग ते निघून गेले आणि रामपाल येण्याच्या दोन मिनिटे पुन्हा परत आले. गोळीबार करून भरधाव निघून गेले. दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. पण ती जुनी इंड सुझुकी मोटारसायकल असावी, असे सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांच्या लक्षात आल्याचे बातम्यांमध्ये सांगण्यात आले. रामपालसिंग एकेकाळचा गाजलेला कामगार नेता. त्याची दहशत होती आणि लोकप्रियताही. पण तो काळ ओसरला. त्याच्याभोवतीचे वलय कमी झालं, असा पोलिसांचा अंदाज होता. तो साफ चुकीचा ठरला. त्याच्या अंत्ययात्रेला तोबा गर्दी होती. दहा-बारा वर्ष कामगारांच्या हक्कासाठी आंदोलने करण्यात रामपाल आघाडीवर होता. त्याचे अनेक राजकीय शत्रू होते. कंपन्यांचे मालक तर खार खाऊन होते. त्या काळात त्याच्यावर एक – दोन खुनी हल्लेही झाले होते. त्यामुळे काही मित्रांच्या आग्रहावरून तो नेतेगिरी सोडून फ्लॅट विक्री, प्लॉटिंगच्या धंद्यात उतरला. वर्ष, दोन वर्षांत स्थिरावला. त्याचे राजकीय विरोधक म्हणत प्लॉटिंगचा धंदा तर बनाव आहे. खरेतर कंपनी मालकांकडून त्याला दरमहा घसघशीत रक्कम मिळते. त्यामुळे जुने वैमनस्य हल्ल्याचे एक कारण असू शकते, असे म्हणत रेड्डी यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा खबऱ्यांकडून एक एक माहिती मिळत गेली. रामपालचे सर्वात गाजलेले, हिंसक आंदोलन प्राईम प्लास्टिक इंडस्ट्रीजमधले होते. अगदी कंपनी मालक हरप्रीतसिंग गिल यांच्या कॉलरला हात घालण्यापर्यँत रामपाल पोहोचला होता. नंतर कंपनी बंद झाली. गिल निवर्तले. त्यांची दोन्ही मुले कॅनडात निघून गेली. मुलगी प्रीतमकौरने एका उद्योजकाशी लग्न केले. प्राईम बंद झाल्यावरच रामपालने नेतेगिरीतून बाहेर पडण्याचे ठरवले. त्याने गावाकडे शेती सुरू केली. तेव्हा चुलतभाऊ शिवपालसिंग, जसपालसिंगसोबत यांच्यासोबत त्याची तुफान हाणामारी झाली. अगदी एकमेकांवर बंदुका ताणण्यापर्यँत प्रकरण गेले होते. त्यानंतर शेतीच्या वाटण्यावरून सख्खे भाऊ अवधेश, जगमोहन यांच्याशी वाद झाले. दोन्ही भावांनी मिळून रामपालला चांगलेच तुडवून काढले होते. त्यामुळे त्याने गावाकडचा गाशा गुंडाळला. शहरात परतल्यावर तो गुंडगिरीकडे वळण्याच्या बेतात असताना अचानक त्याचे आयुष्य बदलले. त्याच्या आंदोलनामुळेच बंद पडलेल्या एका कंपनीतील रिसेप्शनिस्ट रेखा त्याच्या संपर्कात आली. दोघे प्रेमात पडले आणि तिने त्याला प्लॉटिंगच्या धंद्याकडे वळवले. कारण तिच्या बहिणीचा नवरा शरद हेच काम करत होता. रामपाल, रेखा आणि शरद या त्रिकुटाने कंपन्यांच्या रिकाम्या पडलेल्या जागा त्यांनी झपाट्याने बिल्डरांच्या घशात घातल्या. त्यातल्या दोन कोटींच्या देवाणघेवाणीवरून बिल्डर गहलोत, वर्मांसोबत त्याची अलिकडेच कटकट झाली होती. देखण्या, अतिमहत्वाकांक्षी, उच्चशिक्षित रेखाशी त्याचे खटके उडू लागले होते. तिची बिल्डरांशी वाढलेली घसट त्याला मान्य नव्हती. तिने त्यांच्या पार्ट्यांमध्ये जाता कामा नये, असे रामपाल बजावत होता. तर हाय सोसायटीत बस्तान बसवण्यासाठी हे सगळे करावेच लागणार. मी फक्त बिल्डरांना थोडे झुलवत आहे. त्यांच्याकडून दहा पैसे जास्त मिळवत आहे. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत नाहीये. मी तुझे जीवन बदललेय हे विसरू नको, असे ती सांगत होती. उलट प्रॉपर्टी डिलिंगमध्ये कागदपत्रे तयार करून देणाऱ्या दोन मुलांची आई असूनही अत्यंत आकर्षक असलेल्या वकिल निलोफरसोबत तु गुंतत चालला आहे. तिच्या घरी विनाकारण फेऱ्या मारतोयस. असा म्हणत रामपाललाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत होती. त्यामुळे भाडोत्री हल्लेखोरांच्या मागे डोके कोणाचे असावेॽ असा प्रश्न इन्सपेक्टर रेड्डींपुढे होता.
No comments:
Post a Comment