Thursday, 7 May 2020

आधे – अधुरे : पूर्ण नाट्य

मराठी रंगभूमीवर चमकदार कामगिरी करणारे अनेकजण एनएसडी म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. पण एनएसडीवर कायम हिंदी भाषकांचेच वर्चस्व राहिले. तेथील सादरीकरणाची भाषा हिंदीच राहिली. एकतर त्यांच्या प्रांतात हे स्कूल आहे. दुसरे म्हणजे तिथल्या शिक्षकांमध्ये मराठी दुर्मिळच. जे होते. त्यांना मराठीचा दुस्वास होता किंवा सवतासुभा निर्माण केल्याची कुठेही नोंद नाही. पण तरीही हिंदी पट्ट्यातील विद्यार्थी जास्त. प्रेक्षकांमध्येही तेच. त्यामुळे अनेक दमदार मराठी नाटके तेथे सादर होण्याचा वेग कमी राहिला. त्यात १९६०नंतर महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध दाक्षिणात्य, मराठी विरुद्ध इंग्रजी असे राजकारण पेटले. समाजकारण धुमसून निघाले. त्याचा बराचसा फायदा त्यावेळच्या मराठी तरुणांना झाला. राजकारणी यशस्वी झाले. पण सांस्कृतिकदृष्ट्या पडलेले अंतर कायम राहिले. प्रसारमाध्यमांतून मराठी लेखक, अभिनेते, तंत्रज्ञ हिंदी भाषिकांसमोर जात राहिले. तरीही त्यांच्यातील प्रतिभेचे दर्शन सातत्याने घडलेच नाही. मराठी आणि हिंदी रंगभूमीमध्ये एकमेकांत मिसळून जाण्याची भावना कधी निर्माण झालीच नाही. किमान निकोप, गुणवत्तेची स्पर्धाही झालेली दिसत नाही. भाषेचा, संस्कृतीचा पोलादी पडदा कायम राहिला. अगदी नाट्य पंढरी मानल्या गेलेल्या मुंबईत मराठी रंगभूमी वेगळी आणि हिंदी वेगळी अशीच राहिली. हिंदीतील सर्वोत्तम नाट्य कलाकृती मराठीत फारशा आल्याच नाहीत. स्वीकारल्या गेल्या नाहीत.

अर्थात त्याला एक-दोन नाटकांचा अपवाद राहिला. यामध्ये सर्वात अग्रक्रमावर राहिले ते मोहन राकेश यांचे आधे अधुरे’. त्याचे शेकडो प्रयोग मराठी रंगभूमीवर झाले. कित्येक दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रींनी त्यात भूमिका करून स्वत:तील ताकद जोखून घेतली. केवळ ४७ वर्षांचे आयुष्य लाभलेले प्रतिभावान लेखक मोहन राकेश १९७२मध्ये जग सोडून गेले. त्यांच्या नाट्य लिखाणाचा अखेरचा टप्पा सुरू असताना मराठी रंगभूमी बहरात येत होती. विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, चिं. त्र्यं. खानोलकर असे अनेक लेखक उदयास आले होते. दिवाणखान्यात, हास्यविनोदात आणि कौटुंबिक विवंचनेत अडकलेले नाटक वास्तववादी करण्यात ते यशस्वी होत होते. मोहन राकेश यांना अधिक आयुष्य लाभले असते तर कदाचित मराठी-हिंदीतील दुरावा त्यावेळी काही प्रमाणात दूर झाला असता. कारण ते केवळ लिखाणात वास्तववाद मांडत नव्हते. तर प्रत्यक्ष जीवनातही वास्तवाशी भिडणारे होते. तेंडुलकरांप्रमाणेच सामाजिक विषमता, कुटुंब व्यवस्थेतील दांभिकता त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू होता. त्यांनी हिंदी रंगभुमीला एक वेगळा चेहरा मिळवून दिला.
तर मुद्दा असा आहे की, त्यांच्या आधे-अधुरेचा प्रयोग आजही ताजा, समकालीन वाटतो. अगदी हे नाट्य १९६०च्या दशकातील भारतीय शहरी संस्कृतीतील असले तरी. कारण त्यात त्यांनी ठसठशीतपणे आणि अगदी खोलवरपणे मानवी जीवनातील मूल्ये पेरली आहेत. एका ओळीत त्याचे कथानक एका कनिष्ठ मध्यमववर्गीय स्त्रीची विविध रुपे दर्शन असे आहे. त्याची सुरवात अगदी वेगळी. गुंतागुंतीची. पण ही गुंतागुंत हळूहळू उलगडू लागते आणि एकूणच भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीचे काय स्थान आहे. हे स्थान बदलण्यासाठी तिला काय करावे लागत आहे. संपर्कात येणाऱ्या पुरुषाशी ती कशी नाते संबंध प्रस्थापित करत जाते. आणि मग टप्प्या-टप्प्याने स्वतःच कशी तुटत जाते, याचे विदारक चित्रण होत जाते. त्यामुळे लेखकाला नाटकाची नायिका भारतीय समाजव्यवस्थेच्या, मानवी जीवन मूल्याच्या रुपात मांडायची आहे, असे लक्षात येते. केवळ भारतीयच नव्हे तर पुरुषी संस्कृतीतील अनेक घरांमध्ये कमी अधिक फरकाने असेच घडत असणार, असेच ठसत जाते. त्यासाठी मोहन राकेश यांनी अतिशय टोकदार संवाद लिहिले आहेत. दोन ओळींमध्ये दिलेली विश्रांती विलक्षण बोलकी केली आहे. जितक्या ताकदीचा अभिनेता, अभिनेत्री तेवढी व्यक्तिरेखा खुलत राहिल. दिग्दर्शक जेवढा कल्पक तेवढ्या सादरीकरणात दिग्दर्शकीय जागा तयार करता येतील. अशी लेखनात एक अजबता असलेली कलाकृती म्हणजे ‘आधे - अधुरे’ आहे, असे म्हटले तरी चालेल. कोरोनामुळे सगळे जग एकमेकांजवळ येत चालले आहे. जात, धर्म, पंथ, भाषांचे भेदभाव काही उपयोगाचे नाही, हे काहीजणांना कळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याचा फायदा घेऊन कोरोनानंतर आधे-अधुरे किंवा मोहन राकेश यांच्याच आषाढ का एक दिन किंवा अन्य हिंदी लेखकांच्या नाटकांचे अधिकाधिक प्रयोग झाले तर दोन भाषांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होण्यास थोडीशी मदत होईल, असा लॉकडाऊनच्या काळात टोचणारा विचार.


No comments:

Post a Comment