Tuesday, 6 July 2021
गौरींचा गौरव
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी, अभिनेते दादासाहेब फाळकेंनी १९१२ मध्ये भारतीय सिनेमाचा पाया रचला. तेव्हा रुपेरी पडद्यावर महिलांचे येणे अत्यंत दुर्मिळ होते. त्यामुळे त्यांच्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या सिनेमात पुरुषांनीच महिलांच्या भूमिका केल्या होत्या. आज २०२१ म्हणजे १०९ वर्षे होत आहेत. या काळात शेकडो, हजारो तारका पडद्यावर आल्या. काही प्रखरतेने चमकल्या. काहींनी मंद का होईना प्रकाश दिला. रसिकांचे मनोरंजन केले. अभिनयाने सिनेमाची दुनिया चमकदार केली. त्यात मराठी तारकांचे मोठे योगदान आहे. मधला काही काळ वगळला तर आज मराठीचा हिंदी सिनेमातही मोठा दबदबा आहे. पण महिला जगतापुरते पाहिले तर १०९ वर्षांच्या इतिहासात मराठीपणाची तटबंदी ओलांडून हिंदीमध्ये ठसा उमटवणाऱ्या मराठी दिग्दर्शिका अत्यंत मोजक्याच आहेत. त्या मोजक्यांमध्ये गौरी शिंदे आहेत. म्हणजे आपण अगदी गेल्या काही दशकांची पाने चाळून पाहिली तर असे लक्षात येते की सई परांजपेंनंतर थेट गौरी शिंदेंचे नाव येते. एक विलक्षण प्रतिभावान, नवीन काही करू पाहणारी, प्रेक्षकांना बांधून ठेवणारी दिग्दर्शिका अशी गौरी यांची ओळख केवळ दोन सिनेमांत झाली आहे. तेही सिनेमा इंडस्ट्रीचा वारसा पाठिशी नसताना.
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात ६ जुलै १९७४ रोजी जन्मलेल्या गौरी यांनी सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिम्बॉयसिस विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात पदवी मिळवली. त्याच काळात त्यांच्या सिनेमाविषयी आकर्षण निर्माण झाले. पण तिथला दरवाजा कसा उघडेल, असा प्रश्न होता. म्हणून त्या जाहिरात संस्थेत क्रिएटीव्ह कॉपीरायटर म्हणून काम करू लागल्या. तेथे त्यांचा पुढे प्रख्यात सिने दिग्दर्शक झालेले आणि कॉपीरायटर म्हणून काम करणारे आर. बाल्की यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याशी क्रिएटीव्ह चर्चा करताना गौरी यांना ‘ओह मॅन’ या शॉर्ट फिल्मची कल्पना सुचली. बाल्कींच्या पाठिंब्याने त्यांनी ती दिग्दर्शित केली. ही शॉर्ट फिल्म २००१मध्ये बर्लिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवडली गेली. त्यामुळे समांतर सिनेजगतात त्यांच्या नावाला छोटेसे का होईना वलय प्राप्त झाले.
पण त्या पुढे फारसे काही घडले नाही. अगदी जवळपास दहा वर्षे सामसूम होती. आणि २०१२ मध्ये गौरी शिंदे हे नाव भारतातील प्रत्येक रसिकाच्या तोंडावर आले. कारण होते श्रीदेवींचे पुनरागमन. होय. प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी प्रदीर्घ कालखंडानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार, अशा बातम्या मिडिआमधून येऊ लागल्या. पहिल्यांदा अशी चर्चा होती की, कोणीतरी बडा दिग्दर्शक आहे. कोण असावा तो या विषयीचे कयास बांधले जाऊ लागले. आणि एक दिवस अचानकपणे लेखिका, दिग्दर्शिका म्हणून गौरी शिंदे यांचे नाव आले. ते पाहून जवळपास सर्वांनाच धक्का बसला. श्रीदेवींनी नवख्या, मराठी मुलीच्या दिग्दर्शनात काम करण्याचे का ठरवले असावे, याबद्दल उलट सुलट बोलले गेले. अगदी सिनेमा पडावा, म्हणून ग्लॅमरस व्यक्तिमत्वाच्या गौरींच्या हातात सूत्रे दिली, इथपर्यंत म्हटले गेले. पण इंग्लिश विंग्लिश २०१२ मध्ये पडद्यावर आला आणि अक्षरश: रातोरात गौरी स्टार झाल्या. त्यांच्यातील दिग्दर्शन कौशल्याच्या तारिफीने रकानेच्या रकाने भरू लागले. टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ला परदेशी रसिकांनीही डोक्यावर घेतले. श्रीदेवींच्या अभिनयाइतकेच किंबहुना काकणभर जास्त गौरींच्या दिग्दर्शनाचे कौतुक झाले. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शिकेचा पुरस्कार मिळाला. पण त्या इंग्लिश विंग्लिशवर थांबल्या नाहीत. त्यांनी शाहरूख खान, अलिया भट यांना घेऊन ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातून तरुण आणि मध्यमवर्गीय पिढीला साद घातली. त्यांचे म्हणणे आहे की, खरेतर कोणतीही गोष्ट तुम्ही महिलेच्या नजरेतून पाहिली तर त्यात एक वेगळेच स्वारस्य निर्माण होत असते. बहुतांश वेळा सिनेमाची कहाणी महिलांच्या दृष्टीकोनातून पडद्यावर मांडलीच जात नाही. आणि मला मानवी भावभावनांविषयी काहीतरी विलक्षण, वेगळं सांगायला खूप आवडतं. मला जे आवडतं तेच मी करते. मी त्यासाठीच सिनेमात आले आहे.
आता कोरोनामुळे थिएटरच्या सिनेमाचे जग आक्रसले असले तरी सिनेमा जगभर पोहोचवणारे जग खूप विस्तारले आहे. त्यामुळे गौरींच्या पाऊलवाटेवर मराठी मुली चालू लागल्या तर हिंदीच काय इंग्रजी सिनेमाच्या दिग्दर्शनातही मराठी महिलांची प्रतिभा सिद्ध होईल.
Tuesday, 22 June 2021
चक्रीवादळी नीना
‘आँ ... काय सांगताय’, ‘खरंच की काय’, ‘अरे बापरे ... भयंकरच आहे हे’, ‘कठीण आहे, यावर विश्वास ठेवणं’, ‘खूपच धाडसी आहे ती. तिला हवं ते मिळवलंय तिनं’ असे उद्गार १९८९ मध्ये पहिल्यांदा ही बातमी कानावर पडली तेव्हा लोक बोलत होते. समांतर सिनेमा जगात रमलेली आणि क्रिकेटवाली मंडळी त्यात आघाडीवर होती. पेप्रांचे कॉलमच्या कॉलम तिच्या त्या बातमीनं भरून गेले होते. त्या घटनेला ३२ वर्षे उलटून गेली तरी ती अजूनही प्रसारमाध्यमांची आवडती आहे. तिच्यासोबतच्या, तिच्यापेक्षाही अधिक चमकणाऱ्या अनेक तारका मागे पडल्या, लपल्या. काही संपूनही गेल्या. पण तिच्या नावावरील बातम्या विकल्या, वाचल्या, पाहिल्या जात आहेत. कोणालाही हेवा वाटावा अशा प्रसिद्धीच्या लाटेवर ती कायम आहे. तरीही ... तरीही ती काहीशी आंतरिक दुखावलेली, स्वतःपासूनच दुरावलेली आहे. आपल्याला जे हवं ते आपण हट्टानं, धाडसानं मिळवलं. पण ते आपल्याजवळ आपल्याला हवं तसं का राहिलं नाहीॽ आपलं काय चुकलंॽ असे प्रश्न तिला पडले आहेत. पडद्यावर सहनायिकेच्या भूमिकेत राहूनही बंडखोर नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या आहेत नीना गुप्ता. ६२ वर्षांच्या जीवनात जे काही अनुभवलं, पाहिलं, जाणून-समजून घेतलं ते त्यांनी ‘सच कहूँ तो’ पुस्तकात मांडलंय. १४ जून रोजी या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झालंय. त्यामुळं त्यांच्यावरील प्रसिद्धीचा झोत आणखी प्रखर झालाय.
१९८०च्या दशकातील क्रिकेट जगताचे अनभिषिक्त सम्राट सर व्हिव्हियन रिचर्डससोबत नीनांनी संबंध प्रस्थापित केले. त्या संबंधातून १९८९ मुलीला म्हणजे मसाबाला जन्म दिला. ‘होय, मी लग्नाविना मूल मिळवलं’ असं धाडसानं जगाला सांगितलं. लिव्ह इन रिलेशनशिप, एकल महिलांना समजून घेणं. त्यांच्याविषयी किंचित का होईना सन्मानाची भावना ठेवणं हळूहळू सुरू होतंय. तरीही ती घटना भारतीय समाजातील प्रचंड मोठ्या वर्गाला धक्कादायक वाटते. त्या काळी तर भूकंपच झाला.
काही व्यक्ती वादळी तर काही चक्रीवादळासारख्या असतात. त्या स्वतःभोवतीच धुळ उडवत फिरत राहतात. त्यातून त्यांना किनाऱ्यावर आदळल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. नीना अशाच चक्रीवादळी.
४ जुलै १९५९ रोजी दिल्लीत जन्मलेल्या, संस्कृत भाषेत मास्टर्स, एम.फिल. केलेल्या नीनांनी या आत्मचरित्रात्मक पुस्तकात भूकंपाचे अनेक हादरे दिले आहेत. काही रहस्येही सांगितली आहेत. त्यातील काही चक्रावून टाकणारी आहेत. त्यांनी सांगितलंय की, रिचर्डसकडून होणाऱ्या बालकाला बाप म्हणून कोणाचं नाव लावावं, असा प्रश्न उभा ठाकला. तेव्हा प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, सतीश कौशिक यांनी त्यांच्याशी विवाहाची तयारी दाखवली होती. बाळ कृष्णवर्णीय जन्माला आलं तर ते सतीश कौशिककडून झालंय, असं तु जगाला सांगू शकतील, असा कौशिकांचं म्हणणं होतं. पण रिचर्डसशिवाय कोणालाही आयुष्यात प्रवेश द्यायचाच नाही, असं त्यावेळी ठरवलं होतं. त्यामुळं त्यांनी कौशिकांचा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढं मसाबाचा जन्म झाल्यावर लग्नाविना मूल जन्माला घालणारी महिला असं म्हणून त्यांना सिनेमात निगेटीव्ह भूमिकाच ऑफर होऊ लागल्या. आणि सिनेमातील पुरोगामींचा एक वेगळा चेहरा त्यांच्यासमोर आला.
एकट्याने राहणे शक्यच नाही, असे लक्षात आल्यावर नीनांनी विवेक मेहरांशी वयाच्या पन्नाशीत लग्नही केलं. अर्थात मसाबाला विश्वासात घेऊन. तिनं होकार दिल्यावरच. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी प्रख्यात अभिनेत्री करीना खान कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत नीना सांगतात की, तसं तर मी गेल्या २० वर्षांपासून पुस्तक लिहण्याची तयारी करत होते. पण कोरोनाचं संकट आल्यावर उत्तराखंडातील एका गावात राहण्यास गेल्यावर बरंच लिखाण केलं. त्या वेळी मला जाणिव झाली की, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळात माझा कोणी प्रियकर नव्हता. मी पतीविना होते. काही प्रेमप्रकरणं झाली. पण त्यातील एकही पूर्णत्वाला गेलं नाही. एक लग्न आई-वडिलांनी ठरवलं. पण शेवटच्या क्षणी मुलानं नकार दिला. लग्न मोडलं. एकूणात मी पूर्णपणे एकटीच राहिले. या पुस्तकात नीनांनी त्यांचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षण, मुंबईच्या सिनेजगतातील संघर्ष, यश, राजकारण, काम मिळवून देण्यासाठी लैंगिक शोषण अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या वाचकांना निश्चितच सिनेमावाल्यांचा आणखी एक चेहरा दाखवतील. चेहऱ्यावरील एक बुरखा हटवतील. या निमित्ताने एकाकी चक्रीवादळाचं विचार, अनुभवविश्वही समजेल.
Wednesday, 9 June 2021
द फर्स्ट गर्ल
काही आत्मकथनाची पुस्तकं अशी असतात की, ती हातात पडल्यावर आपण लगेच वाचायला सुरूवात करतो. विषय स्फोटक असतो. मांडणी धारदार असते. जागतिक प्रश्नांचा वेध घेतलेला असतो. त्यामुळे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचला जातो. पानामागून पाने उलटली जातात. पूर्ण वाचून झाल्यावर आपण चिंताक्रांत होऊन जातो. काय होणार आपलंॽ आपल्या देशाचं, जगाचं कसं होईलॽ असा विचार चक्रीवादळासारखा फिरू लागतो. दिवस उलटतात. त्या पुस्तकात मांडलेला विषय मागे पडतो. ते कपाटात जाते किंवा त्यावर जणू धूळ साचते. अन् अचानक अशा घटना घडतात की, ते पुस्तक पुन्हा कपाटातून बाहेर येते. आधीपेक्षा अधिक बारकाईने पानन् पान वाचले जाते. शब्दा-शब्दांत नेमके काय म्हटले आहे. दोन शब्दांमध्ये काय दडलं आहे, हे जाणून घेण्यासाठी विचार धावू लागतात. लेखकानं मांडलेला विषय किती जळजळीत, जिवंत आहे. मानवी मूल्यांविषयी त्यात किती तिखट, मूळ प्रश्न उपस्थित केला आहे, याची जाणिव होऊ लागते. आणि हे पुस्तक केवळ एक आत्मकथन नसून त्यात काही सूचना, संकेत दिले आहेत. वैश्विक संदेश, ऐतिहासिक दस्तावेज दडलेला आहे. असंही उलगडू लागतं. आणि हेच त्या आत्मकथनाचं बलस्थान असतं. ‘द लास्ट गर्ल’ या पुस्तकात हे सारं आपणास अनुभवास येतं.
१९८०-९०च्या काळात भारतात काहीही घडले तरी त्या मागे परकीय शक्तीचा हात आहे, असं म्हटलं जायचं. अगदी पाऊस कमी, जास्त झाला तरी परकीय, तिसरी शक्ती अशी नावं घेतली जायची. आता त्याचं रुप जागतिक पातळीवर बदललंय. अमेरिका, इस्त्राइल मिळून सगळं काही घडवून आणतंय, असं सांगणारा एक मोठा वर्ग आहे. नऊ-दहा वर्षांपूर्वी सिरीया, इराकमध्ये भयंकर हत्याकांड करणाऱ्या आयसिस या मुस्लिम दहशतवादी संघटनेच्या पाठिशीही अमेरिकाच असल्याचं म्हटलं जातं. त्यात किती तथ्य आहे, याचं खरं उत्तर काळच देईल. पण एकमात्र खरं की आयसिसनं याजिदी धर्माच्या हजारो निरपराधांना संपवलं. संपवण्यापूर्वी भयंकर अत्याचार केले. तरुणी, महिलांवर बलात्कार केले. माणुसकीची मान शरमेनं खाली जाईल, असा हाहा:कार उडवला. काही प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडं आयसिसवाल्यांनीच पाठवलेल्या फुटेजवरून बातम्या दिल्या. पण, त्या क्रूर संघटनेच्या विचारांची जडणघडण, कार्यपद्धती हे सारं जगासमोर अत्यंत धाडसाने आणलं एका तरुण महिलेनं. त्यांचं नाव नादिया मुराद.
२०१४मध्ये आयसिसनं इराकमधील नादियांच्या गावावर हल्ला केला. त्यांना १२ हजार रुपयांत खरेदी केलं. त्यांच्या आई, सहा भावांना त्यांच्या डोळ्यादेखत गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या आईसह ऐंशी वयस्क महिलांना एकाच कबरीत पुरून टाकण्यात आलं. नादियांना एका दहशतवाद्याकडून दुसऱ्याकडं विकण्यात आलं. विकृतांच्या टोळीनं त्यांच्या देहाचे अनेक लचके तोडले. एकवेळ तर नादियांना असं वाटलं की आपलं आयुष्य संपलं. पण त्याचक्षणाला कोठून कोणास ठावूक तिच्यात एका शक्तीचा संचार झाला. आपण जगलं पाहिजे. जगण्यासाठी लढलंच पाहिजे, हा विचार प्रबळ झाला. या विचारानं झपाटलेल्या नादियांसाठी मग कोठडीची दारे हळूहळू किलकिली होत गेली. अनेक युक्त्या-प्रयुक्त्या करत, धडपडत, काहीवेळा माघार घेऊन पुढे जात, वेशांतर करत, स्वतःची ओळख लपवत त्या आयसिसच्या मुलुखातून बाहेर पडल्या. कुर्दिस्तानमार्गे जर्मनीत आणि तेथून जगभरात पोहोचल्या. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.
आयसिसच्या हल्ल्यानंतर वर्ष-दोन वर्षांत त्यांनी जे काही भोगलं ते ‘द लास्ट गर्ल‘ या पुस्तकात सांगितलं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊससाठी सुप्रिया वकिल यांनी ते मराठीत आणलं आहे. ३०७ पानांच्या या पुस्तकात प्रारंभीचा काही भाग सोडला तर प्रत्येक पानावर थरार आहे. याजिदी नावाचा धर्मच पृथ्वीतलावरून समूळ संपवून टाकायचा असं म्हणत आयसिसनं नेमकं काय केलं. शेकडो वर्षांपासून मुस्लिमांसोबत शांततेनं राहणाऱ्या याजिदींना कसं बेचिराख केलं. पळून जाण्यासाठी कसं भाग पाडलं. हे सांगणारी वर्णनं अंगावर शहारा आणतात. आणि अंर्तमनाला सावधानतेचा सुप्त इशाराही देतात. त्यामुळं हे पुस्तक आवर्जून वाचावं, असं आहे. त्याचं नाव नादियांनी ‘द लास्ट गर्ल’ म्हणजे आयसिसच्या तावडीतून सुटलेली शेवटची मुलगी अशा अर्थानं दिलं असावं. खरं तर ते आयसिसविरुद्ध लढणारी ‘फर्स्ट गर्ल’ असं हवं होतं, अशी भावना पुस्तक वाचून झाल्यावर निर्माण होते.
Thursday, 3 June 2021
नव्या पिढीची ख्रिस्तिना
ख्रिस्तिना मारिया हेडिच अमनपोर असे त्यांचे लांबलच्चक नाव. १९९० च्या दशकात जगातील सर्वाधिक दहा लोकप्रियांच्या यादीत त्या होत्या. लांबलच्चक नावासारखे भारदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढाच दराराही. त्या काळच्या त्या योद्ध्याच. फ्रंट वॉरियर. पण प्रत्यक्ष युद्धात भाग न घेताही शौर्य, धाडसाचे दर्शन घडवणाऱ्या ख्रिस्तिनांनी नेमकं काय केलं होतं. हे जाणून घेण्यासाठी तीस वर्षे मागे जावे लागेल. २ ऑगस्ट १९९०. इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेनने कुवैत देशात सैन्य घुसवले. मग अर्थातच जगाचा दादा असं म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वात काही युरोपीय राष्ट्रे एकत्र आली. आणि १७ जानेवारी १९९१ रोजी आखाती युद्धाला प्रारंभ झाला. महाबलाढ्य अमेरिकेसमोर सद्दामचा टिकाव टिकणे कठीण होते. तसेच झाले. २८ फेब्रुवारी १९९१ रोजी इराकच्या पराभवाने युद्ध संपले. पण तो महिनाभर सारे जग ते युद्ध एखादी क्रिकेट, फुटबॉलची मॅच पाहावे तसे डोळे भरून टीव्हीवर लाईव्ह पाहत होते. भारतीय लोक तर ते पाहून अवाक झाले होते. ते युद्ध एका कारणासाठी भारतीयांना आपल्या जवळचे वाटत होते. ते म्हणजे एकीकडून सद्दामची सेना स्कड मिसाईल डागायची. दुसरीकडून अमेरिकेचे पेट्रियाट मिसाईल त्याला हवेतच उडवून लावायचे. आपल्या रामायण, महाभारतातील अस्त्राचे म्हणजे आपलेच तंत्र अमेरिका – सद्दामने चोरले असेही लोक म्हणायचे. पण हे युद्ध टीव्हीच्या छोट्या पडद्यावर सीएनएन या त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावरील न्यूज चॅनेलमुळे पाहता आले. तेथे जगाने पहिल्यांदा ख्रिस्तिनांना पाहिले. त्या अतिशय बिनधास्तपणे रिपोर्टिंग करत होत्या. युद्धाचे अनेक बारकावे उलगडून दाखवत होत्या. लोकांचे दु:ख, वेदना मांडत होत्या. एकीकडे अमेरिकन सैन्य विजयाचा मार्ग प्रशस्त करत होते. दुसरीकडे ख्रिस्तिना जगभरातील महिला पत्रकारांना युद्धभूमीवरही कौशल्य, जिद्द, आत्मविश्वास दाखवण्याची वाट दाखवत होत्या. त्यावर पुढे अनेकींनी वाटचाल केली. त्यातील काहीजणी ख्रिस्तिनांना अभिमान वाटेल, धाडसात त्यांच्या दोन पावले पुढे टाकलेली कामगिरी करत आहेत. व्हाईज न्यूज, एचबीओ या अमेरिकन चॅनेलच्या इसोबेल येऊंग त्यापैकी एक आहेत. जेमतेम ३४ वर्ष ६ महिने वय असलेल्या इसोबेल यांची कामगिरी थक्क करून टाकते. काही वर्षांपूर्वी आयसिस या मुस्लिम दहशतवादी संघटनेने सिरीया, इराकमध्ये धुमाकूळ घातला होता. यझदी जमातीचे शिरकाण सुरू केले. तेव्हा त्या तेथे पोहोचल्या. बाँबहल्ल्यांच्या वर्षावात जीवावर उदार होऊन वार्तांकन केले. गृहयुद्धात बेचिराख होणाऱ्या येमेन, सिरिया, लिबियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून तेथील लोकांचे म्हणणे जगापुढे मांडले. दहशतवादी हल्ले, युद्ध, धर्माच्या नावाखाली कट्टरता हे त्यांचे आवडते विषय आहेत. त्यातही फोकस युद्धामुळे होणारे महिला, मुलांचे हाल. त्यांची परवड यावर असतो. अफगणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना त्यांनी वाचा फोडली. उग्येर प्रांतातील मुस्लिमांवर चीनी राजवट कसा वरवंटा चालवत आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन तिला जागतिक सन्मानाचा ऍमी पुरस्कार दोनदा आणि ग्रेसी पुरस्कार एकदा मिळाला आहे.
त्यांचे वडिल चिनी. चांगल्या आयुष्याच्या शोधात ते १९८० साली हाँगकाँगमधून इंग्लडला आले. रेस्टॉरंट व्यवसायात स्थिर होताना एका इंग्लिश तरुणीशी विवाह केला. तर इंग्लिश माता आणि चिनी पित्याचे अपत्य असलेल्या इसोबेल यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून २००९ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आणि पाच वर्ष शांघाय आणि चीन सेंट्रल टेलिव्हिजनसाठी काम केले. २०१४ मध्ये अमेरिकेतील व्हाईज न्यूजने त्यांना निमंत्रित केले. युद्धखोर अमेरिकेच्या कुठे ना कुठे लष्करी कारवाया सुरूच असतात. त्यामुळे इसोबेल यांना आवडीचे काम मिळत गेले. युद्धभूमीवरून सवड काढून त्या टायकून टॉक नावाचा शो चालवतात. द इंडिपेंडंट, द टेलिग्राफ, चायना मॉर्निंग पोस्ट या दैनिकातही लिखाण करतात. बेंजामिन झांड नावाच्या एका ब्रिटीश-इराणी वंशाच्या पत्रकारासोबत त्या लिव्ह इनमध्ये आहेत. इसोबेल सांगतात की, बेंजामिनसोबतचे नाते मला जगण्याची, लढण्याची ऊर्जा देते. पण आणखीही एक रहस्य आहे. काहीही असले तरी मला रात्री अतिशय गाढ झोप लागते. ही गाढ झोपच मला सकाळी ताजेतवाने करते. लोकांच्या उपयोगाचे, त्यांच्या जीवनात काहीतरी देऊ शकेल, असे शोधण्याची शक्ती, प्रेरणा देते. तरुण पिढीची ख्रिस्तिना असलेल्या इसोबेल यांनी असं अतिशय प्रामाणिकपणे स्वत:च्या उर्जा, प्रेरणास्त्रोताविषयी सांगणंही प्रेरणादायीच आहे ना?
Tuesday, 11 May 2021
ममता आटवणारी मिनाक्षी
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील निकालांनी भाजपचे तारु जमिनीवर आणले. मोदी-शहांनी अतिरेकी ताकद पणाला लावूनही तृणमूलने प्रचंड बहुमत मिळवले. चाणाक्ष, धुरंधर राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपला शंभरीही गाठता आला नाही. पण महाकाय विजय मिळवणाऱ्या तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मोदी-शहांएवढीच शक्ती झोकून देऊनही नंदिग्राममध्ये पराभूत झाल्या. नंतर त्यांनी काहीही आरोप केले असले तरी आपला पराभव झाला, हे त्यांच्या अंतर्मनालाही लक्षात आले असावे. त्यांचे एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारींनी त्यांना धूळ चारली. पण लोकशाहीत मतांची फाटाफूटदेखील पराभवाचे एक कारण असते. हे लक्षात घेतले तर ममतांचा पराभव शुभेंदूंनी केला असे म्हणताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तरुण उमेदवार मिनाक्षी मुखर्जींनीही तो केला असे म्हणावे लागेल. शुभेंदू १९५६ मतांनी जिंकले आणि मिनाक्षींनी ६२६७ मते घेतली. त्यांनी नंदिग्राममध्ये ममता आटवली. त्यामुळे पक्ष जिंकूनही ममता पराभूत तर पराभूत होऊनही मिनाक्षी विजयी मुद्रेत आहेत. निवडणूक गमावली तरी मिनाक्षी जायंट किलर ठरल्या आहेत.
१९९५मध्ये नरसिंहरावांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे केंद्र सरकार गेले. आणि संख्याबळ हाच निकष असलेल्या भारतीय राजकारणात कम्युनिस्ट पक्षांचा दबदबा अधिक वाढला. त्यांच्याशिवाय देशात सरकार नाही, असे गणित १४ वर्षे म्हणजे २००९पर्यंत होते. पश्चिम बंगाल तर डाव्यांचा महाकाय किल्ला होता. त्यांच्या सत्तेचा सूर्य अस्ताला जाणे मुश्किल आहे, असे डावे, काँग्रेससमर्थक पत्रकारही हिरीरीने मांडत. ममता बॅनर्जींनी ती मांडणी मोडीत काढली. २०१६ मध्ये एकहाती डाव्यांचा धुव्वा उडवला.
त्यामुळे मार्चमध्ये नंदिग्राम विधानसभेसाठी जेव्हा भाकपने मिनाक्षी मुखर्जींना उमेदवारी दिली. तेव्हा त्या इतक्या धोकादायक ठरू शकतील, याचा अंदाज ममतांना आला नसावा. अवघे ३७ वर्ष वयाच्या, पदव्युत्तर पदवीधर असलेल्या मिनाक्षींच्या उमेदवारी अर्जावर त्यांची मालमत्ता एक लाख ३ हजार रुपये असल्याचे नमूद केले होते. यावरून त्यांची आर्थिक ताकद किती किरकोळ आहे, हे लक्षात येते. पण कम्युनिस्टांचे उमेदवार कायमच गोरगरिबांच्या पाठबळावर निवडणुकीत उतरतात. त्याला मिनाक्षी अपवाद नव्हत्या. एकीकडे भाजपचे धनाढ्य शुभेंदू दुसरीकडे बलाढ्य मुख्यमंत्री ममता अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी आक्रमक प्रचार केला. तृणमूल समर्थकांकडून सभा उधळण्याचे प्रकार झाल्यावरही त्या डगमगल्या नाहीत. उलट आणखी आत्मविश्वासाने लोकांशी संवाद साधत गेल्या. सगळा मिडिआ ममता आणि शुभेंदूंभोवती फिरत असताना त्यांनी एकेकाळी डाव्यांचा गड असलेला नंदिग्राम मतदारसंघ पिंजून काढला. ‘बंगालला स्वत:ची मुलगी मुख्यमंत्री हवी आहे’, अशी अस्मितेची हाक ममतांनी दिल्यावर त्याला मिनाक्षींनी ‘होय बंगालची मुलगीच मुख्यमंत्रीपदी हवी. पण ती ६५ वर्षांची नव्हे तर तरुण हवी’ असे प्रत्युत्तर देत प्रचार केला. भाजप आणि तृणमूल दोन्ही पक्ष धनदांडग्यांचे धनी आहेत. हे राज्य लुटणाऱ्या आणि लुटण्यासाठीच आलेल्यांना नाकारा. पु्न्हा आपल्या घराकडे म्हणजे कम्युनिस्टांकडे परत या, असे भावनिक आवाहनही केले. त्यामुळे नंदिग्राममध्ये जवळपास शू्न्यावस्थेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला सहा हजार मते मिळू शकली.
मिनाक्षी वर्धमान जिल्ह्यातील चालबलबूर गावच्या मूळ रहिवासी. त्यांचे वडिल मनोज मुखर्जी डाव्या चळवळीत तर आई पारुल ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन असोसिएशनमध्ये काम करतात. एका महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करत असताना २००८मध्ये त्यांनी नोकरी सोडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डीवायएफआय या तरुणांच्या संघटनेत प्रवेश केला. शब्दांचा तोलूनमापून वापर करत खर्जाच्या आवाजात तळमळीने बोलण्याची नैसर्गिक देणगी त्यांना मिळाली होतीच. त्यात कम्युनिस्टांमधील लढाऊपणाचा बाणा पेरला गेला. आणि केवळ दहा वर्षात डीवायएफआयच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. एवढेच नव्हे तर पक्षाच्या राज्य समितीतही नियुक्त झाल्या. अनेक आंदोलने त्यांनी स्वबळावर उभी केली. पश्चिम बंगालमध्ये एनआरसी, सीएएविरोधी लढ्याची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. यावरून त्यांच्यातील नेतृत्वशक्तीचा अंदाज येऊ शकतो.
वीस वर्षांपूर्वी शून्यावर असलेल्या ममता बॅनर्जी आज पश्चिम बंगालच्या सर्वसत्ताधीश आहेत. आणि जवळपास तीन दशके सत्तेत असलेले कम्युनिस्ट शून्यावर आले आहेत. असे म्हणतात की, धैर्याने लढण्याची तयारी असलेला कोणीच राजकारणात पूर्णपणे संपत नाही. मिनाक्षींचाही यावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी नंदिग्रामचा निकाल जाहीर होताच पुन्हा लोकांसोबत जाऊन काम करणे सुरू केले आहे. काय सांगावे पुन्हा राजकारणाची चक्रे फिरतील आणि २०४१मध्ये मिनाक्षी मनोज मुखर्जी पश्चिम बंगालच्या सर्वसत्ताधीश होतील.
Tuesday, 27 April 2021
मनो‘भावे’विश्व
सिनेमाच्या दुनियेत थोडंसं स्थिरसावर होऊ लागलं की कलावंतांसमोर एक पेच उभा असतो. तो म्हणजे लोकांना आवडेल असं आपण घडायचं की आपल्याला जे मनापासून आवडतं तेच करत राहायचं. बहुतांश कलावंत लोकांसोबत जाण्याचं ठरवतात. कारण त्यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. खूप मोठ्या वर्गासोबत तुम्ही जोडले जातात. मात्र, काहीजण विशिष्ट वर्तुळात राहणं पसंत करतात. स्वत:ला मनापासून भावणाऱी कला निर्मिती करत राहतात. सातत्याने त्याच वर्तुळात राहिल्याने त्यांना काही तोटे सहन करावे लागतात. पण टिकून राहिल्यावर कालांतराने फायदेही मिळतात. तळागाळातील अस्सल रसिकांपासून हे कलावंत शेकडो मैल दूर असले तरी मिडिआ, अभिजन वर्गावर त्यांची मजबूत पकड कायम असते. ही पकड असण्यामागे अनेक कारणे असली तरी एक महत्वाचे म्हणजे त्यांना विषयाचे उत्तम भान असते. कोणता विषय चर्चेत येऊ शकतो किंवा कोणत्या विषयावर उच्च वर्गात, मिडिआत अधिक चर्चा घडून येऊ शकते, याचा अंदाज त्यांना असतो. त्यामुळे ही कलावंत मंडळी सातत्याने उजळत राहतात. प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, लेखिका, पटकथाकार सुमित्रा भावे, अशाच उजळलेल्या होत्या. त्यांनी अतिशय मनापासून सिनेमाचे माध्यम हाताळले. कोणी सहसा वाटेला जाणार नाही, अशा विषयांना हात घालत स्वत:चे भाव विश्व सर्वांसाठी खुलं केलं होतं. त्यामुळं त्यांचं जाणं क्लेशदायी आहे.
पडद्यावर मांडण्यासाठी सशक्त गोष्ट समाजात घडणाऱ्या, दिसणाऱ्या घडामोडींतूनच उचलण्याची एक अजब शक्ती त्यांच्यात होती. कासव सिनेमातून त्यांनी ते सिद्ध केले. त्यावर राष्ट्रीय पारितोषिकाची मोहरही उमटली. पण त्यापलिकडे ‘हा भारत माझा’ या सिनेमाचं उदाहरण आहे. २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकासाठी दिल्लीत आंदोलन सुरू केलं होतं. बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सहभागी झाला. देशभर एकच धुरळा उडाला. चॅनेलवाले, मिडिआवाले हात धुऊन घेत होते. पण या प्रश्नाचं मूळ काय होतं. अण्णांच्या आंदोलनाचा गाभा काय होता. त्याचा आणि सामान्य भारतीय तरुणाचा काय संबंध होता, याची अतिशय मर्मभेदी मांडणी सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी ‘हा भारत माझा’मध्ये केली होती. त्याचं कथानक असं होतं की, इंजिनिअर होण्याची इच्छा असलेल्या इंद्र सुखात्मे नावाच्या एका मुलाला बारावीत ९० टक्के मिळालेत. आणि प्रवेश ९१ टक्क्यांवर थांबलाय. वडिलांना वाटतंय त्यानं खासगी कॉलेजात पैसे देऊन प्रवेश घेण्यापेक्षा थोडी स्वस्तातली, वेगळी वाट शोधावी. आहे त्यात समाधान मानावं. पण आई म्हणते की, मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे. सरळ मार्गानं जाऊन यशस्वी कसं व्हायचं? भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या भारतात असं यश मिळवता येतं का, असा प्रश्न सुमित्रा भावे यांनी उपस्थित केला होता. त्या सिनेमाला दहा वर्ष होत आली. अजूनही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. सिनेमाचा विषय आजही तेवढाच ताजा आहे. एवढी दूरदृष्टी आणि समाजमनाचे आकलन त्यांच्याकडे होते. सिनेमा पाहून बाहेर पडणारा प्रेक्षक सिनेमाच्या विषयात दीर्घकाळ गुंतून राहिल, अशी क्षमता त्यांच्यात होती, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण त्यातही एक वेगळेपण असे होते की, त्यांची मांडणी सामाजिक प्रश्नांना, विषयाला धरून असली तरीही कुठे त्यात उपदेशाचा सूर त्यांनी लावला नाही. मांडणीचे अवडंबर, अतिशयोक्ती नाही. भपका तर नाहीच नाही. तुमच्या आजूबाजूला जे घडतंय तेच मी तुम्हाला सांगत आहे. असं बीज पेरून त्या कथावस्तूविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडत.
‘संहिता' सिनेमाही असाच वेगळ्या वळणाचा. म्हणजे असा की, चार महिला. त्यातील एक सिनेमा दिग्दर्शिका, दुसरी निर्माती, तिसरी लेखिका आणि चौथी अभिनेत्री. यातल्या दिग्दर्शिकेला मनासारखा शेवट असलेली कथा लिहायची आहे. पण असं शक्य आहे का? चौघींना आपल्या कथेचा शेवट सुखात करता येईल का, या प्रश्नाभोवती सुमित्रा भावेंनी अख्खा सिनेमा फिरवला आहे. त्या सांगत की, माझा स्वतःचा दिग्दर्शक म्हणून प्रवास निराळा असतो. माझ्या सिनेमांची कथा मला इतर कुणी देत नाही. मलाही नुसती स्वतंत्र कथा म्हणून सुचत नाही. तर सगळा सिनेमा डोळ्यांसमोर उलगडल्याप्रमाणे दिसू लागतो आणि मग मी तो कागदावर उतरवते. कथा-पटकथा-संवाद, कला-वेशभूषा इतकंच काय पण कॅमेरा-साऊंड यांच्या सूचनांसह अशी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिते. आधी लिहिले मग अंमलात आणले, असे त्यांचे तंत्र होते. म्हणूनच तर त्या अभिजन वर्गासाठी अनेक दमदार सिनेमे देऊ शकल्या. नव्या पिढीतील लेखक, दिग्दर्शकांसाठी हे तंत्र दिशादर्शक नक्कीच आहे.
Tuesday, 13 April 2021
चांदणी शिशिराची
जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात. एखादी का होईना पणती कोणीतरी धाडसाने पेटवतं. काळ्याकुट्ट काळोख्या अवकाशात एक चांदणी प्रकाशमान होतेच. ही निसर्गाची अद्भुत लीला आहे. मानवी जीवनातही असेच घडत असते. त्याचा अनुभव यंदा जागतिक महिला दिनी बांगलादेशाने घेतला. माणूस म्हणून अस्तित्वच नाकारलेल्या, ना मर्द ना औरत असे म्हणून कायम हिणावल्या गेलेल्या तृतीयपंथीयांच्या जमातीतील तश्नुवा अनान शिशिरने प्रख्यात बौशाखी या न्यूज चॅनेलवर अँकर म्हणून काम सुरू केले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणून तेथील मध्यमवर्गीयांनी या घटनेचे क्रांतीकारी असे वर्णन करत स्वागत केले आहे.
१९४७मध्ये भारत आणि १९७१मध्ये पाकिस्तानातून वेगळ्या झालेल्या बांगलादेशात कट्टरपंथीयांचा धुमाकूळ कायम सुरू असतो. १६ कोटी लोकसंख्येच्या या देशात अल्पसंख्यांकांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना नेहमीच घडतात. धर्मविरोधी लिखाण केल्याचा ठपका ठेवून तस्लिमा नसरीन या प्रख्यात लेखिकेला परागंदा होण्यास भाग पाडणारा देश अशीही एक ओळख आहेच. तेथे २९ वर्षीय तनुश्वामधील उपजत गुणाला, कौशल्याला वाव मिळाला. तिला एक सन्मानाचे काम देण्यात आले, हे महत्वाचे आहे.
घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ
फांदीवर झुलते हिरवी पाऊल धूळ
कानावर आली अनंतातुनी हाक
विसरूनि पंख पाखरु उडाले एक
या प्रख्यात रॉय किणीकर यांच्या ओळींची ‘विसरुनि समाजाचे डंख, पाखरु उडाले एक’ अशी रचना करत तनुश्वाने झेप घेतली आहे. अर्थात हे झेपावणे महाकठीण होते. तिच्या लढाईची सुरूवात घरापासूनच झाली. आपल्या घरात मुलाच्या रुपात मुलगी जन्माला आली आहे, असे कळताच तिच्या माता-पित्यांनी तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अक्षरश: लाथाडून हाकलले. वडिलांनी बोलणेच बंद केले. शेजारी टोमणे मारू लागले. मग तिने ढाका शहरातील एका वस्तीत राहण्यास सुरुवात केली. तेथे पदोपदी होणारा अपमान गिळत लढाईला प्रारंभ केला. अंगी उपजत हुशारी होतीच. त्या बळावर तिने शिक्षण पूर्ण केले. हॉर्मोन बदलाची शस्त्रक्रिया करून तिचे मूळ स्त्री रुप मिळवले. इतर तृतीयपंथीयांसारखे रस्त्यावर भीक मागत जगायचे नाही हे तर तिने ठरवलेच होते. म्हणून तिने स्वत:ला सांस्कृतिक जगात झोकून दिले. नटुआ, बोटोआ नावाच्या दोन कलापथकांमध्ये काम केले. उत्तम नर्तक आणि आवाजावर प्रभुत्वाची देणगी आपल्याला मिळाली आहे, याची जाणिव तिला याच काळात झाली. कला प्रांतातील अनुभव घेतल्यावर तिने सामाजिक क्षेत्राकडे लक्ष वळवले. तरुण, महिलांसाठीच्या संस्थांमध्ये काम करू लागली. बंधू समाजकल्याण संस्था, बांगलादेश मानवाधिकार संघटनेत तिने कर्तृत्वाचा ठसा उमटवला. बांगलादेशात १० हजार तृतीयपंथीय आहेत. पंतप्रधान हसिना शेख यांनी २०१३मध्ये त्यांची स्वतंत्र नोंद करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये मतदानाचा अधिकार दिला. देशाच्या सर्वोच्च नेत्याने दिलेल्या बळामुळे तश्नुवाला आणि तिच्यासारख्यांच्या पाठिशी उभे राहू इच्छिणाऱ्यांना धीर मिळाला. तनुश्वाच्या नेमणुकीसाठी पुढाकार घेणारे बौशाखी चॅनेलचे उपकार्यकारी संचालक टिपू अलोम म्हणाले की, आपल्या पंतप्रधान धाडसी निर्णय घेत असतील तर आपणही काही केले पाहिजे, असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही तनुश्वासोबत आणखी एका तृतीयपंथीयाला नाट्य विभागात नियुक्त केले आहे. बंधू समाजकल्याण संस्थेत दीर्घकाळापासून काम करणारे तनवीर इस्लाम तनुश्वाला पडद्यावर अत्यंत विश्वासाने बातम्या देताना पाहून कमालीचे सुखावले. धर्माच्या पोलादी भिंतीत बंदिस्त बांगलादेशासारख्या देशात असे काही घडणे ही चांगल्या बदलांची सुरुवात आहे, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि ते म्हणाले ते सत्यच असावे. कारण तनुश्वाला नुकतेच दोन सिनेमांसाठी साईन करण्यात आले. त्यातील एका सिनेमात ती फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तृतीयपंथीयांमधील उत्तम नर्तक, अभिनेत्री आणि प्रसारमाध्यमांच्या अभ्यासकांना एक चांगला मंच मिळवून देण्यासाठी ती कार्यरत राहणार आहे. त्यामुळे शिशिराची चांदणी दिवसेंदिवस प्रकाशमान होत राहिल. तिच्यासोबत इतर तारकाही चमकू लागतील. त्यांच्या नशिबात तनुश्वासारखा खडतर प्रवास येऊ नये, एवढीच पुरुष आणि स्त्री म्हणून जन्मण्याचे भाग्य लाभलेल्यांकडून अपेक्षा आहे. अखेर थोडेसे भारत आणि पाकिस्तानबद्दल. भारतात २०१४ मध्ये तमिळनाडूतील लोटस् नामक न्यूज चॅनेलवर पद्मिनी प्रकाश या तृतीयपंथीयाला अँकर म्हणून संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे २०१८मध्ये मर्विया मलिक कोहीनूर या पाकिस्तानी चॅनेलवर झळकली. जगात सदा सर्वकाळ सगळंच काही वाईट घडत नसतं. कुठेतरी आशेची किरणं उगवत असतात, असेच तर तनुश्वा शिशिर, पद्मिनी प्रकाश, मर्विया मलिक सांगत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)