दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.
या प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांची मनोवस्था झाली आहे. कारण त्यांच्या नेत्यांमध्ये नव्या वादाला सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी रामदास कदम यांना पालकमंत्रीपदावरून पायउतार करण्यात खासदार चंद्रकांत खैरे यांना यश मिळाले. थेट मातोश्रीवर जाऊन कदमांचे कदम त्यांनी खेचले. एवढेच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात कोणतेही स्वारस्य नसणारे, औरंगाबाद जिल्ह्याची पूर्ण जहागिरी खैरेंच्या हवाली, असे म्हणू शकणारे डॉ. दीपक सावंत यांची पालकमंत्री वर्णी लावून घेण्यातही खैरे यशस्वी ठरले. त्याचवेळी खैरेंना उपनेतेपदावरून नेतेपदावर बढतीही मिळाली. त्यामुळे आता सारेकाही आलबेल होईल. डॉ. सावंतांना जिल्ह्याच्या सीमेवर ठेवून मनाप्रमाणे राज्य करता येईल, अशी खैरे यांची अपेक्षा होती. पण त्याला अनपेक्षितपणे सुरूंग लागला. डॉ. सावंत यांनी खैरे यांना अपेक्षित असलेले ‘ऑपरेशन निधी’ करण्यास नकार दिला. आणि खैरे खवळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. कदम यांनी पालकमंत्री असताना विकास कामांसाठी निधी वाटप केला होता. त्यात त्यांनी अर्थातच स्वत:च्या समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे बस्तान पक्के बसेल, याची काळजी घेतली होती. पूर्ण निधी वितरित करूनच त्यांनी पालकमंत्रीपदाची वस्त्रे उतरवली होती. त्यानंतर आलेल्या डॉ. सावंत यांनी आधीचे निधी वितरण रद्द करून आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना तो वळता करावा, असा खैरे यांचा आग्रह होता. आधीच म्हटल्याप्रमाणे सावंतांना औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात फारसे स्वारस्य नाही. ते आधी ज्या उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तेथेही ते स्थानिक घडामोडींत हस्तक्षेप करत नव्हते. एवढेच नव्हे तर तिकडे फिरकतही नव्हते. औरंगाबाद हा श्रेष्ठींनी खैरेंना दिलेला सुभा आहे. त्यात ढवळाढवळ केल्यामुळेच कदमांचे पद गेले, याची जाणिव सावंतांना होतीच. शिवाय येथील गट-तट, तंटे-बखेडेही त्यांच्या कानावर होतेच. पण आपल्याच पक्षाच्या एका मंत्ऱ्यांने आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकास कामांसाठी दिलेला निधी आपण आपल्याच पक्षाच्या का होईना दुसऱ्या कार्यकर्त्यांना देणे, म्हणजे चुकीचा पायंडा पाडणे आहे. कोणावर तरी अन्याय करून दुसऱ्याला न्याय कसा देता येईल, असा सवाल बहुधा सावंतांना पडला असावा. म्हणून त्यांनी खैरे समर्थकांना निधी वळता करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवाय ‘या वर्षी झाले ते झाले. ते आता रद्द करण्यात अर्थ नाही. पुढील वर्षीचा निधी येईल. तेव्हा तो आधी तुमच्या समर्थकांनाच मिळेल, अशी व्यवस्था करतो’ असे म्हणते खासदार खैरे यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. पण दोन तपांपेक्षा अधिक काळ औरंगाबाद जिल्हा आणि शिवसेनेवर राज्य करणाऱ्या, कोणाचाही नकार ऐेकण्याची सवय नसलेल्या खैरेंना ते पचनी पडले नाही. माघारी काहीही बोलत असले तरी कोणालाही समोरासमोर दुखावण्याचा खैरेंचा स्वभाव नाही. त्यानुसार त्यांनी डॉ. सावंतांच्या स्वीय सहायकाला फैलावर घेतले. स्वीय सहायकाने ते शब्दश: सावंतांपर्यंत पोहोचवताच मग त्यांचाही पारा चढला. त्यांनी थेट मातोश्री गाठत ‘नको ते औरंगाबादचे पालकमंत्रीपद मला’ असे उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे. उद्धव यांची कार्यपद्धती, स्वभाव लक्षात घेता ते लगेच सावंतांचे म्हणणे मान्य करतील, असे नाही किंवा खैरे यांची खरडपट्टी काढतील, अशीही शक्यता नाही. कारण दोघांनाही दुखावणे त्यांना शक्य होणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीचे वारे तापू लागले आहे. उद्धव यांनी पालकमंत्रीपदावरून कदमांना हटवणे म्हणजे खैरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे संकेतच असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत खैरेंना दुखावणारा किंवा त्यांच्या प्रचारात अडथळा आणणारा, शिवसेनेतील खैरेविरोधी गटाला खतपाणी घालणारा पालकमंत्री औरंगाबाद जिल्ह्यात नको, अशीच उद्धव यांची भूमिका असावी. तरीही केवळ खैरेंना वाटते तेच खरे बाकीचे सगळे झूट, असा संदेश तमाम शिवसैनिकांत जाऊ नये म्हणून ते सावंतांनाही सबूरीचा सल्ला देतील, अशीच शक्यता आहे. अर्थात त्यांनी तसे केले नाही तर आणखी तीन-चार महिन्यात फारच झाले तर लोकसभेच्या तोंडावर शिवसेनेत सध्याच असलेल्या तिफळीची (खैरे गट, जैस्वाल गट, कदम गट) चौफळी होईल. आणि त्याचा फटका पक्षालाच बसेल याविषयी दुमत असणार नाही. कोणताही राजकीय पक्ष म्हटला की त्यात गट आलेच. नेत्यांचे सवते-सुभेही असतातच. त्यात नेत्यांचे फारसे बिघडत नाही. पण सामान्य कार्यकर्त्यांचे हाल होतात. त्यांना नेमके कोणासोबत राहायचे हेच कळेनासे होते. ते सामाजिक कार्यक्रमांतून बाहेर पडू लागतात. हळूहळू पक्षाची बांधणी मुठीतून वाळू निसटल्यासारखी निसटू लागते. शिवसेनेच्या वैचारिक भूमिकांविषयी कितीही मतभेद असले तरी अजूनही औरंगाबाद जिल्ह्यात तळागाळातील शिवसैनिक लोकांना आजही जवळचा वाटतो आणि शिवसैनिकही त्याला जमेल तेवढ्या शक्तीने लोकांच्या मदतीला धावून जात असतो. आता खैरे - सावंत यांचा वाद वाढला तर त्यात शिवसैनिक आणि काही प्रमाणात लोकांचेही नुकसान होते. याचा सारासार विचार उद्धव ठाकरे करतील आणि नेत्यांमधील निधीचे भांडण मिटवतील, अशी अपेक्षा आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांनी तसे केले नाही तर वाळू आणखी वेगात निसटेल, याविषयी कोणाला काही शंका आहे का?
No comments:
Post a Comment