Saturday, 28 April 2018

आणखी यावे ‘परिवर्तन’

कलावंतांना रंगमंचावर येऊन व्यक्तिरेखा साकारल्याचे आणि नाट्य चळवळीत काहीतरी होत असताना पाहण्याचे समाधान रविवारी रसिकांना परिवर्तन संस्थेतर्फे आयोजित शेक्सपिअर महोत्सवात मिळाले. प्रख्यात अभिनेत्री सुजाता कांगो यांनी दिग्दर्शित केलेला या महोत्सवात शेक्सपिअरच्या हैम्लेट, मैकबेथ, ज्युलिअस सीझर, मर्चंट ऑफ व्हेनिस या चार प्रसिद्ध नाटकांतील काही प्रवेश सादर झाले. ते उभे करण्यासाठी कांगो यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यांच्यामुळेच रसिक अखेरच्या क्षणापर्यंत गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात थांबून होते, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. कारण त्यांनी एक अत्यंत अवघड जबाबदारी स्वीकारून ती यशस्वी करून दाखवली. अवघड या अर्थाने की, नाट्य चळवळीतील कोणतेही नाटक उभे करताना त्यातील कलावंत पूर्णवेळ देणारे, हौशी असतील तर दिग्दर्शकाचे काम बरेच हलके होते. पण परिवर्तनने किंवा कांगो यांनी व्यक्तिरेखा उभ्या करण्यासाठी निवडलेले वीसेक कलावंत गुणवंत असले तरी पूर्णवेळ रंगभूमीला वाहून घेणारे नव्हते. त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. अशा विविध व्यवसायात स्थिरावलेल्या वीसेक हौशी, अर्ध व्यावसायिक तंत्रज्ञ, कलावंतांना एकत्रित आणणे. त्यांच्यावर शेक्सपिअरन अभिनय शैलीचा संस्कार करणे. त्यांचे शब्दोच्चारण घोटून घेणे. त्यांचा रंगमंचावरील वावर सहज, सोपा करून घेणे तसे सोपे नव्हते. पण दिग्दर्शिकेने ते करून दाखवले. महोत्सवात सादर झालेल्या सर्वच व्यक्तिरेखा खूप दमदार, टोकदार नसल्या तरी किमान त्यातून कलावंताचे व्यक्तिमत्व समोर आले. लेखकाने जे लिहिले, दिग्दर्शकाने जे सांगितले ते अविष्कृत करण्याची त्याची किती क्षमता आहे, हे रसिकांना कळाले. तसा त्या कलावंताला स्वतःलाही अंदाज आला असावा. म्हणूनही कांगो यांचे कौतुक करावे लागेल. त्यांना दिग्गज नाटककार प्रा. अजित दळवी यांनी मार्गदर्शन केले. तालमींच्या वेळी सूचनाही केल्या. त्याचाही परिणाम सादरीकरणावर झाल्याचे दिसले. नीना निकाळजे, रोहित देशमुख, डॉ. विक्रम लोखंडे, डॉ. अनंत कडेठाणकर, डॉ. प्रणव महाजन, आकाश काळे, अतुल गाडेकर, सुयोग कुलकर्णी, निलेश चव्हाण, अभिषेक देशपांडे,  नीता पानसरे वाळवेकर, चित्रलेखा निकुंभ, तेजस ताम्हाणे यांनी शब्दाभिनयातून पात्रे जिवंत केली. समाधान इंगळे यांचे निवेदन, राजेंद्र जोशी यांचे संगीत, रवी कुलकर्णींची रंगभूषा, नेपथ्य, अविनाश थिगळेंची ध्वनी व्यवस्था उत्तमच होते. आता यात सलग चौथ्या वर्षी हा महोत्सव झाला, हे सर्वात महत्वाचे आहे. कारण 1990 च्या दशकात स्थापन झालेली परिवर्तन संस्था म्हणजे अनेक दिग्गजांचा समूह. त्यात विशिष्ट वर्तुळातील कलावंतांनाच प्रवेश असे समीकरण अनेक वर्षे चर्चेत होते. त्यात अर्थातच फारसे सत्य नव्हते. पण इतर कलावंतांपासून कायम अंतर राखणाऱ्या परिवर्तनच्या काही मंडळींमुळे तशी इमेज तयार झाली होती. ती मोडून काढली जात आहे. सर्व स्तरातील गुणवंतांना सोबत घेऊनच आता औरंगाबादेत चळवळ चालवली जाऊ शकते, हे बहुधा परिवर्तनच्या काही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले असावे. आणि त्याच दिशेने त्यांची पावले पडत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. कारण नाट्यक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची शक्ती परिवर्तनमध्ये आहे. नेमके काय आणि कसे केले पाहिजे. हे सांगू शकणारे प्रा. अजित दळवी त्यांच्याकडे आहेत. नव्या, जुन्या पिढीतील अनेक कलावंत परिवर्तनसोबत काम करणे म्हणजे बहुमान आहे, असे मानतात. पण केवळ कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असल्याने सर्वकाही साध्य होतेच असे नाही. सातत्याने प्रयोग करता येतात, असे नाही. तर त्यासाठी आर्थिक बळ असावे लागते. ते औरंगाबादेतील धनिक आणि रसिक असा संगम झालेल्या रवी खिंवसरा, प्रा. मुनीश शर्मा यांनी उभे केले आहे. त्यामुळे परिवर्तनकडून आता आणखी अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 1980च्या दशकात प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी यांनी जिगिषा संस्था स्थापन केली. अत्यंत अडचणींना तोंड देत नाट्य प्रयोग केले. रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या असतानाच ते मुंबईला निघून गेले. सुनिल पाटील, उन्मेष देशपांडे यांनी जाणिवा ग्रुपमार्फत अनेक वर्षे एकांकिका, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. नोकरी, व्यवसायासाठी पाटील, देशपांडेंनी वेगवेगळ्या दिशा निवडल्या. जाणिवा स्पर्धा थांबल्या. राजू पाटोदकरांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या रंगकर्मी ग्रुपचे अस्तित्व तीन वर्षांसाठीच राहिले. तरीही त्यात त्यांनी साक्षरता, महिला सुरक्षा, पाणी बचत अशा विषयांवर पथनाट्याचे किमान 200 प्रयोग केले. मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, प्रा. डॉ. संजय पाटील देवळाणकर, प्रा. डॉ. राजू सोनवणे अशा अनेकांनी त्यात भूमिका केल्या होत्या. पुढे पाटोदकर सरकारी नोकरीच्या शोधात औरंगाबादबाहेर पडले. मकरंद, मंगेश प्रा. दासू वैद्य यांच्या `देता आधार की करू अंधार` एकांकिकेतून मुंबई प्रवेश करते झाले. प्रा. देवळाणकर बीडच्या केएसके महाविद्यालय तर प्रा. सोनवणे एमजीएमच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. याशिवायही औरंगाबादेत थांबून नाट्य चळवळ चालवण्याची क्षमता असलेल्या इतर काही संस्था होत्या. त्या वेगवेगळ्या कारणांमुळे थांबल्या. पण परिवर्तनची बात काही औरच आहे. त्यांच्याकडे संहिता, कलावंत, तंत्रज्ञ, अर्थबळ, प्रसिद्धी अशी कशाचीही मुळीच कमतरता नाही. पण सातत्य हा कोणत्याही चळवळीचा आत्मा आहे. ते साध्य झाले तर स्थानिक कलावंत, रसिकांच्या जीवनात निश्चितच परिवर्तन घडून येईल. डॉ. सुनिल देशपांडे, प्रा. दळवी, अनुया दळवी, प्रा. मोहन फुले, डॉ. भालचंद्र कांगो, सुजाता कांगो, प्रा. मुनीश शर्मा या दिग्गज मंडळींनी त्याच दिशेने पावले टाकली तर दर महिन्याला एक दीर्घांक, एकांकिका किंवा नाटक, अभिवाचन सहज सादर होऊ शकते. हे खरेच आणि असेच झाले तर चळवळीत बहार येईल. औरंगाबादच्या नाट्य इतिहासात परिवर्तनची नोंद अधिक ठळक होईल. होय ना?

No comments:

Post a Comment