आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सिनेमा दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्याशी संवाद कार्यक्रमासाठी रविवारी म्हणजे २९एप्रिलला सकाळी थोडासा वेळेपूर्वी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात पोहोचलो. तेव्हा तिथे अक्षरशः शुकशुकाट होता. तीन तंत्रज्ञ वगळता चिटपाखरूही नव्हते. जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्यावर आधारित चित्रपट महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या, महागामी गुरुकूलच्या संचालिका पार्वती दत्ता थोड्यावेळाने आल्या. त्यांनाही सभागृहातील सामसूम जाणवली. मग एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, चित्रपट – नाट्य विभागाची धुरा सांभाळणारे शिव कदम, प्रख्यात प्रकाशक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत उमरीकर आले. त्यांनीही अल्प प्रतिसादाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. पण म्हणतात ना की काही ठिकाणी लोक कमी असले तरच कार्यक्रम अधिक रंगतदार होतो. तसेच इथेही झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय उच्च दर्जाची कामगिरी बजावूनही पाय जमिनीवर असलेल्या गोपालकृष्णन यांनी त्यांची विविध विषयांवरील मते अतिशय सौम्य शब्दांत पण ठामपणे मांडली. त्यातील एक मत म्हणजे कला क्षेत्रातील सर्वांसाठी मार्गदर्शक तत्वच होते. ते म्हणजे कठोर साधनेशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे बऱ्याचवेळा विशेषतः नाट्यक्षेत्रात असे होते की, एक-दोन एकांकिकांमध्ये चमकदार कामगिरी होते. बक्षिसेही मिळतात. की लगेच तो कलावंत किंचित फुगून जातो. त्याच अवस्थेत मुंबईला दाखल होतो. तिथे अमाप संधी असल्याने दोन-चार कामे मिळतात आणि त्याच लयीत तो वाटचाल करू लागतो. त्याची प्रगती विशिष्ट उंचीवर जाऊन थांबते. मग काही वर्षानंतर आपले मूळ काय होते, याची शोधाशोध सुरू केल्यावर ते सापडता सापडत नाही. सापडलं तरी हाताला लागत नाही. त्यामुळे प्रारंभीच्या काळात कठोर, सखोल साधना हाच पुढील दीर्घ यशाचा मार्ग आहे. स्वतः अदूर गोपालकृष्णन यांनी ते केले आहे. त्यांच्या अनुभवातून आलेले हे बोल कलावंत मंडळींनी आत्मसात करावे असेच आहेत. त्यांचा दुसरा मुद्दा चर्चेचा, वादाचा ठरणारा आहे. ते म्हणाले की, बॉलिवूडवाल्यांना मुर्ख प्रेक्षक हवे आहेत. आणि बॉलिवूडवाल्यांनी आयटम साँगमधून नृत्यात अश्लिलता आणली आहे. पण बॉलिवूडमध्ये अलिकडील पिढी तर खूप नाविन्यपूर्ण आणि प्रेक्षकांना पुढे नेणारे विषय मांडत आहे. त्याचे प्रमाण कमी असले तरी वर्षागणिक ते वाढत आहे. बरं, गोपालकृष्णन बॉलिवूडवाल्यांवर हल्ला चढवून थांबले असते तर तेही आपण समजून घेतले असते. पण त्यांनी मराठी सिनेमे मात्र खूपच दर्जेदार आणि सकस निघत असल्याचे म्हटले. मराठी इंडस्ट्रीत दरवर्षी निघणाऱ्या सिनेमांची सखोल माहिती घेतली तर ते वरवरचे किंवा मराठी मनाला खुश करण्यासाठी काहीतरी बोलले, असे दिसते. अर्थात लोकांना आवडते ते द्यायचे की लोकांना आवडेलच अशी निर्मिती करायची, अशा दुहेरी फेऱ्यात बहुतांश कलावंत अडकलेले असतातच. हेही त्यांना पुरते ठावूक होते. म्हणून त्यांनी अचूक निर्णय घेण्याचा मार्गही सुचवला. ते म्हणाले की, तुम्हाला स्वतःला जे मनापासून आवडते. त्याच्यातच जीव झोकून द्या. तेच अविष्कृत करत राहा. काही काळानंतर ते लोकांना निश्चितच पसंत पडेल. त्याचा ट्रेंडही प्रस्थापित होईल. आता गोपालकृष्णन यांच्याशी चर्चेतील तिसरा मुद्दा म्हणजे बॉलिवूडमधील आयटम साँगचा. तुम्ही यु ट्युबवर जाऊन ‘इंडियन डान्स इन फॉरेन’ असे सर्च केले. तर इंग्लंड, अमेरिका, फिनलंड, रशिया, स्पेन अशा असंख्य देशातील टॅलेंट स्पर्धेत बॉलिवूडमधील नृत्ये, गीतेच सादर झाली असल्याचे दिसते. केवळ ती सादरच झालेली नाहीत तर त्यांना तेथील रसिक, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बॉलिवूडचा महिमा नाकारण्यात काहीच अर्थ नाही. समांतर चळवळीतील चित्रपटांनी कायम भारतीय समाजाचे एक रुप जगापुढे ठेवले. तर अलिकडील बॉलिवूड सिनेमांनी संपन्न संस्कृती, झगमगता समाज दाखवला. समांतर काय किंवा मसाला काय दोन्ही संपूर्णपणे खरे नाही आणि दोन्ही खोटे नाही. ज्याला जे पाहावेसे वाटते. त्याने ते पहावे. तर मूळ मुद्दा असा की शास्त्रीय, लोकनृत्यांनी भारताची संस्कृती परदेशात नेली. तिची ओळख करून दिली. पण त्यातील वेग, ठेका, चमकदारपणा बॉलिवूडनेच जगाला दाखवून दिला आहे. आणि एकदा दाखवून द्यायचे अन् जिंकायचे आहे, असे म्हटल्यावर त्यात विक्रीचा भाव आला. आणि विक्रीसाठी बाजारात उतरलात की वस्तू आपल्या हातात राहतच नाही. त्यातील मूल्य झपाट्याने घसरत जाते. दिसेनासे होते. त्यामुळेच गोपालकृष्णन यांचा आक्षेप आहे. कोरिओग्राफीच्या नावाखाली तुम्ही अंगप्रदर्शन कसे करू शकताॽ द्विअर्थी शब्दांवर शरीराला प्रचंड झटके का देताॽ तुमची नृत्ये प्रेक्षकांना उद्दीपित करणारीच का असतात, हा त्यांच्या मत मांडणीमागील मूळ गाभा होता. बॉलिवूडवाले काहीही करत असले तरी मूळ प्रवाहातील, भारतीय कलांची जोपासना करणाऱ्यांनी त्यात वाहून जाऊ नये. कारण जेव्हा पुढे कधी मूळ शोधणे सुरू होईल. तेव्हा सर्वांना शास्त्रीय नृत्य, लोकपरंपरांच्या मूळाकडेच यावे लागणार आहे, असे त्यांनी मांडले. आणि याचा खरेच गांभीर्याने विचार झाला पाहिजे. किमान सध्या जी मंडळी नृत्य क्षेत्रात काम करत आहेत. नृत्यांचा आस्वाद घेत आहेत. त्यांनी तर यासाठी निश्चित धोरण स्वतःच्या पातळीपुरते का होईना ठरवलेच पाहिजे. म्हणजे मी डोळ्यांना सुखावणारे, मनाला आनंद देणारेच नृत्य सादर किंवा दिग्दर्शित करेन असे कलावंतांनी ठरवले आणि मी शरीराला झटके देणारे, भावना प्रक्षुब्ध करणारे नृत्य पाहणारच नाही, असे रसिकांनी ठरवले तर हे चित्र हळूहळू का होईना निश्चित बदलेल. कायम नाविन्याचा विचार करत, सर्व प्रकारची टीका झेलत वाटचाल करणाऱ्या महागामीच्या संचालक पार्वती दत्ताही त्यासाठी खूपच आग्रही आहेत. उच्च मूल्यांच्या आधारावरच भारतीय नृत्य कला टिकणार, वाढणार आहे. यावर त्या ठाम आहेत. त्यामुळेच संथगतीने का होईना महागामीचे वर्तुळ विस्तारत आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण निर्मितींना रसिकांची भरभरून दाद मिळत आहे. आता दत्ता यांनी नृत्य क्षेत्रातील सर्वांना हृदयापासून आपुलकी, आदराच्या भावनेने खरेच सोबत जोडले. इतरांसाठीही कायम मदतीची भावना ठेवून ती प्रत्यक्षात आणली तर गोपालकृष्णनांच्या बोलण्यातील सूर महागामीला आणखी बळ देतील. आणि महागामीसारखी उच्च मूल्याधारित, मोठे आर्थिक पाठबळ असलेली संस्था विस्तारत गेली तर त्याने औरंगाबादच्या वैभवातही भर पडेल, याविषयी शंकाच नाही.
Thursday, 3 May 2018
अदूरांचे सूर : ‘महागामी’चे बळ

Saturday, 28 April 2018
आणखी यावे ‘परिवर्तन’
कलावंतांना रंगमंचावर येऊन व्यक्तिरेखा साकारल्याचे आणि नाट्य चळवळीत काहीतरी होत असताना पाहण्याचे समाधान रविवारी रसिकांना परिवर्तन संस्थेतर्फे आयोजित शेक्सपिअर महोत्सवात मिळाले. प्रख्यात अभिनेत्री सुजाता कांगो यांनी दिग्दर्शित केलेला या महोत्सवात शेक्सपिअरच्या हैम्लेट, मैकबेथ, ज्युलिअस सीझर, मर्चंट ऑफ व्हेनिस या चार प्रसिद्ध नाटकांतील काही प्रवेश सादर झाले. ते उभे करण्यासाठी कांगो यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यांच्यामुळेच रसिक अखेरच्या क्षणापर्यंत गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात थांबून होते, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. कारण त्यांनी एक अत्यंत अवघड जबाबदारी स्वीकारून ती यशस्वी करून दाखवली. अवघड या अर्थाने की, नाट्य चळवळीतील कोणतेही नाटक उभे करताना त्यातील कलावंत पूर्णवेळ देणारे, हौशी असतील तर दिग्दर्शकाचे काम बरेच हलके होते. पण परिवर्तनने किंवा कांगो यांनी व्यक्तिरेखा उभ्या करण्यासाठी निवडलेले वीसेक कलावंत गुणवंत असले तरी पूर्णवेळ रंगभूमीला वाहून घेणारे नव्हते. त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. अशा विविध व्यवसायात स्थिरावलेल्या वीसेक हौशी, अर्ध व्यावसायिक तंत्रज्ञ, कलावंतांना एकत्रित आणणे. त्यांच्यावर शेक्सपिअरन अभिनय शैलीचा संस्कार करणे. त्यांचे शब्दोच्चारण घोटून घेणे. त्यांचा रंगमंचावरील वावर सहज, सोपा करून घेणे तसे सोपे नव्हते. पण दिग्दर्शिकेने ते करून दाखवले. महोत्सवात सादर झालेल्या सर्वच व्यक्तिरेखा खूप दमदार, टोकदार नसल्या तरी किमान त्यातून कलावंताचे व्यक्तिमत्व समोर आले. लेखकाने जे लिहिले, दिग्दर्शकाने जे सांगितले ते अविष्कृत करण्याची त्याची किती क्षमता आहे, हे रसिकांना कळाले. तसा त्या कलावंताला स्वतःलाही अंदाज आला असावा. म्हणूनही कांगो यांचे कौतुक करावे लागेल. त्यांना दिग्गज नाटककार प्रा. अजित दळवी यांनी मार्गदर्शन केले. तालमींच्या वेळी सूचनाही केल्या. त्याचाही परिणाम सादरीकरणावर झाल्याचे दिसले. नीना निकाळजे, रोहित देशमुख, डॉ. विक्रम लोखंडे, डॉ. अनंत कडेठाणकर, डॉ. प्रणव महाजन, आकाश काळे, अतुल गाडेकर, सुयोग कुलकर्णी, निलेश चव्हाण, अभिषेक देशपांडे, नीता पानसरे वाळवेकर, चित्रलेखा निकुंभ, तेजस ताम्हाणे यांनी शब्दाभिनयातून पात्रे जिवंत केली. समाधान इंगळे यांचे निवेदन, राजेंद्र जोशी यांचे संगीत, रवी कुलकर्णींची रंगभूषा, नेपथ्य, अविनाश थिगळेंची ध्वनी व्यवस्था उत्तमच होते. आता यात सलग चौथ्या वर्षी हा महोत्सव झाला, हे सर्वात महत्वाचे आहे. कारण 1990 च्या दशकात स्थापन झालेली परिवर्तन संस्था म्हणजे अनेक दिग्गजांचा समूह. त्यात विशिष्ट वर्तुळातील कलावंतांनाच प्रवेश असे समीकरण अनेक वर्षे चर्चेत होते. त्यात अर्थातच फारसे सत्य नव्हते. पण इतर कलावंतांपासून कायम अंतर राखणाऱ्या परिवर्तनच्या काही मंडळींमुळे तशी इमेज तयार झाली होती. ती मोडून काढली जात आहे. सर्व स्तरातील गुणवंतांना सोबत घेऊनच आता औरंगाबादेत चळवळ चालवली जाऊ शकते, हे बहुधा परिवर्तनच्या काही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले असावे. आणि त्याच दिशेने त्यांची पावले पडत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. कारण नाट्यक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची शक्ती परिवर्तनमध्ये आहे. नेमके काय आणि कसे केले पाहिजे. हे सांगू शकणारे प्रा. अजित दळवी त्यांच्याकडे आहेत. नव्या, जुन्या पिढीतील अनेक कलावंत परिवर्तनसोबत काम करणे म्हणजे बहुमान आहे, असे मानतात. पण केवळ कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असल्याने सर्वकाही साध्य होतेच असे नाही. सातत्याने प्रयोग करता येतात, असे नाही. तर त्यासाठी आर्थिक बळ असावे लागते. ते औरंगाबादेतील धनिक आणि रसिक असा संगम झालेल्या रवी खिंवसरा, प्रा. मुनीश शर्मा यांनी उभे केले आहे. त्यामुळे परिवर्तनकडून आता आणखी अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 1980च्या दशकात प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी यांनी जिगिषा संस्था स्थापन केली. अत्यंत अडचणींना तोंड देत नाट्य प्रयोग केले. रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या असतानाच ते मुंबईला निघून गेले. सुनिल पाटील, उन्मेष देशपांडे यांनी जाणिवा ग्रुपमार्फत अनेक वर्षे एकांकिका, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. नोकरी, व्यवसायासाठी पाटील, देशपांडेंनी वेगवेगळ्या दिशा निवडल्या. जाणिवा स्पर्धा थांबल्या. राजू पाटोदकरांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या रंगकर्मी ग्रुपचे अस्तित्व तीन वर्षांसाठीच राहिले. तरीही त्यात त्यांनी साक्षरता, महिला सुरक्षा, पाणी बचत अशा विषयांवर पथनाट्याचे किमान 200 प्रयोग केले. मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, प्रा. डॉ. संजय पाटील देवळाणकर, प्रा. डॉ. राजू सोनवणे अशा अनेकांनी त्यात भूमिका केल्या होत्या. पुढे पाटोदकर सरकारी नोकरीच्या शोधात औरंगाबादबाहेर पडले. मकरंद, मंगेश प्रा. दासू वैद्य यांच्या `देता आधार की करू अंधार` एकांकिकेतून मुंबई प्रवेश करते झाले. प्रा. देवळाणकर बीडच्या केएसके महाविद्यालय तर प्रा. सोनवणे एमजीएमच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. याशिवायही औरंगाबादेत थांबून नाट्य चळवळ चालवण्याची क्षमता असलेल्या इतर काही संस्था होत्या. त्या वेगवेगळ्या कारणांमुळे थांबल्या. पण परिवर्तनची बात काही औरच आहे. त्यांच्याकडे संहिता, कलावंत, तंत्रज्ञ, अर्थबळ, प्रसिद्धी अशी कशाचीही मुळीच कमतरता नाही. पण सातत्य हा कोणत्याही चळवळीचा आत्मा आहे. ते साध्य झाले तर स्थानिक कलावंत, रसिकांच्या जीवनात निश्चितच परिवर्तन घडून येईल. डॉ. सुनिल देशपांडे, प्रा. दळवी, अनुया दळवी, प्रा. मोहन फुले, डॉ. भालचंद्र कांगो, सुजाता कांगो, प्रा. मुनीश शर्मा या दिग्गज मंडळींनी त्याच दिशेने पावले टाकली तर दर महिन्याला एक दीर्घांक, एकांकिका किंवा नाटक, अभिवाचन सहज सादर होऊ शकते. हे खरेच आणि असेच झाले तर चळवळीत बहार येईल. औरंगाबादच्या नाट्य इतिहासात परिवर्तनची नोंद अधिक ठळक होईल. होय ना?
Thursday, 19 April 2018
वाळू आणखी वेगाने निसटेल
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.
या प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांची मनोवस्था झाली आहे. कारण त्यांच्या नेत्यांमध्ये नव्या वादाला सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी रामदास कदम यांना पालकमंत्रीपदावरून पायउतार करण्यात खासदार चंद्रकांत खैरे यांना यश मिळाले. थेट मातोश्रीवर जाऊन कदमांचे कदम त्यांनी खेचले. एवढेच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात कोणतेही स्वारस्य नसणारे, औरंगाबाद जिल्ह्याची पूर्ण जहागिरी खैरेंच्या हवाली, असे म्हणू शकणारे डॉ. दीपक सावंत यांची पालकमंत्री वर्णी लावून घेण्यातही खैरे यशस्वी ठरले. त्याचवेळी खैरेंना उपनेतेपदावरून नेतेपदावर बढतीही मिळाली. त्यामुळे आता सारेकाही आलबेल होईल. डॉ. सावंतांना जिल्ह्याच्या सीमेवर ठेवून मनाप्रमाणे राज्य करता येईल, अशी खैरे यांची अपेक्षा होती. पण त्याला अनपेक्षितपणे सुरूंग लागला. डॉ. सावंत यांनी खैरे यांना अपेक्षित असलेले ‘ऑपरेशन निधी’ करण्यास नकार दिला. आणि खैरे खवळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. कदम यांनी पालकमंत्री असताना विकास कामांसाठी निधी वाटप केला होता. त्यात त्यांनी अर्थातच स्वत:च्या समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे बस्तान पक्के बसेल, याची काळजी घेतली होती. पूर्ण निधी वितरित करूनच त्यांनी पालकमंत्रीपदाची वस्त्रे उतरवली होती. त्यानंतर आलेल्या डॉ. सावंत यांनी आधीचे निधी वितरण रद्द करून आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना तो वळता करावा, असा खैरे यांचा आग्रह होता. आधीच म्हटल्याप्रमाणे सावंतांना औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात फारसे स्वारस्य नाही. ते आधी ज्या उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तेथेही ते स्थानिक घडामोडींत हस्तक्षेप करत नव्हते. एवढेच नव्हे तर तिकडे फिरकतही नव्हते. औरंगाबाद हा श्रेष्ठींनी खैरेंना दिलेला सुभा आहे. त्यात ढवळाढवळ केल्यामुळेच कदमांचे पद गेले, याची जाणिव सावंतांना होतीच. शिवाय येथील गट-तट, तंटे-बखेडेही त्यांच्या कानावर होतेच. पण आपल्याच पक्षाच्या एका मंत्ऱ्यांने आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकास कामांसाठी दिलेला निधी आपण आपल्याच पक्षाच्या का होईना दुसऱ्या कार्यकर्त्यांना देणे, म्हणजे चुकीचा पायंडा पाडणे आहे. कोणावर तरी अन्याय करून दुसऱ्याला न्याय कसा देता येईल, असा सवाल बहुधा सावंतांना पडला असावा. म्हणून त्यांनी खैरे समर्थकांना निधी वळता करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवाय ‘या वर्षी झाले ते झाले. ते आता रद्द करण्यात अर्थ नाही. पुढील वर्षीचा निधी येईल. तेव्हा तो आधी तुमच्या समर्थकांनाच मिळेल, अशी व्यवस्था करतो’ असे म्हणते खासदार खैरे यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. पण दोन तपांपेक्षा अधिक काळ औरंगाबाद जिल्हा आणि शिवसेनेवर राज्य करणाऱ्या, कोणाचाही नकार ऐेकण्याची सवय नसलेल्या खैरेंना ते पचनी पडले नाही. माघारी काहीही बोलत असले तरी कोणालाही समोरासमोर दुखावण्याचा खैरेंचा स्वभाव नाही. त्यानुसार त्यांनी डॉ. सावंतांच्या स्वीय सहायकाला फैलावर घेतले. स्वीय सहायकाने ते शब्दश: सावंतांपर्यंत पोहोचवताच मग त्यांचाही पारा चढला. त्यांनी थेट मातोश्री गाठत ‘नको ते औरंगाबादचे पालकमंत्रीपद मला’ असे उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे. उद्धव यांची कार्यपद्धती, स्वभाव लक्षात घेता ते लगेच सावंतांचे म्हणणे मान्य करतील, असे नाही किंवा खैरे यांची खरडपट्टी काढतील, अशीही शक्यता नाही. कारण दोघांनाही दुखावणे त्यांना शक्य होणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीचे वारे तापू लागले आहे. उद्धव यांनी पालकमंत्रीपदावरून कदमांना हटवणे म्हणजे खैरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे संकेतच असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत खैरेंना दुखावणारा किंवा त्यांच्या प्रचारात अडथळा आणणारा, शिवसेनेतील खैरेविरोधी गटाला खतपाणी घालणारा पालकमंत्री औरंगाबाद जिल्ह्यात नको, अशीच उद्धव यांची भूमिका असावी. तरीही केवळ खैरेंना वाटते तेच खरे बाकीचे सगळे झूट, असा संदेश तमाम शिवसैनिकांत जाऊ नये म्हणून ते सावंतांनाही सबूरीचा सल्ला देतील, अशीच शक्यता आहे. अर्थात त्यांनी तसे केले नाही तर आणखी तीन-चार महिन्यात फारच झाले तर लोकसभेच्या तोंडावर शिवसेनेत सध्याच असलेल्या तिफळीची (खैरे गट, जैस्वाल गट, कदम गट) चौफळी होईल. आणि त्याचा फटका पक्षालाच बसेल याविषयी दुमत असणार नाही. कोणताही राजकीय पक्ष म्हटला की त्यात गट आलेच. नेत्यांचे सवते-सुभेही असतातच. त्यात नेत्यांचे फारसे बिघडत नाही. पण सामान्य कार्यकर्त्यांचे हाल होतात. त्यांना नेमके कोणासोबत राहायचे हेच कळेनासे होते. ते सामाजिक कार्यक्रमांतून बाहेर पडू लागतात. हळूहळू पक्षाची बांधणी मुठीतून वाळू निसटल्यासारखी निसटू लागते. शिवसेनेच्या वैचारिक भूमिकांविषयी कितीही मतभेद असले तरी अजूनही औरंगाबाद जिल्ह्यात तळागाळातील शिवसैनिक लोकांना आजही जवळचा वाटतो आणि शिवसैनिकही त्याला जमेल तेवढ्या शक्तीने लोकांच्या मदतीला धावून जात असतो. आता खैरे - सावंत यांचा वाद वाढला तर त्यात शिवसैनिक आणि काही प्रमाणात लोकांचेही नुकसान होते. याचा सारासार विचार उद्धव ठाकरे करतील आणि नेत्यांमधील निधीचे भांडण मिटवतील, अशी अपेक्षा आहे. पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांनी तसे केले नाही तर वाळू आणखी वेगात निसटेल, याविषयी कोणाला काही शंका आहे का?
Thursday, 12 April 2018
दूधात पाणी तरी टाकू नका
दोन वर्षांपूर्वी तत्कालिन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पेटाऱ्यात कुलूपबंद करून समुद्राच्या तळाशी टाकून दिलेली औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीची समांतर जलवाहिनी योजना पुन्हा बाहेर आली आहे. काही अटी, शर्ती टाकल्याचा भास निर्माण करत कंपनीला ठेका देण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाच्या स्तरावर मुंबईमध्ये पुढील बैठका होतील आणि त्यात तोडगा निघेल. मग कंपनी सर्वोच्च न्यायालयातील दावा मागे घेईल. महिना, दीड महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर पक्षांचे बडे नेते पुन्हा एकदा नारळ फोडतील, अशी व्यूहरचना केली जात आहे. औरंगाबादमधील लाखो लोकांची तहान भागवण्यासाठी आम्हीच हे केले. त्या मोबदल्यात आता मते द्या, अशी आवाहनेही दीड वर्षाने होणाऱ्या निवडणुकीच्या काळात केली जाणार आहेत. श्रेय लाटण्याची तुफान स्पर्धा त्यावेळी सुरू झाली असेल. जायकवाडीपासून फारोळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर जलवाहिनी दिसेल, अशीही व्यवस्था केली जाईल. आणि कदाचित निवडणुका संपताच नवे काहीतरी कारण काढून काम बंद होईल, अशी भिती वाटते. कारण असे यापूर्वी वेगवेगळ्या योजनांत झाले आहे. चुलीवर दुधाचे भांडे ठेवायचे. चुलाणात सर्वांनी मिळून लाकडे टाकायची. दूध भरपूर उकळू द्यायचे. त्यावर मलई आली की ती खाऊन दूधात खूप सारे पाणी टाकायचे. मग नवीन भिडू दुधाचे नवे भांडे घेऊन येणार. चुल पेटवणार असा खेळ कायम खेळला गेला. म्हणूनच तो समांतर जलवाहिनीतही होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आधीच नाशिक, पुणे, नागपूरपेक्षा मागे पडलेले औरंगाबाद आणखी मागे जाईल. सध्याची पिढी तर अन्याय सहन करण्यासाठीच निर्माण झाली असली तरी येणारी पिढी या कारभाऱ्यांना कदापि माफ करणार नाही. म्हणून लोकांची काळजी म्हणून नाहीतर स्वतःचे भवितव्य राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी त्यांच्या इथल्या स्थानिक कारभाऱ्यांना दोन चांगल्या गोष्टी सांगाव्यात. किमान आतातरी लोकांच्या तोंडचे पाणी पळवू नका. मलई खाऊन दूधात पाणी टाकणे थांबवा, असे सांगावे, अशी अपेक्षा आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सेवा देऊ शकत नाहीत. काम करत नाहीत. भ्रष्टाचार करतात, याची अनेक उदाहरणे आहेत. पण त्यातील मोजकीच पुढे आणत काही नागरी सेवा संकटात आल्या आहेत, असे वातावरण निर्माण करायचे. आणि आता लोकांची सेवा करणे तर आपले कर्तव्यच आहे. मनपा प्रशासन त्यात अपयशी ठरत आहे, असे वारंवार सांगून खासगी संस्थेला वाट मोकळी करून द्यायची, असा मार्ग औरंगाबाद शहरात तयार झाला आहे. बरं, केवळ तेवढ्यावर हे थांबत असते तरी काही वाटले नसते. कारण लोकांना शेवटी चांगल्या दर्जाची सेवा हवी असते. ती मिळत असेल तर त्यांचा फारसा आक्षेप राहत नाही. पण महापालिकेचे सर्वच पक्षाचे कारभारी कमी अधिक फरकाने एक चलाखी हमखास करतात. ती म्हणजे खासगी संस्था लोकांच्या किती उपयोगाची आहे, याचा अभ्यास करण्याआधी ती आपल्याला किती मदत करू शकते, याचीच उजळणी करतात. मालमत्ता कर मोजणीची स्पेक, कचरा गोळा करणारी रैम्की, शहर बस वाहतुकीची अकोला मालवाहतूक संस्था अशा सर्वांशी अंधाधुंद व्यवहार करण्यात आला. समांतरमध्ये तेच झाले. कंपनीशी करार करताना त्यात थेंबभरही पाणी न मिळताच लोकांची लूटमार होईल, अशी कलमे टाकून देण्यात आली. त्यासाठीच्या वाटाघाटी करून कारभारी निघून गेले. नवे आले. त्यांनी करारातील त्रुटी शोधून काढल्या. तेव्हा त्यांच्याशी वाटाघाटी करणे कंपनीला शक्य नव्हते. मग करारच रद्द करण्यासाठी बकोरिया, तत्कालिन प्रभारी आयुक्त सुनिल केंद्रेकरांकडे पाठपुरावा सुरू झाला. करार रद्द करण्याचा मार्ग लोकांच्या फायद्याचा असल्यामुळे तो त्यांनी निवडला. ठरल्याप्रमाणे कंपनी न्यायालयात गेल्यावर पुन्हा नवे कारभारी आले. आता त्यांनी न्यायालयात वाद दीर्घकाळ चालेल. त्यात मनपा हरली तर खूप पैसे द्यावे लागतील. लोकांना पाणी कसे मिळणार, असे म्हणत वाटाघाटीचे धोरण अवलंबले आहे. करारात आपली बाजू भक्कम असल्याचे कंपनीला पुरते ठावूक आहे. शिवाय नव्याने काम सुरू करावे लागले तर नव्या कारभाऱ्यांना कार्यपूर्तीचा पूर्ण आनंद द्यावा लागेलच, हेही कंपनीला ठावूक आहे. म्हणून 289 कोटी रुपये वाढवून मिळाले तरच काम करता येईल, असे कंपनीने प्राथमिक प्रस्तावात म्हटले आहे. ती मनपा कदापि देणार नाही, असे महापौर नंदकुमार घोडेले आणि त्यांचे सहकारी सांगत आहेत. त्यातून ते मनपाचे पैसे वाचवत आहेत, असे चित्र निर्माण होत आहे. परंतु, कंपनीला पैसे महापालिका देवो की राज्य शासन. शेवटी ते लोकांच्याच कष्टाचेच आहेत. लोकांनी करापोटी शासनाच्या तिजोरीत जमा केलेले पैसे कंपनीच्या खिशात जातील आणि तेथून ते कोणाकोणाच्या वाट्याला जातील. याच्या वाटा ठरलेल्या आहेत. खरेतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा शासनाचाच विभाग समांतरचे काम करू शकतो. पण वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. काम मिळणार नसेल तर कंपनी माघार घेणार नाही, असे म्हणत प्राधिकरणाचा जीवन मार्ग बंद केला जाणार आहे. या सगळ्या घडामोडीत लोकांसाठी सर्वात महत्वाची आहे ती पाणीपट्टी. चार – पाच दिवसाआड पाणी देऊनही वर्षभराची रक्कम वसूल करण्यास लोकांचा विरोध आहे. जलवाहिनी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने टाको की जीवन प्राधिकरणाने. दोन वर्षांनंतर दररोज मुबलक पाणी मिळावे. आणि मगच पाणीपट्टी वाढवावी, अशी अन्याय, लूट सहन करण्यातच आयुष्य गेलेल्या लोकांची अपेक्षा आहे. ती पूर्ण झाली तरच येणारी पिढी या कारभाऱ्यांना आणि त्यांच्या नेत्यांनाही चुलीवर दूधाचे नवे भांडे ठेवू देईल.
Wednesday, 11 April 2018
गोष्ट मोठी डोंगराएवढी
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात जे सांगितले. ते ऐकून महाराष्ट्राचा सरकारी कारभार कसा चालू असावा, याचा अंदाज सहज येऊ शकतो. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी शेतकरी कुटुंबांचे संरक्षण या विषयावर दोन दिवसांचा मेळावा आयोजित केला होता. त्यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी प्रश्न विचारल्यावर महिला बोलत्या झाल्या. खरे तर सरकारी यंत्रणा निर्ढावलेली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ती इतकी टोकावर पोहोचल्याचे समोर आले एवढेच. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी शेकडो सरकारी योजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. भापकरांनीच पुढाकार घेऊन एक मोहीम गेल्यावर्षी राबवली होती. स्वतः शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना बळीराजाचे प्रश्न मुळापासून माहिती आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्याची ताकद सरकारी योजनांमध्ये आहेत. सर्व विचार करूनच योजना तयार केल्या आहेत. फक्त त्या थेट गरजूंपर्यंत जेव्हा सर्वाधिक गरज असते. तेव्हा पोहोचतच नाही, हे त्यांना लक्षात आले होते. म्हणून त्यांनी अतिशय संवदेनशीलपणे एक मोहीम आखली होती. त्यात पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करून अशा कुटुंबापर्यंत पोहोचायचे आणि दुसऱ्या टप्प्यात वीज जोडणी, घरकुल अशा अनेक योजना मिळवून देणे अशी आखणी केली होती. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वेक्षण झाले. जवळपास पावणेचार हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबापर्यंत पोहोचलो. त्यांची माहिती गोळा केली. त्यांना अमुक तमुक योजनांची गरज आहे, असा अहवाल महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डॉ. भापकरांपुढे ठेवला. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रसारमाध्यमांकडे आकडेवारी जाहीर केली. शिवाय अमुक इतक्या कुटुंबांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून दिला आहे, असेही म्हटले. पण गेल्या वर्षीच्या अखेरीस सरकारी पातळीवर राबवले गेलेले सर्वेक्षण आमच्यापर्यंत आलेच नाही. मग मदतीची योजना पोहोचण्याचा प्रश्नच उद्भवत येत नाही, असं आसवं पुसत शेतकरी पत्नींनी गाऱ्हाणं मांडलं. खरं तर त्याला गाऱ्हाणं म्हणावं का असाही मुद्दा आहे. कारण त्यांच्यातील बहुतांश महिलांना सरकारकडून कोणत्याही अपेक्षाच राहिल्या नव्हत्या. सरकार नावाची यंत्रणा म्हणजे लोकशाहीत लोकांचं नोकर असतं आणि ते थेट गरीबांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठीच असते. त्यासाठी सरकारी नोकरांना बऱ्यापैकी पगार तर मिळतोच. शिवाय वरकमाईही होते, हे त्यांच्यापैकी अनेकांच्या गावीही नव्हते. म्हणून संवेदनशीलतेचा तळ कोरडाठाक झालेली महसूल खात्यातील ही मंडळी कोणत्या मुशीतून तयार झाली असावीत, असा प्रश्न विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनाही पडला असावा. महिलांचे म्हणणे जाणून घेतल्यावर ते व्यथित झाले होते. पण सर्वांसमक्ष आपल्याच खात्यातील लोकांची चूक कबूल करणे शक्य नव्हते. तसे करणे अडचणीचेही ठरले असते. म्हणून त्यांनी त्याचे तात्पुरते उत्तर देऊन टाकले. महसूल खात्यातील काहीजणांनी बदमाशी केली असावी, असे त्यांचे म्हणणे होते. आता चार एप्रिलपासून पुन्हा सर्वेक्षण करण्याचे त्यांनी ठरवले आहे. सरकारी बाबूंनी पुन्हा पहिल्यासारखा घोळ घालू नये म्हणून एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्याचेही त्यांनी जाहीर केले. तातडीचा खुलासा म्हणून डॉ. भापकर यांनी जे सांगितले ते मान्यही करता येईल. महसूलमधील सर्वच मंडळी कामचुकार, संवेदनहीन नाहीत, हेही खरे असावे. पण तेवढ्यावर ते सोडून देता येणार नाही. कारण ही गोष्ट मोठी आहे. डोंगराएवढी आहे. दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या आणि तरीही हार न मारता जीवनाशी झुंजणाऱ्या या महिलांना पूर्ण सरकारी मदत मिळवून देण्याची जबाबदारी डॉ. भापकरांना पार पाडावी लागणार आहे. पण केवळ डॉ. भापकर विभागीय आयुक्त आहेत. म्हणून त्यांनीच हे सर्व पाहावे, असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. कारण शेतकरी हा सर्वांचाच बांधव आहे. पोशिंदा आहे. त्याच्या निराश्रित कुटुंबाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची जबाबदारी महसूल खात्यातील सर्वांचीच आहे. अगदी जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवकाने हे आपले कर्तव्य आहे, असे समजले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नोव्हेंबरमधील सर्वेक्षणात ज्यांनी कुचराई, चालढकल केली. गावात न जाता, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी न बोलताच खोटी माहिती भरून टाकली. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि अशी कारवाई होते की नाही, याकडे विजया रहाटकर यांनी लक्ष दिले. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही राजकारणाचे जोडे बाजूला काढून ठेवत महसूल यंत्रणेवर दबाब ठेवला तर आणि तरच समुद्राएवढे मोठे दुःख ओंजळभर का होईना कमी करण्याचा प्रयत्न केला, असे समाधान त्यांना मिळू शकते.
Wednesday, 14 March 2018
गौरव चालत्या-बोलत्या विद्यापीठांचा
कौतिकराव ठाले पाटील आणि इतर मंडळींमुळे साहित्य क्षेत्रातील वादांमध्ये
मराठवाडा साहित्य परिषद अग्रभागी अगदी टोकावर असतेच. पण वादग्रस्त
वक्तव्यांच्या पलिकडे मसापची कामगिरी झळकत असते. विविध
स्वरूपाच्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मान्यवरांच्या नावाने
कर्तृत्ववान, गुणीजनांना दिले जाणारे पुरस्कार हे मसापचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
खरेच उत्तम कामगिरी करणाऱ्यांना आणि समाजापुढे काही आदर्श ठेवणाऱ्यांची
पुरस्कारासाठी निवड करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. हे विशेष.
आता हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राच्या
नाट्य जगतातील दिग्गज प्रा. डॉ. दिलीप घारे, प्रा. यशवंत देशमुख यांना मसापच्या
वतीने जाहीर झालेला नटवर्य लोटू पाटील पुरस्कार. १२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता
मसापमध्ये होणाऱ्या सोहळ्यात माजी कुलगुरु, प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ
कोत्तापल्ले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तो केवळ
नाट्य जगतातील दिग्गज आणि ज्येष्ठ रंगकर्मींचा नव्हे तर खऱ्या अर्थाने
नाट्यशास्त्राच्या चालत्या बोलत्या विद्यापीठांचाच गौरव असेल.
१९८० च्या दशकात जेव्हा टीव्हीचा नुकताच उदय झाला होता. मुंबई-पुण्यात
नव्या पद्धतीने नाट्य संहिता, सादरीकरणाचा विचार होऊ लागला होता. तेव्हा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची सूत्रे
वऱ्हाडकर प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडेंच्या हातात होती. वऱ्हाडमुळे ते यशाच्या शिखराकडे
निघाले होते. विद्यार्थी घडवण्याचे काम प्रा. अलोक चौधरी, प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब,
प्रा. कुमार देशमुख, प्रा. प्रताप कोचूरे करत होते. विद्यापीठाच्या विभागाला मोठे
वलय असले तरी तो कायम वादाच्या भोवऱ्यात होता. दुसरीकडे सरस्वती भुवन
कला व वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग होता. तेथे
प्रा. घारे, प्रा. देशमुख ही जोडगोळी अक्षरशः विद्यार्थ्यांमध्ये अभिनय, लेखन,
संगीताचा तप्त रस ओतत होती. प्रा. देशमुख म्हणजे विभागाचे अनिभिषिक्त
सम्राट तर प्रा. घारे म्हणजे कल्याणकारी भावना प्रबळ असलेले राजे होते.
दोघांचे ध्येय एकच. मुलांना घेऊन नवनवीन प्रयोग करत राहणे. नाटक
म्हणजे काय नेमकं माहिती नाही. रंगमंचावर कसे उभे राहायचे हेही ठावूक नाही.
तोंडातून एक शब्दही धडपणे बाहेर पडेल तर शप्पथ. अशा अवस्थेतील
मुला-मुलींना अभिनेते, अभिनेत्री, लेखक-तंत्रज्ञ म्हणून घडवण्याचे
शिवधनुष्य त्यांनी त्यावेळी उचलले होते. त्यातून किमान शंभर उत्तम
रंगकर्मी निश्चित निर्माण झाले. रंगभूमीचे जाणकार किती तयार झाले
याची मोजदाद करणे कठीण आहे. आणि त्यापेक्षाही त्यांनी तयार केलेली
संवेदनशील माणसे अफाट आहेत. ते दोघेही विद्यार्थ्यांना सांगत, इथं प्रवेश घेतला
म्हणून तुम्हाला नाट्यकर्मी म्हणून आम्ही घडवूच. पण त्यापेक्षाही जास्त तुम्ही
माणूस म्हणून घडणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. यावरून दोघांच्या दृष्टीचा,
आवाक्याचा आणि त्यांनी उद्दिष्ट ठेवून केलेल्या कामाचा अंदाज येऊ शकतो.
एकांकिका स्पर्धा, युथ फेस्टीव्हल, स्नेहसंमेलनासाठी हे दोघे ज्या तालमी घेत
त्या पाहणे, अनुभवणे म्हणजे एक धडाच असायचा. आवाजाचे आरोह, अवरोह.
विनोदातून निर्माण होणारा ध्वनी, दोन शब्दांमधील मूक आणि बोलक्या जागा.
रंगमंचावरील वावर, संगीताचा लयीत चालणे अशा एकना अनेक असंख्य गोष्टी
ते तालमींमध्येच तयार करून घेत. आणि तालीम झाल्यावर झडणाऱ्या मनमोकळ्या
चर्चा, गप्पांमध्ये माणूस असण्याची काय लक्षणे आहेत, अशी सुरुवात करून ही
लक्षणे पेरत. त्याचा परिणाम असा झाला की, सर्वच विद्यार्थी काही उत्तम अभिनेते,
लेखक, तंत्रज्ञ बनले नाही. पण ते ज्या ज्या क्षेत्रात गेले तेथे त्यांनी वेगळेपण
सिद्ध केले. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा लाभ फक्त त्यांच्या विभागात
असणाऱ्यांनाच मिळाला असे नाही. तेथे सर्वांना खुला प्रवेश होता. खऱ्या अर्थाने
ती मुक्त विद्यापीठे होती. प्रा. देशमुख अचानकपणे सेवानिवृत्ती स्वीकारून पुण्यात
निघून गेल्यावरही अनेक वर्षे प्रा. घारे यांनी अत्यंत जिद्दीने हे काम केले.
दोघांमध्ये अभिनयाच्या अपार क्षमता. गाजराची पुंगी या त्याकाळी प्रचंड
गाजलेल्या द्विपात्री नाटकात ते सिद्ध झालेच. प्रा. देशमुख तर ७० च्या दशकात
मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजवत होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना
औरंगाबादेत यावे लागले. पण त्यांनी त्यांचे मोठेपण कधीच विद्यार्थ्यांवर
लादले नाही. आता अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये गाजत असलेल्या
प्रा. घारेंचा विश्वास कधीच कोणतीही गोष्ट लादण्यावर नव्हताच. त्यामुळे दोघांभोवती
कायम नव्या पिढीचे मोहोळ राहिले. आजही आहे आणि पुढेही कायम राहिल.
या दोघांचे उत्तुंग कार्य काहीसे उशिरा का होईना मसापच्या लक्षात आले,
हेही नसे थोडके. होय ना?

दायाद : ‘नाट्यत्रयी’चा दस्तऐवज
मराठवाड्याचं मागासपण केवळ सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा,
सरकारी नोकऱ्यांपुरते नाही. ते त्या पलीकडच्या मानसिकतेत आहे.
ज्या क्षेत्रात आपण मागास आहोत, त्याची शास्त्रशुद्ध नोंद ठेवण्यातही
मराठवाडा कमालीचा मागास आहे, असा अनुभव येतो. एवढेच नव्हे, तर
जी काही चांगली कामे झाली त्यांचा इत्थंभूत आराखडा, इतिहास, खाचाखोचा
पुस्तकरूपात तयार करण्याचे कामही फारसे झाले नाही. विशेषतः कला प्रांतात
ते ठळकपणे जाणवते. नाटक लोकांना आवडले ना? मग झाले तर. आपले काम
संपले, असे मानणाऱ्यांची संख्या मराठवाड्यात प्रचंड आहे. आपण केलेली
निर्मिती शब्दबद्ध करावी आणि तो वारसा अभ्यासासाठी, आठवणींकरिता
पुढील पिढीसाठी द्यावा, असे वाटणारे बरेच असतील. पण त्यासाठी प्रत्यक्ष
काम करणारे नाहीतच. कारण तसा संस्कार कधी मराठवाड्यात झालेला नाही.
हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे प्रख्यात नाटककार प्रशांत दळवी यांनी
संपादित केलेले दायाद : वारसा ‘वाडा’त्रयीचा हे पुस्तक. महान नाटककार
महेश एलकुंचवार लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित वाडा चिरेबंदी,
मग्न तळ्याकाळी, युगांत या त्रिनाट्यधारेने रंगभूमीवर इतिहास निर्माण केला.
सलग तीन नाट्यप्रयोग एकाच दिवसात, अशी केवळ अशक्य वाटणारी घटना
प्रत्यक्षात आणली गेली. हे कसे शक्य झाले. मुळात वाडा चिरेबंदीच्या पुढे
एलकुंचवारांनी मग्न तळ्याकाठी, युगांत कसे लिहिले. ते कुलकर्णींकडे कसे आले.
कलावंत भूमिकांत कसे शिरले. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसाठी काय
अभ्यास झाला, हे सारे नाट्य रसिकांसमोर पुस्तकरूपातच येणे आवश्यक होते.
आणि तसे कुलकर्णी – दळवींच्या जिगिषा प्रकाशनाने आणले आहे. त्याबद्दल
त्यांचे कौतुक करावे, त्यांना तमाम नाट्यकर्मींतर्फे द्यावेत, तेवढे धन्यवाद
कमीच आहेत. मूळचे मराठवाड्यातील असले आणि मराठवाड्याचे असल्याचा
अभिमान वाटतो, असा दावा ते म्हणजे विशेषतः कुलकर्णी करत असले तरी
मराठवाड्याच्या मुळात असलेले मागास, आळसपण, जाती-धर्म, प्रांतवादात
घुटमळणे त्यांच्यात नाही. औरंगाबादमध्ये काम करत असतानाच
त्यांच्यात व्यावसायिकता कमालीची भिनलेली होती. मुंबईत तर त्यावर
झळाळी चढली. आपल्या भोवतीच्याच वर्तुळाला घेऊनच पुढच्या पायरीवर
पाऊल ठेवायचे, हा शिरस्ता पाळत कुलकर्णी चालत गेले. त्या अर्थाने
दायादमध्ये मांडलेला नाट्यत्रयीचा चित्तवेधक इतिहास म्हणजे त्याचेच
पुढचे पाऊल आहे. संपादक म्हणून प्रशांत दळवी यांनी दायादची अतिशय
आकर्षक मांडणी केली आहे. नाट्यत्रयीला जागतिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या
कुलकर्णींच्या संवादापासून पुस्तकाचा प्रवास सुरू होतो. तो श्याम चौघुले या
नौकानयनपटूंच्या प्रतिक्रियेनं थांबतो. मधल्या पानांवर नेपथ्यकार प्रदीप
मुळ्ये, संगीतकार राहुल रानडे यांच्यासह निवेदिता सराफ, वैभव मांगले,
प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर आदी रंगमंचावर विविध भूमिका साकारणारे
त्यांची प्रांजळ मते नोंदवतात. शिवाय नाट्यत्रीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका
बजावणारे श्रीपाद पद्माकर यांचाही अनुभव वाचण्यास मिळतो. जयंत पवार,
रवींद्र पाथरे, राज काझी, श्रीपाद ब्रह्मे, सुधीर पटवर्धन, विजय तापस या
मुंबई-पुणेकर समीक्षकांनी तेव्हा काय म्हटले होते, हेही कळते. शिवाय भालचंद्र
मुणगेकर, निळू दामले, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, संदीप कुलकर्णी,
सुनील बर्वे, क्षितिज पटवर्धन, प्रा. दासू वैद्य, अनिकेत सराफ यांना नाट्यत्रयीतून
नेमके काय गवसले हेही समोर येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुराधा कपूर यांनी
घेतलेली महेश एलकुंचवारांची १५ पानांची प्रदीर्घ मुलाखत यात आहे. यात एलकुंचवार
यांनी त्यांचे सामाजिक स्थित्यंतराबद्दल मांडलेले चिंतन नाट्यकर्मींसाठी
खूपच उपयुक्त दस्तऐवज आहे. तसेच काहीसे कुलकर्णींच्या लेखात आहे. त्यात त्यांनी
स्वतःतील दिग्दर्शकीय कौशल्याबद्दल ओघवत्या शब्दांत सांगितले आहे. दिग्दर्शक होऊ
इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी त्यांचे ओघवते सांगणे म्हणजे मैलाचा दगड ठरू शकते,
एवढी ताकद त्यात आहे. वाडा आणि नाट्यत्रयीचे प्रयोग केव्हा झाले. कुलकर्णींच्या
दिग्दर्शकीय नोंदी कशा होत्या. प्रदीप मुळ्येंनी नेपथ्य रेखाटन कसे केले होते, असे
अनेक महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात वाचण्यास, अभ्यासण्यास मिळतात. म्हणून
ते पानागणिक सखोल आणि समृद्ध करणारे होत जाते. मुंबईच्या यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत
आणि त्यांचे सहकारी सुबोध जाधव यांनी हे पुस्तक विविध माध्यमांकडे पोहोचवले.
त्यामुळे तेही या अमोल ठेव्याचे मानकरी आहेत. कलाकृतीची टिपणे तयार करणे,
ती जपून ठेवणे, नंतर ती अभ्यासणे. नाटकाची छायाचित्रे, नाटक बांधणीसाठी
दिग्दर्शकाने कागदावर उतरवलेली कॉम्पोझिशन्स, प्रकाश योजनेचे चार्ट हे सारे
म्हणजे नाटकाच्या आयुष्यभराच्या प्रवासाची ऐतिहासिक कहाणी असते.
मराठवाड्यात निर्माण झालेल्या स्मारक, वऱ्हाड निघालंय लंडनला, थांबा रामराज्य
येतंय, गाजराची पुंगी या आणि अशा अनेक नाट्यकृतींनी तर अस्सल इतिहास
निर्माण केला आहे. या प्रत्येकाचा पुस्तकरूपात दस्तऐवज तयार होऊ शकला असता
तर रंगकर्मींच्या विश्वात मोठी भर पडली असती. पण ते मराठवाड्याच्या मागास,
आळशी मनोवृत्तीमुळे शक्य झाले नाही. जे होऊन गेले त्यावर बोलून उपयोग नाही.
म्हणून आता नव्या पिढीने विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून काही
नाट्यकृतींना पुस्तकात आविष्कृत केले तर ती मोलाची कामगिरी निश्चित ठरेल.

Subscribe to:
Posts (Atom)