मराठी माणसाला राजकारण आणि नाटकांत अधिक स्वारस्य. त्यानं दोन्हींचा छान गुंताही करून ठेवला आहे. काही मंडळी त्याचा खुबीने वापरही करतात. पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना पास वर्गात ढकलण्यावरून जे काही सुरू आहे, ते याचं सध्याचं उत्तम उदाहरण आहे. मराठी म्हणवून घेणारा एकमेकाविषयी किती विखारी बोलतो. द्वेषाचा विषाणू किती ताकदीने पसरवू शकतो, हेच यातून लक्षात आले. गेला महिनाभर सत्ताधारी संघटनांचे कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांतील समर्थक भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर तुटून पडले. अगदी कोश्यारींच्या धोतराला हात घालण्यापर्यंत काहींच्या कॉमेंटस् सोशल मिडिआवर होत्या. दुसरीकडं असाच प्रकार भाजप समर्थकांनी केला. त्यांनीही सत्ताधाऱ्यांवर गल्लीबोळातले हल्ले केले. हातची सत्ता गेल्याचे वैफल्य दाखवून दिले. यामुळे सगळ्या घटनाक्रमाकडे तटस्थपणे पाहू शकणाऱ्यांचे बऱ्यापैकी मनोरंजन तर झाले. परंतु, पुढील काळात किमान एक नाटक, दोन सिनेमा आणि दोन बेवसिरीजचा मसाला राजकारण्यांनी लेखक, दिग्दर्शक, कलावंतांना नक्कीच पुरवला. शैक्षणिक पटलावरील एका कादंबरीची बीजे या संघर्षात आहेतच.
सत्ताधाऱ्यांनी काहीही म्हटलं की विरोधकांनी त्याला विरोध करायचा आणि
विरोधकांनी काही सांगितलं तर सत्तेतल्या लोकांनी त्याची खिल्ली उडवायची, ही
सत्तेच्या सारीपाटावरील एक मुव्ह असतेच. त्याचदृष्टीने पास – नापासाची ही लढाई होती.
त्यातील एक मुद्दा होता, दोन वर्षांचे सरासरी गुण पाहून तिसऱ्या वर्गात पास करून
टाकणे. आता त्या अभ्यासक्रमाची इतर कशाशीही तुलना होऊच शकत नाही. त्यात पास
करण्याचे निकष अत्यंत वेगळे आहेत. परीक्षा पद्धतीतही जमिन अस्मानाचा फरक आहे. पण
तरीही हे पाहून अनेक रंगकर्मी, नाट्यकर्मींच्या पोटात नक्कीच गोळा आला असणार.
त्यांना अशी ढकलाढकली कधीच मान्य होणार नाही. काहीही करा पण आमची परीक्षा घ्या.
राज्य नाट्य, कामगार नाट्य, एकांकिका स्पर्धा घ्या. असा त्यांचा आग्रह असेल.
कानाकोपऱ्यातील एकांकिका स्पर्धांना हौस म्हणून हजेरी लावणारे आणि परीक्षकांकडून
अन्याय होतोय, अशी भावना कायम व्यक्त करणारेही स्पर्धा झालीच पाहिजे. आमचं
सादरीकरण पाहिल्याशिवाय, आमची कठोर परीक्षा घेतल्याशिवाय पुढं ढकलू नका, असंच
सांगतील. कारण, रंगमंचावरील स्पर्धा हा
प्रकारच एकेकाळी कठोरतेच्या मुशीत तयार झाला आहे. अनेकांना राज्य, कामगार नाट्य
स्पर्धेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. मराठी रंगभूमीचा इतिहास जेव्हा कधी
मूळापासून आणि विविधांगानी लिहिला जाईल. तेव्हा या स्पर्धांचे
पान सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल. कारण. किमान १५० उच्च दर्जाचे लेखक, तेवढेच दिग्दर्शक आणि दुपटीने तंत्रज्ञ, चौपटीने कलावंत केवळ या
स्पर्धांनी सिनेमा, नाट्यसृष्टीला दिले आहेत. त्यातून विचारी, संयमी, चिंतनशील समाज किती घडला
याची मोजदाद सध्या करणे शक्य होणार नाही. पण राज्य, कामगार नाट्य स्पर्धेने
त्यासाठी आटोकाट प्रयत्न केला एवढा नक्की. आणि मधला काहीसा साचलेपणाचा काळ मागे पडला
आहे. ही स्पर्धा नाविन्याच्या शोधात निघाली आहे. गेल्या काही वर्षांत उत्तम संहिता
आल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई, पुणे, नागपूरपुरती असलेली
मर्यादा या स्पर्धेने मोडीत काढली आहे. अगदी ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील
कलावंतही रंगमंचावर स्वतःची चमक दाखवू शकतील, अशी यंत्रणा राबवली जात
आहे. बाल नाट्यातून छोटे कलावंत आणि छोट्यांसाठी खास लिहिणारे, दिग्दर्शक तयार होऊ लागले
आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी ही स्पर्धा थांबू नये, अशी तमाम रंगकर्मींची मनोमन
इच्छा आहे.
अंबाजोगाईतील रंगभूमीचे विद्यापीठ अशी ओळख असलेले, कालच काळाच्या
पडद्याआड गेलेले प्रा. केशव देशपांडे यांनी काही वर्षांपूर्वी एक महत्वाची गोष्ट
सांगितली होती. ते म्हणाले होते की, नाटकाच्या ग्रुपमधील काही कलावंत
अत्यंत चमकदार कामगिरी करतात. प्रेक्षकांना भावतात. लोकप्रिय होतात. पण काहीजण
मागे पडतात. यश मिळाले तरी ते टिकत नाही. त्यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही माणूस
म्हणून चांगले असाल तर आणि तरच तुमच्यात नवीनतेची उर्जा सातत्याने निर्माण होत
राहते. ती रसिकांना आवडत जाते. म्हणून आपण माणूस म्हणून किती चांगले आहोत, हे कलावंताने सातत्याने
तपासत राहिले पाहिजे. थोडी कमतरता पडली असे वाटले तर ती शोधून दूर केली पाहिजे. प्रा.
देशपांडे यांनी जे सांगितले, ते अंमलात आणण्यासाठी तरुण कलावंत आता अधिक उत्सुक
असतील. त्यांच्याकडे नाटकाची कला जिवंत ठेवण्याचे, कमतरता दूर करण्याचे अफलातून
तंत्र असेलच.
तर मुद्दा असा आहे की, नाटकाच्या सादरीकरणातील चुका कोण दाखवून देणारॽ तर
त्याला परीक्षकाशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे ते गटबाजी करतात. अन्याय करतात. नाटक
न पाहताच मार्क देऊन टाकतात. असे आरोप काही कलावंत करत असले तरी परीक्षाच नको, ढकलाढकली
करा, असं त्यांचं कधीच म्हणणं असणार नाही. फार झालं तर परीक्षेची पद्धत पारदर्शक
करावी. परीक्षकांवर निरपेक्षतेचा दबाब असावा, असा त्यांचा रास्त आग्रह असेल.
कोरोनानं किमान पारदर्शकतेची संधी आणून दिली आहे. रंगकर्मींनी नाटकाचे सादरीकरण
ऑनलाईन करावं. परीक्षकांनी ते घरीच बसून पाहत गुण द्यावेत. आणि नंतर ते सादरीकरण
लगेच यु ट्युबवर उपलब्ध करून द्यावे. त्यावर रसिकांचे एसएमएस मागवावेत. एसएमएसमधून
होणाऱ्या कमाईचा वाटा नाट्यसंघाला द्यावा. म्हणजे पारदर्शक परीक्षण, रसिकांचा
सहभाग आणि थोडेसे अर्थकारणही साधले जाईल. शेवटी सगळी नाटकं करता येतात. पण पैशाचं
नाटक करता येत नाही. होय नाॽ
No comments:
Post a Comment