प्रभा म्हणजे गजबजलेल्या भाजी बाजाराची शान होती असं म्हटलं तर वावगं ठरलं नसतं. भल्या पहाटे ती मोठ्या मार्केटमधून भाज्यांची गाठोडी घरी आणायची. काही भाज्या हातगाडीवर रचून पुतण्या रवीला शहरभर फिरण्यासाठी पाठवायची. मग स्वतः रिक्षात भाजी लादून बाजारात पोहोचायची. हारुनच्या मदतीनं मोठ मोठी गाठोडी उतरवून घ्यायची. तिथं तिच्या नवऱ्याच्या प्रभाकरच्या नावावरील गाळा होता. नवऱ्याकडून फार काही मिळालं नाही. पण गाळा तर पदरात पडला. महिनाकाठी वीस हजार मिळतात, याचं समाधान होतं. प्रभाकर एका कंपनीत कामगार होता. अपघातात हात मोडल्यावर मिळालेले ५ लाख रुपये त्यानं बँकेत गुंतवले. व्याजाच्या पैशातून भिशी सुरू केली. त्याची साखळी चांगली सुरू झाली होती. दर महिन्याला चांगला पैसा येत होता. प्रभा जेवढं खूप मेहनत करून कमावत होती. तेवढं तो घरबसल्या मिळवू लागला होता. रवीची कमाईही वाढत होती. आणि प्रभाची तर गोष्टच काही वेगळी होती. ती पूर्ण भाजी बाजाराची लीडर होती. काही वर्षांपूर्वी तिने कुख्यात गुंड अझीमची भर बाजारात धुलाई केली. त्याच्या हातातला चाकू हिसकावून घेत त्याच्याच मांडीत खुपसला होता. तेव्हापासून प्रभा म्हणजे सगळ्या विक्रेत्यांसाठी जीव की प्राण होती. अनेकजण तिच्या प्रेमातही पडले होते. कारण ती होतीच तशी. जेमतेम तिशीची. काळी-सावळी, तरतरीत, साडेपाच फूट उंची. भेदक डोळे आणि खळखळून, मनमोकळं हसणं. तिच्या गाळ्यासमोर चहाचं दुकान चालवणारा वासुदेव पागल होऊन चालला होता. त्याची बायको वर्षभरापूर्वी निर्वतली. तेव्हापासून तर प्रभाशी आपले सूत जुळले आहे, असे स्वप्न तो पाहायचा. पण प्रत्यक्षात सांगण्याची कधीच हिंमत होत नव्हती. तसे तिच्याशी त्याचे संबंध अगदी चांगले होते. प्रभाकरचा अपघात झाला. तेव्हा त्यानं पैसे दिले. दवाखान्यात तो त्याची विचारपूस करण्याच्या निमित्ताने तिला पाहायला जायचा. पण वासुदेव एकटाच तिच्या मागं लागला होता, असं नाही. शेजारचा गाळेवाला हारुन, भाजी मार्केट समितीचा अध्यक्ष फुलचंद, नगरसेवक लक्ष्मीकांत तिच्या आशेवर होते. त्यातल्या त्यात हारुनचा आणि तिचा आठ वर्षांतील सहवास अधिक होता. तो तिच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जात होता. त्याचे घरी येणे-जाणेही होते. ते प्रभाकरला कधीच खटकले नाही. कारण प्रभाच्या वागण्या-बोलण्यातील मोकळेपणा म्हणजे प्रेम नाही, याची त्याला पक्की खात्री होती. पण तारुण्याच्या उंबरठ्यावरील रवीला प्रभाचं हारुनसोबत राहणं, फिरणं, बोलणं कमालीचं खटकत होतं. तिच्या डोळ्यात, मनात हारुनबद्दल प्रचंड प्रेम आहे, असं त्याला ठामपणे वाटत होतं. काकी, त्याच्यापासून दूर राहा, असं त्यानं एकदा म्हणूनही टाकलं. तिनं परक्यांशी कामापुरतंच बोलावं, अशी त्याची तीव्र भावना होती. पण प्रभाला ते मुळीच मान्य नव्हतं. माझ्याकडं कायम संशयानं पाहणारी तुझी नजर, विचार बदल, असं ती उसळून, रागारागात म्हणायची. पण ते मुळीच खरं नव्हतं. हारुन हाच आपला सखा, मित्र, जीवाचा जिवलग आहे, अशी तिची भावना होती. त्याची कजाग बायको माहेरीच राहते. हाच दोन चिमुकल्यांचा सांभाळ करतोय आणि प्रभाकरकडून आपल्याला कधीच मूल मिळणार नाही, हे कळाल्यावर तर प्रेम उसळू लागलं होतं. त्याच्यासाठी ती हमखास टिफिन घेऊन यायची. दुपारी दोघं एकत्रच जेवायचे. दोन-तीनदा त्यांना सिनेमा थिएटरात राजरोस चिटकलेले पाहून वासुदेव कळवळला. प्रभा कितीही लपवत असली तरी हे प्रेम प्रकरण प्रत्यक्षात येणार, हे त्याला स्पष्टपणे लक्षात आले. धुमसत त्यानं ही माहिती फुलचंदला दिली. ज्या गुंडाला एकेकाळी प्रभानं धडा शिकवला तो अझीम म्हणजे हारुनचा दूरचा भाऊ आहे, असंही सांगितलं. पण ‘अशा बाईमध्ये फार गुंतणं चांगलं नाही.’ असा सल्ला देऊन त्यानं वासुदेवला रवाना केलं. प्रसंग येईल तेव्हा प्रभाला आपण आपलं प्रेम सिद्ध करून दाखवू. तिच्यावर कोणतंही संकट कोसळलं तरी मदतीला धावून जाऊ, असं मनाशी म्हणत तो फुलचंदच्या बंगल्यातून बाहेर पडला. प्रभाकडं नुसतं शरीर नाही. तर भरपूर पैसाही आहे. त्यामुळं फार घाई करून चालणार नाही, हे फुलचंदला माहिती होतं. तर नगरसेवक लक्ष्मीकांतची नजर प्रभाचं शरीर, पैसा आणि गाळा शिवाय प्रभाकरकडच्या पैशावर होती. एकूणात सारे प्रभाभोवती फिरत होते. तरीही भाजी बाजारपासून एक किलोमीटरवर असलेल्या कचऱ्याच्या ग्राऊंडवर प्रभाचा मृतदेह सापडला. इन्सपेक्टर दावणेंनी धागे जुळवणे सुरू केले. आणि खुनी शोधला. कोण असावा तोॽ
No comments:
Post a Comment