पंचविशी पार केलेला निशांत म्हणजे केएलआर फायनान्स कंपनीतील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व होते. कारण हसतमुख चेहऱ्याचा निशांत सर्वांच्या मदतीला तयार असायचा. कंपनीचे स्थानिक प्रमुख अदिल खान यांच्यासाठीही तो अत्यंत महत्वाचा व्यक्ती होता. कितीही अडचणीचे काम असो निशांतला सांगितले तर ते होऊन जाईलच. किमान त्यातील निम्मे अडथळे हा तरुण एकटाच दूर करेल, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते त्याच्यावर मोठ्या जोखमीच्या जबाबदाऱ्या सोपवत. कधी रात्री-बेरात्री पाच-दहा लाखांची रोख रक्कम घरी घेऊन जाताना ते निशांतला हमखास कारमध्ये सोबत घेत. अशा या तरुणावर कंपनीतील मुली जीव टाकत नसतील तरच नवल. समिधा आणि नेत्रा त्याला येता-जाता निरखून बघत. कधी-कधी ‘आम्हीपण इथंच काम करतो’ असे टोमणेही मारत. दोघींनी त्याला वेगवेगळे गाठून आडपडद्याने जीवनसाथी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण निशांतने त्यांना फारसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यामागे त्या मुली त्याला आवडल्या नव्हत्या, असे नव्हते. पण तो आई-वडिलांचा एक आज्ञाधारक मुलगा होता. त्यातल्या त्यात अपंग आई म्हणजे त्याचा जीव की प्राण होती. तिच्यामुळेच आपल्याला शिक्षणाची गोडी लागली. तिने सारखा धोशा लावून लहानपणी आपले गणित पक्के करून घेतले. त्यामुळेच फायनान्स कंपनीत नोकरी मिळू शकली. वडिलांनी कधीही लाड, कौतुकात कमतरता ठेवली नाही. कायम भक्कमपणे ते पाठिशी उभे राहिले. कॉलेजात असताना झालेल्या जीवघेण्या अपघातात वडिलांनीच आपली सेवा केली. मृत्यूच्या दारातून खेचून आणले. आता ते अधूनमधून बिछान्यावर खिळतात. त्यामुळे सून म्हणून घरात येणारी मुलगी आई-वडिलांची सेवा करणारीच हवी, असे त्याने ठरवले होते. समिधा, नेत्रा स्वभावाने चांगल्या, दिसण्यास आकर्षक असल्या तरी वृद्ध माता-पित्यांची सेवा करणे दोघींच्याही रक्तात नाही, असे त्याला ठामपणे वाटत होते. म्हणून त्याने आई-वडिलांनी सुचवलेले मधुराचे स्थळ एका क्षणाचा विलंब न लावता स्वीकारून टाकले. अर्थात त्याला मधुरा आवडली नव्हती, असे नव्हते. उलट पदवीधर असलेली, धारदार नजरेची, अत्यंत शांत व्यक्तिमत्वाची ही मुलगी आपल्याला खरी साथ देईल, असे त्याला वाटले. तिचे आई-वडिलही अत्यंत साधे, सरळ. लग्नाचा बार उडाला. अदिल खान यांनी गोव्यात आठ दिवस मधुचंद्राची व्यवस्था केली होती. निशांत उत्साहाने पत्नीला घेऊन गेला. पण तीन दिवसांतच हे जोडपे परतले. कारण समुद्री वातावरण पचत नसल्याचे मधुरा म्हणू लागली होती. त्यानंतरच्या काही दिवसांत निशांतला जाणवू लागले की, माता – पित्यांची सेवा अतिशय मन लावून करणारी मधुरा शांत नव्हे तर अत्यंत अबोल आहे. एवढंच नाही तर तिला कोणत्याही विषयांवर आपल्याशी बोलण्यात काहीच स्वारस्य नाही. ती अत्यंत तुटक वागते. पण हळूहळू होईल सगळं सुरळित. तिला गावात रोज कुठेतरी फिरायला घेऊन जात जा, असं अदिल खान यांनी सांगितलं. मग त्यानं तो प्रयोग सुरू केला. मग ती खुलू लागली. थोडं थोडं बोलणं सुरू झालं. एक दिवस असेच ते बाहेर पडले. आणि निशांत गायब झाला. आम्ही दोघे भेळ खात असताना कोणाचा तरी आवाज आला म्हणून ते गेले. असे तिने त्याच्या आई-वडिलांना सांगितले. तीन दिवस वाट पाहून निशांतचा पत्ता लागत नसल्याने अदिल खान यांना सांगून आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. निशांतला आवाज देणारा कोण होता, हे खरंच मला माहिती नाही, असं मधुरानं वारंवार, ठामपणे सांगितल्याने पोलिस इन्सपेक्टर बनसोडे चक्रावले. त्यांनी थोडा तिच्या पूर्वायुष्याचा मागोवा घेतला. तेव्हा तिच्या माहेरच्या घराशेजारी राहणाऱ्या बलरामसोबत तिचे अतिशय मित्रत्वाचे संबंध होते. पण त्यात प्रेमाचा अंश नसावा, असं खबऱ्यांचं म्हणणं होतं. निशांत गायब झाला त्या दिवशी बलराम त्याच्या गॅरेजमध्येच काम करत होता, असं त्याच्याकडचे कर्मचारी सांगत होते. समिधा, नेत्रा ‘आमचा काय संबंध’ असं म्हणत होत्या. मग कोणी केलं असावं निशांतला गायब? त्याचा मृतदेह का सापडत नाही? इन्सपेक्टर बनसोडेंसमोर गुंता वाढला.
No comments:
Post a Comment